नीरजा

सत्ता म्हणजे केवळ कुरघोडी नसते, सत्ता म्हणजे केवळ ओरबाडणं नसतं, सत्ता म्हणजे केवळ द्वेषाचं पीक काढणं नसतं, युद्ध करणं किंवा साऱ्या जगाला वेठीला धरणं नसतं तर आपल्या प्रजेला सर्वार्थानं गत्रेतून वर उचलून काढणं असतं. आणि तसं जर होत नसेल तर अस्वस्थ व्हायला हवं, सावध व्हायला हवं..

माणसांचे आवाज येताहेत बाहेर. लोक उभे आहेत तयारीत हातात फटाक्यांच्या माळा घेऊन, गुलालाची पोती आणली जाताहेत आणि फुलांच्या माळा, पाकळ्या, टोपल्यांमध्ये पहुडल्यात वाट पाहात त्या क्षणाची. कोणाच्या गळ्यात पडायचं आहे नेमकं माहीत नाही त्यांना. गुलालाला माहीत नाही कोणावर उधळला जाणार आहे तो आणि फटाके विचार करताहेत कोणत्या शोभायात्रेत पेटवलं जाणार आहे नेमकं त्यांना.

आणि मी उद्याच्या काळजीनं आत आत शिरतेय खोल इतिहासात! आठवते आहे इतिहासातले अनेक क्षण युद्धाचे, आठवते आहे एक-एक प्रांत पादाक्रांत करत जाणाऱ्या त्या जुन्याजाणत्या राजांना, सिकंदर, नेपोलियन, सम्राट चंद्रगुप्त, अशोक यांसारख्या जेत्यांना. आठवते आहे त्यांच्या राज्याभिषेकाचे सोहळे, त्यांच्या डोक्यात चढलेल्या सत्तेची नशा दिसू लागते मला. त्या नशेत प्राण घेतलेल्या अनेकांचे आक्रोश घुमत राहतात कानात. पण त्याचवेळी यातील अनेकांना झालेल्या पश्चात्तापाचे धीरगंभीर स्वरही ऐकू येतात पुरातन वास्तूतील कोळिष्टकांच्या पडद्याआडून.

सत्तेची लालसा कशी असते नेमकी? कधी संपूर्ण भूमी पादाक्रांत करण्याची स्वप्नं घेऊन जगतात माणसं, तर कधी एखाद्या धर्माच्या नावानं पसरवत जातात आपल्या सत्तेच्या सीमारेषा. कधी शिरकाण करत एखाद्या वंशाचे नायक होऊ पाहातात इतिहासात. तर कधी व्यापू पाहतात अवघं अवकाश आपल्या अक्राळविक्राळ पंजात गच्च धरून ठेवत जगाच्या नकाशालाच. काही तर आपल्या क्रूर, महत्त्वाकांक्षी चेहऱ्यावर चढवतात मुखवटे सौहार्दाचे, देशप्रेमाचे, गातात गाणी आपल्या अभावाच्या जंगलात वणवणण्याची आणि ताब्यात घेतात लोकांची विचार करण्याची शक्तीच. सत्तेच्या जवळ पोचण्यासाठी केलेल्या क्लृप्त्यांनी भरलेल्या जगण्याचा व्हावा इतिहास अशी स्वप्नं पाहत विराजमान होतात सिंहासनावर.

खरं तर सत्ता कोणाच्याही गळ्यात माळ घालू शकते. अजाणतेपणी आपल्या बापालाच ठार मारून आपल्या आईशी लग्न करून राजा झालेल्या इडिपसच्या गळ्यात किंवा भावाच्या कानात विष ओतून त्याच्या बायकोला राणी बनवणाऱ्या क्लॉडिअसच्या गळ्यातही ही माळ पडू शकते. ती जशी एखाद्या राजपुत्राच्या गळ्यातला हार होते तशी रस्त्यानं चालणाऱ्या एखाद्या सामान्य माणसाच्याही डोक्यावर बसू शकते मुकुट होऊन. लोकशाहीत तर प्रत्येकाचा हक्क असतो या सत्तास्थानावर पोचण्याचा. एखाद्या राजघराण्यातल्या व्यक्तीचा जेवढा हक्क असतो तेवढाच हक्क असतो तळागाळातून वर आलेल्या माणसाचा. खरं तर आपला बहुतेक सगळा इतिहास वेगवेगळ्या घराण्यांचाच आहे. मग तो सातवाहनांचा असो, मौर्याचा असो, मुघलांचा असो, मराठय़ांचा असो की पेशव्यांचा. त्या त्या राजवटीतल्या राजांच्या थोरल्या पुत्राच्या हातीच तर असायचे बऱ्याचदा या सत्तेचे दोर. पण भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि पहिल्यांदाच लोकांनी, लोकांसाठी, लोकांमार्फत केलेलं राज्य आलं. लोकशाहीत घराणेशाही नामंजूरच असते. म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत या राजकीय घराणेशाहीविरोधात बोलत राहिलो आपण. पण दुर्दैवानं असं बोलत बोलत, या घराणेशाहीविरोधात आवाज उठवत पुढे गेलेले आणि सत्तेत आलेले लोकही आपल्या तिसऱ्या पिढय़ा आणायला लागलेच राजकारणात, देशातही आणि अगदी प्रत्येक राज्यातही!

खरं तर सत्ता म्हटलं की आपल्या मनात पहिला विचार येतो तो राजकीय सत्तेचा. राजकारणाचा, सत्तेच्या बळावर मुजोर बनलेल्या राजकीय नेत्यांचा, सत्तेच्या बळावर नवा इतिहास रचू पाहणाऱ्या राजकीय पक्षांचा. किंवा कोणतीही भूमिका नसलेल्या किंवा भूमिका आहे असं भासवून संधीचा फायदा घेऊन पक्षबदल करणाऱ्या उमेदवारांचा. अगदी खालच्या पातळीवर चाललेल्या साटमारीचा. पण सत्ता म्हणजे केवळ राजकारण आणि राजकीय पक्ष नसतात. ती व्यापून राहिलेली असते साऱ्या जगण्यालाच. सत्तेचा अनुभव आपण घेऊ लागतो तो अगदी जन्मल्यापासून. ती असते ज्या कुटुंबात तुम्ही जन्माला येता त्या कुटुंबात, तुमच्या शाळेत, महाविद्यालयात. एवढंच नाही तर ती असते तुमच्या मित्रांच्या गोतावळ्यात, आजूबाजूच्या परिसरात, वाडी-वस्तीत. तुमच्या जगण्याच्या प्रत्येक वळणावर या सत्तेचा अनुभव यायला लागतो. अर्थव्यवस्थेतील, धर्मव्यवस्थेतील, समाजव्यवस्थेतील आणि नोकरशाहीतील सत्ताही हळूहळू तुमचं आयुष्य व्यापायला लागते. कधी कधी तर तुमच्या नकळत हातात आलेली सत्ता भोगायला लागता तुम्ही. मग ती सत्ता कुटुंबानं दिलेली असो, नोकरीतल्या अधिकारानं दिलेली असो की समाजातल्या वेगवेगळ्या उतरंडींनी दिलेली असो.

या अशा जगण्यातल्या प्रत्येक थांब्यावर भेटत राहणाऱ्या सत्तेविषयी चर्चा व्हावी म्हणून रायगड जिल्ह्य़ातील माणगाव येथील ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारका’नं या वर्षीच्या युवा छावणीचा विषय ठेवला होता ‘सत्ता’. राजकारणाबरोबरच धर्मकारण, अर्थकारण, कुटुंब, समाज, जात, लिंग, पर्यावरण या सगळ्यांना व्यापून असलेल्या सत्तेविषयी खुली चर्चा व्हावी आणि आजच्या तरुणाईला या वेगवेगळ्या पातळीवरच्या सत्तांचंही आकलन व्हावं या हेतूनं वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना माणगावच्या या ३६ एकर जागेत आमंत्रित करण्यात आलं. १८ ते २५ वयोगटातील पन्नासेक मुलं आणि त्यांच्या समोर बोलण्यासाठी राम पुनयानी, प्रा. नीरज हातेकर, प्रा. मृदुल निळे,

प्रा. आनंद पवार, सामाजिक कार्यकर्त्यां उल्का महाजन, भीम रासकर,  संविधानाची मांडणी करणारे सुभाष वारे अशी मान्यवर मंडळी वेगवेगळ्या सत्तांविषयी बोलली. तेव्हा इंटरनेट, फेसबुक किंवा वॉट्सअ‍ॅपवरून फिरणाऱ्या मेसेजच्या बाहेर एक विचार करायला लावणारं जग आहे आणि आपण या जगाचे एक विचारी नागरिक आहोत याचं भान मुलांना आलं. पत्रकार युवराज मोहिते त्यांनी सत्तेविषयी लिहिलेल्या या कवितेत अतिशय मार्मिक पद्धतीनं या सत्तेचं स्वरूप स्पष्ट केलं होतं. या कवितेत ते म्हणतात,

सत्ता म्हणजे पक्ष, पद,

राजकारणातला खेळ नाही

सत्ता असते अर्थकारण, समाजकारण,

धर्मकारणातही

सत्ता असते व्यक्ती, कुटुंब, परिसर,

गल्ली, मोहल्ल्यातही

सत्ता असते जंगल, जमीन, पाणी,

साधनसंपत्तीतही

सत्ता असते भाषा, रेषा, लिंग, रंग,

वर्ण, जाडी, रुंदीची

सत्ता असते इतिहास, भूगोल, शास्त्र,

तंत्र, मंत्र, ग्रंथांची

सत्ता जन्मते भेदाभेद, हिंसा,

तिरस्कार, हाहाकार, युद्ध..’

सत्तेचा सोस माणसाला कुठं घेऊन जातो नेमका. अस्पृश्याच्या गळ्यात युगानुयुगाचं मडकं अडकवून ठेवते ही सत्ता आणि काळ्या रंगाला गोऱ्या रंगापासून कायमचं दूरही ठेवते. ती मालकी हक्काच्या गोष्टी करायला शिकवते पुरुषाला आणि बाईला पायातली वहाण समजायला लागते. समाजव्यवस्थेतील अनेक उतरंडीवर विराजमान झालेली ही सत्ता निर्माण करते वेगवेगळ्या प्रकारचे भेदाभेद, मग ते जाती धर्मातील असोत, लिंगभावावर आधारलेले असोत, प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांच्यातील असोत, आर्थिक विभागणीवर आधारलेले असोत की शिक्षणव्यवस्थेतील आजच्या उतरंडीवरील असोत.

ही सत्ता समाजात प्रत्येक पातळीवर कशी काम करते याचं अतिशय सुंदर प्रात्यक्षिक पाहायला मिळालं ते या शिबिरात पहिल्याच दिवशी खेळल्या गेलेल्या ‘पॉवर गेम’मध्ये. या खेळात इथं आलेल्या शिबिरार्थीचे तीन गट केले गेले आणि त्यांना वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या मूल्यदराची नाणी देऊन एकमेकांशी व्यवहार करायला सांगितले आणि या व्यवहारात जास्तीत जास्त नाणी मिळवणाऱ्याला बोनस गुणही देण्यात येण्याची ग्वाही देण्यात आली. हा व्यवहार एकमेकांशी हात मिळवूनच करायचा होता. व्यवहाराची बोलणी सुरू केल्यावर तो व्यवहार अर्धवट सोडायचा नाही तर पूर्ण करायचा आणि सहकाराच्या भावनेनंच तो पूर्ण करायचा, असंही सांगितलं गेलं. या खेळाचे काही नियम होते आणि ते तोडेल त्याला दंड आकारण्यासाठी या शिबिरातले कार्यकत्रेच निरीक्षक म्हणून नेमले गेले. खेळाला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत काही मुलं कफल्लक झाली तर काही श्रीमंत. कार्यकर्त्यां निरीक्षकांच्या  हातात दंड आकारण्याचा अधिकार असल्याने ते जास्तीत जास्त दंड आकारत शिक्षा करण्यातच रमून गेले. एक दोन मुलांना तर दंड करून-करून निरीक्षकांनीच कफल्लक केलं. पहिल्या फेरीत ज्यांनी जास्त मूल्यदराची नाणी मिळवली त्यांचा वेगळा गट केला गेला. ज्यांनी सगळ्यात कमी नाणी मिळवली त्यांचा वेगळा गट केला गेला. आता ज्या गटाकडे जास्त पैसे होते त्यांना नियम बनविण्याचे अधिकार दिले आणि चित्र बदलत गेलं. यापुढचा व्यवहार हा दुसऱ्या गटाशी किंवा त्या त्या गटातील मुलांनी आपापसातही करायचा नाही तर फक्त आमच्या गटाशीच करायचा असा नियम या आर्थिकदृष्टय़ा वर गेलेल्या गटानं दुसऱ्या दोन गटांसाठी केला. आपली हुशारी दाखवत हळूहळू पुढच्या दोन फेऱ्यांत गरीब असलेली काही मुलं जास्त मूल्याची नाणी मिळवून पहिल्या गटात गेली आणि आधी आपल्या अधिकारांसाठी भांडणारी ही मुलं वरच्या गटात गेल्यावर त्यांची भाषा बोलत मिळालेल्या अधिकारांचा फायदा घ्यायला लागली.

हा सगळा खेळ शेवटी चच्रेसाठी घेतला तेव्हा अनेकांच्या लक्षात आलं की आर्थिक सत्ताच नाही तर कोणतीही सत्ता आपल्या हातात आली की आपण आपले अधिकार चुकीच्या पद्धतीनं वापरतोच पण त्याचं समर्थनही करायला लागतो. स्वत:चा जास्तीत जास्त फायदा करतानाच दुबळ्या झालेल्या गटाला आपलं अंकित करण्याची आणि त्यांच्यावर असंख्य मर्यादा घालण्याची आस अनावर होत जाते. मग ती समाजात असो, कुटुंबात असो की अगदी आपापल्या समुदायात असो. या सात दिवसात आणखी दोन खेळ खेळले गेले. त्यात सामाजिक प्रश्नांसाठी लढणारे आंदोलक आणि सरकार यांच्या सामन्याचा आणि प्रत्यक्ष निवडणुका घेण्याचा खेळ होता. स्वत:च्या गटासाठी पक्ष निवडण्यापासून उमेदवारी अर्ज भरून मतदान व त्याचे निकाल येण्यापर्यंत सर्व गोष्टी मुलांनी केल्या.

या सगळ्या गोष्टीतून जाताना आंदोलन थांबवण्यासाठी सरकारनं काय केलं, सरकार आणि आंदोलकांनीही कोणत्या चुका केल्या आणि निवडणुकीत कोणते डावपेच वापरले, यावर मुलं विचार करायला लागली आणि मुख्य म्हणजे आत्मपरीक्षण करायला लागली. ही सारी मुलं आजचे मतदार आहेत. आपण कोणत्याही बाजूला असलो तरी कितपत हिंसक होऊ शकतो याचा अंदाज त्यांना आलाच पण त्याचबरोबर आपण सत्ता मिळविण्यासाठी कोणत्या पातळीवर जाऊ शकतो याचाही अंदाज आला. मुलं अस्वस्थ झाली. एवढे दिवस घरात बसून राजकारण्यांना, धनाढय़ांना, मुजोर नोकरशाहीला दोष लावणारी ही मुलं हातात सत्ता आल्यावर आपल्यावरही ती कशी स्वार होऊ शकते याचा विचार करायला लागली आणि प्रचंड अस्वस्थ झाली. हळूहळू स्वत: केलेल्या चुका, वापरलेले महत्त्वाकांक्षी, मूल्यविरहित डावपेच यांविषयी बोलू लागली. स्वत:च्या या अधोगतीची कबुली देतानाच पश्चात्ताप करायला लागली.

त्यांना हा असा पश्चात्ताप होणं ही गोष्ट जास्त महत्त्वाची वाटली मला. कारण सत्ता म्हणजे केवळ कुरघोडी नसते, सत्ता म्हणजे केवळ ओरबाडणं नसतं, सत्ता म्हणजे केवळ द्वेषाचं पीक काढणं नसतं, युद्ध करणं किंवा साऱ्या जगाला वेठीला धरणं नसतं तर वर उद्धृत केलेल्या कवितेच्या शेवटी युवराज मोहिते यांनी म्हटलं आहे तसं आपल्या प्रजेला सर्वार्थानं गत्रेतून वर उचलून काढणं असतं. या कवितेत विनाश करणाऱ्या सत्तेच्या पुढं नेमकं काय असतं हे सांगताना ते म्हणतात,

‘सत्ता सांगते प्रज्ञा, शील, करुणेच्या

मार्गावरील बुद्ध

सत्ता नसते हुकूम, जुलूम, वर्चस्व,

गुलामी चिरंतन

सत्ता अलबत स्वातंत्र्य, समता,

एकता, परिवर्तन

सत्ता वदते गांधी, मार्क्‍स, आंबेडकर,

विचार, संविधान

सत्ता म्हणते गावकुसातील

घरटं होवो प्रकाशमान.’

सत्तेचा वापर हा लोककल्याणासाठी होणं आवश्यक असतं. जसा इस्रायलमध्ये तो अतातुर्क कमाल पाशानं केला होता. आपल्याकडे तर सम्राट अकबर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या सत्ताधाऱ्यांनी गावकुसातील घरटं प्रकाशमान करण्यासाठी या सत्तेचा वापर केला होता. तो करताना चुकीचं वागणाऱ्या आप्तस्वकीयांचीही पर्वा न करता त्यांना योग्य त्या शिक्षा केल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंनी परंपरा जपतानाच विज्ञाननिष्ठतेकडे जाणारा, समानतेचं गाणं गाणारा भारत निर्माण करण्यासाठी या सत्तेचा वापर केला. या अशा राजांचे आणि पंतप्रधानांचे आदर्श आपल्या देशातच असताना आपण आजही चुका करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे गुणगान गातो आहोत. आज परिस्थिती अशी आहे की नथुरामाला देशभक्त म्हणवणाऱ्यांवरच गुलाल उधळला जातो आहे. विजयाच्या माळाही त्यांच्या गळ्यात पडताहेत. फटाके फुटताहेत. पण ते फोडताना आपण आपल्याच पदराला आग तर लावत नाही ना याचा शहाणं होऊन विचार करणं आवश्यक आहे.

neerajan90@yahoo.co.in

chaturang@expressindia.com