पालक आणि मुलं यांच्यातील असंवादी नातं हा विषय आजकालच्या पालकांसाठी रोजचा तणावाचा ठरतो आहे. समस्या त्याच असल्या तरी त्यावर ठोस मार्ग मिळालेला नाही, त्यासाठी गरज आहे पालकत्वाची पारंपरिक पद्धत बाद करण्याची. मिलिटरी शिस्त, धाकदपटशा यांना अपेक्षित यश मिळत नाहीये. तसंच फार गोड बोलणंही मुलांना आवडत नाही. म्हणूनच गरज आहे संवादात सकारात्मक बदल करण्याची. त्यासाठी हे काही अनुभवाचे बोल..
सर्वसाधारण सगळ्या आईबाबांचं हे म्हणणं असतं, तशी ती किंवा तसा तो हुशार आहे हो पण.. हा ‘पण’ नेहमी जिथे तिथे आडवा येतो. याचं करायचं काय हाच खरा प्रश्न आहे. कधी आळशीपणा, तर कधी धांदरटपणा, कधी मौजमजेकडे जास्त लक्ष, असे अनेक अडथळे त्यांच्या हुशारीच्या आड येतात. अंगी गुण असून, सोन्यासारख्या संधी वाया जाताना पाहून पालकांना वाईट वाटत असतं. गेलेली वेळ परत येणार नाहीये, एकदा वय उलटलं की इच्छा असली तरी अनेक दरवाजे बंद झालेले असतील हे त्यांना अनुभवाने माहीत असतं. मुलांनी सगळी शक्ती एकवटून प्रयत्न करावेत अशी त्यांची इच्छा असते. तसं घडताना दिसत नाही म्हणून ते हताश झालेले दिसतात. असेच हे काही पालक.
संध्याकाळी स्पंदनच्या घरातून रडण्याओरडण्याचे आवाज आले नाहीत तरच आम्हाला नवल वाटायचं, इतकं ते रोजचं झालं होतं. त्यांचे संवादसुद्धा आम्हाला पाठ झाले होते. ‘‘नेहमीनेहमी त्याच चुका!’’ एक धपाटा, मग स्पंदनच्या तारस्वरात किंचाळण्याचा आवाज. ‘‘अशा चुका होतातच कशा? हज्जारदा सांगितलंय, गणित नीट वाचत जा. पण हा मुलगा ऐकेल तर शपथ!’’ किंवा ‘‘रडणं बंद कर आधी, काही एक उपयोग नाहीये त्याचा. मी काय सांगतेय इकडे लक्ष दे.’’ हा सगळा आटापिटा आपल्या मुलाने चांगला अभ्यास करून, चांगले मार्ग मिळवून यशस्वी व्हावं म्हणून असायचा.
स्वप्निलच्या आईला मात्र हे अजिबात आवडत नव्हतं. स्वप्निल आणि स्पंदनला साधारण सारखेच मार्क असत, पण स्वप्निलची आई चुकूनही त्याला ओरडत नसे. आपल्या मुलाची कुवतच नाही, उगाच बिचाऱ्याला जाच कशाला, अशी तिची धारणा असायची.
सायली तशी शांत, अबोल मुलगी. सतत अभ्यासाचं पुस्तक हातात असतं, पण कसल्या तरी विचारात गढलेली, काय चाललंय मनात याचा थांगपत्ता लागणार नाही. काही विचारलं तर नुसतं मंद स्मित. तिच्या आईला कळतंय काहीतरी करायला हवं, पण नेमकं काय करावं, कसं करावं, कळत नाहीये. ती काळजीने पुन्हा पुन्हा विचारत राहते, ‘‘काय ग, कसला विचार करतेस? अशी गप्पा का असतेस?’’ पण उत्तर मिळत नाही.
हिमांशूची नेमकी उलटी तऱ्हा. एक क्षण पाय घरात टिकेल तर शपथ. सारखे मित्र, आणि क्रिकेट मॅचेस, एकटा असेल तर सायकल घेऊन कॉलनीत गरागरा चकरा मारत राहील. पण अभ्यासाचं नाव नाही. तो दरवर्षी पास कसा होतो याचंच नवल वाटतं सगळ्यांना. तो सरळ सांगतो, ‘‘मला नाही आवडत अभ्यासबिभ्यास करायला.’’ मग बाबा बिथरतात, ‘‘तू काय स्वत:ला सचिन तेंडुलकर समजतोस का? सगळ्यांना नाही जमत ते, उद्या खर्डेघाशी करायला लागली की कळेल या उनाडक्या किती महाग पडतात ते.’’ याला वेळीच आवरायला हवं, सावरायला हवं, असं बाबांना वाटतं. ते जमत नाही असं दिसल्याने त्यांचा पारा चढतो.
    सागर वर्गात नेहमी पहिला-दुसरा होता. पण एक नंबरचा मुखदुर्बळ आहे. कामापुरत्या जुजबी संवादापलीकडे याची गाडी सरकत नाही. पुस्तकं आणि कॉम्प्युटरच्या जगात तो खूश असतो. पण आपण आपल्या आई-वडिलांच्या अपेक्षेला उतरू शकत नाही म्हणून मनातल्या मनात खंतावतो.
सारिका तशी बोलकी, उत्साही मुलगी. तिची आजकालची फॅशन, मित्रमैत्रिणीतलं मोकळं बिनधास्त वागणं, विशेषत: मुलांशी वागता-बोलतानाची शारीरिक जवळीक, आजीला खुपत राहते. आजीसारखी काळजी आईबाबांनासुद्धा आहे, पण हा विषय कसा हाताळायचा कळत नाही. आपण बुरसटलेल्या विचारांचे ठरू की काय, असंही त्यांना वाटतं.
स्पृहादेखील अभ्यासात मागे नाही. पण आजकाल एवढय़ातेवढय़ा कारणावरून संतापते. तिचं कोणाशीच पटत नाही. प्रत्येकात तिला काहीतरी खोट दिसते, त्यावरून तिचं भांडण होतं. मग त्या व्यक्तीवरच फुल्ली मारली जाते. तिला एकही जिवाभावाची मैत्रीण नसावी याचं तिच्या आईला दु:ख होतं. पुढे हिचं कसं होणार याची चिंता सतावत राहते.
या आजकालच्या पालकांच्या काही प्रातिनिधिक काळज्या. काय करावं या मुलांचं काही समजत नाही. ‘‘कधी अक्कल येणार यांना’’, असा एक सूर बहुतांश पालकांच्या बोलण्यात असतो. एकूण चित्र काही फार आशावादी दिसत नाही. फार थोडय़ा घरांचा सन्माननीय अपवाद सोडला तर बहुतांश पालक असे हतबल झालेले दिसतात. दिलाशाची बाब एवढीच की या समस्या जगभरच्या पालकांना जाणवताहेत. त्यावर उपायही शोधले जात आहेत.
एक नक्की की पालकत्वाची पारंपरिक पद्धत बाद करावी लागते आहे. मिलिटरी शिस्त, धाकदपटशा यांना अपेक्षित यश मिळत नाहीये. आपण जे संवाद ऐकत मोठे झाला ते उपयोगी नाहीयेत. त्यामुळे संवादात बदल करणं आवश्यक आहे. आपल्या परिचयाचे काही उद्गार आणि त्यांचा परिणाम यांचा विचार करूया.
‘‘काय हा गोंधळ, जराही शिस्त नाहीये तुम्हाला!’’ ‘‘काचेचा ग्लास नका देऊ त्याला, पाडेल. एक नंबर वेंधळा आहे तो.’’ बेशिस्त, वेंधळा, आळशी, धांदरट अशी नावं ठेवून मुलांच्या वागणुकीवर शिक्का मारला गेला तर सुधारण्याऐवजी ती तसंच वागत राहतात. आपण असेच आहोत असा त्यांचा दृढ समज होतो.
‘‘नापास झालात? छान आता कसं बरं वाटत असेल नाही आपल्याला.’’ अशा उपरोधिक शेऱ्याने मुलं दुखावली जातात, दुरावतात. जरी ती चुकली असतील, आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी अभ्यासाच्या वेळी उनाडक्या केल्या असतील तरी त्यांची चूक दाखवून द्यायची ही वेळ नाही हे लक्षात घ्यायला हवं.
‘‘आजपासून पॉकेटमनी बंद.’’ ‘‘या सुट्टीत कुठेही बाहेर जायचं नाही.’’ शिक्षा म्हणून त्यांच्या सवलती काढून घेतल्या तर त्याने ती बिथरण्याची शक्यता जास्त. ज्या चुकीची शिक्षा मिळाली असेल ती चूक पुन्हा न करण्यापेक्षा लपवण्याकडे कल जाताना दिसेल.
‘‘हे झालंच पाहिजे, मी सांगते म्हणून.. आत्ताच्या आत्ता..’’ ‘‘पाहतेच कसा ऐकत नाहीस ते.., शेवटचं सांगतोय..’’ असा धाकदपटशा लहान असताना थोडाफार सहन केला जातो. पण एकदा का त्यांच्या लक्षात आलं की यांचं ऐकलं नाही तरी फार काही बिघडत नाही की हे अस्त्र निष्प्रभ होतं.
‘‘असं करू नये बाळा..’’ असा गोड गोड प्रेमळ उपदेश त्यांच्या डोक्यात जातो.
‘‘तू नं हमालीच करणार स्टेशनात, तीच लक्षणं आहेत तुमची!’’ ‘‘भांडी घासायला लागतील तेव्हा कळेल.’’ अशी कडवट भविष्यवाणी एकतर अतिशयोक्त असते. दुसरं म्हणजे त्यातून हेटाळणी होण्याशिवाय दुसरं काही साधत नाही.
‘‘आम्ही मरमर मरतो तुमच्यासाठी, तुला कदर कुठेय त्याची?’’ ‘‘तू आणि तुझं नशीब! आम्ही काय बोलणार?’’ हे बोलताना आपणच इतके वैफल्यग्रस्त, शरणागत झालेले असतो की त्यातून मुलांना उभारी मिळण्याची सुतराम शक्यता नसते.
हे सगळं आपण का बोलतो, तर आपण हेच ऐकत मोठे झालो आहोत, त्यामुळे अशा वेळी असंच बोलायचं असतं असा आपला ग्रह झालेला आहे. यातही गैर आहे किंवा याचा काही उपयोग होतो का, याचा विचार न करता अगदी सहज हे शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतात.
आपलं मूल कसं असावं, त्याने कसं वागावं, काय मिळवावं, काय करू नये, याविषयी आपल्या काहीही अपेक्षा असल्या तरी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी की, ‘आपलं मूल हे आपल्यापेक्षा वेगळं, स्वतंत्र अस्तित्व असलेली एक व्यक्ती आहे.’ आपल्याला त्यांच्याविषयी आपल्या जे वाटतं ती आपली स्वत:ची इच्छा, अपेक्षा झाली. अशी अपेक्षा असणं यातही काही गैर नाही. पण मुलांनाही नेमकं तस्संच वाटलं पाहिजे. त्यांनी आपल्या इच्छेबरहुकूम वागलं पाहिजे ही अवास्तव मागणी झाली.
म्हणजे मुलांना मोकाट सोडायचं का? त्यांना काहीच बोलायचं नाही का? त्यांच्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिले असल्यामुळे, जे खाचखळगे आपल्याला माहीत झालेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायला नकोत का? तर या सगळ्याची निश्चित जरुरी आहेच, फक्त जर त्याचा योग्य परिणाम साधायचा असेल तर आपल्या बोलण्याचा टोन बदलण्याची नितांत आवश्यकता आहे. आपण जे बोलतो त्यातून कोणत्या भावना व्यक्त होतात? समोरच्या पर्यंत त्या कोणत्या स्वरूपात पोहोचतात याचा विचार व्हायला हवा.
स्पंदनला मारझोड करण्यापेक्षा त्याची एकाग्रता कशी वाढेल याचा विचार व्हायला हवा. चिडण्यारडण्यात जो वेळ आणि शक्ती वाया जाते त्यात त्याच्या नेमक्या चुका कोणत्या, त्या का होतात, त्या कशा सुधारता येतील. याचा विचारच होताना दिसत नाही. आम्हाला तुझी काळजी वाटते. तुला खूप छान मार्क मिळावेत असं आम्हाला वाटतं. तसं होत नाही म्हणून आमची चिडचिड होते, असं आपण त्याला म्हणू शकतो का? स्वप्निलच्या आईलादेखील आपल्या भावना तपासून पाहण्याची गरज आहे. मुलांना समजून घेणं म्हणजे त्यांना मुळीच ताण न देणं नव्हे. स्वप्निलची सगळी ऊर्जा वापरली जातेय का? त्याला कोणते विषय आवडतात? कोणते जड जातात? नावडत्या पण सोप्या वाटणाऱ्या विषयांचा अभ्यास तो करतो की नाही? जड जाणारे विषय समजून घेण्यासाठी त्याला मदत मिळतेय का? या सगळ्याचा विचार त्याच्या सोबतीनं व्हायला हवा. परीक्षेत खूप मार्क मिळणं हे एकच उद्दिष्ट कधीच नसावं. पण त्याच वेळी त्याचा सगळ्या विषयांचा अभ्यास नीट होतोय ना, हे बघणं तितकंच आवश्यक आहे.
सायलीसारख्या मुलीच्या अंतरंगात शिरणं अवघड असतं. आईच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीयेत. तर आजकाल ती कोणत्या मित्रमैत्रिणींबरोबर असते? त्यांचं वागणंबोलणं कसं असतं? कुणाच्या प्रेमात वगैरे पडली आहे का? वर्गात नियमित जातेय नं? यासारख्या बाबींवर बारीक लक्ष असायला हवं. तेदेखील तिच्या अपरोक्ष. मुलंमुली मोठय़ा होताना या अवघड वळणावरून पार पडेपर्यंत आईबाबांची कसोटी लागते. अशावेळी आणखीन एक उपाय करता येतो. सहज बोलताना आपल्या माहितीतल्या मुलामुलींच्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करता येतात. कशा चुका होऊ शकतात आणि त्या चुकांचे कसे परिणाम होतात, याची उदाहरणं आपल्याला अवतीभवती दिसतच असतात. आपल्या मुलांना त्यात न गोवता तटस्थपणे अशी चर्चा केली तर मुलं त्यात भाग घेतात. सायलीचे विचार, तिची दिशा, तिची मतं अशा अवांतर बोलण्यातून आईला जोखता येतात. अनघड वाटेवरचे धोके, त्या वयातल्या मुलांच्या पालकांची घालमेल आईच्या बोलण्यातून व्यक्त झाली तर सायलीला काही न बोलता आवश्यक ती मदत मिळेल.
हिमांशूच्या बाबांनी न रागावता हिमांशू, तू क्रिकेट खूप छान खेळतोस, उद्या तू मोठा क्रिकेटवीर झालास तर मला आवडेलच, कोणाला नाही आवडणार? पण तसं झालं नाही तर? ही शक्यता विचारात घेतली की माझा थरकाप होतो. या शब्दांत बाबांनी आपलं मन मोकळं केलं तर ‘बाबांना काळजी वाटू नये म्हणून’ हिमांशू आपल्या वागण्यात बदल करेल कदाचित, किंवा तो असंही म्हणेल की त्याला ‘अभ्यास करायचा म्हटलं की प्रचंड कंटाळा येतो.’ आता त्याला समजून घ्यायची जबाबदारी बाबांची असेल. ‘असा कसा कंटाळा येतो?’ असं न म्हणता, अभ्यास रंजक होण्यासाठी काय बदल करूया, याची चर्चा करत, त्याच्या मित्रांना सहभागी करत मार्ग काढता येईल. पालकत्व हे वेळखाऊ आणि कौशल्याचं काम आहे, इथे कोणताही शॉर्टकट चालत नाही.
सारिकाचं मोकळं वागणं गैर म्हणायचं, का आपलं मन संकुचित मानायचं, हा दर पिढीला पडलेला गहन प्रश्न. फक्त आताच्या पिढय़ांचा वेग भन्नाट आहे. अशा वेळी ‘पुलं’ आपली मदत करतात. ते म्हणतात. ‘साठच्या दशकात पुण्यात स्कूटरवर नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून बसणं अनीतीकारक समजलं जायचं. त्याआधी मुलींनी सायकल चालवावी की नाही यावर रण माजलं होतं. त्याही पूर्वी मुली लिहा-वाचायला शिकू लागल्या म्हणून त्यांच्यावर शेणमारा केला गेला. दरवेळी हे सगळं संस्कृती वाचवण्यासाठी होतं. त्यामुळे संस्कृतीतलं शाश्वत काय याचा विचार व्हायला हवा. आईबापांनी जर मुलांना अभिमान दिला, जीवन सुंदर कसं करायचं ते सांगितलं तर त्याचा योग्य तो परिणाम नक्की होईल. जे जे चांगले आहे, सुंदर आहे त्याच्या मागे आपली मुलं कशी लागतील, त्याची त्यांना आवड उत्पन्न कशी होईल याची तळमळ हवी. ही तळमळ माणसामाणसामध्ये जवळीक उत्पन्न करणारी आहे.’ यातच स्पृहाच्या समस्येचंही उत्तर आहे.
एकूण प्रकरण सोपं नक्की नाही. पण मुलांना बरोबरीच्या नात्याने वागवलं. त्यांच्यातील चांगुलपणावर विश्वास टाकला, त्यांचे ताण, त्यांच्या उणिवा समजून घेतल्या, आपल्या नेमक्या भावना त्यांच्यापर्यंत योग्यरीत्या पोचवल्या तर पालक म्हणून आपला आलेख उंचावतो हे नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा