जगासाठी वेगळं असलेलं त्याचं असणं तिच्यासाठी सहज होऊन जातं. तिच्या तोंडी त्या म्हाताऱ्याला उद्देशून सतत एक वाक्य येतं कानडीत, ‘इर्ली बीड!’ म्हणजे, ‘असू दे! राहू दे!’ म्हणजेच संस्कृतमध्ये ‘अस्तु’. हे ‘असू देणं’च आयुष्यात कितीतरी ठिकाणी जमत नाही. आहे ते आहे. त्याच्याशी काय भांडायचं? ‘असू दे’ म्हणायचं.
मी त्यांच्या कनपटीलाच बसलेली असायचे! माझ्या हातात एक घडय़ाळ. मी विचारले, ‘किती वाजलेत या घडय़ाळात?’ ते टक लावून नुसतेच त्या घडय़ाळाकडे बघत राहायचे. मग ओशाळून हसायचे. मला त्या हसण्याची भीती वाटायची. मी नेटानं म्हणायचे, ‘सांगा ना, छोटा काटा कितीवर आहे? हे किती आहेत? एक नंतर कुठला आकडा येतो? त्यावर आहे बघा छोटा काटा, सांगा, म्हणजे कितीवर आहे?’ ते अश्राप मुलागत माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहायचे. मी म्हणायचे ‘बरं, घडय़ाळाचं राहू देत. कॅरम खेळू या’ त्यांच्या चेहऱ्यावर निर्मळ हसू यायचं. सोंगटय़ा छान जायच्या त्यांच्या. अजूनही एक डाव झाला की मी पुन्हा सुरू करायची, ‘बरं, आता कुणाचे किती गुण झाले बघू या. पांढरी सोंगटी म्हणजे २०, काळी म्हणजे दहा. तुमच्या पाच पांढऱ्या गेल्या. म्हणजे किती गुण? पाच गुणिले २० किती?’ पुन्हा त्यांच्या निर्मळ, हसऱ्या डोळय़ांत भीती यायची. गणित त्यांचा किती आवडता विषय. लहानपणी मला उत्तम गणित शिकवायचे. तेच आता ‘पाच गुणिले २० म्हणजे किती?’वर दिङमूढ होऊन माझ्याकडे पाहत होते. पण मी हार मानायला तयारच नव्हते. त्या काळात एक वय असतं. जेव्हा वाटतं आपण काही म्हणजे काहीही करू शकतो. त्या भरात आपण काही अचाट गोष्टी करूनही जातो. पण काही गोष्टी त्या ‘काहीही’च्या पलीकडच्या होऊन बसतात. मला वाटायचं, ‘काय असेल तो असू दे यांचा तो विस्मरणाचा रोग. काय असेल ते असू दे त्या रोगाचं नाव. असू दे तो असाध्य. मी बरा करते. मी बाहेर काढते त्यांना यातनं,’ त्या माझ्या वागण्यातनं मी सारख्या त्यांच्यासाठी अशा ‘परीक्षा’ तयार करायचे. त्या ‘परीक्षांनी’ मी त्यांना वाचवू शकेन असं वाटायचं मला. लहान होते ना. त्यांचं ‘२० गुणिले पाच किती?’वर नुसतंच माझ्याकडे पाहत राहणं, म्हणजे मला माझाच पराभव वाटायचा. ‘त्यांचा विस्मरणाचा’ रोग जिंकला, मी हरले असं वाटायचं एक प्रकारची खेचाखेच चालू आहे, असं वाटायचं. तो रोग त्यांच्या एका हातात धरून त्यांना त्याच्या ‘विस्मरणाच्या’ प्रदेशात खेचतो आहे आणि आम्ही, त्यांचे आप्त धडपडून त्यांना आमच्या ‘स्मरणाच्या’ प्रदेशात खेचू पाहतो आहोत असं वाटायचं. मला वाटायचं, ‘खूप जोर लावला तर तो रोग हरेल. त्यांचं एक पाऊल त्या रोगाच्या प्रदेशाच्या रेषेपलीकडे पडलं असलं तरी आम्ही सगळय़ांनी जोर लावला तर