‘‘पाळीव प्राण्याचा कोणताही गुण नसलेला जिराफ, पण मी त्यांना भेटलो आणि ते मला आपलेच वाटायला लागले. याचं कारण फक्त त्यांचं उंच,डौलदार नि जंगली देखणेपणंच नव्हे, तर त्यांच्या एकमेकांशी असलेल्या साहचर्यातून माणसाला खूप काही शिकण्यासारखं आहे..’’ सांगताहेत प्राणीप्रेमी व जिराफ अभ्यासक तुषार कुलकर्णी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काहीच दिवसांपूर्वीची गोष्ट. स्थळ- ‘संजय गांधी बायोलॉजिकल पार्क’,पटना. वातावरणात प्रचंड गारवा. त्या प्राणीसंग्रहालयात एखाद्या रुग्णालयाचा मॅटर्निटी वॉर्ड असावा, तशी धामधूम! ‘कुणीतरी येणार येणार गं’ म्हणत व्हेटर्नरी डॉक्टर आणि मदतनीस मंडळी प्रचंड उत्साहात होती, पण हे ‘कुणीतरी’ ठरलेल्या तारखेच्या एक महिना आधीच जगात येऊ पाहात होतं.. त्यातच ती होणारी आई पहिलटकरीण! त्यामुळे सगळे जय्यत तयारीत. मीसुद्धा मदतीसाठी हजर होतोच. अखेर ‘तो’ क्षण आला. आमच्या अपेक्षेप्रमाणे नुकतंच जन्मलेलं ते ‘बाळ’ अशक्तच होतं.. काहीच अनुभव नसलेली त्याची आई त्याला सांभाळू शकेल का, याची जमलेल्या सगळय़ांच्या मनात प्रचंड धाकधूक. पण घडलं ते अगदी अनपेक्षित.. बाळाचं पहिलं पाऊल या जगात पडलं आणि त्या पहिलटकरणीच्या अंगी अनुभवी आईसारखा खंबीरपणा दिसायला लागला. बाळाला सांभाळायला ती एकदम तयार आहे हे तिच्या हालचालींवरूनच दिसत होतं. आणि ‘मॅटर्निटी वॉर्ड’मधल्या सगळय़ांना ‘हुश्श्’ झालं..

बाळाला ढकलून ढकलून उभं राहायला आधार देऊ पाहाणारी ती होती एक जिराफ माता आणि धडपडत उभं राहाण्याचा प्रयत्न करणारं, नुकतंच जन्माला आलेलं ते होतं, जिराफाचं बछडं! जिराफ हा काही आपल्याकडचा प्राणी नाही. पाळीव प्राण्यांसारखा माणसाशी जिवलग मैत्री करणारा तर मुळीच नाही. प्राणीसृष्टीतला सगळय़ात उंच, सगळय़ात लांब मानेचा, एवढीच काय ती त्याची आपल्याला शाळेत झालेली ओळख. फक्त आफ्रिकेत आढळत असल्यामुळे आपल्याकडे बंगळूरु, कोलकाता, पटना अशा मोठय़ा प्राणीसंग्रहालयांमध्येच फक्त तो पाहायला मिळतो. तो दिसतो मात्र अतिशय देखणा. तितकाच शांत आणि लाजाळू ! खरंतर मी काही मूळचा प्राणीतज्ज्ञ, जिराफतज्ज्ञ वगैरे नाही. १९९६ मध्ये मी वाणिज्य शाखेचा पदवीधर झालो आणि पुढे पंधरा वर्ष त्याच क्षेत्रात नोकरी करत होतो. केवळ आवड म्हणून मी गोरेगावला ‘बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या ‘काँझव्र्हेशन सेंटर’मध्ये स्वयंसेवकाचं काम करायला लागलो. २०१०-१२ दरम्यान तिथेच इंटर्नशिप केली. त्याच दरम्यान इंटरनेटवरच्या एका प्रकल्पानं माझं लक्ष वेधलं. ‘युगांडा वाइल्डलाइफ एज्युकेशन सेंटर’मध्ये एक व्हॉलेंटियर प्रोग्रॅम होता. तिथल्या प्राणीसंग्रहालयात जिराफ, गेंडा आणि सिंह या प्राण्यांच्या देखभालीसाठी ‘झू-कीपर’ मंडळींना लागेल ती मदत करायची. ती संधी मिळाली आणि मी तिथे जाऊन काम सुरू केलं. जंगली प्राण्यांशी जवळचा संपर्क तेव्हाच प्रथम आला. सिंह आणि गेंडे यांची देखभाल करताना पुरेशी काळजी घेण्यासाठी मध्ये कुंपण असे, पण तिथले जिराफ माणसांच्या वावराला बरेच सरावलेले असल्यामुळे त्यांच्या अगदी जवळ जाऊन खायला देता यायचं. आवडतं खाणं घेण्यासाठी ते आपल्या मागे मागे येत. अर्थात, या सगळय़ा कामात शारीरिक कष्ट खूप होते. पण जिराफ मनापासून आवडला. उंचापुरा माणूसही जेमतेम ज्याच्या पायांपर्यंतच पोहोचतो इतका उंच, डौलदार आणि मैत्री झाली तरी ‘जंगली’ असणं नेहमी अबाधित राखणारा असा तो प्राणी!

जिराफाविषयी फार कमी संशोधन झालं आहे, हे जाणवल्यावर अमेरिकेतही मी प्राणीसंग्रहालयात जाऊन काम करून आलो. दरम्यान ‘जिराफ काँझव्र्हेशन फाउंडेशन’चे संचालक ज्युलियन फेनेसी यांच्या मुलाखती पाहिल्या, त्यांच्याशी ओळख करून घेतली. २०१५ मध्ये एका सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे, की गेल्या तीस वर्षांत जिराफांच्या संख्येत ४० टक्के घट झालीय. हे सगळं समजून घेताना माझा रस वाढत गेला. मी कोलकाता प्राणीसंग्रहालयात स्वयंसेवक म्हणून पर्यटकांना जिराफांची माहिती देऊ लागलो. त्यावेळी असं समजलं, की तिथले जिराफ सतत कोणत्या तरी तणावाखाली आहेत. तिथले दोन-चार जिराफ सारखे भिंती आणि कुंपणाची जाळी चाटायचे. जिभेची विशिष्ट हालचाल करणं, विशिष्ट पद्धतीनं रवंथ केल्यासारखं करणं, मान फिरवणं, हेही लक्षात येत होतं. एकतर त्यांना पुरेशी पोषणमूल्यं मिळत नसावीत किंवा इतर काही ताण लपवण्यासाठीचं हे वागणं असावं, असा माझा अंदाज होता. या जिराफांना फिरायला मिळणारी जागाही लहान होती. मी त्यांचं निरीक्षण करून रीतसर नोंदी करत गेलो आणि ती माहिती ‘ओकलंड झू’मधल्या प्राण्यांच्या एका ‘बिहेव्हिअरिस्ट’ना पाठवली. त्यांनी त्याचं विश्लेषण केलं. उपाय जाणून घेतले. २०१६ मध्ये शिकागोमध्ये जगातली पहिली ‘जिराफ परिषद’ भरली होती. तिथे मी हा अभ्यास सादर केला. भारतातून तिथे गेलेला मी एकटा होतो. नंतर म्हैसूर प्राणीसंग्रहालयातही मी येणाऱ्या लोकांना जिराफांची माहिती देण्याचं काम केलं. प्राणीसंग्रहालयातलं व्यवस्थापन शिकण्यासाठी अमेरिकेत इंडियानापोलीसमध्ये इंटर्नशिप करून अनुभव घेतला.

दरम्यान,‘जिराफ काँझव्र्हेशन फाउंडेशन’नंच एक व्यापक जनुकीय अभ्यास केला आणि त्यात असं लक्षात आलं की, जिराफांच्या चार प्रजाती आहेत. उटीमधल्या एका प्रयोगशाळेची मदत घेऊन आमच्या टीमनी कोलकाता प्राणीसंग्रहालयांमधल्या जिराफांची प्रजाती कोणती ते पाहिलं. ते जिराफ न्युबियन जिराफ उपजातीचे, केनिया, युगांडा, इथियोपिया व दक्षिण सुदान भागात आढळणाऱ्या नॉर्दर्न जिराफ प्रजातीचे निघाले. हाच उपक्रम इतर प्राणीसंग्रहालयांमध्येही करायचा आहे, परंतु करोनामुळे ते काम बाजूला राहिलं आहे. २०१८ मध्ये युगांडामध्ये झालेल्या नियमित जिराफ सर्वेक्षणातही मी सहभाग घेतला होता. जिराफांची अभयारण्यात किंवा प्राणीसंग्रहालयात देखभाल करणं हा थरारून टाकणारा अनुभव असतो. या प्राण्याचा अवाढव्य आकार, उंची आणि एकूण शरीराची ठेवण पाहिली, तर त्यांना उपचारांमध्ये कोणत्याही कारणासाठी भूल देणं शक्यतो टाळलंच जातं. कारण भूल दिल्यानंतर ते जगतील याची शाश्वती नसते. जखमांवर उपचार करू देणं, इंजेक्शन, सोनोग्राफी, एक्स-रेसाठी तयार होणं, खुरांची देखभाल, यासाठी जिराफानं स्वत:हून सहकार्य करावं लागतं. ते त्यांना शिकवणं आव्हानात्मक आहेच, पण तितकंच रंजकही. जिराफ कुणाला उगाच स्पर्श करू देत नाही. त्यामुळे त्यांच्या मानेला, पोटाला, पाय आणि खुरांना माणसानं मुद्दाम स्पर्श करून त्यांना त्याची सवय लावली जाते. आवडत्या खाद्याचं आमिष दाखवून त्यांनी योग्य ती कृती केली की त्यांना बक्षीस दिलं जातं. जिराफांची स्मरणशक्ती तोकडी असते. त्यामुळे त्यांना एखादी गोष्ट शिकवताना सातत्यानं, वारंवार सराव करावा लागतो. जंगलात जिराफ दिवसाचा ७५ टक्के वेळ चरण्यात घालवतो आणि उर्वरित वेळात बराच वेळ रवंथ करत बसतो. अन्न मिळवण्यासाठी तो प्रचंड पायपीट करतो. हे सर्व प्राणीसंग्रहालयांत मिळत नाही. त्यामुळे त्यांना खुरांचे विकार जडतात, त्यांच्या जिभेचा वापरही तितक्या प्रमाणात केला जात नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांना जीभ अधिकाधिक वापरावी यासाठी लहान लहान खेळांद्वारे खायला द्यावं लागतं. त्यांचे खूर ठरावीक काळानं घासावे लागतात, पायांचं दुखलंखुपलंही पाहावं लागतं.
