उपहास, विनोद आणि व्याजोक्ती ही वेमनाच्या काव्याची वैशिष्टय़ं आहेत आणि मार्मिक प्रश्न विचारण्याची त्याची शैलीही खास त्याची अशी आहे. कधी कडवट, कधी आक्रमक, कधी उग्र धारदार, तर कधी सूक्ष्मपणे भेदक, कधी नर्मविनोद तर कधी हलका उपहास- वेमनाची सगळीच रचना अत्यंत प्रभावी आहे. अत्यंत वेधक आहे.
एका ताटी वाढा त्यांना, एका ताटी जेवू द्या
या दुनियेतील सर्व जणांना सर्व भेदही विसरू द्या
एकरूप होऊन सर्वही, जगावेत एकत्रच ते
दोन्ही बाहू उभारून द्यावे त्यांना आशीर्वाद असे
अशी सर्वसमानतेची आणि एकात्मतेची भव्य कल्पना करणारा एक तेलुगु संतकवी बहुधा सोळाव्या शतकात होऊन गेला. वेमना त्याचं नाव. तो बहुधा सोळाव्या शतकातला असावा असं म्हटलं याचं कारण तेरावं ते अठरावं शतक अशा सहा शतकांमध्ये संशोधकांनी त्याला फिरवलं आहे आणि निश्चित पुराव्यांअभावी त्याच्या जन्म-मृत्यूचा काळ संदिग्धच राहिला आहे. तो एका राजघराण्यातला होता, अशाही कथा प्रचलित आहेत. पण त्यालाही पुरेसा पुरावा नाही. तो जातीनं रेड्डी होता आणि त्याचा व्यवसाय शेतकऱ्याचा होता, असं मानलं जातं.
कडाप्पा आणि कर्नूल या दोन जिल्ह्य़ांमधल्या प्रदेशात त्याचं बहुतेक आयुष्य गेलं. त्याच्या कवितेतून त्याच्या आयुष्याचं एक तर्कसंगत चित्र त्याच्या चरित्रकारांनी तयार केलं आहे. शेतीवाडीवर काम करणारा वेमना निर्भय आणि मनमोकळातरुण होता. गावाकडची नाटकं आणि कठपुतळ्यांचे खेळ पाहणारा, लोकगीतं गाणारा आणि रामायण-महाभारताच्या देवळात चालणाऱ्या कथा ऐकणारा तो एक प्रतिभावान मुलगा होता.
दुर्दैवानं कुटुंबातलं सुख त्याच्या वाटय़ाला आलं नाही. सावत्र आई आणि टोचून बोलणारी बायको यांच्या सहवासानं तो त्रस्त झाला. शेतीवर कर्ज झालं, मुलं वाईट निघाली आणि त्यानं भलत्या मार्गावर पाऊल ठेवलं. तो देवदासीच्या नादी लागल्याची आख्यायिका आहे. लोखंडाचं सोनं करण्याची किमया तो शोधत राहिल्याचीही कथा सांगतात. पण त्याला त्या वाटेवरून परत फिरवून सन्मार्गावर आणलं ते त्याच्या गुरूनं. त्यांनी संस्कारांचं, सद्विचारांचं महत्त्व पटवून दिलं आणि त्याचं आयुष्य बदलून गेलं.
कर्नाटकात बसवेश्वरांनी ज्याची स्थापना केली तो वीरशैव संप्रदाय आंध्रातही विस्तारला होता आणि त्याचा लढाऊ, धर्मसुधारक शैव संप्रदायाचा वेमना हा अनुयायी होता. पण वेमनाच्या काळापर्यंत त्याच पंथात झालेले (उच्चवर्णीयांचा) आचार्य आणि (बहुजनांचा) जंगम असे भेद, पंथात शिरलेल्या नव्या भ्रामक रूढी आणि नवी कर्मकांडं, यांनी त्याचं मूळ स्वरूप बदलून गेलं होतं. वेमनाची थोरवी त्याच्या मूळ धर्मतत्त्वांशी असलेल्या बांधीलकीत आहे. विकृतीला- मग भलेही ती स्वत:च्या संप्रदायातली का असेना, दूर सारण्याच्या धैर्यात आहे आणि उदार मानवतावादाच्या त्यानं केलेल्या प्रखर पुरस्कारात आहे.
वेमना हा मध्ययुगातल्या तत्त्वज्ञ कवींमधला एक श्रेष्ठ कवी समजला जातो. आपल्या काळाला आव्हान देणारा संत समजला जातो. रूढार्थानं अशिक्षित होता तो. त्याच्याजवळ पांडित्य नव्हतं; पण जीवनाकडे गंभीरपणे पाहणारा आणि खोलवर विचार करू शकणारा तो एक असाधारण प्रतिभेचा माणूस होता. शेतकरी संत! रानातून, शेतातून, भवतालातून त्यानं जे वेचलं आहे तेच दृष्टांतांच्या रूपानं त्याच्या काव्यात उतरलं आहे.
वेमना सर्वसामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करतो आणि सर्वसामान्य माणसांचा विचार करतो. त्याच्या कवितांचे कित्येक चरण तेलुगु भाषेत आज सुभाषितांची प्रतिष्ठा पावले आहेत. उपहास, विनोद आणि व्यक्रोक्ती ही वेमनाच्या काव्याची वैशिष्टय़ं आहेत आणि मार्मिक प्रश्न विचारण्याची त्याची शैलीही खास त्याची अशी आहे. कधी कडवट, कधी आक्रमक, कधी उग्र धारदार, तर कधी सूक्ष्मपणे भेदक, कधी नर्मविनोद तर कधी हलका उपहास- वेमनाची सगळीच रचना अत्यंत प्रभावी आहे. अत्यंत वेधक आहे.
वेमना बसवेश्वरांच्या विचारांना अधिकच प्रखर करून मांडतो आणि ते विचार मांडता मांडता स्वत:चं असं तत्त्वज्ञानही बोलत जातो. तो श्रम प्रतिष्ठेचा पुरस्कर्ता आहे. समतेचा पाठिराखा आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याच्या एकूणच विचारविश्वाच्या केंद्रस्थानी माणूस आहे. त्याचा ईश्वर माणसापेक्षा वेगळा नाही. तो असं मानतो की आपल्या सगळ्या वासना निपटून, अहंकार पुसून टाकून माणूस जेव्हा परमतत्त्वाशी एकरूप होतो तेव्हा तो ईश्वरच असतो. हे ज्यांना समजत नाही ते त्याला देवळामध्ये आणि तीर्थक्षेत्रांमध्ये शोधत राहतात. ते दगडाच्या मूर्तीना देव मानतात आणि जिवंत माणसांचा, जिवंत प्राण्यांचा छळ करतात. कवी वा. रा. कांत यांनी वेमनाच्या निवडक पदांचा मराठी अनुवाद केला आहे. त्यातले काही अंश इथे उद्धृत करावेसे वाटतात. वेमना म्हणतो,
अज्ञानी हे प्राणी। पूजिती पाषाण
देव लाथाडून। अंतरीचा।।
मातीच्या मूर्तीना। मानूनी ईश्वर
पूजिता साचार। भक्तिभावे।।
सर्वाभूतीचा जो। खरा भगवंत
जाता तुडवीत। आंधळ्याने।।
जिवंत बैलास। उपाशी मारिता
नंदीस पूजिता। दगडाच्या।।
हिंसक क्रूर हे। तुमचे अज्ञान
पाप ते याहून। दुजे काय?
वेमना सर्व माणसांना समान मानतो. त्याला जातिभेद अमान्य आहेत आणि वर्गभेदही तो अत्यंत कठोरपणे नाकारतो. संपत्तीच्या जोरावर सत्ता मिळवणं आणि गाजवणं हे त्याला अमान्यच आहे. अस्पृश्यतेची सांगड त्यानं चारित्र्यहीनतेशी घातली आहे. चरित्रहीन माणूस अस्पृश्य मानायला हवा असं तो म्हणतो. कल्पनेतल्या स्वर्गाच्या प्राप्तीसाठी प्रत्यक्ष जीवनात पापं करण्यापेक्षा प्रत्यक्षातल्या आयुष्याला सहकर्मानं उत्तम बनवा असा त्याचा उपदेश आहे.
मानवी मर्यादांची त्याला नेमकी जाण होती. प्रत्येक माणूस संत महात्मा होऊ शकणार नाही, पण उत्तम नागरिक तर तो होऊ शकतो! प्रामाणिकपणे स्वत:चा व्यवसाय करणं, सचोटीनं आणि निलरेभी वृत्तीनं संसार करणं हे तर माणसाच्या हाती आहे! आपल्या भावना-वासनांना शक्य तितकं उदात्त बनवण्याचा माणसानं प्रयत्न केला पाहिजे, असा वेमनाचा आग्रह आहे. मानवी जीवनाच्या सर्व बाजू, सर्व बारकाव्यांसह वेमनाच्या विचारविश्वात आल्या होत्या. त्यानं माणसाला स्वत:च्या आत्म्याशी प्रामाणिक राहायला सांगितलं. अहिंसा आणि सहिष्णुता यांचा हात धरायला सांगितलं. सर्व सचेतन सृष्टीवर प्रेम करायला सांगितलं.
त्यानं धर्मातल्या अनेक विपरितांवर आघात केले. प्रसंगी अश्लाघ्य भाषाही वापरली. त्यानं वेदांना आणि पुराणांना बहुजनांच्या वतीनं जाब विचारला. धर्मातल्या विकृतींवर प्रखरपणे हल्ला चढवला. त्याची निर्भयता चकित करणारी आहे आणि त्याच्या विचारांची स्पष्टताही आश्चर्यकारक आहे. त्याची मर्यादा किंवा त्याच्यातली उणीव एकच होती, ती म्हणजे स्त्रीकडे पाहण्याची त्याची अनुदार दृष्टी. कदाचित व्यक्तिगत अनुभवांनी पोळून निघाल्यामुळे त्याची तशी दृष्टी तयार झाली असेल, पण म्हणून तिचं समर्थन होऊ शकत नाही.
आणि तरीही वेमना हा अत्यंत थोर प्रतिभेचा संतकवी होता यात शंका नाही. आपल्या काळाला गदागदा हलवून जागं करणारा आणि सच्च्या धार्मिकाचं कर्तव्य म्हणून धर्मशुद्धीचा आग्रह धरणारा संतकवी. धर्म आणि संस्कृतीच्या उदारीकरणाची प्रक्रिया त्यानं द्रष्टेपणानं सुरू केली. तिचं मोल शतकं उलटली तरी मोठंच आहे.
डॉ. अरूणा ढेरे – aruna.dhere@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा