गायत्री साळवणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शालेय जीवनात ज्या शिक्षकांनी आम्हा विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी निरपेक्षपणे कष्ट घेतले, त्याची जाणीव आता वयाच्या साठीत, सध्याची बाजारस्नेही शिक्षणव्यवस्था पाहताना ठळकपणे जाणवते. शाळा-कॉलेजातल्या खूप शिक्षकांना यांच्या योगदानाचं श्रेय द्यायलाच हवं, पण या चाकोरीबाहेर मला एक शिक्षक असे लाभले, की ज्यांच्याबद्दल मुद्दाम लिहिलं नाही, तर या अवलियाची माहिती जगापुढे येणारच नाही. त्यांनी स्वत:ला प्रसिद्धी मिळावी असा प्रयत्न कधीही केलेला नाही. त्यांचं छायाचित्र काढायची परवानगी मागितली, तीही माझ्या सुदैवानं मिळाली! त्यामुळे त्यांची क्षमा मागून मी त्यांचा परिचय करून देण्याचं धारिष्ट करते.

या व्यक्तीचं नाव दिनकर पाटकर. विद्यार्थ्यांमध्ये ते ‘दिनू सर’ म्हणून प्रसिद्ध आहेत. ते आमच्याच कॉलेजचे विद्यार्थी. आम्ही जेव्हा बेळगावच्या ‘गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स’मध्ये ‘पी.यू.सी.’ (प्री युनिव्हर्सिटी कोर्स) पहिल्या वर्गात प्रवेश घेतला, तेव्हा दिनू सर ‘बी. कॉम. फायनल’मध्ये शिकत होते. माझा मोठा भाऊ आणि त्याच्या मित्रांची ते शिकवणी घेत असत. त्या ओळखीतून मी आणि इतर तीन मैत्रिणी, अशांची शिकवणी घेण्याचं त्यांनी कबूल केलं. विषय- अकाउंटन्सी, कॉिस्टग, गणित आणि सांख्यिकी. एकीच्या घरी येऊन ते शिकवणी घेत. गणितात त्यांची गती विलक्षण होती. अगदी अवघड उदाहरणंही सोपी करून शिकवण्याचा हातखंडा होता. ते स्वत: वाणिज्य शाखेचे विद्यार्थी असताना इंजिनीअिरगचं गणितही लीलया शिकवत. कमालीची स्मरणशक्ती. आम्हा चौघींना बी.कॉम. फायनलला मिळालेले परीक्षा क्रमांक आणि मिळवलेले गुण त्यांच्या आजही लक्षात आहेत. विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता त्यांना वेळ अपुरा पडत असे. आमचा कॉस्ट अकाउंटन्सीचा क्लास पहाटे साडेपाच वाजता असे, म्हणजे बघा. आश्चर्य वाटेल, पण त्यांच्या रेग्युलर क्लासची वार्षिक फी फक्त १०० रुपये होती. पहिल्या वर्षी जी फी ठरली, तीच पुढची पाच वर्ष लागू होती. विषय वाढले, तरी फी तीच. आम्ही त्यांना जादा पैसे देऊ केले, तर ते नाराज होऊन निघून जात.

त्यांना आमच्या ग्रुपला शिकवताना काही वेगळं जाणवलं आणि त्यांनी आम्हाला बारावीनंतर गणित घ्यायला उद्युक्त केलं. त्रिकोणमिती, इंटिग्रेशन वगैरे संकल्पना सुरुवातीपासून शिकवून ‘फस्र्टक्लास’चे गुण आम्ही कसे मिळवू याकडे त्यांनी लक्ष दिलं. आमचा जेवढा स्वत:वर विश्वास होता, त्यापेक्षा जास्त सरांचा आमच्यावर आणि त्यांच्या शिकवण्यावर विश्वास होता. प्रत्येक संकल्पना सुटी सुटी करून, अगदी सोपी करून शिकवण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. माझ्या कन्येला मी मुद्दाम अकरावीच्या सुट्टीत गणिताच्या शिकवणीसाठी आजोळी पाठवलं होतं. सरांनी अगदी मनापासून तिची शिकवणी घरी येऊन घेतली. पण फीची रक्कम देऊ केल्यावर मात्र नाराज झाले.

त्यांनी कधी पैसे मिळवण्याचं साधन म्हणून शिकवणीकडे बघितलं नाही. मनापासून शिकवायचं, हाच त्यांचा ऊर्जास्रोत. निष्काम कर्मयोगी म्हणून सरांची गणना करता येईल. स्वत: पदवीधर झाल्यावर आपल्या नोकरीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केल्याचं स्मरत नाही. आम्ही विद्यार्थी मात्र त्यांच्या शिकवणीवर अभ्यास करून चांगल्या नोकरीतून सेवानिवृत्त झालो.बेळगावात त्यांच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ३० हून अधिक जण ‘सी.ए.’ झाले. सरांच्या शिकवणीची फी आमच्या वेळी जी होती, ती नंतरही फारच कमी रकमेनं वाढली. तशात एखादा विद्यार्थी नापास झाला, तर सर फी घेत नसत. त्याला शिकवण्यात आपण कमी पडलो अशी खंत करत.

आता अनियंत्रित मधुमेह आणि मोतीबिंदूमुळे सरांची दृष्टी अधू झाली आहे. पूर्वीप्रमाणे त्यांना आता जास्त शिकवण्या घेता येत नाहीत. प्रश्न विद्यार्थ्यांना वाचायला सांगून तोंडी गणिताची प्रत्येक पायरी सांगत आज मोजक्या शिकवण्या सुरू आहेत. इतर आर्थिक तरतूद नसताना ‘सोने चांदी आम्हा मृत्तिके समान’ हा तुकारामांचा वारसा पुढे चालवणं सुरू आहे.

सध्याच्या भौतिकवादी आणि बाजारस्नेही जगात अशाही शिक्षकाची नोंद असावी, म्हणून हा छोटासा प्रयत्न!

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers dinkar patkar school life author gayatri salvankar amy
Show comments