सुरुवातीला सांगितलेला पटना प्राणीसंग्रहालयातल्या जिराफ मातेच्या बाळंतपणाचा अनुभव आम्हा सगळय़ांसाठीच रोमांचक होता. तिथे दोन जिराफ माद्या गर्भवती होत्या. जिराफांचा गर्भवती राहाण्याचा काळ साधारणत: १५ महिन्यांचा असतो. माद्या सहसा एकमेकींबरोबर आणि बछडय़ांबरोबर समूहानं राहातात. याच्या उलट प्रौढ नर एकेकटे राहतात, पण काही नर गट करूनही राहातात. पटनामधल्या जिराफ माद्यांना बछडय़ांच्या जन्मासाठी तयार करणं हा मोठाच कार्यक्रम होता. गर्भवती जिराफ मादीला प्रसूतीच्या वेळी एकदम वेगळं काढणं शक्य नसतं. मादी पहिलटकरीण असेल, तर असं वेगळं काढल्यानं तिच्यावर ताण येतो, ती घाबरून जाऊ शकते. जिराफ बछडा जन्माला आल्यावर तासाभरात त्याच्या पायांवर उभा राहाणं आवश्यक असतं. बछडा अशक्त असेल, त्याला उठता आलं नाही, दूध पिता आलं नाही, तर अशी परिस्थिती हाताळण्यासाठी प्राणीसंग्रहालयानं तयार राहावं लागतं. पहिल्यांदाच बछडय़ाला जन्म देणाऱ्या किंवा ज्यांना स्वत:ला अजिबात आईचा सहवास मिळालेला नाही अशा जिराफ माता काही वेळा बछडय़ाला नाकारतात. आई तणावात गेली, तर आक्रमक होऊन बछडय़ाला इजाही करू शकते. असं काही झालं तर पूर्णत: त्याला वाढवण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागते. जंगलात मात्र ही परिस्थिती वेगळी असते. जिराफ माद्या त्यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला होता त्या जागी आपल्या बछडय़ाला जन्म देण्यासाठी परततात असं निरीक्षण आहे. कारण ती जागा त्यांना सुरक्षित वाटते. माद्या गटानं राहात असल्यामुळे इतर माद्या गर्भवतीच्या आसपास राहातात. बछडय़ांना सांभाळायची त्यांची पद्धतही एकदम छान असते. गटातल्या सगळय़ा बछडय़ांना एकच जिराफ मादी सांभाळते आणि तेवढय़ा वेळात बाकीच्या माद्या दूरवर जाऊन चरून येतात. पुढच्या वेळी दुसरी कुठलीतरी मादी बछडय़ांजवळ थांबते. प्राणीसंग्रहालयात मात्र असं होत नाही. पटना प्राणीसंग्रहालयातली एक जिराफ मादी अगदीच अननुभवी, तर दुसरीला आधीचे बछडे होते. आता दोघी एकदम गर्भवती होत्या. सुदैवानं त्यातल्या अनुभवी जिराफ मादीचं बाळंतपण आधी झालं. तिच्या बछडय़ाचा जन्म होताना आम्ही नवख्या मादीला तिच्यापासून अशा अंतरावर ठेवलं की, ती या बाळाचा जन्म पाहू शकेल. याचा अपेक्षित परिणाम दिसला आणि स्वत:चं बाळंतपण आलं तेव्हा तिला तणाव आला नाही.
जिराफांच्या ताडमाड उंचीमुळे त्यांची शिकार करणं इतर प्राण्यांना सहजासहजी शक्य नसतं. जिराफ फार लांबपर्यंत पळू शकतात. त्यांना पकडण्याच्या प्रयत्नात सिंहासारख्या प्राण्यांची दमछाक होते. सुदृढ जिराफाला हेरून शिकार करायची असेल, तर सिंहांना त्यासाठी सापळा रचावा लागतो. काही अंतरापर्यंत एक सिंह पाठलाग करतो, पुढे दुसरा सिंह पाठलागासाठी तयार असतो, त्याच्यापुढे आणखी दुसरा सिंह, अशी साखळी असते. जिराफांना चढावर चढणं फारसं शक्य होत नाही, त्यामुळे त्यांना दमवण्यासाठी सिंह त्यांना मुद्दाम चढाच्या दिशेनं नेतात. जिराफाची मान हेच त्याचं सर्व काही. त्यामुळे खाली वाकून पाणी पिताना जिराफ फार सावध असतात. नदीमध्ये पाण्यात दबा धरून बसलेली एखादी मगर मानेवर एकदम हल्ला करू शकते म्हणून ही खबरदारी. जिराफाचं मोठंच्या मोठं धूड एकदा खाली बसलं की, त्यांना पटकन उठताही येत नाही. तेवढय़ा वेळात शिकारी चाल करून येऊ शकतो, म्हणून ते फार कमी वेळा खाली बसतात. बसले तरी लांबलचक मानेनं चोहीकडे लक्ष ठेवून असतात किंवा पाच जिराफांपैकी चार जण खाली बसले, तर एक जण उभा राहून लक्ष ठेवतो. त्यांना ‘वॉच टॉवर’ असंच म्हणतात. आसपास शिकारी प्राणी दिसला, तर वॉच टॉवरचं काम करणारा जिराफ फक्त जिराफांनाच नाही, तर झेब्रा, विल्डबीस्ट अशा बाकीच्या प्राण्यांनाही ‘अलर्ट’ करतो. मग सगळे तिथून पळ काढतात. जिराफांचे बछडे मात्र उंचीनं कमी असल्यामुळे ते एकटे पडल्यावर सहज सिंह किंवा तरसांच्या भक्ष्यस्थानी पडू शकतात. त्यामुळेही बछडय़ांना जपण्यासाठीची पाळणाघराची रचना विशेष. उपचारांसाठी किंवा सॅटेलाइट कॉलर लावण्यासाठी जेव्हा अगदीच गरजेचं असतं तेव्हाच जिराफांना डार्टद्वारे सावधपणे बेशुद्ध केलं जातं. जिराफ बेशुद्ध होऊन जमिनीवर पडताना काळजी घ्यावी लागते, नाहीतर त्याला इजा होऊ शकते. त्याची शक्तिशाली मान जमिनीवर धरून ठेवण्यासाठी काही स्वयंसेवक अक्षरश: त्यांच्या मानेवर बसतात, अर्थात जिराफ गुदमरणार नाही याची काळजी घेऊनच.
नर जिराफ एकमेकांवर कुरघोडी करून आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, मादीचा ताबा मिळवण्यासाठी मानेनं युद्ध करतात. त्यांचं हे एकमेकांशी लढणं अगदी थक्क होऊन पाहात राहावं असं असतं. मानेनं एकमेकांना जोरात फटकारे मारत हे युद्ध चालतं आणि त्यातला एक जिराफ जिंकतो. मी असंही पाहिलं आहे, की थोडय़ा वेळानं दोघं एकाच झाडावरची पानं खात असतात! म्हणजे माणसांच्यात असते तशी त्यांच्यात एकमेकांबद्दल कटुता नसते. जिराफांच्या गटांमध्ये म्होरक्या ठरलेला नसतो. ते सहजपणे एक गट सोडून दुसऱ्या गटात जातात आणि तिथे त्यांचा स्वीकार होतो. माणसांचं आणि प्राण्यांचं जग किती वेगळं असतं! प्राणी, किंबहुना निसर्गातला प्रत्येक घटक एकमेकाला पूरक वागतो. जिराफ इतर प्राण्यांना शिकाऱ्यांपासून वाचवतो, छोटे-छोटे पक्षी जिराफांच्या अंगावरचे कीटक खाऊन त्यांना स्वच्छ राहायला मदत करतात, ढांगा टाकत दूरवर फिरणारे जिराफ नकळतपणे विष्ठेद्वारे झाडांच्या बिया ठिकठिकाणी टाकत जातात. एकमेकांना धरून राहाणाऱ्या या निर्मळ प्राणीजगापासून खूप शिकण्यासारखं आहे. जंगली जिराफाबरोबर जवळचं नातं जुळणं कठीण आहे. पण प्राणीसंग्रहालयात माझ्या वावराची सवय झालेला जिराफ मला ओळख दाखवतो, मी जवळ गेल्यावर त्याला एक पान का होईना, पण खायला घालावं असा त्याचा हट्ट असतो. या देखण्या प्राण्याच्या एवढय़ा साध्या वागण्यानंही बरं वाटून जातं! त्यांच्याबरोबर, त्यांच्यासाठी काम करताना मनाला शांतता मिळते. पाळीव न होताही आपल्या प्रजातीशी आणि इतरांशीही निरोगी साहचर्याचा पाठ शिकवणारे हे सोयरे म्हणूनच मला प्रिय आहेत.
tushkul@hotmail. com
शब्दांकन – संपदा सोवनी