प्रतिभा वाघ – plwagh55@gmail.com
‘गोंदण’ ही आदिमकाळातील कला आहे. जगात ज्या-ज्या ठिकाणी आदिवासी वस्ती आहे तिथे ही कला अजूनही आहे. विशेषत: आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि आपल्याकडे मध्य भारतात! आदिवासी समाजाने तिला जपली, वाढवली, मात्र अलीकडे नवीन पिढी पारंपरिक गोदना काढून घेत नाही. त्यामुळे ही परंपरा नष्ट होईल अशी चिंता या जमातीतील लोकांना वाटत आहे. म्हणूनच ही चित्रकला टिकावी यासाठी साफियानो पावले ही सत्तरीच्या घरात असलेली ज्येष्ठ चित्रकर्ती ‘गोदना रक्षणा’साठी प्रयत्न करीत आहे. लखनपूरमध्ये राहणाऱ्या साफियानोला तिच्या या कामासाठी अनेक पारितोषिके, प्रमाणपत्रे मिळाली आहेत. तिच्याबरोबरीने अनेक जणी ही कला जिवंत ठेवत आहेत, नव्हे अनेकींच्या उपजीविके चे साधन बनवीत आहेत.
चेहऱ्यावर, दंडावर, पाठीवर ‘टॅटू’ केलेली तरुण मंडळी आपण पाहातो. ही आताची फॅशन असली तरी ‘गोंदण’ ही आदिमकाळातील कला आहे. जगात ज्या-ज्या ठिकाणी आदिवासी वस्ती आहे तिथे ही कला अजूनही आहे. विशेषत: आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि आपल्याकडे मध्य भारतात! शिकाऱ्याचे जीवन जगणाऱ्या आदिमानवाने भिंतीवर गुहाचित्रे काढताना प्राण्यांचे चित्रण केले आणि या चित्रांपासून प्रेरणा घेऊन गोंदण केले असावे असे म्हटले जाते.
‘गोंदण’ याचा अर्थ ‘टोचणे’. धातूचा शोध लागण्यापूर्वी झाडाच्या काटय़ांनी टोचून, त्यात काजळी भरून गोंदविले जाई. मध्य भारतातील आदिवासी त्याला ‘गोदना’ असे म्हणतात. संपूर्ण शरीर हा ‘कॅनव्हास’ (चित्रफलक) आहे असे समजून त्यावर निरनिराळे सुंदर आकार गोंदवून शरीराचे सौंदर्य वाढविणे हा त्यामागील उद्देश असतो. मध्य भारतात गोंदणाचे खूप महत्त्व आहे. गोदना हे आत्मिक सुख देणारे, पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत जाण्याच्या मार्गाचे प्रभावी साधन मानले जाते. दागिन्यांची हौस, कामेच्छापूर्ती, प्रजननाची इच्छापूर्ती, जादूटोण्यापासून रक्षण, ग्रहांचा हानीकारक प्रभाव नष्ट करणे आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढविणे यासाठी उपयोगी ठरते अशा विविध समजुती त्याच्याशी निगडित आहेत. बैगा ही सर्वात आदिम आदिवासी जमात भोपाळपासून ५४० किलोमीटर दूर ‘दिंडोरी’ आणि ७५० किलोमीटरवरील ‘सरगुजा’ जिल्हय़ातील जंगली प्रदेशात मोठय़ा संख्येने राहात आहे. अतिशय सहजतेने कमीत कमी उपजीविकेच्या साधनांसह राहणारे, महत्त्वाकांक्षेपासून मुक्त असलेले, नृत्य, संगीत, गोदना कलांनी समृद्ध आयुष्य जगणारे बैगा आदिवासी आपल्या जीवनात ‘गोदना गुदवाना’ अर्थात ‘गोंदवणे’ खूप महत्त्वाचे समजतात. ‘गोदना’मुळे शरीर रोगमुक्त राहते, स्त्रियांना प्रसववेदना आणि जीवनातील इतर संकटे झेलण्याची ताकद त्यामुळे मिळते असे मानतात. ज्या स्त्रीच्या अंगावर ‘गोदना’ नसेल तिला ‘विवाहयोग्य’ समजत नाहीत. तिच्या हातचे पाणी पिण्यास वडीलधारी मंडळी नकार देतात. जिच्या अंगावर ‘अधिक गोदना’ ती धनवान समजली जाते आणि पूजापाठ करण्याचा मान तिला दिला जातो. स्त्रियांच्या अंगावर दागिने नसले तरी गोदना असणे प्रतिष्ठेचे समजले जाते. ‘गोदना’ चोर, डाकू चोरून नेऊ शकत नाहीत, वाटणी करून मुलाबाळांना द्यावे लागत नाही, म्हणून वेदना सहन करून स्त्रिया गोंदवून घेतात.
गोंदण गोंदवताना काही भागांत गीते म्हटली जातात. ती पारंपरिक गीते असतात. काही भागांत ढोलाच्या थापेवर गोंदवितात- म्हणजे जशी थाप पडेल तशी सुई टोचतात. सर्वसामान्यपणे तीन सुया एकत्र करून त्या बांधतात आणि गोंदवितात. ही संख्या आठ, दहा, पंधराही असू शकते. अर्थात निवडलेली नक्षी (डिझाईन), स्त्रीचे वय, सहनशीलता यावर ही संख्या अवलंबून असते. ‘रमतिला’ म्हणजे काळ्या तिळाचे (कारेळ, खुराश्णी) तेल, काही भागांत मोहरीचे तेल काजळासाठी वापरतात. काजळात तेल घालून ते थोडे पातळ केले जाते. त्यात खास गोदनासाठी तयार केलेली लाकडी काठी बुडवून ‘गोदना’ची चिन्हे काढली जातात. त्यानंतर आवश्यकतेनुसार सुया वापरून त्यावर टोचले जाते. त्यामुळे काजळ आत जाते. गोंदण पूर्ण झाले की गाईचे शेण त्यावर हलक्या हाताने चोळले जाते आणि पाण्याने ते धुतले जाते. त्यानंतर कापडाने ते टिपून घेतात आणि हळद, तीळ तेल, तर काही प्रदेशांत करंजाच्या तेलाचा लेप लावतात. जखम पूर्ण बरी होईपर्यंत हा लेप नियमितपणे लावतात. पावसाळा सोडून आणि प्रामुख्याने थंडीच्या दिवसांत ‘गोदना’ गुदवतात. गोंड जमातीचे लोक आपल्या वाडवडिलांकडून ही कला शिकले आहेत. प्रामुख्याने गोंड स्त्रिया हे काम करतात. वयाच्या ८ ते १० वर्षांत मुलीला कपाळावर पहिले गोंदण गोंदविले जाते. कपाळावर बिंदी अर्थात टिकलीची आकृती गोंदवतात. सुंदरतेबरोबर बुद्धीचा विकास या बिंदीमुळे होतो, असे बैगा आदिवासी मानतात. गोदना केल्यावर अंगाची आगआग होते आणि खूप वेदनाही; पण आयुष्यभर टिकणारा हा गोदना गुदवणारी चित्रकर्ती खूप प्रेमाने आणि कौशल्यपूर्ण काम करते. ती कोणावरही जबरदस्तीने, मनाविरुद्ध गोंदवीत नाही. या कामानंतर ती गोंदण झालेल्या स्त्रीची नजरही काढते. या चित्रकर्तीचा मान धान्य आणि पैसे देऊन राखला जातो. पूर्वी गावागावांत फिरून ‘गोदना’ करीत. आठवडय़ाच्या बाजारातही गोदना करीत; पण आता शिकणाऱ्या मुली याला विरोध करतात याचे एक कारण वेदना आणि शाळेत इतर मुली चेष्टा करतात, असे त्या सांगतात.
