नीरजा
ती म्हणाली, ‘प्रेम असताना लग्न न करता राहिलं तरी हरकत नाही पण प्रेम नसताना लग्न करून एकत्र राहायचं म्हणजे गुन्हाच आहे. इट इज क्रिमिनल टू मॅरी विदाउट लव.’ काय सांगणार होते मी तिला आमच्याकडच्या लग्नपद्धतीबद्दल, विवाहसंस्थेबद्दल! आमच्याकडे लग्नं ही मनं जुळण्यासाठी करतच नाहीत हे, आमच्याकडे लग्न म्हणजे तडजोड हेच शिकवलं जातं हे? की आमच्याकडे कुटुंबाला प्राधान्य देऊन जमलंच तर प्रेम केलं जातं हे?
स्टुटगार्टला असताना आम्ही काही शिक्षक आणि विद्यार्थी जवळजवळ दहा दिवस एकाच हॉटेलमध्ये राहत होतो. आमच्या विद्यार्थ्यांना तिथल्या भाषेची आणि संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी गेलो होतो तिथं. मुलं त्यांच्या जर्मन जोडीदारांबरोबर त्यांच्या घरात राहून तिथली संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती आणि आम्ही शिक्षिका या हॉटेलात राहून.
अगदी छोटंसं हॉटेल होतं ते. एक रिसेप्शनिस्ट दिवसभर असायची. जवळजवळ रात्रीपर्यंत. सकाळी ब्रेकफास्ट आणि रूम सर्व्हिससाठी दोन मुली यायच्या. भ्रमंती आणि मुलांसोबत राहिल्यावर दिवसभरात कधी वेळ मिळाला तर या रिसेप्शनिस्टबरोबर गप्पा व्हायच्या. जन्मानं पोलिश होती ती. तिची आई आणि वडील एका प्रवासात भेटलेले. त्यांच्यात गप्पा झाल्या. पुढे भेटी वाढल्या, दोघं प्रेमात पडले आणि त्यातून ही मुलगी जन्माला आली. आईला वाटत होतं या मुलीच्या जन्माआधी लग्न व्हावं त्या दोघांचं. पण नाही झालं. तो डॉक्टर होता. हिच्या जन्मानंतर तो येत असावा घरी पण लवकरच तिच्या आईचे आणि त्याचे संबंध संपले. मग आईनं वाढवलं तिला. अगदी लहानपणी आपल्या बापाला पाहिलं असावं तिनं पण आता त्या वेळच्या तिच्या आठवणीत तो नव्हता. पुढे तिच्या आईनं दुसऱ्या माणसाशी लग्न केलं. मग वयाच्या बाराव्या वर्षी ही मुलगी आपला बाप पाहावा आणि त्याच्यासोबत वेळ घालवून त्याला जाणून घ्यावं म्हणून त्याच्याकडे गेली. पण त्याची बापाच्या भूमिकेत जाण्याची इच्छाच नव्हती. एकूणच तो नाही भावला तिला. त्याच्याकडे राहणं हा तिच्यासाठी वाईट अनुभव होता. त्याच्यापेक्षा नवा बाप खूप चांगला असं तिला वाटत होतं. आता इथं स्टुटगार्टला येऊन हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर या हॉटेलात तिचं प्रशिक्षण सुरू होतं.
सुरुवातीला फक्त ‘गुड मॉर्निंग’ वगरे झाल्यावर दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून आमच्या गप्पा सुरू झाल्या. आम्हाला तिच्याविषयी कुतूहल होतं आणि तिला आमच्याविषयी. तिला स्वत:ची जागा नव्हती. इथंच ती रात्रपाळी करत होती. त्यामुळे रात्री कुठं डोकं टेकावं हा प्रश्नच नव्हता तिच्यापुढे. पण लवकरच आपण आपल्या भाडय़ाच्या घरात राहायला जाणार आहोत असं म्हणाली ती. भारताविषयी अनेक गोष्टी जाणून घेण्याचाही ती प्रयत्न करत होती. एक दिवस ती म्हणाली, ‘मी असं ऐकलंय की तुमच्याकडे प्रेम न करता लग्नं केली जातात?’ आम्ही म्हटलं ‘असंच काही नाही. अलीकडे बरेच प्रेमविवाहही होतात. ‘म्हणजे पूर्वी नव्हते का होत?’ तिचा आश्चर्यचकित प्रश्न. ‘नव्हतेच असं नाही. पण ठरवून केलेली लग्नं जास्त सुरक्षित असतात असं वाटतं आमच्या पालकांना. आई-वडील करून देतात तेव्हा ते मुलाचं किंवा मुलीचं घराणं, मुलाची आर्थिक परिस्थिती वगरे पाहतात. आणि पुढे काही झालंच तर ती दोन्ही कुटुंबांची जबाबदारी असते’ वगरे सांगत आम्ही आमच्या देशातल्या संस्कृतीचं रक्षण करण्याचा पवित्रा घेतला. मग ठरवून केलेली लग्नं आणि त्याचे फायदेही सांगितले. त्यावर तिनं विचारलं, ‘लग्न ही जबाबदारी त्या त्या नवरा-बायकोची असते ती त्यांच्या आई-वडिलांची कशी? मग आम्ही तिला म्हटलं, ‘‘बघ, आता तुझी आई फसली गेलीच की. इथं त्या दोघांचे आई-वडील असते तर त्यांनी काही एक भूमिका घेतली असती की नाही. तुलाही वडील मिळाले असते.’’ तर ती चटकन म्हणाली. ‘‘माझ्या आईला फसवलं नाही त्यानं. तिनं तिच्या मर्जीनं प्रेम केलं आणि तिच्या मर्जीनंच त्याला सोडण्याचाही निर्णय घेतला. तिनं प्रेम केलं त्या वयात. ते नाही यशस्वी झालं. त्यांना नाही राहावंसं वाटलं एकमेकांसोबत आणि तसं वाटत असेल तर ओढत आयुष्य काढण्याची काय गरज? तिनं तिच्या जबाबदारीवर प्रेम केलं आणि जबाबदारीवरच त्याला सोडण्याचा निर्णय घेतला.’’ ‘‘पण प्रेमलग्नात ही रिस्क असतेच, फसवलं जाणं तर खूपदा होतं.’’ आम्ही पलटवार करत म्हणालो. तशी ती म्हणाली, ‘‘ते ठरवलेल्या लग्नात नाही का होत?’’ ‘‘झालं तरी कुटुंब जबाबदारी घेतं.’’ आमचा आग्रही पवित्रा. ती हसली आणि म्हणाली, ‘‘प्रेम असताना लग्न न करता राहिलं तरी हरकत नाही पण प्रेम नसताना लग्न करून एकत्र राहायचं म्हणजे गुन्हाच आहे.’’ आम्ही नव्या जोमानं तिला पटवायचा प्रयत्न केला. पण ती तिरमिरीत म्हणाली, ‘‘बट इट इज क्रिमिनल टू मॅरी विदाउट लव.’’
स्वत:च्या आयुष्यात इतकं काही घडूनही ती ज्या पद्धतीनं हे वाक्य म्हणाली ते ऐकून मी खरं तर अवाक झाले. त्या क्षणी मी काहीच बोलले नाही. कारण माझ्याकडे आपलं समर्थन करावं असं कोणतंही उत्तर आणि स्पष्टीकरण नव्हतं. पण ते वाक्य आजही माझ्या कानात घुमतं आहे.
