नीरजा
डंख मारणारे अनेक विंचू आजूबाजूला असण्याच्या काळात ज्या स्त्रिया राजकीय किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द करण्याचा विचार करतात तेव्हा त्यांच्या बाजूनं स्त्रीला वस्तू न समजणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषानं एक माणूस म्हणून उभं राहायला हवं. त्यांच्या न पटणाऱ्या विचारधारेविरोधात बोलण्याचा आपल्याला हक्क आहे, पण त्यांच्या चारित्र्यावर बोलण्याचा नाही हे आपण लक्षात ठेवायला हवं.
सध्या निवडणुकीचे दिवस आहेत. प्रचाराचा धुरळा उडतो तेव्हा विरोधी पक्षापेक्षा आपण कसे योग्य आहोत हे दाखविण्यात जी चुरस लागते त्यात अनेकदा उमेदवारांची भाषिक घसरण होत जातेच. आणि जर स्त्री उमेदवाराविरोधात बोलायचं असेल तर ही भाषिक पातळी अधिकाधिक घसरत जाते. आजच्या राजकीय क्षेत्रात स्त्रीचा सन्मान करणारे अनेक लोक आहेत. पण तरीही काही उमेदवारांकडून स्त्रियांवर जी गलिच्छ शेरेबाजी होते आहे ती वाचून किंवा ऐकून अस्वस्थ वाटतं. ही अस्वस्थता आज अनेक स्त्रियांमध्ये तसेच पुरुषांमध्येही आहे. विशेषत ते पुरुष, जे स्त्रीचा केवळ आई म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून सन्मान करतात.
आपल्या समाजात स्त्रीकडे पाहण्याचे दोन टोकाचे दृष्टिकोन आहेत, एक तर ती वंदनीय माता असते, नाहीतर मग पुरुषाला रिझवणारी वस्तू. आई म्हणून परमेश्वराच्या जोडीला बसवून तिचं कायम उदात्तीकरण केलं गेलं आहे. आपल्या कवी लेखकांसाठीच नाही तर अगदी आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी आई म्हणजे दुधावरची साय किंवा वासराची गाय वगरे असतेच पण ती जेव्हा बाई म्हणून त्यांच्या समोर येते तेव्हा ते तिच्याकडे नेमकं कसं पाहतात हा संशोधनाचा विषय आहे. एकीकडे तिचं गौरवीकरण करायचं आणि दुसरीकडे तिच्याच नावानं तिच्या शरीराशी आणि लंगिकतेशी जोडणाऱ्या ढीगभर शिव्या तयार करायच्या हा आपल्या पुरुषसत्ताक संस्कृतीच्या अमलाखाली असलेल्या समाजाचा स्वभाव झाला आहे.
जगात जिथं जिथं पुरुषसत्ताक पद्धत होती तिथं तिथं अगदी पूर्वीपासून स्त्रीला एक उपभोगायची वस्तू किंवा एक मुलं प्रसवणारं यंत्रच समजलं गेलं. अर्थात काही सन्माननीय अपवाद आपल्या देशातही जन्माला आल्यानं तिचा एक व्यक्ती म्हणूनही विचार झाला. अलीकडे तर तिला आपल्या बरोबरीचं स्थानही या व्यवस्थेतला पुरुष देतो आहे, तिच्या हक्कांसाठी भांडतोही आहे. आणि ही अत्यंत अभिनंदनीय गोष्ट आहे. एकीकडे स्त्रीचा आदर करणाऱ्या पुरुषांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत असतानाच दुसरीकडे मात्र केवळ पुरुषांचाच नाही, तर या पुरुषसत्ताक समाजाची मानसिकता असलेल्या स्त्रियांचाही बाईकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला नाही असं खेदानं म्हणावं लागतंय. या अशा समाजात निवडणूक प्रचार भरात असताना काही राजकीय मंचांवरून कधी तिच्याविषयी गलिच्छ भाषा वापरण्याचा तर कधी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.
आपल्याकडे स्त्रीचं स्वतचं असं एक अस्तित्व असू शकतं याचा विचार केला गेला नाही. आज शिक्षित झालेली स्त्री वेगवेगळी क्षेत्रं काबीज करत चालली आहे. विशेषत: आज पुरुषांची म्हणून जी काही कार्यक्षेत्रं आहेत त्यात शिरून ती आपलं पाऊल रोवते आहे. पण आजही स्त्री उच्चपदावर असेल तर तिच्या हाताखाली काम करत असलेल्या पुरुषांना काम करणं म्हणावं तेवढ सोपं जात नाही. बाईनं हुकूम करणं, अधिकार गाजवणं किंवा काम करायला सांगणं ही कल्पनाच आपल्या व्यवस्थेतील स्त्री-पुरुषांनी कधी केली नाही. त्यामुळे तिचे आदेश पाळण्याची वेळ येते तेव्हा नाइलाजानं ते पाळले गेले तरी मनातून अनेकदा पुरुष अस्वस्थ होतो. अशा वेळी स्त्रीला नामोहरम करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले जातात. आणि त्यातला सर्वात सोपा मार्ग म्हणजे तिचं चारित्र्यहनन करणं. ज्यावेळी एखाद्या पुरुषाला बढती मिळते तेव्हा ते त्याचं कर्तृत्व असतं, पण स्त्री ते मिळवते तेव्हा तिनं ते चुकीच्या मार्गानंच मिळवलं असेल असं समजलं जातं. एखाद्या स्त्रीला नोकरीच्या किंवा ज्या ज्या क्षेत्रात ती काम करते आहे त्या क्षेत्रात पुढे जायचं असेल तर काही वेळा तिच्याकडून लंगिक संबंधांचीही अपेक्षा केली जाते.
‘मी टू’ची चळवळ सुरू झाली तेव्हा अनेक देशांतील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांनी आपल्या ज्या कहाण्या सांगितल्या, त्यात अशा प्रकारच्या मागण्या अगदी समाजात मान्यवर म्हणून मिरवणाऱ्या दिग्गजांकडूनही झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या चळवळीतून बळ घेऊन भारतातीलही काही स्त्रियांनी तोंड उघडलं. करमणूक, जाहिरात आणि पत्रकारिता या क्षेत्रातीलच नाही तर साहित्य आणि कला क्षेत्रातील काहींनी जेव्हा आपलेही अनुभव सांगितले तेव्हा आमचे पुरुषमित्रच नाही तर मत्रिणीही म्हणाल्या, ‘एवढी वर्ष या बायका गप्प का बसल्या? हवे ते फायदे करून घेतले आणि आता शोषणाच्या वगरे गोष्टी करून समाजाची सहानुभूती मिळवताहेत.’ अशा प्रतिक्रिया देताना एवढे दिवस ती गप्प बसण्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न आपण करत नाही. एखाद दुसऱ्या घटनेत स्त्रीचीही चूक असू शकते, पण तरीही या समाजाची मानसिकता विशेष बदललेली नाही हे लक्षात येतं. आजही स्त्रीवर झालेल्या लंगिक अत्याचाराची हवी तशी दखल घेतली जात नाही. आपल्याकडे तर बलात्काराची केस दाखल करून घेण्यातही पुरुष किंवा स्त्री पोलीस अधिकारी विशेष रस दाखवत नाहीत. ‘तू तिथं काय करत होतीस, इतक्या रात्री का गेलीस, एकटीच का गेलीस. कपडे कोणते घातले होतेस’, असे टिपिकल प्रश्न विचारले जातात. स्त्रीनं काही सांगण्याचा प्रयत्न केला तर तिच्या पेहरावाबद्दल, तिच्या मोकळेपणानं बोलण्याबद्दल, तिच्या व्यवसायाबद्दल प्रश्न उठवले जातातच, पण तिच्या चारित्र्याकडेही बोट दाखवलं जातं. अनेकदा ‘तीच उठवळ आहे. आमच्याकडे पाहण्याची कशी हिम्मत होत नाही कोणाची’ अशी बायकांचीही प्रतिक्रिया असते. त्यामुळे लंगिक शोषण होऊनही अशा गोष्टींविषयी न बोलता अनेक स्त्रिया बऱ्याचदा गप्प बसतात.
करमणूक क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना हे जास्त भोगावं लागतं हे खरं आहे. कारण पडद्यावर ती ज्या स्वरूपात येते त्यावरून तिचं चारित्र्य ठरवलं जातं. आपल्याकडे पूर्वीच्या चित्रपटात ‘कॅब्रे डान्स’ असायचा, आता त्याला ‘आयटम सांॅग’ म्हणतात. सामान, आयटम, फटाका असे सुंदर स्त्रीसाठी वापरले जाणारे शब्दच पाहिले तरी लक्षात येतं की हे सारे शब्द तिच्या वस्तू असण्याशीच निगडित आहेत. हे वापरण्यात तथाकथित सुशिक्षित, उच्चभ्रू पुरुषही मागे नाहीत. आजही त्यांच्या पार्टीत किंवा ग्रूपवरही स्त्रीविषयीचे अश्लील विनोद फिरत असतात. आपल्याकडच्या कॉमेडी शोमध्ये निळू फुले यांच्या आवाजात आजही अनेक विनोदवीर ‘बाई वाडय़ावर चला’ असा त्यांच्या एका चित्रपटातला डायलॉग पुन:पुन्हा म्हणून हास्यसम्राट होतात. निळूभाऊ स्वत: अत्यंत सज्जन माणूस. त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत, पण त्या भूमिकांतील पात्रांनी म्हटलेले संवाद म्हणण्यापेक्षा या चित्रपटातील खलनायकाचा बाईला वस्तू समजण्याचा स्वभाव दाखविण्यासाठी लिहिलेले हे वाक्य आज जो उठतो तो वापरतो आणि बाई ही वाडय़ावर येण्याची गोष्ट आहे हे अधोरेखित करतो. त्यावर हसणारे पुरुष आणि स्त्रियाही आपल्या समाजाची सांस्कृतिक पातळी कुठं चालली आहे हेच दाखवून देत असतात. त्यामुळे स्त्रियांवर केलेल्या अश्लील शेरेबाजीत आनंद घेणारे आपले लोक राजकीय प्रचारसभांतही आपली पातळी सोडणार हे सांगायला नको.
आज परिस्थिती अशी आहे की जेव्हा स्त्री स्वतचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी बाहेर पडते आणि तेही पुरुषांच्या क्षेत्रात काम करण्यासाठी बाहेर पडते तेव्हा तिला या सगळ्याचा सामना करावा लागतोच. कोणतीही स्त्री जर थोडी मोकळी ढाकळी असेल, बोलायला थेट असेल तर ती स्त्री ही ‘उंडारलेली’ म्हणूनच तिच्याकडे पाहिलं जातं. केवळ पुरुषच नाहीत तर शिकल्या सवरलेल्या स्त्रियाही यात मागे नाहीत. ‘आपल्या आजूबाजूला शोषित गरीब गायी भरपूर आहेत, त्यांच्याविषयी लिहा ‘तिच्यासारख्या’ किंवा ‘अशा स्त्रियांविषयी’ लिहिण्याची काही गरज नाही’, असं आमच्या कवयित्री किंवा लेखिकाही म्हणतात तेव्हा मन उद्विग्न होतं. कोणी कोणते कपडे घालावे, स्त्रियांनी अंगप्रदर्शन करावं की नाही. त्यांनी बुरख्यात राहावं की बिकिनीत, त्यांचे मित्र असावे की नाहीत, त्यांनी कोणत्या धर्मातील मुलांशी लग्न करावं हेही हा पुरुषप्रधान मानसिकता असलेला समाज ठरवतो. स्त्रीकडे वस्तू म्हणून पाहिलं गेल्यानं पारंपरिक वेशभूषेपेक्षा वेगळा पेहराव करणारी स्त्री दिसली की आपल्या नजरा मग त्या पुरुषांच्या असोत की स्त्रियांच्या एका वेगळ्याच दृष्टीनं तिच्याकडे पाहायला लागतात. मुलांशी मोकळेपणानं बोलणाऱ्या किंवा मित्र असणाऱ्या मुलींना मोडीत काढून स्वतच्या गलिच्छ मानसिकतेलाच संस्कार समजणारे स्त्रीपुरुष ज्या समाजात आहेत त्या समाजाकडून आपण कोणती अपेक्षा करणार आहोत?
कोणती अभिनेत्री पडद्यावर कोणत्या रूपात येते यावरून तिचं चरित्र ठरवणारा हा समाज हे विसरतो की हिंदी चित्रपट सृष्टीत व्हॅम्पची भूमिका करणाऱ्या अनेक स्त्रियांना आजही चित्रपटसृष्टीत मानाचं आणि आदराचं स्थान आहे. आज ऊर्मिला मातोंडकर असो की स्मृती इराणी असो की सोनिया गांधी किंवा जयाप्रदा. यांच्याविषयी त्यांच्या त्यांच्या विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी जे शब्द वापरले आहेत ते केवळ आक्षेपार्ह नाहीत तर गुन्हा दाखल करण्यासारखेच आहेत.
राजकारणात स्त्रियांना ३३ टक्के आरक्षण मिळाल्यानंतर काही स्त्रिया स्वत:हून तर काही नवऱ्याच्या जागेवर यायचं म्हणून या क्षेत्रात आल्या. यातला ‘पॉवरगेम’ त्यांना समजायला लागला. पुरुषांना वापरून घेणारं सत्ताकारण स्त्रियांनाही वेगळ्या पद्धतीनं वापरून घ्यायला लागलं. आपल्या बौध्दिक मर्यादेपेक्षा जास्त सत्ता मिळालेल्या काही स्त्रियांनी पक्षप्रमुखांना खूश करण्यासाठी गेल्या काही वर्षांत किंवा अगदी अलीकडे जी वक्तव्य केली आहेत ती कधी बाळबोध तर कधी खुनशीपणाने भरलेली वाटावी अशीच होती आणि आहेत. तरीही त्यांच्या चारित्र्याविषयी बोलण्याचा अधिकार कोणालाच पोचत नाही.
आजचं राजकारणातलंच नाही तर अगदी कार्पोरेट जगातलं वास्तवही भीषण आहे. अशा काळात या स्त्रिया जेव्हा धाडस करून या क्षेत्रात येतात तेव्हा त्यांच्याकडे केवळ या लढाईतला एक प्रतिस्पर्धी म्हणून पाहायला हवे. पण आपल्या मनात स्त्री ही कमी बुद्धिमत्ता असलेली आणि पुरुषाचं रंजन करणारी गोष्ट असं असल्याने अनेकदा पुरुष उमेदवारच नाही तर सन्माननीय आमदार, खासदार देखील त्यांच्याविषयी बोलताना आपली पातळी सोडतात. मध्यंतरी रेणुका चौधरी यांच्या खळखळून हसण्यावरून अनेक पुरुष खासदारांना गलिच्छ हास्यविनोद करताना आपण पाहिले होते. आमच्या शेजारी राहणाऱ्या अतिशय सभ्य आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार असणाऱ्या पक्षाच्या एका कार्यकर्त्यांनं बिल्डिंगमधल्या दुसऱ्या एका पक्षाच्या कार्यकर्त्यां स्त्रीला थेट विचारलं होतं, ‘काय झालं का गाव भटकून?’ स्त्रिया घराबाहेर पडल्या की अशाप्रकारे शब्दांचे डंख मारणाऱ्या या पुरुषांपासून या स्त्रियांना स्वतला वाचवायचं असतंच पण या डंखातलं विषही अंगात भिनून द्यायचं नसतं. कारण त्याचा विचार केला तर त्यांना घरातून बाहेर पडणंही मुश्कील होऊन जाईल. पण कितीही ठरवलं तरी या डंखांतून मनात पोचलेलं ते विष भिनून राहातं. त्यामुळेच आपलं आत्मकथन लिहिताना जया जेटली यांच्यासारख्या राजकीय व्यक्तिमत्त्व असलेल्या स्त्रीला आपल्या आत्मकथनाचं शीर्षक, लाईफ अमंग स्कॉर्पिअन्स् : मेमोअर्स ऑफ अ इंडियन पॉलिटिक्स’ असं ठेवावं लागतं.
हे असे डंख मारणारे अनेक विंचू आजूबाजूला असण्याच्या काळात ज्या स्त्रिया राजकीय किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द करण्याचा विचार करतात तेव्हा त्यांच्या बाजूनं स्त्रीला वस्तू न समजणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषानं एक माणूस म्हणून उभं राहायला हवं. त्यांच्या न पटणाऱ्या विचारधारेविरोधात बोलण्याचा आपल्याला हक्क आहे, पण त्यांच्या चारित्र्यावर बोलण्याचा नाही हे आपण लक्षात ठेवायला हवं. एवढंच नाही तर तस्लीमा नसरीन यांनी त्यांच्या ‘रीत’ या कवितेत म्हटल्याप्रमाणे त्यांना हेही सांगायलाही हवं की,
तू एक स्त्री आहेस
म्हणूनच पक्कं लक्षात ठेव
जेव्हा घराची चौकट ओलांडशील,
लोक तुझ्याकडे सरळ नजरेनं पाहणार नाहीत.
तू जेव्हा गल्ली-बोळातून जायला लागशील,
तेव्हा ते तुझा पाठलाग करतील,
शिटय़ा मारतील.
गल्ली ओलांडून मोठय़ा रस्त्यावर आलीस तर..
तर तुला कुलटा म्हणून शिवी मिळेल.
हे सोसण्याचं बळ जर नसेल तुझ्यात
तर आताच मागे फिरलेलं बरं
पण हिंम्मत असेल तर..
जशी जात आहेस तशीच जात राहा.
(अनुवाद : मृणालिनी गडकरी)
neerajan90@yahoo.co.in
chaturang@expressindia.com