कबड्डीच्या खेळात नाही का आटापिटा करून पलीकडच्या पार्टीत गेलेला माणूस धडपडून स्वत:च्या पार्टीत परत येत? तसं होईल त्याचं असं वाटायचं. आता वाटतं, तेव्हाच्या त्या खेचाखेचीत आसपास खरोखर काय चाललं होतं हे दिसतच नव्हतं मला. दिसून घ्यायचं नव्हतं. जे दिसतं आहे त्याच्याशी भांडणं एवढंच होत होतं. आता, इतक्या वर्षांनंतर जेव्हा त्या खेचाखेचीकडे पाहायची संधी मिळाली, एका भूमिकेमुळे, तेव्हा मला त्या सगळय़ात काही ‘वेगळं’ दिसू पाहतं आहे. ते वेगळं मला खूप काही शिकवू पाहतं आहे. त्या ‘वेगळय़ा’ डोळय़ांनी या खेचाखेचीकडे पुन्हा एकदा पाहताना मला त्या रोगाने ‘होत्याचा’ ‘नव्हता’ झालेल्या माझ्या जिवाभावाच्या कुणाची तरी एक हतबल ओढाताण दिसते आहे. मी त्यांना माझ्या दिशेनं जीव खाऊन खेचणं हे खरंच त्यांना वाचवणं होतं का? का त्यांना अजूनच दुखलं असेल माझ्या या कनपटीला बसून घेतलेल्या परीक्षांनी? त्या रोगांमुळं ज्या झपाटय़ानं माझं ते जिवाभावाचं माणूस मलाच ओळखेनासं झालं त्या झपाटय़ानं खरं तर मी पुरती गारद झाले होते. गारद माणूस जिवाच्या आकांतानं स्वत:ला आणि दुसऱ्याला वाचवण्यासाठी वेडेवाकडे हातपाय मारतो तशी ती माझी खेचाखेच होती. ती बरोबर चूकच्या पलीकडची होती. दररोज तो रोग नव्यानं त्याचं ‘काहीसं’ माझ्या माणसाला   दाखवत होता. माझ्या माणसाच्या रत्नमोल आठवणी हिरावत सुटला होता. ही लुटालूट, आपल्याच माणसाची आपण उघडय़ा डोळय़ांनी पाहत राहायची? आपल्या माणसाचा हात असा हळूहळू आपल्या हातातनं सुटत जात असताना. असं नुसतंच कसं पाहणार? त्या हरवणाऱ्या आपल्या माणसाला आरडाओरडा करून सांगायला नको का, ‘आम्ही इथे आहोत. तुमची माणसं.. आम्ही आहोत!’ एवढं सगळं करून, आपला हा आरडाओरडा. त्या माणसासाठी नुसते हलते ओठच, आवाज हरवलेले.
जगलेलं, जगून झालेलं, कालचं, सगळे कुठे जातं? वाहून जातं? कालचा दिवस कुठे जातो? आपला जगून झाल्यानंतर? तो कुठेतरी लुप्त होतो, तो पुन्हा येत नाही. खऱ्या आयुष्यात येत नाही, पण काही जगलेले दिवस जगून संपले तरी मनात पुन्हा पुन्हा जगावे लागतात. गेली काही र्वष माझ्या मनात माझ्या या जिवाभावाच्या माणसाचे शेवटचे विस्मरणाचे दिवस मी असेच पुन्हा पुन्हा जगत होते. खूप धडपडूनसुद्धा आपलं सगळं चुकतंच का असं वाटण्याचे दिवस ‘झालं गेलं’ कुठे जातं? सगळं गंगेला मिळतं? सगळं नाही मिळत. काही ‘झालं-गेलं’ मनात अडकून बसतं. रुतून बसतं. रोजचं, चारचौघांसारखं नेहमीचं जगताना प्रत्येकाच्याच आत या दुखऱ्या जागा असतात रुतलेल्या. प्रत्येकाचे तपशील निराळे. पण जागा त्याच. दुखरी नस तीच. बेसावध दाबली जाणारी. कित्येकदा या दुखऱ्या जागा शेवटच्या श्वासापर्यंत सोबत करतात. पण काही जादुई क्षणांना आयुष्य असं काही वागतं, असं काही बरोबर, जे हवं तेच चपखल देऊन जातं की त्या खोल जखमांनाही भरून निघण्याची उभारी यावी. गेलेला दिवस पुन्हा नव्या स्वरूपात तुमच्यासमोर उभा राहतो. आयुष्य रिवाईंड झाल्यासारखा आणि आधी तो दिवस जगताना दुष्ट वाटलेलं आयुष्य पुन्हा दुसऱ्यांदा तो जगायला देताना दिलदारपणे म्हणतं, ‘पुन्हा एकदा जग तेच सगळं. पण यावेळी तुला हवं तसं. तुला शिकवेल असं?’ मला माझं आयुष्यं तेच म्हणत होतं असं वाटतं आहे. ‘चनम्मा’च्या निमित्तानं त्या विस्मरणाच्या रोगाशी माझं असलेलं भांडण मनात आता कायमच खदखदत राहणार असं वाटत असताना आयुष्यानं अवचित ‘चनम्माला’ माझ्याकडे पाठवली. ती वरवर पाहता एक भूमिका, माझ्या वाटय़ाला आलेली. ‘अस्तु’ नावाच्या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकरांच्या चित्रपटातली. सिनेमात तिचं असणं सहायक भूमिकेएवढंच, पण माझ्यासाठी ती या सगळय़ा तपशिलांपलीकडे निघून गेलेली. माझ्यातल्या सगळय़ा दुखऱ्या वादळांना शमवायला कुठूनशी अवचित माझ्यासमोर आलेली.
चनम्मा ही कर्नाटकातल्या कुठल्याशा खेडय़ातली एक तथाकथित शिक्षितांच्या भाषेत, ‘अशिक्षित’ म्हणावी अशी बाई. कर्नाटकातून महाराष्ट्रात आलेली. तिचा नवरा माहूत. ती, नवरा, दोन मुलं आणि तिची लक्ष्मी नावाची हत्तीण हे तिचं कुटुंब. लक्ष्मी हत्तिणीच्या पाठीवर शहरातल्या लहानग्यांना सैर घडवून तिचा नवरा पैसे कमवतो. शहराबाहेर त्यांचे पालं पडलेली त्यांची वस्ती. एका शहरात कमाई करून झाली की दुसरीकडे निघायचं असं फिरतं आयुष्य आज इथे तर उद्या तिथे. एके दिवशी तिचा नवरा दिवस संपताना नेहमीप्रमाणे पालावर परततो, तर त्याच्यासोबत एक अनोळखी म्हातारा. बऱ्या कपडय़ातला चनम्माला ते कळत नाही, ‘हा कोण?’ नवरा सांगतो ‘मागेच लागला हा म्हातारा!’ तो संस्कृत श्लोक म्हणतो. चनम्माला ते कळत नाही, पण हा बुद्धिमान माणूस असणार, असा ती अंदाज बांधते. तो म्हातारा मध्येच रडतो, मध्येच हसतो. नुसताच इकडे तिकडे पाहतो. तो वेगळा आहे, पण विद्वान आहे हे आकळून ती स्वत:शी म्हणते, ‘कुणास ठाऊक, देवच आला असेल वेगळय़ा रूपात मला आशीर्वाद देण्यासाठी.’ ती त्याला खाऊ पिऊ घालते. त्याच्या अल्झायमर या रोगाविषयी तिला अर्थातच कल्पना नसते. पण त्याच्या ‘वेगळं’ असण्याचा ती तिच्याच शब्दांत अर्थ लावते, ‘पोर झालंय त्येचं!’ बास. आता जगासाठी वेगळं असलेलं त्याचं असणं तिच्यासाठी सहज होऊन जातं. तिच्या तोंडी त्या म्हाताऱ्याला उद्देशून सतत एक वाक्य येतं कानडीत, ‘इर्ली बीड!’ म्हणजे, ‘असू दे! राहू दे!’ म्हणजेच संस्कृतमध्ये ‘अस्तु.’ हे ‘असू देणं’च आयुष्यात कितीतरी ठिकाणी जमत नाही. आहे ते आहे. त्याच्याशी काय भांडायचं? ‘असू दे’ म्हणायचं.
एका प्रसंगात पालाच्या आवारात चनम्माच्या मुलांबरोबर खेळत असलेले आजोबा, हा म्हातारा, एका क्षणी चड्डीत शू करतात. यावर तिचा नवरा म्हणतो, ‘राड केली म्हाताऱ्यानं’ पण चनम्मा म्हणते, ‘इर्ली बीड! असू दे, राहू दे!’ ती उठते. सहजपणे आजोबांना स्वच्छ करते. लुंगी नेसवते. त्यांचं गळणारं नाक स्वत:च्या पदरानं पुसते आणि म्हणते, ‘जा पोरासंग खेळा आता.’ पोरांना कानडीत सांगते, ‘ए, या आज्जाला खेळायला घ्या?’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या हरवलेल्या आजोबांना शोधत त्यांची मुलगी जेव्हा त्यांच्यापाशी पोचते तेव्हा चनम्मा त्यांचा निरोप घेताना त्या मुलीला सांगते, ‘ह्य़ेन्ला तुमचं लेकरू समजा. द्येवं झालं त्येंचं. सगळं सारकंच दिसतंय त्येन्ला.’’
माझ्या खऱ्या आयुष्यातला माणूस अल्झायमरने हरवत चाललेला असताना मला स्वत:ला त्याच्याकडे असं बघायला आवडलं असतं. खऱ्या आयुष्यात नाही, निदान चित्रपटातल्या आयुष्यात मला ते करता आलं यासाठी मी आयुष्याची ॠणी आहे. ‘चनम्मा’ लिहिणाऱ्या लेखणीची ॠणी आहे. खरं तर ‘चनम्मा’ ही कानडी बाईची भूमिका कुणी कन्नड अभिनेत्रीही करू शकली असती. पण सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी मला फार जवळून पाहिलं आहे. माझं आणि या रोगाचं भांडणही फार जवळून पाहिलं आहे. ‘तूच आमची चनम्मा’ अशा विश्वासानं त्यांनी चनम्मा माझ्या आयुष्यात आणली. चनम्मासारखं मलाही माझ्या आयुष्यातल्या त्या माणसाचं ‘देवपण’ बघता यायला हवं होतं असं वाटतं आहे.
तो माणूस तर आता निघून गेला, पण या चित्रपटानं, चनम्मानं ती संधी मला परत दिली. त्या म्हाताऱ्याची आई होता होता चनम्मानं कितीतरी वेळा माझ्याही डोक्यावरून हात फिरवला आहे. मला स्वत:ला हवं तसं वागता आलं नाही, मला माझ्या आयुष्यात हा रोग समोर उभा असताना चनम्माइतकं मोठं होता आलं नाही, याची खंत आता जेव्हा जेव्हा डोळय़ांत दाटून येते, तेव्हा चनम्माचा कष्टाने जाडाभरडा  झालेला हात माझ्याही डोक्यावरून प्रेमभरानं फिरतो. आणि ती मलाही म्हणते, ‘‘इर्ली, बीड!’’ ‘असू दे, राहू दे’, अस्तु!    ल्ल
amr.subhash@gmail.com

ब्लॉग माझापेरले ते..
प्रतिभा आळतेकर
दुसरा दिवस उजाडला. चहा-पाणी झालं. तात्यांची निघायची वेळ झाली. तसे चिंगूआत्यांच्या कानावर शब्द आदळले, ‘‘तुम्ही तुमच्या गावाला जा. इथं तुमचं करायला कोणी नाही. मधुकर, त्यांची बायको करायला तयार असेल तर बघा, नाहीपेक्षा गावी परत बेडगला जा. बघा, काय करताय ते!’’ असं म्हणत तात्यांच्या पत्नी त्यांच्यासह टांग्यात बसल्या.