खरंच काय सांगणार होते मी तिला आमच्याकडच्या लग्नपद्धतीबद्दल, विवाहसंस्थेबद्दल, विवाहातील एकूणच रीतीभातींबद्दल, देवाणघेवाणींबद्दल, मानापमानांबद्दल? ज्या देशात आज कायदा केल्यानंतरही राजरोसपणे हुंडा घेतला जातो, तो देण्यासाठी आईबापाला आयुष्यभराची कमाई ओतावी लागते, त्यासाठी कधी कर्जबाजारी व्हावं लागतं आणि पुढे आत्महत्याही करण्याची वेळ येते, हुंडा कबूल करून लग्नानंतर देऊ शकला नाहीत तर पुढे मुलींना जाळून मारलं जातं, जिथं लग्नसमारंभात मुलीकडच्या माणसांना आपसूकच कमीपणा घ्यावा लागतो, चालीरीतींच्या नावाखाली मुलाचे पाय धुतले जातात, त्याच्या कुटुंबीयांचे मानपान केवळ लग्नातच नाही तर आयुष्यभर करावे लागतात आणि मुलीचं दान करून ‘तू आता आमच्यासाठी संपलीस’ असं सांगितलं जातं, जिथं आजही विवाह जमवण्यासाठी मध्यस्थ असतात, विवाहमंडळं असतात, एवढंच नाही तर विवाह जमवण्यासाठी वेगवेगळ्या जातीनिहाय संकेतस्थळांचा सर्रास वापर केला जातो, प्रेमविवाह झाले तरी जात पाहिली जाते, आंतरजातीय किंवा आंतधर्मीय विवाह झाले तरी या धर्माचा नको आणि त्या तर नकोच नको, असं सांगितलं जातं. समजा, लग्न केलं तर शक्यतो आपल्यापेक्षा वरची जात असावी हे पाहिले जातं, खालच्या जातीच्या मुलाशी लग्न केलं तर बापच सुपारी देऊन गरोदर मुलीसमोर तिच्या नवऱ्याचा खून करवून आणतो, ‘ऑनर किलिंग’चे प्रकार सर्रास घडतात, कोणत्याही प्रकारचा विवाह ठरला तरी मुलगा किंवा मुलगी कोणत्या जातीचे आहेत असे प्रश्न नातलगांकडूनही सहज येतात. अशा देशात राहणाऱ्या लोकांना प्रेमाशिवायचं लग्न गुन्हा कसा काय वाटणार?
आजच्या काळातही भारतातील अनेक खेडय़ांमध्ये आणि शहरातही आई-बाप ज्याच्याशी लग्न करायला सांगतात त्याच्याशी लग्न करून मुलं आणि मुली मोकळे होतात. एकविसाव्या शतकातही काही शिकली-सवरलेली मुलं एकमेकांचे केवळ फोटो पाहून पसंती कळवतात आणि लग्नातच भेटतात तेव्हा आपण कोणत्या काळात राहतो आहोत हा प्रश्न पडतोच. त्यामुळे तिला कसं सांगणार होते मी, की आमच्याकडे लग्नं ही मनं जुळण्यासाठी करतच नाही. ती जुळली तर बोनसच. इथली मुलं, त्यांचे आई-वडील आणि त्यांच्या आजूबाजूच्या गणगोतातली मंडळी, या सर्वासाठी लग्न हा टप्पा म्हणजे आयुष्याचं एक वळण समारंभपूर्वक पार करण्याचा क्षण असतो. कुटुंबव्यवस्था आणि हे जग चालण्यासाठी लागणारं लायसन्स. लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत जे कृत्य पाप मानलं जातं ते कामाशी निगडित असलेलं कृत्य लग्नानंतरची पूजा झाल्याबरोबर यशस्वीपणे व्हावं म्हणून करण्याचा तो विधी. ‘अमुक अमुक मुलाचा अमुक अमुक मुलीशी शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे’ असं ज्या देशात लग्नपत्रिकांमध्येही लिहिण्याचा प्रघात होता त्या देशात लग्नाकडे केवळ अधिकृतपणे शरीरसंबध ठेवण्याचं प्रमाणपत्र म्हणूनच पाहिलं गेलं.
अशा देशात राहणारी मी तिला कसं पटवून देणार होते की भारतात तयार होणारे चित्रपट, लिहिल्या गेलेल्या कथा-कादंबऱ्या आणि विशेषत: कविता या प्रेमाभोवती फिरत असल्या तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र प्रेम करायचं की नाही किंवा अलीकडे अगदी व्हॅलेंटाइन दिवस साजरा करायचा की नाही हे आई-वडील, इथला समाज किंवा कधी कधी इथले राजकीय पक्षही ठरवत असतात. ‘चार पोरं झाली तरी आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो,’ असं आमच्या आधीच्या पिढीचे लोक सांगायचे तेव्हा लग्न हे प्रेमासाठी करायचं असतं की मुलं जन्माला घालण्यासाठी हा प्रश्न आम्हालाही पडायचा लहान असताना.
आमच्याकडे लग्न म्हणजे तडजोड हेच शिकवलं गेलं आहे मुलांना, विशेषत: मुलींना. काही तक्रार केलीच मुलींनी, तर मारझोड तर करत नाही ना नवरा असं विचारत बाकीच्या वाईट परिस्थिती असणाऱ्या मुलींच्या संसाराशी तुलना करत काढलेली समजूत आमच्याकडची लग्नं शाबूत ठेवत आली आहेत. जे मुलींच्या बाबतीत तेच मुलांच्या बाबतीत. पण मुलांना थेट कधीच ‘तडजोड कर’ म्हणून सांगितलं जात नाही. मुलींना तसे आदेशच असतात.
अलीकडे मुलींना जरा जास्तच आत्मभान वगरे आल्याने मुली अशा तडजोडी मान्य करत नाहीत आणि मग घटस्फोटाचा मार्ग स्वीकारतात. यामुळेच आमच्या संस्कृतिरक्षकांना पाश्चात्त्य संस्कृती मान्य नाही. त्यांच्या दृष्टीने तर स्त्री-पुरुष समानतेचा हा दुष्परिणाम आहे. अलीकडेच नागपूरच्या ‘मातृसेवा संघा’ने महिला दिनाच्या निमित्तानं एक निबंध स्पर्धा जाहीर केली होती, त्याचा विषय होता ‘स्त्री-पुरुष समानतेमुळे उद्ध्वस्त संसार’ शिक्षणामुळे आत्मभान आल्याने जास्तच आधुनिक झालेल्या मुली अलीकडे मुलांना पारखून घ्यायला लागल्यात किंवा स्वतची मतं मांडायला लागल्यात ही गोष्टच आमच्या अजूनही पचनी पडत नाही. जी अपेक्षांची यादी पूर्वी मुलाकडचे द्यायचे ती यादी मुलीकडून आल्यावर आमच्या पिढीतले बिथरलेले लोक ‘या मुली कुटुंबव्यवस्था मोडायला निघालेल्या आहेत’ असं सहज म्हणतात. त्यामुळे प्रेम वगरे नंतरची गोष्ट झाली.
लग्न झाल्यावर स्वत:चं नातं आधी सांभाळायचं की कुटुंबातील लोकांची मनं या संभ्रमात आमच्याकडचे मुलगे बिचारे सारं आयुष्य काढतात. बायकोविषयी थोडं प्रेम दाखवलंच कोणत्याही कृतीतून तर लगेच ‘बदलला हो आमचा मुलगा, या मुलीनं बदलवलं त्याला. आईबापाची काही पर्वाच नाही’ असं म्हणणारे पालक अनेकदा मुलांच्या त्या नाजूक नात्यात निर्माण होणाऱ्या संघर्षांला कारणीभूत होतात.
या मुलीचे हे शब्द आमच्या संस्कृतिरक्षकांच्या कानावर गेले असते तर ते म्हणाले असते की असा विचार करणंच ‘क्रिमिनल’ आहे. कारण आमच्याकडे लग्नं होतात ती मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये नाही तर दोन कुटुंबांत. आणि तेही अगदी ठरावीक पद्धतीनं चाललं आहे युगानयुगे, अगदी आपल्या संस्कृतीनं दिलेल्या शिकवणी किंवा संस्कारांप्रमाणे. पत्रिका पाहून. आकाशात असलेल्या सगळ्या ग्रहांना चौकडीत बसवून, कुंडली काढून, ३६ गुणांची बेरीज करून, मुलाचा पगार, उंची सारं काही मुलीपेक्षा जास्त आहे की नाही हे तपासून आणि लग्नानंतर एकमेकांपेक्षा कुटुंबाला आणि तोही मुलाच्या कुटुंबाला जास्त वेळ द्यावा हे गृहीत धरून.
बाई गं, आमच्याकडे लग्नानंतर एकमेकांना वेळ देणं, एकमेकांना समजावून घेण्याचा विचार करणंच ‘क्रिमिनल’ मानलं गेलं आहे. आम्ही व्यक्तिवादी नाही होऊ शकत. आम्हाला विचार करावा लागतो तो कुटुंबाचा, समाजाचा. आणि त्यांनी परवानगी दिलीच तर मग कधी तरी प्रेमाचा!
neerajan90@yahoo.co.in
chaturang@expressindia.com