नीरजा
मनात हिंसा ठासून भरण्याचे दिवस असण्याच्या आजच्या काळात शहाणे शब्द शोधण्याची गरज आहे. ते आहेतही आजूबाजूला. त्यासाठी जात, धर्म, रंगापलीकडे जाऊन विचार करणाऱ्या माणसांच्या आणि पुस्तकांच्या जगात शिरण्याची गरज आहे. तिथं आपल्या आतून, अगदी काळजातून आलेले शब्द सापडतील.. डिस्कनेक्ट होण्याच्या काळात त्याचीच गरज आहे..
इंटरनेटनं किती गोष्टी सोप्या केल्या. जगभरात काय चाललं आहे याची माहिती दिलीच, पण त्याचबरोबर एका क्लीकवर सारा इतिहास, भूगोल, साऱ्या कला, साहित्य, राजकीय आणि सामाजिक वास्तव आपल्यासमोर आणलं. गेल्या काही वर्षांंत महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे हव्या त्या विषयावर चर्चा करायला ‘फेसबुक’, ‘इन्स्ट्राग्राम’, ‘व्हॉट्स अॅप’ यांसारखे वेगवेगळे चव्हाटे उपलब्ध झाले.
या समाजमाध्यमांमुळे अनेकांना आपल्यातल्या कला लोकांसमोर सादर करता आल्या. एखादी कविता लिहिली किंवा लेख लिहिला किंवा एखादा व्हिडीओ बनवला आणि समाजमाध्यमावर पाठवला की हजारो लाइक्सनं या माध्यमांवरचं तुमचं खातंच भरतं असं नाही तर मनही भरायला लागतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या माध्यमानं केली आणि ती म्हणजे विस्मरणात गेल्यासारखी वाटणारी, पण मनात आत कुठे तरी जपून ठेवलेली, माणसं पुन्हा भेटवली. विशेषत: लहानपणी ज्या शहरात, ज्या भागात आपली मुळं रुजवली होती ती मुळं उखडून दुसऱ्या मातीत रुजल्यावर मागे पडलेली, त्या मुळांच्या आसपास वाढलेली अनेक रोपटी, झाडं आज पुन्हा एकदा भेटवली. विशेषत: साठ, सत्तर आणि ऐंशीच्या दशकात शाळा-महाविद्यालयं सोडलेल्या अनेकांचे मित्रमत्रिणी हरवले होते. त्या काळात पत्रव्यवहार चालू ठेवला नाही तर या मित्रमत्रिणींना भेटणं ही गोष्ट अशक्यच असायची. काही अगदी घट्ट बांधलेले मित्र भेटायचे क्वचित कधी. मुलग्यांना ही मत्री पुढे चालू ठेवणे शक्य तरी व्हायचे. पण मुलींना मात्र ही मत्री एका गाठोडय़ात गुंडाळून घरातल्या फडताळात बंद करून ठेवायला लागायची. लग्न झालं की संपायचं सगळंच. नाव आणि गावही बदललं जायचं. सासरच्या गोतावळ्याला सांभाळताना भूतकाळातील नाती, मित्रमत्रिणी विसरावी लागत होती. त्यामुळे मुलांना काय किंवा मुलींना काय, शाळेतल्या प्रत्येक मुलामुलीच्या संपर्कात राहणं शक्यच नव्हतं. पण आज ‘फेसबुक’ आणि ‘व्हॉट्स अॅप’मुळे ते शक्य झालं. प्राथमिक शाळेत असताना, छडय़ा खाऊन दुखऱ्या झालेल्या हातावर चिमणीच्या दातानं तोडलेली ‘फोड एक कैरीची’ ठेवणारी पाडगावकरांची ‘छोरी’ वयाची साठी ओलांडल्यावर आता ‘फेसबुक’वर भेटते आणि ‘तू तोच ना रे मागच्या बेंचवर बसून मला त्रास देणारा?’ असा प्रश्न विचारते, तेव्हा या वयातही,
‘फोड एक कैरीची
अजून ताजी जिभेवर तिची आंबट गोडी,
अजून स्वप्नी
भुरभुरती सोनेरी कुंतल,
अजून घेते टिपून वेदना
नजर तिची ती निळी खोडकर..
गिरकी घेते मनीं कलाबूत तिच्या स्वरांची
नाव छोरी हात पुढे कर’
असं म्हणणारी ती ‘छोरी’ मनावर मोरपीस फिरवून जाते. आपल्याला मनातल्या मनात आवडत असलेल्या तिचा किंवा त्याचाही चेहरा पुन्हा एकदा कधी तरी दिसावा, असं वाटत असण्याच्या काळात तो चेहरा कधीच दिसला नव्हता या पिढीतल्या लोकांना. पण आज सोशल मीडियामुळे तो पुन्हा दिसणं शक्य झालं आहे.
आमच्या दहावीच्या बॅचला पंचवीस वर्ष झाल्यावर आमच्या एका मित्राच्या प्रयत्नांमुळे त्याच्या संपर्कात असलेल्या मुलांचे गेट-टुगेदर झाले. २००० मध्ये म्हणजे सुमारे १८-१९ वर्षांपूर्वी सर्वाचे लँडलाइनचे नंबर मिळवून संपर्क साधायला त्याला फार कष्ट पडले. कारण त्या काळात मोबाइल नुकतेच कुठे आले होते. पण जगण्याचा भाग नव्हते झाले. आम्ही सगळे तेव्हा एकत्र आलो. एक-दोनदा भेटलो. खूप छान वाटलं. मनात जपलेले ते लहानपणीचे चेहरे बदलले होते, पण अनोळखी मात्र नव्हते. शाळा ते आजपर्यंतच्या सर्वाच्या प्रवासाविषयी ऐकलं. एकमेकांचं कौतुक केलं. संपर्कात राहायचंच असं ठरवलं आणि पुन्हा बारा-तेरा वर्ष संपर्क तुटलाच. आता ‘व्हॉट्स अॅप’, ‘फेसबुक’ आल्यावर त्याच मित्रानं चार वर्षांपूर्वी आमचा ग्रुप तयार केला. प्रत्यक्ष भेटी एक-दोनदाच झाल्या, पण ‘व्हॉट्स अॅप’मुळे सकाळच्या ‘गुड मॉर्निग’नं दिवसाची सुरुवात व्हायला लागली आणि रात्री ‘शुभरात्री’ म्हणत झोपायला लागलो. फार पूर्वी कधी तरी इंजिन सोडून यार्डात गेलेले डबे पुन्हा एकदा जोडले गेले आणि आमची ट्रेन एका छानशा सफरीला निघाली.
पण ही सफर वाटली होती तेवढी प्रसन्न नाही राहिली. कायमचे संपर्कात आलो असं वाटत असतानाच हळूहळू लहानपणी हातात सहज हात घेणारी, दुखऱ्या हातावर कैरीची फोड ठेवणारी मत्री लुप्त होते की काय अशी शंका मनात यायला लागली. सुरुवातीला मेसेजेसचा भडिमार चालू होता. कधी थट्टा-मस्करीही. कधी कधी दुसऱ्या ग्रुपवरचे तर कधी स्वत:ला आवडलेले आणि पटलेले मेसेजेस फॉरवर्ड करणं सुरू झालं. आणि मग हळूहळू मेसेजेसचे विषय बदलले. राजकीय पक्षानं कित्येक कोटी खर्च करून जे आयटी सेल उभे केले होते त्यांनी तयार केलेले संदेश या भ्रमणध्वनींवरून भ्रमण करायला लागले. वादाच्या ठिणग्या पडायला लागल्या. काहींनी ग्रुप सोडला, काही ग्रुपवर राहूनही कायमचे मुके झाले तर काही नित्यनेमाने एक आन्हिक म्हणून प्रत्येक वाराबरोबर बदलणाऱ्या देवदेवतांच्या प्रतिमा, कधी साईबाबा तर कधी स्वामी समर्थ मग त्याच्या जोडीला स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, भगतसिंग, क्वचित कधी तरी जोतीबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, नाही तर थेट नाना पाटेकर, विश्वास नांगरे पाटील वगैरेच्या नावावर खपवल्या गेलेल्या संस्कारांचं भरघोस पीक, सुविचारांची उधळण, कधी ‘कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन’ म्हणत जुन्या दिवसांच्या काढलेल्या आठवणी, वेगवेगळ्या दिवसांच्या, सणावाराच्या शुभेच्छा, बायकोच्या (कथित) हुकूमशाहीवरचे विनोद, आणि जोडीला ‘मेरा भारत महान’च्या घोषणा!
हे केवळ माझ्या ग्रुपवर झालं असं नाही तर गेल्या पिढीतल्या आणि आजच्याही पिढीतल्या जवळजवळ सगळ्यांच्या ग्रुपवर व्हायला लागलं आहे. त्याला कारणंही तशीच असावीत. आज तीस- चाळीस- पन्नास वर्षांनंतर भेटलेले सारे मित्र आणि मत्रिणी आयुष्याच्या वेगवेगळ्या साच्यातून तयार होऊन आलेत. प्रत्येकाच्या भूमिका तयार झाल्या आहेत. राजकीय आणि सामाजिकच नाही तर त्यांची सांस्कृतिक मतंही पक्की झाली आहेत. शाळेत असताना केवळ दाखल्यावर लिहिण्यापुरती असलेली जात आणि धर्म आज प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजलेला आहे; जगण्याचा भाग झाला आहे. आपापल्या धर्माची किंवा जातीची अस्मिता अधोरेखित करणारी वेशभूषा, खाद्यसंस्कृती, लग्नपद्धती आणि इतर सर्व कर्मकांडं यांविषयी अभिमानानं बोलण्याची सवय झाली आहे. नऊवारी नेसून, नथ घालून, फेटे उडवत मोटरसायकलवरून भरधाव जाणाऱ्या मुली म्हणजे प्रगती आणि संस्कृती यांचा मिलाप असं आम्ही सार्थ अभिमानानं सांगायला लागलो आहोत. एके काळी शाळेच्या हॉलमध्ये दाखवला गेलेला गजानन जहागिरदारांचा ‘शेजारी’ हा चित्रपट पाहताना जवळजवळ सगळ्यांच्याच डोळ्यांच्या विहिरी ओसंडून वाहायच्या. त्या विहिरींवर आता वेगवेगळ्या रंगांचे झेंडे लागल्यानं त्या कोरडय़ा होत गेल्यात. काहींच्या मनात आज जसे गांधीजी रुतून बसले आहेत तसेच काहींच्या मनात आजही नथुराम दबा धरून बसलेला आहे. इतका की त्याचं उदात्तीकरण करण्यासाठी आपल्या लेखण्याही झिजवल्या जात आहेत. भगतसिंगवर प्रेम करणारे हिटलरवरही प्रेम करतात. भगतसिंग नास्तिक तर सावरकर गाईला उपयुक्त प्राणी म्हणायचे हे कानावेगळं करून आपल्याला सोयीस्कर वाटेल तेवढीच वाक्यं उचलून आजची हुशार मुलं यंत्रासारखी रोज नवा नवा इतिहास रचताहेत आणि आपण त्या जाळ्यात फसत चाललो आहोत.
२०१४ च्या, मागच्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजकारण्यांना आयटी सेलचं महत्त्व कळलं आणि प्रचाराची सारी धुरा त्याच्या हातात सोपवली गेली. या तरुण रोबोज्नी आदेशानुसार त्यांना मिळेल ती माहिती कधी त्याचं विरेचन करून तर कधी आपल्याला हवी तशी त्याची पुनर्रचना करून लोकांसमोर आणायला सुरुवात केली आणि एका आभासी जगातलं वाग्युद्ध सुरू झालं. माणसाला गॉसिपिंग करायला आवडतं, त्याला इतरांच्या प्रेमप्रकरणात तर खूप रस असतो, त्याला कोणत्याही गोष्टीवरून सहज भडकवता येतं हे जाणून असलेली आपली राजकीय व्यवस्था या हुशार मुलांचा वापर करून भारतीयांनाच एकमेकांसमोर उभी करते आहे. जणू महाभारतातील युद्धाचाच सेट लावला जातो आहे आणि कौरव-पांडव या भावंडांनाच एकमेकांविरोधात उभं केलं जातंय. आज इतिहास जाणून घेण्यासाठी खोल आणि विस्तृत पट उलगडून दाखविणारी पुस्तकं वाचण्याची गरज असते हे वेळ नसलेली आणि वाचनाची सवयच नसलेली माणसं विसरून गेलेली आहेत. या माणसांना आपण देऊ ते पटत जाणार या भरवशावर हा आयटी सेल इतिहास विरेचित करतो आहे. मोठमोठय़ा नेत्यांची प्रेमप्रकरणं काढून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतो आहे. दुसऱ्या पक्षाच्या नेत्यापेक्षा माझा नेता किती स्वच्छ आहे आणि किती महान आहे हे दाखवताना विरोधातल्या लोकांच्या कपडय़ांवर डाग पाडून माझं चारित्र्य धुतल्या तांदळासारखे आहे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न रात्रंदिवस होतो आहे. आपण सगळेच आपली मत्री विसरून, आपली नाती विसरून या युद्धात अप्रत्यक्षपणे सहभागी होतो आहोत. आज परिस्थिती अशी आहे की एकाच घरात अनेक विचारांची माणसं एका ताणाखाली राहताहेत. कुठे वडील समाजवादी विचारांचे असतील तर मुलगा दुसऱ्या पक्षनेत्याचा भक्त, कुठे जावई ‘हा विकास खोटा आहे’ असं म्हणतोय तर सासूबाई मात्र रोज विकासाच्या पोस्ट पाठवून लोकांना हैराण करताहेत.
गेल्या पाच वर्षांत विकास किती झाला माहीत नाही पण राष्ट्रप्रेमाच्या व्याख्याच बदलून टाकल्या गेल्या. आता केवळ सीमेवरच सैनिक लढताहेत असं नाही. तर प्रत्येक घराची रणभूमी झाली आहे. अलीकडे तर अनेक ‘फेसबुक’ व ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुपवर युद्धसदृश स्थिती आहे. एवढे दिवस कोणत्या तरी साहित्यिक किंवा अगदी घरगुती कार्यक्रमात किंवा एखाद्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात किंवा लग्न समारंभात किंवा अगदी अंत्ययात्रेला भेटणारी आणि जमेल तशी एकमेकांची, एकमेकांच्या मुलांची ख्यालीखुशाली विचारणारी मंडळी आता एकमेकांना असे मेसेज पाठवून दुखावत चालली आहेत. साधी सरळ वाटणारी माणसं आतून-बाहेरून कळायला लागली आणि एकमेकांच्या मनातून उतरायला लागली. एकमेकांपासून तुटायला लागली. फुलापानांनी आणि सुंदर सुविचारांनी भरलेला ‘व्हॉट्स अॅप’चा अवकाश हळूहळू हिंसक रंगांनी भरायला लागला. सगळ्या रंगांनी मिळून माणूस आणि त्याच्या भोवतीचा निसर्ग तयार होत असतो हे विसरून चाललेल्या माणसांच्या डोक्याला एकाच रंगाचा भुंगा लागला आहे. मी माझ्याच एका कवितेत म्हटलं आहे,
भुंगा काय करू शकतो जास्तीत जास्त
हे माहीत नसलेल्या लोकांच्या कानात शिरून
तो करतो बंद
आतला आवाज,
आणि सारे मार्ग स्वतमध्ये शिरण्याचे.
पोखरतो व्यवस्था आणि त्याचा भुगा
कपाळावर लावून देतो गर्जना.
बहिऱ्या झालेल्या माणसांना आपोआप येतं मुकेपण
हे माहीत असतं त्याला.
भुंगा लागला आहे डोक्याला माणसांच्या
आणि माणसांना कळतच नाही कुठून येताहेत आवाज दारं बंद होण्याचे.
एकूणच मनात हिंसा ठासून भरण्याचे दिवस असण्याच्या काळात शहाणे शब्द शोधण्याची गरज आहे. ते आहेतही आजूबाजूला. त्यासाठी पुस्तकांच्या आणि जात, धर्म, रंगापलीकडे जाऊन विचार करणाऱ्या माणसांच्या जगात शिरण्याची गरज आहे. तिथं आपल्या आतून, अगदी काळजातून आलेले शब्द सापडतील. पण आपण मात्र कुठल्या तरी पगारी माणसानं तयार केलेले, ओल नसलेले, विद्वेषानं भरलेले शब्द उसने घेऊन एकमेकांना पाठवतो आहोत अव्याहतपणे. त्यांनीच भरत चालली आहेत आपल्या जगण्याची पानं. रोज रद्दी होते आहे त्यांची आणि आपण त्यालाच समजत बसलो आहोत एकटेपण भरून काढणारा आश्वस्त हात!
समाजमाध्यमांमुळे सोपं झालं आहे कनेक्ट होणं एकमेकांशी. पण मनानं डिस्कनेक्ट होत चाललो आहोत कायमचे, त्याचं काय करायचं राव!
neerajan90@yahoo.co.in
chaturang@expressindia.com