नीरजा

आम्हा स्त्रियांना आता कुठे अभिव्यक्त व्हायला मिळालं आहे. त्यामुळे आम्हाला व्यक्त होण्याची किंमत जास्त कळते आहे. गेल्या चाळीस-पन्नास वर्षांत लिहिणाऱ्या सगळ्या लेखिका एकमेकींच्या स्वातंत्र्याचा आदर करतात. हा भगिनीभाव स्त्रीवादी चळवळीने आम्हाला दिला. आज बंधुभाव, सहानुभूती, सहानुभव, संवाद कमी होण्याच्या आणि इतरांच्या लेखनासंबधी तुच्छतावादी होण्याच्या काळात आम्ही सगळ्या बायका संविधानावर विश्वास ठेवत हा भगिनीभाव जपू पाहतो आहोत.

गेल्या शतकात स्त्रीवादाची चर्चा करताना स्त्रीचं शारीरिक, मानसिक, लैंगिक, भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक आणि ज्ञानात्मक पातळीवर होणारं शोषण थांबलं तर खऱ्या अर्थानं स्त्रीमुक्ती येईल, असं अनेक विचारवंतांनी म्हटलं आहे. त्यासाठी जगभरात विविध चळवळी उभ्या राहिल्या आणि त्या आजही कार्यरत आहेत. स्त्रीवादाच्या या सगळ्या मांडणीत पुरुषसत्ताक व्यवस्थेचं सत्ताकारण समजून घेण्यासाठी स्त्रीला जसं आत्मभान येणं गरजेचं आहे तसंच स्वत:च्या दास्याला कारणीभूत असलेल्या गोष्टींचा विचार करणंही अपेक्षित आहे, असं म्हटलं गेलं आहे.

या मांडणीत एक अतिशय सुंदर गोष्ट सांगितली आहे आणि ती म्हणजे या पुरुषसत्ताक व्यवस्थेनं स्त्रीला जे दुय्यमत्व दिलं आहे ते समजून घेऊन त्याविरोधात लढायचं असेल तर स्त्रियांमध्ये ‘भगिनीभाव’ वाढणं गरजेचं आहे. आज या भगिनीभावाची आठवण झाली ती साहित्य संमेलनात अरुणा ढेरे यांच्या भाषणानंतर ‘फेसबुक’वर टाकलेल्या आमच्या काही मत्रिणींच्या पोस्ट वाचल्यावर. मी स्वत: ‘फेसबुक’वर नाही, पण आमची एक मत्रीण सुनीती सु.र. हिनं अरुणा ढेरे यांच्या भाषणानंतर समाजमाध्यमांवर ज्या उलटसुलट चर्चा झाल्या त्यांच्या अनुषंगाने एक पोस्ट लिहिली आणि त्यातून आजच्या एकूण वातावरणाबद्दल अस्वस्थता व्यक्त केली.

सुनीतीच्या मते नयनतारा सहगल यांना दिलेल्या नकारासंदर्भात अरुणा ढेरे यांनी परखड भूमिका मांडणं हीच या संमेलनाची ऐतिहासिक मागणी होती. ती पूर्ण झाल्याचं समाधान व्यक्त करताना सुनीती म्हणते, ‘‘नयनतारांच्या निमित्ताने अरुणा ढेरे जे बोलल्या ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील नेमस्तपणालाही ओलांडणारं होतं. कारण त्या बोलत होत्या ते संवाद आणि समन्वयाविषयी. विचारांचीही बहुविधता आणि त्याविषयीचा आदर आणि स्वीकार याबद्दल बोलताना समतेचा धागा न सोडता एका व्यापक सहिष्णू परंपरेचा पटही त्यांनी मांडला. श्रोत्यांना जे आवाहन त्यांनी केलं ते आवाहन केवळ वैचारिक नव्हे तर कृतिशीलतेचंही होतं. ज्या अर्थाने अरुणा ढेरे यांनी रानडय़ांच्या समन्वयवादी रीतीचा अथवा फुल्यांच्या एकमय समाजाच्या उद्दिष्टाचा उल्लेख केला, त्याही अर्थाने ती विद्रोहाची रीत होती.’’

या भाषणाचं कौतुक करणारी पोस्ट सुनीती यांनी टाकल्यावर काही मित्रांनी जो टीकेचा सूर लावला त्यानं त्या अस्वस्थ झाल्या आणि आपल्या मित्रांना संवादी राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. माझ्या या मत्रिणीप्रमाणे अनेक लोक अस्वस्थ झाले. आज साहित्य क्षेत्रात अनेक विचारधारांवर आधारित लेखन होतं आहे. मार्क्‍सवाद, साम्यवाद, समाजवाद, गांधीवाद, आंबेडकरवाद अशा अनेक विचारधारा स्वीकारून तर कधी विशिष्ट अशी विचारधारा न मानता या सर्व विचारधारांतील मानवता हे मूल्य मानणारी विचारधारा मानून मराठीतले अनेक लेखक कवी लिहीत आहेत. खरं तर एकूण मानवजातीविषयी ममत्व असलेला कोणताही संवेदनशील माणूस किंवा विध्वंसापेक्षा निर्मितीवर विश्वास असणारा लेखक हिंसेविषयी बोलत नाही की, असहिष्णूतेच्या बाजूनं उभा राहत नाही. तो बोलतो ते माणसामाणसातील सौहार्दाविषयी, माणसानं माणसाला जगण्याच्या या जंजाळात जात, धर्म, लिंगापलीकडे समजून घेण्याविषयी.

तरीही आमचे काही लोक अरुणा ढेरे यांनी काय म्हणावे, कधी म्हणावे, कसे म्हणावे, कोणती भूमिका मांडावी आणि त्या ती तशी मांडत नसतील तर त्यांना कोणत्या गोटात ढकलावे याविषयी चर्चा करत होते. आपण अनेकदा आपल्या आजूबाजूच्या लोकांविषयी खूप अपेक्षा बाळगून असतो. कोणत्या परिस्थितीत कोणत्या लोकांनी काय बोलायला हवं आणि कसं बोलायला हवं हे ठरवत असतो. उदाहरणार्थ, मराठी मनांवर दुर्गा भागवत या व्यक्तिमत्त्वाचा प्रचंड प्रभाव आहे. परखडपणाचं एक मिथक त्यांनी जनमानसात तयार केलं आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्या स्त्रीनं सडेतोड बोलण्याची अपेक्षा केली जाते तेव्हा तिनं दुर्गा भागवत यांच्या प्रमाणे परखडपणे बोलावं, असं म्हटलं जातं. हीच अपेक्षा अरुणा ढेरे यांच्याकडूनही केली गेली. पण आपण हे विसरतो की, प्रत्येक व्यक्ती ही आपापलं एक व्यक्तिमत्त्व घेऊन येत असते. तिची व्यक्त होण्याची पद्धत, तिची भाषा ही दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळी असते. कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्याचा मुखवटा लावून आपण त्याच्याप्रमाणे बोलू शकत नाही की व्यक्तही होऊ शकत नाही.

ज्या माहोलात आज आपण राहतो आहोत त्यात समविचारी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. अशा काळात पुरोगामित्वाची प्रत्येकी एक आणि तीही स्वत:ला पटेल ती स्वतंत्र व्याख्या घेऊन प्रत्येक जण पुढे आला तर आपण आजच्या या सांस्कृतिक दहशतवादाचा सामना कसा करणार आहोत याचाही विचार व्हायला हवा. मला आठवतं, पुरस्कारवापसीच्या काळातही असे काही दबावगट तयार झाले होते. त्या वेळच्या एकूण सामाजिक परिस्थितीत आपला निषेध नोंदवण्यासाठी पुरस्कार परत करणं हा मार्ग योग्य वाटला त्यांनी तो मार्ग निवडला. इतरांनी पत्रकं काढून, सह्य़ांच्या मोहिमा काढून हा निषेध नोंदवला. प्रत्येकाचा निषेध करण्याचा मार्ग वेगळा होता. आणि त्या परिस्थितीत तो रास्तही होती. महाराष्ट्रात काही अपवाद वगळता अनेक ‘साहित्य अकादमी पुरस्कार’प्राप्त लेखकांनी पुरस्कार परत केले नाहीत, याचा अर्थ या लेखकांना कोणतीही भूमिका नव्हती असा होत नाही. पण तरीही त्यांच्यावर कणा नसलेले साहित्यिक वगैरे आरोप झाले होते. जसं अखलाखला गोमांस बाळगल्याच्या संशयावरून त्या वेळी मारलं गेलं तसंच पुरस्कार परत न करणाऱ्या लेखकांना काहीच भूमिका नाही या संशयावरून त्यांचं त्या काळात मानसिक खच्चीकरण केलं गेलं. आमचे अनेक लेखक हे समन्वयवादी, संवादी आहेत. पण काही मूठभर लोक जर अशा भूमिका घेत असतील तर हाही एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवादच आहे, असं खेदानं म्हणावं लागेल.

आपल्या सर्वाना अपेक्षित असलेला मानवतावादी धर्म पुरोगामित्वाकडे घेऊन जाणाऱ्या साऱ्या विचारसरणींचा आधारस्तंभ आहे. प्रत्येक जण कदाचित तुमच्या भाषेत बोलणार नाही, पण हा माणसाला माणूस म्हणून वागवण्याचा धर्म तो मानत असेल आणि स्वातंत्र्याचा, समतेचा, बंधुभावाचा, करुणेचा उद्घोष त्याच्या लेखनातून करत असेल तर तो प्रत्येक संवेदनशील माणूस आपल्यासोबतच आहे हे आपण लक्षात ठेवायला हवं.

आपण सगळेच अभिव्यक्तिस्वातंत्र्य मानणारे आहोत. गांधींची हत्या करणाऱ्या नथुरामावर जेव्हा एखादं नाटक येतं तेव्हा ते लिहिण्याचा त्या नाटककाराचा अधिकार आपण हिरावून घेत नाही, त्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करत गांधींच्या बाजूनं बोलणारं किंवा गांधींजीचा विचारव्यूह मानणारं नाटक आपण तयार करतो. जर आपण त्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अनादर केला असता तर विचार पटले नाहीत म्हणून दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांना संपवणाऱ्या त्या माणसांत आणि आपल्यात काहीच फरक उरला नसता, म्हणूनच अरुणा ढेरे यांच्या भाषणात जर कच्चे दुवे असतील तर त्याविषयी प्रत्येकाने जरूर बोलावे. तुझं म्हणणं जरी मला पटत नसलं तरी ते म्हणण्याच्या तुझ्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी मी तुझ्या बाजूनं उभा राहीन, असं म्हणणाऱ्या व्हॉल्टेअरचं उदाहरण देणाऱ्या आमच्या अनेक मित्रांनी अरुणा ढेरे यांचं स्वागत केलं आहेच, पण उरलेल्यांनीही ते केलं तर आमच्या या चळवळीतल्या आणि साहित्यिक मित्रांचं मोठेपण मनात कायम भरून राहील.

या बाबतीत माझ्या कार्यकर्त्यां, लेखिका, कवयित्री, पत्रकार, मत्रिणींचं कौतुक करायला हवं. (काही अपवादात्मक मत्रिणींनी कदाचित विरोधात भूमिका घेतली असेल, पण माझ्यापर्यंत ती पोचली नाही). नयनतारा सहगल यांना न बोलावल्यानं त्यांनी जशी निषेधाची भूमिका घेतली तशीच भूमिका अरुणा ढेरे यांच्या संयत पण ठाम भाषणानंतर त्यांचं कौतुक करून घेतली. खरं तर आम्हा स्त्रियांना आता कुठे अभिव्यक्त व्हायला मिळालं आहे. त्यामुळे आम्हाला व्यक्त होण्याची किंमत जास्त कळते आहे. गेल्या चाळीस-पन्नास वर्षांत लिहिणाऱ्या सगळ्या लेखिका एकमेकींच्या स्वातंत्र्याचा आदर करतात. त्यांचं लेखन कमी अधिक दर्जाचं असलं तरी त्या लिहिताहेत हेच स्त्रीवादी चळवळीचं मोठं यश आहे. त्यामुळेच असेल पण मल्लिका अमरशेख, मी, प्रज्ञा पवार, कविता महाजन अशा ऐंशीच्या दशकात लिहायला लागलेल्या कवयित्रींना त्या काळात शिरीष प, विजया राजाध्यक्ष, निर्मला देशपांडे, आशा बगे, उषा मेहता, हिरा बनसोडे, प्रभा गणोरकर अशा अनेक लेखिका-कवयित्री यांनी त्यांच्यात सामावून घेतलं, प्रोत्साहन दिलं. पुष्पा भावे, विद्या बाळ, गौरी देशपांडे, सरोजिनी वैद्य, ऊर्मिला पवार यांच्यासारख्या वेगवेगळ्या चळवळीतल्या, वेगवेगळ्या विचारधारांच्या लेखिका-विचारवंतांनी आमच्या पिढीच्या लेखिका कवयित्री यांच्या पाठीवर कौतुकाचा हात ठेवला. हा भगिनीभाव स्त्रीवादी चळवळीने आम्हाला दिला. आज बंधुभाव, सहानुभूती, सहानुभव, संवाद कमी होण्याच्या आणि इतरांच्या लेखनासंबंधी तुच्छतावादी होण्याच्या काळात आम्ही सगळ्या बायका संविधानावर विश्वास ठेवत हा भगिनीभाव जपू पाहतो आहोत. पुरोगामी आम्ही आहोतच. त्याचं प्रमाणपत्र आम्ही म्हणू तोच पुरोगामी विचार, असं म्हणणाऱ्या तथाकथित पुरोगामी लोकांकडून आम्हाला नको.

सावित्रीबाई आणि महात्मा फुल्यांचा वारसा मानणाऱ्या आम्ही जनाबाईच्या लेकी आहोत. विठ्ठलालादेखील जाब विचारण्याचं काम करणाऱ्या आमच्यासारख्या स्त्रियांच्या मनाच्या तळाशी जनाबाईचं आणि बहिणाबाईचं गाणं वाहतं आहे. त्या गाण्याशी तुमचाही सूर जुळला तर आपण सगळेच या कठीण काळात एकत्र राहू.

neerajan90@yahoo.co.in

chaturang@expressindia.com