छत्तीसगडमधील सरगुजा येथील बैगा आदिवासींची गोदना कला ‘सरगुजिया गोदना’ म्हणून ओळखली जाते. वेगवेगळ्या प्रदेशांत गोदनातील चिन्हे, प्रतीके वेगवेगळी आढळतात. दिंडोरी आणि सरगुजा येथील गोदनामध्ये फरक आढळतो. निसर्गातील पाने, फुले, फळे, भाज्या, जीवजंतू यांच्या आकृतींमधून प्रेरणा घेऊन लवंगफूल, हळदीफूल, भुईकोहळ्याचे फूल, बीज, मजरी काटा (माशाचा काटा), बिछवा (विंचू), करेला चानी (कारल्याची चकती) असे आकार आढळतात. संकल्पानुसार हवे ते गोंदवून दिले जाते. पाऊल, हातापायाची बोटे, चेहरा, कंबर, तळवे, दंड, छाती, पाठ, खांदे या ठिकाणी गोंदविले जाते. मांडय़ांवर मात्र विवाहानंतर पतीने विनंती केली तरच गोंदवून घेतले जाते. स्त्रियांच्या आयुष्यातील शेवटचे गोदना म्हणजे ‘छाती गुदाई’. मुलाला जन्म दिल्यानंतर हे करतात. पुरुष प्रामुख्याने त्यांची पाठ आणि दंड गोंदवितात. विंचू, माशाचा काटा हे लोकप्रिय आकार आहेत. यामुळे नजर लागत नाही असे मानले जाते. आपल्या जमातीची माणसे ओळखता यावीत यासाठीही गोदनाने विशिष्ट चिन्ह गोंदवून घेतात. लग्नविधीच्या वेळी स्त्री मंडपात नृत्य करते. त्या वेळी गळ्याच्या मध्यभागी या मंगलप्रसंगाची आठवण म्हणून ‘कलश गोदना’ करतात. मुलींच्या कपाळावर इंग्रजी ‘व्ही’ अक्षराचा आकार आणि त्यामध्ये बिंदू काढतात. हा ‘व्ही’ आकार म्हणजे चुल्हा आणि बिंदू म्हणजे अग्नी. अर्थात ‘जळती चूल’. चुलीवर अन्न शिजले की अन्नामुळे ऊर्जा मिळते. ऊर्जेमुळे शक्ती आणि गती मिळते.
‘गोदना’ मुळात चित्रकला आहे. बिंदू आणि रेषा हे दोन मुख्य घटक आहेत. आडवी रेषा नदी, उभी रेषा वनस्पती, बिंदू म्हणजे पर्वत आणि तीन बिंदू म्हणजे संपूर्ण निसर्ग असा अर्थ लावला जातो. तीन बिंदू म्हणजे तिन्ही लोक, तीन देवता आणि मनुष्याच्या तीन अवस्था असेही ते मानतात. अलीकडे नवीन पिढी सुशिक्षित असल्यामुळे गोदना गुदवत नाही याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे ही परंपरा नष्ट होईल, अशी चिंता या जमातीतील लोकांना वाटत आहे.
साफियानो पावले ही सत्तरीच्या घरात असलेली ज्येष्ठ चित्रकर्ती ‘गोदना रक्षणा’साठी प्रयत्न करीत आहे. छत्तीसगडमधील सरगुजा जिल्हय़ातील लखनपूरमध्ये राहणाऱ्या साफियानोला तिच्या या कामासाठी अनेक पारितोषिके, प्रमाणपत्रे मिळाली आहेत. ती एक केंद्र चालवते आणि त्यात बैगा आदिवासी स्त्रियांना गोदना चित्रकलेचे प्रशिक्षण देते. नैसर्गिक रंग तयार करण्याचे तंत्र शिकविते. ती सांगत होती, की सरगुजा येथील जंगलात हरा बेहडा, भेलवा, धवई, खेरखसाली, रईना बकाला अशी विविध झाडे आढळतात. त्यांची फुले, पाने, साले यांचा उपयोग करून नैसर्गिक रंग बनवतात. त्यातील फरसा हे लाल रंगासाठी वापरतात. होळीच्या दिवसांत याची लाल रंगाची फुले येतात, असे ती म्हणाली. त्यावरून ते पळसाचे झाड असावे असे वाटते. यातील काही झाडांची साले चोवीस तास उकळवून रंग तयार होतो. तो वस्त्रगाळ करतात. वर्षभर ही पाने, फुले उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ऋ तूनुसार त्यांची साठवण करतात. हे रंग पक्के असतात. पाण्यात धुऊनही कपडय़ावरील रंग जराही हलत नाही. रंगकाम करताना मनात येईल तसतसे रंगवले जाते. कोणतेही कच्चे रेखाटन, ट्रेसिंग के ले जात नाही; पण प्रत्यक्षात ती डिझाईन्स छपाई केल्यासारखी वाटतात. त्यांची सहजता, कौशल्य वाखाणण्याजोगे असते. साफियानो माहितीपट, चित्रांचे प्रात्यक्षिक, प्रदर्शने याद्वारे युवक-युवतींना प्रशिक्षण देते. ती स्वत: नवनवीन नमुने तयार करतेच, पण अतिशय वृद्ध झालेल्या स्त्रियांच्या अंगावरील ‘गोदना’ पाहून एका वहीत त्याची नक्कल उतरवते, कारण तिच्या मते ही जुनी गोदना चिन्हे या वृद्धांच्या शरीराबरोबरच नाहीशी होतील. पुढील पिढय़ांना ती पाहावयास मिळाली पाहिजेत.
अंबिकापूरच्या जगमाला गावात राहणारी दिलबसिया पावले ही दुसरी ज्येष्ठ गोदना चित्रकर्ती गेली तीसहून अधिक वर्षे अंबिकापूर राजघराण्याचे कपडे डिझाईन करते. तिची सून रामकेली पावले मला रायपूरला कला मेळाव्यात तिच्याच स्टॉलवर भेटली. वर उल्लेखलेल्या झाडांपासून तीही रंग तयार करते; पण थोडे घट्ट रंग करण्यासाठी त्यात बाजारात मिळणारे तयार कृत्रिम रंग मिसळते. कॉटन, शिफॉन, चंदेरी अशा वेगवेगळ्या पोतांच्या साडय़ांवर सुरेख ‘गोदना’ रंगविते. तीन हजार रुपयांपासून दहा हजारांपर्यंत किमतीचे काम ती या साडय़ांवर करते. एक जपानी विद्यार्थिनी गोदनाचा अभ्यास करण्यासाठी आली होती. तिने कल्पना दिल्यावर चादरी, उशीचे अभ्रे, दुपट्टे, पंजाबी ड्रेस यावरही रामकेली गोदना चित्र रंगवू लागली आहे. गावातल्या स्त्रियाही आता तिच्या मार्गदर्शनाखाली शिकल्या आहेत. त्यांनाही उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आहे.
दिंडोरी येथील मंगलाबाई तीस—पस्तीस वर्षांची असावी. तिची आई शांतीबाई ही प्रसिद्ध गोदना चित्रकर्ती. गोंड जमातीमधील मंगलाबाई ओरझा (निवारी जिल्हा) मध्य प्रदेश येथील कला शिबिरात भेटली होती. मंगलाबाई अंगावर गोंदण गोंदवितेच; पण अलीकडे नवीन पिढी गोंदवून घेत नाही, त्यामुळे ही कला जपण्याचा तीसुद्धा प्रयत्न करते आहे. ती कॅनव्हासवर पेंटिंग करते. कागद आणि कापडावरही काम करते. तिलाही अनेक पारितोषिके, प्रशस्तिपत्रके मिळाली आहेत. तिच्या कॅनव्हासवरील चित्रात गोदना चिन्हे (िदडोरी शैली) आणि गोंड चित्रकलेतील आकार यांचा सुरेख संगम दिसतो. आधुनिक समकालीन चित्रकर्ती या नात्याने तिची कला उल्लेखनीय आहे. या तिन्ही चित्रकर्तीना देशभरात आणि परदेशात जाऊनही आपल्या परंपरागत कलेची ओळख आणि कौशल्य लोकांपर्यंत पोहोचविण्याची इच्छा आहे. गोदना पद्धतीला चिकित्सकीय महत्त्वही आहे. अॅक्युपंक्चर चिकित्सा विशेषज्ञ डॉ. रश्मी झा यांच्या मते गोदना पद्धतीचे उपचार हे अॅक्युपंक्चरचे प्राचीन रूप आहे.
गोदना किंवा गोंदण हे फक्त शरीर शृंगाराचे माध्यम नसून जीवनाच्या समग्रतेची कविता आहे. यातील प्रत्येक चिन्ह जीवनातल्या सुख, दु:ख आणि संघर्षांला प्रतिबिंबित करते. ही अशी भाषा आहे, जी जीवनाचे आणि जगाचे रहस्य सांकेतिक रूपात अर्थपूर्णतेने प्रकट करते.
विशेष आभार — डॉ. आर. पी. शर्मा (उज्जन, मध्य प्रदेश)