शहराच्या तुलनेत गावात, निम्न शहरात आजही विधवेला कुठल्या तरी माहीत नसलेल्या प्रथा, परंपरांचा आधार घेत तिच्या वैधव्याची जाणीव जागवतच कटू अनुभवांना सामोरं जात जगावं लागतं. आजही आणि आपल्याच अवतीभवतीच्या विधवेचं जगणं असह्य़ करणाऱ्या या गोष्टींना सुशिक्षित म्हणवणारे थांबवू शकतील का? अहमदनगरमध्ये सकारात्मक प्रयोग करणाऱ्या डॉक्टरांचा हा अनुभव त्यांच्याच शब्दांत..
तीडॉक्टर तरुणी. नवीनच सुरू झालेली प्रॅक्टिस करत होती. नवराही डॉक्टर, चांगल्या पगारावर एका हॉस्पिटलमध्ये कामाला होता. अल्पशा आजाराने त्याचं अचानक निधन झालं. रुग्णालयाने अनुकंपा तत्त्वावर तिला तिथे घ्यायची तयारी दर्शवली, तर सासरची मंडळी, तुझी प्रॅक्टिस आहे ना ती तू कर. रुग्णालयात तुझ्या दिराला लाव, म्हणून एकदम तिच्या विरोधातच गेली.
दुसरी एक तरुणी. नवऱ्याने पॉलिसी काढलेली. लग्नाआधी काढल्याने नॉमिनेशन म्हणून आईचं नाव घातलं होतं. अचानक तो गेला. तिला नंतर कळलं की, त्या पॉलिसीचे १२ लाख रुपये मिळाले होते. त्यातला एक रुपयाही तिच्या दृष्टीस पडला नाही.
तिसरं उदाहरण, ती २०-२२ वर्षांची तरुणी. छान आनंदी संसार सुरू असताना अचानक नवरा गेला आणि सासरच्या मंडळींना तिचं ओझं वाटायला लागलं. सासूने सरळ सांगितलं, तू तरुण आहेस आणि घरात माझे दोन तरुण मुलगे आहेत. तुला सांभाळू की त्यांना. तू माहेरी चालती हो. तिचं माहेर सधन नव्हतं. गोधडय़ा शिवत, गळ्यातल्या माळा बनवत ती पोटासाठी कमवत माहेरी जगत राहिली..
हे आणि असे किती तरी विदारक अनुभव आजही विधवेच्या वाटय़ाला येतात आणि कित्येक जणी ते मुकाटय़ाने सहन करत जगतात. या झाल्या प्रत्यक्ष जगण्यातल्या आर्थिक प्रश्नांशी संबंधित समस्या; पण आजही कित्येक विधवांना वेगळेच अनुभव येतात. अनेकींना अपशकुनी मानलं जातं. त्यांच्या कुंकू लावण्यावर फुलं, गजरे माळण्यावर बंधनं येतात. तिला सजणं तर दूर, साधं छान राहाणंही मुश्कील केलं जातं..
काही महिन्यांपूर्वीचीच गोष्ट. मी माझ्या मत्रिणीच्या दिराच्या लग्नाला गेले होते. मत्रीण विधवा होती आणि तिच्या सासरीच होती. हळदी समारंभ उत्साहात सुरू होता. दीर म्हणाले, ‘‘वहिनी, तुम्हीपण लावा ना हळद.’’ दिराच्या आग्रहाखातर ती हळद लावायला पुढे झाली खरी; पण इतर स्त्रियाच पुढे आल्या नि त्यांनी तिला अडवले. काही जणी कुजबुज करायला लागल्या, ही इथे कशाला आली आहे? तिची सासू तर जाहीरपणे म्हणाली, ‘‘स्वत:च्या नवऱ्याला तर मारून टाकले, आता दिराच्याही जिवावर उठलीस का? हिचे अपशकुनी तोंड बघायलाच नको खरं तर आजच्या दिवशी.’’ माझी मत्रीण काही न बोलता तिथून बाहेर पडली; पण बाहेर येताच तिचा संयम ढासळला. ती हमसून हमसून रडायला लागली.. आणि तिला पाहून तिची मुलगीही. ही घटना माझ्या जिव्हारी लागली.
तत्पूर्वी एकदा आमच्या जवळच्या नातेवाईकाचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यविधीला गेले होते.
आकस्मिक झालेल्या या घटनेमुळे त्यांची पत्नी धाय मोकलून रडत होती. अशा अवस्थेत खरे तर तिला मानसिक आधाराची गरज होती; परंतु नातेवाईक स्त्रिया तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून काढण्यात मग्न होत्या. तिच्या मन:स्थितीचा विचार न करता तिचे जोडवे काढून घेतले गेले. कपाळी असलेले कुंकू बळजबरीने पुसून काढले गेले. हे सर्व प्रकार ती नको नको म्हणत असताना चालू होते. मी त्या साऱ्या स्त्रियांना बाजूला करत तिच्यापर्यंत पोहोचले, तोपर्यंत अक्षरश: ती बाई बेशुद्ध पडून तिची दातखिळी बसली होती. शेवटी माझ्यातली डॉक्टर जागी झाली आणि तिला धीर देत मी तिच्यावर प्राथमिक उपचार केले; पण ज्या पद्धतीने तिचं सौभाग्यलेणं (मानलं गेलेलं) काढून घेण्यासाठी अहमहमिका लागली होती, त्यामागची मानसिकता मला खरंच कळत नव्हती. तिचं मंगळसूत्र, हातातल्या हिरव्या बांगडय़ा खेचून काढणं, कपाळावरचं कुंकू विसकटून टाकणं हे कशाचं लक्षण आहे? कुठून सुरूझाली ही प्रथा? आणि आजच्या काळातही ती सुरू असावी? आपल्यासारखे सुशिक्षित लोक हा प्रकार बंद करण्यासाठी काही करू शकतात का, हा प्रश्न मनात उभा राहिला.
या घटनेनंतर काहीच दिवसांत माझ्याही वडिलांचे अपघाती निधन झाले. आईने कुंकू लावणं थांबवलं. तिचं ते मोकळं कपाळ बघून मला बाबा आमच्यात नाही, याची तीव्रतेनं जाणीव व्हायची. म्हणून मी आईला म्हटलं, ‘‘आई, तू हळदीकुंकू लावत जा, म्हणजे अण्णा आपल्यातच आहेत, असे आम्हाला वाटत राहील. त्यांची उणीव भासणार नाही. आम्हाला एक मानसिक आधार राहील.’’ आईने कुंकू लावायला सुरुवात केली खरी, पण माझ्या या निर्णयावर नातेवाईकांमधूनच तीव्र विरोध झाला; पण मी ठाम होते. आईनेही माझं ऐकलं, इतकंच नाही तर माझ्या सगळ्या सामाजिक उपक्रमांत तिचा हिरिरीने सहभाग असतो हे विशेष.
आपल्या समाजात, २१ व्या शतकातही वैधव्य आलेल्या स्त्रियांना इतर स्त्रियांपेक्षा वेगळी वागणूक दिली जाते याची एक एक उदाहरणं पाहिली तरी आपलीच आपल्याला लाज वाटते. त्यातून त्या बाईचे किती मानसिक खच्चीकरण होते याची कल्पनाच करायला हवी. शहरात, उच्च वर्गात, सुशिक्षित घरांत कदाचित हे दिसणार नाही किंवा त्यात हे इतके अघोरी प्रकार नसतील, मात्र गावांत, निम्न शहरांत अगदी शिक्षणाचं वारं लागलेल्या ठिकाणीही अद्याप असे प्रकार होतात ते पाहून मन उद्विग्न होतं. मी डॉक्टर असल्याने अनेक तरुणी, स्त्रिया माझ्याकडे येतात, आपली मनं मोकळी करतात. एकदा अकाली वैधव्य आलेल्या २४ वर्षीय तरुणीने माहेरी गेली असता मेंदी लावली म्हणून सासूने तिला तापत्या तेलाचे चटके दिले, तर आणखी एका समाजातल्या तरुणीला नवरा गेल्यावर तीन महिने अंधाऱ्या खोलीत बंदिस्त राहायची सक्ती केली गेली. त्या अंधाराचा आणि मानसिक स्थितीचा परिणाम होऊन तिचा रक्तदाब इतका कमी झाला, की ती चक्कर येऊन पडली आणि जखमी झाली आणि मला बोलावलं गेलं. यांसारख्या अनुभवांनी माझ्या मनावर खोलवर परिणाम होत गेला व या स्त्रियांसाठी आपण काही तरी करायला हवे, मुख्य म्हणजे त्यांनी खंबीर झालं पाहिजे, आत्मविश्वासाने जगलंच पाहिजे, या जाणिवेने मला झपाटून टाकले.
या समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी मी अनेक पुस्तकांचे, जुन्या ग्रंथांचे वाचन केले. विधवा स्त्रियांनी हळदीकुंकू लावू नये, मेहंदी लावू नये, गजरा, फुलं माळू नये हे सगळं कुठून आलं? त्यात फक्त सामाजिक, मानसिक कारणंच आहेत, की यामागे काही शास्त्रीय कारण आहे याचा शोध घेतला, तर साहजिकच तसा उल्लेख मला कुठल्याही पुस्तकात सापडला नाही. मी आचारसंहिता, कल्याण जीवनचर्या, जैमिनी स्मृती, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, रामायण या धार्मिक ग्रंथांबरोबरच स्त्री-विश्वाशी निगडित अनेक पुस्तकांचे नेहमीच वाचन करते, या सर्व ग्रंथांमध्ये प्रत्येक स्त्रीला सन्मानाने वागवावे, असेच सांगितले आहे. काही ग्रंथांत विधवांवर परपुरुषांची वाईट नजर (सधवांवर पडत नाही हे गृहीतक होतं का? हा प्रश्न अनुत्तरित राहतोच.) पडू नये म्हणून तिने शृंगार करू नये, असे सांगितले आहे. विधवांना आजच्या काळात जे अपशकुनी ठरवून वाईट वागणूक देतात, त्या उद्दिष्टाने हे नियम सांगितलेले नसावेत; परंतु त्याचबरोबर असेही उल्लेख आढळले, की जर आपल्या कुटुंबासाठी, मुलांबाळांसाठी काही नियम शिथिल करावे लागले व त्यातून कुटुंबाचे व तिचे कल्याण साधत असेल तर जरूर करावेत. म्हणजेच त्या काळातील वातावरणावर हे सर्व नियम अवलंबून होते. असे संदर्भ आढळल्यानंतर मीही माझ्या मताशी ठाम राहिले आणि याविरोधात काम करायचे ठरवले. अर्थात झोपलेल्या समाजाचे प्रबोधन करणे अवघड होते. म्हणून मी सण-उत्सवाच्या माध्यमातूनच प्रबोधन करायचे ठरवले. पूर्वीच्या काळीही केशवपन, सती जाणे, या जुलमी प्रथा प्रबोधन करूनच बंद पाडल्या गेल्या, वेळप्रसंगी या समाजसुधारकांना समाजाचा रोषही पत्करावा लागला. तशीच मीही समाजाचा वेळप्रसंगी विरोध सहन करण्याची मनाची तयारी ठेवली व कामाला लागले.
सुरुवातीला मकरसंक्रांतीच्या हळदी-कुंकवासाठी इतर स्त्रियांसोबत विधवांनाही आमंत्रित करायला सुरुवात केली. विधवा कार्यक्रमाला येत असत; परंतु याविषयीची मानसिकता खोलवर रुजलेली असल्याने त्या स्वत:च हळदी-कुंकू लावण्यास तयार होत नसत. या स्त्रियांचे मन वळविणे, त्यांना त्या प्रथेतला फोलपणा जाणवून देणे, ही खरोखरच अवघड बाब होती; पण त्या नुसतं मी सांगते म्हणून ऐकणार नाही, मात्र पुस्तकातील संदर्भ घेऊन समजावून सांगितले तर ऐकतील. त्यांना ते पटेल याची मला खात्री होती. त्यातल्या बहुसंख्य जणी या सुशिक्षित नव्हत्या, आर्थिकदृष्टय़ाही निम्न वर्गातील होत्या, म्हणूनच एकदम टोकाची भूमिका घेऊनही चालणार नव्हती, तर हळूहळू त्यांना पटेल असं त्यांच्या भाषेत, त्यांच्यातल्या गोष्टी घेऊन सांगितलं तर कळेल म्हणून मी सुरुवात हळद आणि कुंकू यांचं आपल्या संस्कृतीतलं महत्त्व सांगतच केली. त्यांना मी सांगायचे, ‘‘कुंकू हे मंगलतेचे, पवित्रतेचे प्रतीक मानले गेलेले आहे, तर हळद ही शुद्धतेचे प्रतीक आहे. शौर्याचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी पुरुषांना कुंकवाचा टिळा शुभचिन्ह म्हणून कपाळावर लावतात, तर हळद ही जंतुनाशक म्हणून आपण जखमेवर लावतो. तसेच आरोग्यास लाभदायक असल्यामुळे आहारातून घेतो. तर मग अनेक विधवा पतीच्या निधनानंतर माता व पिता या दोन्ही भूमिका समर्थपणे पेलून शौर्याने मुलांना घडवतात. त्यांनी शूर पत्नी व शूर माता म्हणून कपाळी कुंकू लावलेच पाहिजे व आहारातून सर्व जण रोज हळद सेवन करतात, तर तीच हळद कपाळी लावण्यास काय हरकत आहे? तुम्ही पतीचे निधन झाले तरी त्यांचे नाव, आडनाव लावतात. त्यांचे सर्व नातेवाईकही सांभाळतात. मग त्यांच्या नावाचे हळदी-कुंकू लावण्यास काय हरकत आहे? या जुन्या चुकीच्या रूढी आहेत, अंधश्रद्धा आहेत. या अंधश्रद्धा आपण मोडून काढायला हव्यात.’’ हे मी अनेकांना सांगायला सुरुवात केली. हळूहळू त्यांना ते पटायला लागलं आणि काही जणी हे कुंकू लावू लागल्या; पण अर्थातच सुरुवातीला चार िभतींच्या आडच.
तिचं बोलणं ऐकल्यानंतर मला खरोखरच हे कार्य करण्याची खूप गरज आहे याची प्रकर्षांने जाणीव झाली. त्या वेळी मी तिला समजावून सांगितलं, ‘‘हे बघ, मी तुला आता हळदी-कुंकू लावत आहे आणि हे कायमस्वरूपी लावायचं. कुणालाच घाबरू नकोस. कुणी विरोध केला, तर मी त्यांना समजावून सांगेन. तू नोकरीनिमित्त घराबाहेर जातेस, अशा वेळी वाईट प्रवृत्तीच्या नजरेपासून तुझं रक्षण होण्यासाठी तुला याची गरज आहे.’’ सुनीता आता नित्यनियमाने हळदी-कुंकू लावते. खुषीत असते, आनंदात असते. तिचा छोटा अनिकेतदेखील आपली आई इतर मित्रांच्या आईसारखीच दिसते, म्हणून आनंदात असतो. हा उपक्रम चालू केल्यापासून आता अनेक महिला आत्मनिर्भरपणे समाजात वावरत आहेत व सर्वाशी संवाद साधून खेळीमेळीच्या वातावरणात जीवन जगत आहेत.
अर्थात जोपर्यंत हे सगळ्यांच्या नजरेआड होतं, तोपर्यंत विरोध झाला नाही; परंतु हळूहळू लोकांपर्यंत ही गोष्ट जायला लागली तसतसा परिसरातल्या लोकांचा विरोध वाढत गेला. मी आणखी एक पाऊल टाकायचं ठरवलं. वटपौर्णिमेच्या दिवशी मी आजूबाजूच्या सर्व स्त्रियांना घेऊन वटवृक्षाची लागवड करण्याचं ठरवलं. या कार्यक्रमात जास्तीत जास्त विधवांचा सहभाग असावा, याकरिता जाहीर आवाहन केलं. वक्तृत्वातून सर्वाचं प्रबोधन केलं; परंतु कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी हे काम मी करू नये, म्हणून मला धमकीवजा फोन आले. ‘‘तुम्ही महिलांचा सत्कार करा, परंतु त्यांना हळदी-कुंकू लावू नका व त्यांच्या हातून वडाची झाडं लावू नका. तुम्ही जर हे काम केलं तर काय करायचं, हे आम्ही ठरवू.’’ अशा धमक्यांमुळे मी माझ्यासोबत माझ्या कुटुंबीयांनाही संकटात टाकते आहे याचं भान मला होतं; परंतु घरचे सगळेच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे मीही अधिक धाडसाने, न घाबरता अधिक खंबीरपणे हे काम करायचं ठरवलं.
या पहिल्या कार्यक्रमात ३५ विधवांकडून वडाची झाडं लावून मी त्यांच्या कपाळावर हळदी-कुंकू लावलं. माझ्याविरुद्ध घोषणाबाजी झाली, नाराजीही व्यक्त केली गेली; परंतु मी भाषणाच्या माध्यमातून संदर्भासहित त्याचं कारण सांगत असे. कार्यक्रमांची संख्या वाढली तसं तसं माझ्यावरची टीकाही वाढली. थेट टीका व्हायला लागली. डॉक्टरबाईचा दवाखाना चालत नाही म्हणून त्यांना असले उद्योग सुचतात. करूनच बघा प्रयत्न, आम्ही बघतोच कसा काय दवाखाना चालवता ते? असलं काहीबाही कानांवर पडत होतं. अनेकदा खचल्यासारखं व्हायचं. अगदी रडायलाही यायचं; पण मी हे काम कुणासाठी आणि कशासाठी करतेय याची मला जाणीव होती. म्हणूनच मी माझा आत्मविश्वास ढळू दिला नाही आणि माझ्या घरच्यांनी ठाम पाठिंबा दिला. त्या जोरावर मी भाषणं देणं, रुग्णाचं प्रबोधन करणं आदी गोष्टी करतच राहिले. हळूहळू त्याचा परिणाम जाणवू लागला. त्यांच्याही लक्षात आलं की, खरोखरच हे कार्य चांगलं आहे व हे कार्य करण्याची या काळात गरज आहे.
आज माझ्या या उपक्रमात अहमदनगरसारख्या ठिकाणी अडीचशे ते तीनशे विधवा सहभागी होतात. त्या नित्यनियमाने हळदी-कुंकू लावतात व हे कार्य आता मोठय़ा प्रमाणावर हाती घेतलं आहे. माझ्या डॉक्टर मत्रिणीही या कार्यात सहभागी झाल्या आहेत. आता आम्ही सर्व जणी मिळून या महिलांच्या आरोग्य समस्या तसंच इतर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत व या सर्व महिलांचा आत्मविश्वास वाढवून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास जास्तीत जास्त कसा होईल, यासाठी प्रयत्न करीत आहोत. आम्ही जेव्हा विधवांशी संवाद साधतो, तेव्हा आम्हाला असं जाणवतं की, गजरा माळणं, हळदी-कुंकू लावणं, मेंदी काढणं या आंतरिक इच्छा त्यांना असतात; परंतु समाजाला घाबरून त्यांच्या या इच्छा मनातच दडपल्या जातात. पूर्वी असंख्य विधवा इतर स्त्रियांच्या तुलनेत स्वत:ला कमी लेखत, अपशकुनी समजत. समाजात वावरताना आपल्याच कोषात राहत. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्यामुळे कुटुंबाची आíथक प्रगती कमी होत असे, त्यामुळे मुलांचा शैक्षणिक खर्च व इतर गरजा भागवणं त्यांना अवघड होत असे; परंतु आता या स्त्रिया आत्मविश्वासाने घराबाहेर पडतात, खंबीरपणे समाजात वावरतात व कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थितरीत्या सांभाळतात. स्वत:ची जबाबदारी स्वत: घेतात, तेच माझ्यासाठी खूप मोलाचं आहे.
दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली, ती ही की, आपल्या समाजात स्त्री विवाहिता असणे आणि अविवाहित, विधवा, घटस्फोटिता असणे असे दोन सरळ सरळ भाग आहेत. विवाहित स्त्रीच्या वाटय़ाला फारसे न जाणारे विकृत लोक या अशा एकेकटय़ा स्त्रियांचा मात्र गैरफायदा घेण्यात अग्रेसर असतात. ती एकटी आहे, हे एकच कारण त्यांच्यासाठी पुरेसं असतं. एके दिवशी माझ्या रुग्णालयात एक तरुणी भेदरलेल्या अवस्थेत आली होती. तिचे मोकळे कपाळ पाहून ती विधवा असल्याचे माझ्या लक्षात आले. सुरुवातीला ती काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हती. फक्त डोळय़ांतून झराझरा पाणी वाहत होते. तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला. तिने माझ्याजवळ उभी असलेल्या परिचारिकेला बाहेर पाठवण्यास सांगितले. त्यानंतर मी एकटीच आहे याची खात्री झाल्यानंतर तिने सांगायला सुरुवात केली, ‘‘डॉक्टर, सहा महिन्यांपूर्वीच माझ्या पतीचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या जागी मला नोकरी मिळाली; परंतु ती परगावी असल्यामुळे मला रोज बसने जावे लागते. माझी जायची-यायची वेळ एकच असल्याने एका माणसाने माझा पाठलाग करायला सुरुवात केली. काल पाऊस पडल्यामुळे ऑफिसमधून बसस्टॉपवर यायला उशीर झाला, त्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन त्या व्यक्तीने काही समजण्याच्या आतच माझा हात धरून मला ओढत बाजूला नेले व माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मी जोर त्याला ढककलं आणि तेथून पळ काढला, पण रात्रीपासून मला झोपच लागत नाहीये. सारखी भीती वाटते, ती दुष्ट व्यक्ती मला उद्या परत त्रास देईल का? असे सारखे मनात येते व माझा थरकाप उडतो. नोकरी करणं तर भाग आहे. काय करू मी?’’
मी तिला शांत केलं. काही औषधं लिहून दिली आणि तिच्यासोबत असणाऱ्या वडीलधाऱ्या व्यक्तींना ही घटना शांतपणे समजावून सांगितली व तिला एक सर्वसामान्य स्त्रीसारखे राहण्यास सांगितले. आत्मविश्वास वाढवायला सांगितलं आणि कुंकवाचा प्रयोग हिच्यावरही करावा, असा विचार करत म्हटलं, ‘‘तू का नाही कुंकू लावत? कदाचित तुला त्याने आत्मविश्वास येईल. तू एकटी नाहीस. तुझ्यात काहीही कमतरता नाही. वैधव्य येणं यात तुझा दोष नाही. तू आधी होतीस तशीच वाग.’’
एक आठवडय़ाने ती पुन्हा मला भेटण्यास आली. कपाळावर लाल टिकली होती. मुख्य म्हणजे शांत वाटत होती. हसून म्हणाली, ‘‘डॉक्टर, आता मला भीती वाटत नाही. मी त्या घाणेरडय़ा माणसाला दटावून म्हणाले, ‘जर तू माझा पाठलाग केला तर मी तुझी पोलिसात तक्रार करेन.’ तेव्हापासून तो मला परत दिसला नाही.’’ तिचा अनुभव ऐकल्यानंतर मला खूप समाधान वाटले व आनंदही झाला, की आज एक कोमेजलेले फूल टवटवीत झाले होते. एका छोटय़ा कृतीमुळे तिचा आत्मविश्वास वाढला होता. मला माझ्या कामात अधिक उभारी मिळाली.
तिच्यासारखे अनेकींचे अनुभव आहेत. पन्नाशीच्या अंजलीताई पाटोळे यांनी सांगितलं, ‘‘डॉक्टर, या उपक्रमामुळे माझी जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलून गेली. माझ्या मुलीच्या लग्नात मी विधवा असूनही स्वत: कन्यादान (?) केले. नातेवाईकांनीही मला कुणी विरोध केला नाही, मला आज खूप समाधान वाटत आहे. भाग्यलक्ष्मी भट आमच्या शेजारीच राहतात. त्यांनी सांगितलं, पूर्वी मी कधी लग्न समारंभाला गेले, की मी विधवा आहे म्हणून मला कोणी हळदी-कुंकू लावत नव्हते; परंतु तुमच्या या उपक्रमामुळे अनेक स्त्रियांची मानसिकता बदलली आहे व त्या मला हळदी-कुंकू लावतात. त्यामुळे आपण इतरांसारख्याच आहोत, या जाणिवेने आनंद झाला. स्त्रियांचे हे अनुभव आणि त्यांच्यात झालेला सकारात्मक बदल पाहून मलाही खूप समाधान वाटते.
सध्या आमच्या ‘जागृती ग्रुप’तर्फे आम्ही सर्व डॉक्टर मत्रिणी एकत्र येऊन विधवांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढतो आहोत. त्यासाठी आम्ही आमच्या काही वकील मैत्रिणींचीही मदत घेतली आहे. शिवाय त्याचं रोजचं जगणं सुसह्य़ व्हावं यासाठी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करतो. या कार्यक्रमाला विधवा-सधवा असा फरक न करता सर्व स्त्रियांना आम्ही आमंत्रित करतो. सर्व स्त्रियांसाठी हळदी-कुंकू, गजरा घालणे, मेंदी काढणे, संगीत खुर्ची असे विविध उपक्रम राबवितो. खेळण्यातून जवळ आलेल्या या स्त्रिया एकमेकांशी गप्पागोष्टी करत आपले सुख-दु:ख वाटतात आणि मोकळ्या होतात. या उपक्रमामुळे त्यांच्या आयुष्यातील हिरावून घेतलेला हक्क त्यांना परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलत आहे व हेच माझ्या कार्याचे फलित आहे, असे मला वाटते.
एके दिवशी ऐन तारुण्यात, चोविसाव्या वर्षी वैधव्य आलेली सुनीता माझ्याकडे आली होती. गप्पा मारता मारता मी सहजपणे तिला विचारलं, ‘‘तुला हळदी-कुंकू लावावंसं वाटत नाही का गं?’’ त्या वेळी ती अगदी हळुवार होत मला म्हणाली, ‘‘डॉक्टर, मीही एक स्त्रीच आहे. मलाही सर्व भावना आहेत. अगदी लहानपणापासून आपण घरात आरशासमोर नटतो थटतो. स्वत:ला सजवण्यात एक वेगळाच आनंद असतो. तरुणपणी तर तो आनंद अधिकच वेगळा असतो. मेंदीच्या पानावर मन झुलण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. आपण आपल्यालाच आवडायला लागलेले असतो. आवडत्या रंगाच्या टिकल्या, कुंकू, पावडर, काजळ, वेगवेगळे गजरे माळणं यातच आपले छोटे छोटे आनंद असतात. हे गेले त्याचं मलाही दु:ख आहेच; पण काळ जात असतो. आपल्याला पुढे जावंच लागतं ना? पण मला काळ थांबल्यासारखंच वाटतंय. सगळंच करायला बंदी आलीय माझ्यावर. आमच्या घरात, नातेवाईकांमध्ये माझं कुंकू लावणं, सजणं हे कुणीच स्वीकारणार नाही हे मला माहीत आहे. म्हणून मी काय करते माहीत आहे? घरात कुणी नसलं ना, की मी दारं-खिडक्या लावून घेते आणि हळदी-कुंकू लावून, गजरा माळून आरशासमोर उभी राहते. माझीच मला मी न्याहाळते. स्वत:ला बघून खुदकन हसते; पण कोणी येईल, मला ओरडेल या भीतीने पटकन सगळं काढून, कपाळ पुसून पुन्हा एकदा पोक्तपणाचा मुखवटा चेहऱ्यावर चढवते; पण मनात मात्र आरशातली माझीच छबी मला आठवत राहते. मी का ते सगळं करू शकत नाही? हे गेले त्यात माझा काय दोष?’’