एकनाथांच्या जीवनावरचा एक कार्यक्रम माझ्या आयुष्यातील टर्निग पॉइंट ठरला. आपणही असा कार्यक्रम करायचा या विचारातून आणि समविचारी, गुणी सहकलाकारांच्या मदतीने गट स्थापन केला- ‘ऊर्मी’. गेली १० वर्षे आम्ही भारतभर कार्यक्रम करतो आहोत, पुरस्कार मिळवतो आहोत.
लग्न झाल्यापासून संसार, नोकरी, मुलंबाळं, मुलांचे शिक्षण, लग्न या चक्रात माणूस अडकून जातो. विशेषत: गृहिणींना तर दुसरे जगच नसते. तसेच माझे झाले. फक्त वाचनाचा छंद जमेल तेवढा जोपासला होता आणि मैत्रिणी जमवून हसूनखेळून आनंदी राहायचे हे पहिल्यापासून धोरण होते.
वयाची पन्नाशी उलटली. संसारात थोडं स्थिरस्थावर झाल्यावर नोकरी सोडली आणि गावातील ‘सुयोग महिला मंडळा’त मी जायला लागले. तिथल्या अनेक उपक्रमांमुळे माझ्यातील सुप्त गुण जागे झाले. आत्मविश्वास वाढला. महिला मंडळात वर्षांतून एकदा एका ग्रुपने एक तास कार्यक्रम सादर करायचा अशी पद्धत होती. त्यामुळे लहानपणीची नाटकांची आवड परत जोपासली गेली.
एकदा आमच्या मंडळात ठाण्याच्या महिलांचा एक गट आला होता. त्यांनी एकनाथांच्या जीवनावर ‘भक्तिरसाच्या कावडी’ कार्यक्रम सादर केला आणि हाच माझ्या आयुष्यातील टर्निग पॉइंट ठरला. तो कार्यक्रम पाहून घरी आल्यावर माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. विचार पक्का झाला आणि त्या दृष्टीने हालचाल सुरू केली. प्रथम समविचारी आणि आवड असलेल्या १५ मैत्रिणींना माझी ही कल्पना सांगितली आणि त्यांनी ती उचलून धरली. या सगळ्याच सहकलाकार ‘गुणी’ निघाल्या. मी तर नेहमी म्हणते, एक एक रत्नं मला मिळाली. कुणी दिग्दर्शन छान करतं, तर कुणाचा आवाज चांगला, तर कुणी स्वत: गाणी रचते, कुणी नृत्यात माहीर, कुणी हिशोब छान सांभाळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे स्वभाव जुळले. ‘चार बायका एकत्र राहू शकत नाहीत’, या प्रसिद्ध उक्तीचा आम्ही बोऱ्या वाजवला.
आमचा ‘ऊर्मी’ ग्रुप १० वर्षे गुण्यागोविंदाने नांदतो आहे. १० प्रकारचे कार्यक्रम करतो आहोत. सर्जनशीलता वाढली. त्यामुळे सतत नवीन नवीन कल्पना डोक्यात घोळत असतात. या ग्रुपमुळे आणि कार्यक्रमांमुळे आम्ही संपूर्ण महाराष्ट्र तर पालथा घातलाच, पण त्याशिवाय कोलकाता, डेहराडून, सिमला इथे स्पर्धामध्ये भाग घेऊन बक्षिसेही जिंकली. दिल्ली महाराष्ट्र मंडळात दोन कार्यक्रम केले. आता आम्ही आमची वेबसाइटही उघडली आहे. संसार करता करता वेळेचे नियोजन साधून आम्ही कलानंदाचा आस्वाद घेतो, थोडीफार स्वकमाई करतो. दहा वर्षांत आमची वयं वाढणारच. तेव्हा नवीन कलाकारांना संधी देतो. आनंद अनुभवतो. पुढची फळी तयार व्हावी म्हणून जाणत्या, होतकरू कलाकारांना प्रोत्साहन देतो.
 घरच्यांचे सहकार्य मिळते, असे लिहिण्याची जुनी पद्धत आहे, पण ते अनेकदा सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी झगडावेही लागते. या दहा वर्षांत काही मैत्रिणींच्या जीवनात दु:खाचे प्रसंग आले, पण त्यांनाही या ग्रुपमुळे, कार्यक्रमांमुळे उभारी मिळाली, याचे समाधान जास्त आहे. दहा वर्षांत आम्ही खूप फिरलो. प्रवासाचे अनुभव, निरनिराळ्या माणसांचे अनुभव जीवन समृद्ध करून गेले. निरनिराळे कार्यक्रम बसविण्याच्या निमित्ताने वाचन वाढले.
शेवटी एकच सांगावेसे वाटते, प्रत्येक स्त्रीने स्वत:च्या अंगातील गुण वेळीच ओळखावेत, त्याला वाव द्यावा, आनंद द्यावा, आनंद घ्यावा.    
आमची वेबसाइट-www.Urmi.in

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा