मैत्रिणींच्या पुस्तक भिशीमध्ये चर्चा सुरू होती; अर्थातच पाणीटंचाईची आणि ऐन उन्हाळ्यातील पाण्याच्या उधळपट्टीची. एकीकडे मनमाडसारख्या गावांमध्ये ३६ दिवसांतून एकदा एक तासभर येणाऱ्या पाण्याची बातमी, तर दुसरीकडे समोरच्या बंगल्यातील बोअरवेलमध्ये पाणी आहे म्हणून तीन-तीन गाडय़ांना नळीने यथेच्छ आंघोळ!
अशी चर्चा पोटतिडिकेने सुरू असताना आमच्या गटातील सगळ्यात उत्साही अशा पाध्येकाकू म्हणाल्या, ‘ए, ऐका गं, मी एक उखाणा घेतेय.’ पाणीटंचाईच्या या चर्चेची गाडी अशी भलत्या वळणावर कशी गेली असे मनात येऊन चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटेपर्यंत पाध्येकाकूंचा उखाणा सुरू झाला. ‘पाणी तिथे सोन्याच्या खाणी, xxx राव म्हणतात तूच माझी पट्टराणी’ उखाण्यातील संदेश मनात झिरपेपर्यंत त्यांनी दुसरा उखाणा सुरू केला- ‘पाणी नसे फुकाची बाब, ती तर राष्ट्राची संपत्ती, xxx राव म्हणतात, ठेवा याचे भान, नाहीतर ओढवेल आपत्ती.’ पाणीप्रश्नावर नुसती आपापसात चर्चा आणि इतरांवर टीका करण्यापेक्षा अधिक ठोस काहीतरी करता येईल का, असे वाटून या पाध्येकाकू आणि त्यांच्या मैत्रिणींनी काढलेल्या ‘जलदिंडी’ची कहाणी मग त्या दिवशी ऐकायला मिळाली. पाण्याचा प्रत्येक थेंब कसा शहाणपणाने वाचवायला आणि वापरायलाही हवा हे लोकांना सांगायला हवे, असे अगदी मनापासून वाटणाऱ्या आणि त्यासाठी ठिकठिकाणी जलदिंडीचे प्रयोग करणाऱ्या स्त्रियांचे सरासरी वय असेल ६५ ते ७०! आणि त्यांच्या धडपडीतील ऊर्जेचे वय असेल २२ ते २५..
या जलदिंडीला निमित्त झाले ते ‘भारतीय स्त्री शक्ती’ या संस्थेतर्फे आयोजित एका स्पर्धेचे. ही स्पर्धा होती ‘पाणी’ विषयावरील हस्तलिखितांची. नाशिकच्या ‘स्नेहवर्धिनी मंचा’ने स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवले आणि त्यांचा अभ्यास सुरू झाला. पाण्यावर काम करणाऱ्या राजेंद्र सिंहांसारख्या लोकांवर लिहिली गेलेली पुस्तके वाचणे सुरू झाले. पृथ्वीवरील उपलब्ध पाणी, त्यातील खारे पाणी-गोडे पाणी व त्याचा तपशील समोर आला, पाण्याच्या पुनर्वापराचे प्रयोग समजू लागले. वाया जाणाऱ्या पाण्याची किंमत आणि मोलही समजू लागले. हस्तलिखितासाठी मजकूर जमा करता करता या पाणीप्रश्नांच्या अनेक पैलूंनी या स्त्रियांना हलवले, बेचैन केले. वाटू लागले, केवळ हस्तलिखितापुरता हा प्रयत्न मर्यादित कशाला ठेवायचा? मिळालेली माहिती बेचैन करणारी. आकडेवारी लोकांपुढे नेऊन लोकांना शहाणे करण्याचा प्रयत्न तर करून बघू या. त्यातून आकाराला आली ‘जलदिंडी’ नावाची संहिता. कल्पना सौंदाणकर आणि वसुधा पाध्ये यांनी ती लिहिली आणि मग धडाक्याने तालमी सुरू झाल्या.
संहिता लिहिणाऱ्या आणि त्याच्या सादरीकरणात भाग घेणाऱ्या सगळ्या वाचक मंचाच्या सदस्या होत्या. म्हणजे भरपूर वाचणाऱ्या, त्यावर चर्चा करणाऱ्या, त्याबद्दल वृत्तपत्रातून लिहिणाऱ्या, त्यामुळे या संहितेतही साहित्याच्या विविध प्रकारांचा वापर केलेला दिसतो. ‘पाऊले चालती पाणवठय़ाची वाट, सुखी संसाराची ठेवुनिया आस’ असे एखादे भजन किंवा ‘गंगा आली रे अंगणी, वाहून गेली रे तत्क्षणी, बारा महिने तेरा काळ, पाण्याचा हो सदा दुष्काळ’ असे लोकसंगीताच्या अंगाने म्हटले जाणारे गीत गाता गाता जलसाक्षरतेचे पंचसूत्र या संहितेत त्यांनी मोठय़ा खुबीने गुंफले. लोकांना, समोर असलेल्या श्रोत्यांना जलसाक्षर तर करायचे, पण त्यांचे लक्ष त्या प्रश्नावरून उडणार नाही असा खुसखुशीत, चटपटीत बाजही कायम ठेवायचा, असे लेखनाचे दुहेरी आव्हान या लेखिकांनी छान पेलले आणि बघता-बघता जलदिंडीचा प्रयोग आकाराला येऊ लागला. तो अधिक रंगतदार होण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू झाल्या. साडय़ांचे रंग ठरू लागले, कमरेवर घागरी घेऊन प्रेक्षकांसमोर येण्याच्या तालमी सुरू झाल्या. एखाद्या विशी-बाविशीतील नाटकवेडय़ा गटाचा उत्साह या स्त्रियांमध्ये संचारला होता.
कमरेवर घागरी-कळशा घेऊनच या दहा-अकरा स्त्रिया आपल्यासमोर जलदेवतेची आळवण करीत येतात. भारतातील पाण्याची एकेकाळची सुबत्ता, त्यातून शेतात उमटणारी समृद्धीची सोनेरी पावले, नद्यांना दिलेले मातृस्वरूप आणि हळूहळू या मातेची सुरू झालेली विटंबना; या विटंबनेबरोबर पाणी वापरातील बेफिकि री आणि अनास्था आणि त्यातून भाळी रुतत चाललेला दुष्काळचा दाहक शाप असा पाण्याचा मोठा प्रवास त्या या ३०-४० मिनिटांच्या संहितेत प्रभावीपणे मांडतात आणि मग गप्पांची गाडी शेवटी वळते ती एका शेतकरी मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाकडे. ही मैत्रीण मुलीचे लग्न थाटात करतेय, कारण तिने तिच्या शेतात ठिबक आणि तुषार सिंचन वापरलेय आणि तिच्या हुशारीची फळे तिला मिळतायत. अशा या ‘जलसाक्षर’ मैत्रिणीच्या घरातील लग्नात उखाणेही तसेच घ्यायला नकोत का? म्हणून मग एक मैत्रीण ठणकावून सांगते, ‘नदीच्या पाण्यात टाकून निर्माल्य तुम्ही केले जलप्रदूषण, xxx राव सांगतात, सरकारला त्याबद्दल देऊ नका दूषण’ तर दुसरी मैत्रीण जलदिंडीचा समारोप करता करता म्हणते, ‘वाचवाल पाणी तर वाचेल देश, xx रावांचा आहे तुम्हाला मोलाचा संदेश’
‘जलदिंडी’च्या पहिल्याच प्रयोगाने समोरचे प्रेक्षक चांगलेच अंतर्मुख झाले. पाणी वापराबाबतचा त्यांच्या वर्तनाचा जणू आरसाच या स्त्रियांनी त्यांच्यासमोर धरला होता. अर्थात केवळ एक प्रयोग करून थांबणे या स्त्रियांना फारसे मानवणार नव्हते. कारण या लेखनाचा हेतूच मुळी लोकांना जागृत करावे, जमले तर थोडे शहाणे करावे असा होता. त्यामुळे नाशिकमधील काही शाळा, इंजिनीयर्स अँड इंजिनीयर्स असोसिएशनसारख्या संस्था या ठिकाणी जलदिंडीचे प्रयोग झालेच, पण प्रयोगात काम करणाऱ्या आणि त्याचे लेखन करणाऱ्या स्त्रिया ज्या वयोगटातील होत्या, त्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अनेक ठिकाणी ही ‘जलदिंडी’ फिरून आली. लासलगावपासून ते वेंगुर्ला-पणजीपर्यंत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना मिळालेला प्रतिसाद होता, ‘पाणी इतके दुर्मीळ होत चाललेय? ठाऊक नव्हते हो हे..’ हा प्रतिसाद म्हणजे ‘जलदिंडी’चे सार्थक झाले असे वाटण्याचा क्षण होता. जलदिंडी सादर करणारे स्त्रियांचे दोन गट होते. ज्यांना फक्त नाशिकमध्ये प्रयोग करणे शक्य आहे, अशा तुलनेने तरुण स्त्रियांचा, ज्यात मनीषा टकले, अलका दुबे, रेवती जोशी, सारिका सोनजे, साधना गोखले, सुनीता सहस्रबुद्धे, वैदेही काशिकर अशा अनेक. दुसरा गट होता या सादरीकरणासाठी नाशिकबाहेरही जाऊ शकतील अशा आजी वर्गातील स्त्रियांचा त्यात समावेश होता. संध्या पगार, सुनीता थेटे, सरिता देशमुख, डॉ. कल्पना आचार्य-चौधरी, डॉ. शीला माळवे, स्वाती पाठक, प्रमिला पाठक, नीलिमा बोबडे, ‘जलदिंडी’मध्ये सहभागी होणारी प्रत्येक स्त्री वेगळ्या व्यवसायातील आपले कार्यक्षेत्र असणारी. पण पाण्याच्या प्रश्नाने तेवढीच अस्वस्थ झालेली. आज वयाच्या सत्तरीला टेकलेल्या या स्त्रियांना हे नक्की ठाऊक आहे, की पाण्याच्या एका कळशीसाठी होणाऱ्या मारामाऱ्या त्यांना कदाचित त्यांच्या आयुष्यात बघाव्या लागणार नाहीत. त्यामुळे हा प्रयत्न म्हणजे आजीने नातवासाठी आंब्याचे रोप लावण्याच्या जातकुळीतला आहे. आणि म्हणूनच त्याचे अप्रूप!
२००९ साली गावोगावी ‘जलदिंडी’ घेऊन गेलेल्या पाध्येकाकू आणि त्यांच्या मैत्रिणींपैकी अनेक जणी आता वयाने थकल्या आहेत. त्यामुळे कमरेवर घागरीचे ओझे आता पेलत नाही आणि प्रयोगाची धावपळही. पण आता इच्छा आहे ती, ही ‘जलदिंडी’ची संहिता कोणा तरुणाहाती सोपवण्याची. त्या संहितेचे लेखनमूल्य, नाटय़मूल्य वगैरे गोष्टींकडे न बघता त्यातील संदेश लोकांपर्यंत जावा म्हणून धडपडणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांकडे ही संहिता जायला हवी. पृथ्वीच्या पोटातील पाण्याचे झुळझुळ झरे ओरबाडणाऱ्या, दूषित करणाऱ्या माणसांना शहाणे करण्याचा हा छोटासाच प्रयत्न. पण आज तो प्रत्येक गावातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायला हवा आहे. नाहीतर पुढचा दुष्काळ बघण्यासाठीसुद्धा आपण वाचणार नाही..
या संहितेसाठी संपर्क- वसुधा पाध्ये
दूरध्वनी ०२५३-२३८२८६६
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा