– डॉ. भूषण शुक्ल
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आई असलात तरी तुम्हीदेखील आजच्या बहुतांश पालकांसारखे ‘करिअर’वाले पालक आहात. सकाळी लवकर उठून घरातलं, स्वत:चं आणि मुलांचं आवरून बाहेर पडताना तुमची धावपळ होते. शिवाय दिवसभर आणि नंतरही ऑफिसातले ताण डोक्याचा ताबा घेऊन बसतात… आणि रात्री मुलाच्या दप्तरातला डबा बाहेर काढताना कळतं, की त्यानं तर आज डबा खाल्लाच नाही! काय असते अशा वेळी तुमची प्रतिक्रिया?… पालकत्वाच्या वाचलेल्या पुस्तकांपेक्षा ती निश्चितच वेगळी असते, नाही का?…
‘पालकांचे गुण आणि दोष’, ‘चांगले पालक कसे बनावे’ अशा विषयांवर एखादी निबंध स्पर्धा घेतली तर खूप छान लेख लिहिले जातील. शांतपणे बसून, वाचून, चर्चा करून, विचार करून उत्तम निबंध लिहिले जातात. मूल कसं वाढवावं, यावर अनेक पुस्तकं तर लिहिली जातातच. विचार करून आराखडा बनवणं, याबद्दल सर्वच माणसं तज्ज्ञ असतात. निदान कागदावर तरी मजबूत, अभेद्या आणि चपखल आराखडे बनवणं हे सोपं नसलं तरी शक्य आहे. विशेषत: हा सर्व उद्योग दुसऱ्या कोणाला तरी सल्ला म्हणून करायचा असेल, तर त्यासारखं सोपं आणि आनंददायक काम नाही!
मग ही ‘आदर्श उत्तरं’ लिहून दिलेली उत्तरपत्रिका हातात असतानाही खऱ्या आयुष्यातले प्रश्न चकवा कसे देतात?… जर चांगली कृती ही चांगल्या विचारातून येते, तर हे सर्व कुठे गडबडतं?… याचं उत्तर मनोविज्ञानाला माहीत आहे, पण अनेक शास्त्रीय सत्यांप्रमाणे ते समोर असूनही आपण ते बघणं नाकारतो. तो मनुष्यस्वभावच आहे!
कृतीला खरी चालना मिळते ती भावनेतून. कोणत्याही प्रसंगात तुमच्या मनात कोणती भावना उत्पन्न होते आणि त्या भावनेचं तुम्हाला भान आहे की नाही, यावर तुमची कृती ठरते. भान नसेल, तर उत्पन्न होणारी भावना थेट कृतीला चालना देते आणि आपण म्हणतो- ‘ते माझ्या हातून घडून गेलं’. ‘मी केलं,’ असा कर्ता भाव तिथे दिसत नाही.
ज्या कृती आपण वारंवार, नियमितपणे करतो, त्याच आपल्या आयुष्याची दिशा ठरवतात. म्हणजे पालक म्हणून तुमचं दैनंदिन वागणं हे तुमच्या पालकत्वाची दिशा आणि परिणाम ठरवतं. निबंध कितीही सुंदर असला, तरी भावनेतून आलेल्या वारंवार कृती हेच अंतिम सत्य असतं.
तुम्हाला कदाचित आता हे वाचणं सोडून द्यावंसं वाटेल! भावनेचं फारच प्रकरण होत आहे असंही वाटेल. सर्व पालकांना आपल्या मुलांचं चांगलं व्हावं असंच नाही का वाटत? मुलांबद्दल आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, काळजी, चिंता, आशा, या सर्व पालकांच्या वैश्विक भावना नाहीत का? जगाच्या पाठीवर या भावना नसलेले कोणीतरी पालक असतील का कुठे? चला, आपण पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या प्रवासाला जाऊ या- तीन पिढ्यांच्या पालकत्वाचा भावनात्मक अभ्यास करू या.
यावेळेस सुरुवात मात्र आपल्यापासून- म्हणजे सध्या पालक असलेल्या मंडळींपासून करू या. पन्नाशीच्या आतली पालक पिढी. आमचा असा ठाम विश्वास आहे, की आम्ही उत्तम पालक होण्याची मनापासून इच्छा असलेली, मुलांच्या नजरेतून विचार करणारी आणि त्यांच्याच सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन त्यासाठी कष्ट करणारी भारताच्या इतिहासातली पहिली पिढी आहोत. आमच्या मुलांचं भवितव्य हे आर्थिक, शैक्षणिक, शारीरिक आणि भावनात्मकरीत्या सुरक्षित आणि समृद्ध व्हावं, याचा आम्ही सतत प्रयत्न करतो. आमचा असा ठाम विश्वास आहे, की कुटुंबकल्याणाची भावना हीच आमच्या आयुष्याची दिशादर्शक आहे.
हे सर्व झालं आमचंच आमच्याबद्दलचं मत. मग त्रयस्थ निरीक्षकाला आम्ही कसे दिसतो? त्या निरीक्षकाला असं दिसत असणार, की आम्ही सतत घाईत असतो. प्रत्येक गोष्टीला जेवढा वेळ खरंतर द्यायला हवा, तेवढा वेळ आमच्याकडे कधीच नसतो. सतत आमच्यासमोर येणाऱ्या बातम्या, कथा, रील्स, फिल्म्स वगैरेंमध्ये दिसणारी माणसं एकांगी असतात. म्हणजे ती कमालीची दुष्ट, पाताळयंत्री आणि क्रूर तरी असतात, नाही तर सुंदर, हुशार आणि कमालीची यशस्वी तरी असतात. जगात हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत अशी आमची खात्री आहे. एखादी मोठी संधी आपल्या हातातून सुटून आपण मागे तर पडणार नाही ना, याची आम्हाला चिंता असते.
या पद्धतीनं चाललेल्या आमच्या आयुष्यात सतत भावनांच्या मोठ्या लाटा येत असतात आणि थकवासुद्धा असतो. आपण मागे पडू याची भीती आणि जास्त चांगलं हवं याची आशा ( खरंतर हाव!) या दोन भावना आम्हाला सतत जाणवतात. आशेच्या मुळाशी विश्वास, आनंद आणि आपुलकी असेल, तर ती आशा खूप छान गोष्टी घडवून आणते. मात्र या आशेच्या तळाशी भीती आणि विषाद असेल तर ती संकटात टाकते. सतत उचंबळणाऱ्या या भावना आणि दैनंदिन जीवनात असणारी घाई आणि थकवा हे भयानक मिश्रण आहे. यातून येणारी कृती ही फक्त तात्पुरता विचार करणारी आणि तीव्र असते.
सकाळी खूप ओढाताण असतानाही वेळ काढून तयार करून, भरून दिलेला डबा आपल्या लेकरानं खाल्लाच नाही आणि हे प्रकरण संध्याकाळी थकून घरी आल्यावर समोर आलं की आपलं काय होतं? त्या लेकराबद्दल काय वाटतं? आपण काय वाक्य बोलतो? काय कृती करतो? याचा एक मिनिट डोळे बंद करून मनातच धांडोळा घ्या.
अर्धवट खाल्लेला किंवा न खाल्लेला डबा आपल्या डोळ्यापुढे त्या मुलाच्या भवितव्याबद्दल काय चित्र उभं करतो? पालक म्हणून आपल्याला त्या क्षणी स्वत:बद्दल काय वाटतं? याचा शांत मनानं तुम्ही आढावा घेतला, तर तुम्हाला काळजी, राग, विषाद, चिंता या भावनांचं मिश्रण झालेलं सापडेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अनुसरून त्यातली एक भावना सर्वांत प्रबळ असेल. ती भावना तुमची कृती ठरवेल. उदा. राग किंवा संताप ही भावना सर्वांत तीव्र असल्यास तुम्हाला अपमानाची जाणीव होईल आणि प्रतिक्रिया म्हणून डोळ्यात टच्कन पाणी येण्यापासून तो डबा भिरकावून देण्यापर्यंत काहीही होईल. कदाचित तुमच्या हाताची पाचही बोटं लेकराच्या गालावर, नाही तर पाठीवर उमटतील. या सर्व वाक्यांमध्ये कर्मणी प्रयोगाचा वापर आहे. तुमचा कर्ता भाव नाही, कारण मनात उमटलेली भावनेची लाट हे सर्व कृत्य तुमच्याकडून करवून घेत आहे.
पालक म्हणून जगताना हे ‘डबा प्रसंग’ अनेकदा येतात. अभ्यास, जेवण, छंद, खेळ, इत्यादी निमित्तानं आम्ही खूप प्रयत्न आणि खर्च करतो. खूप आशा आणि स्वप्नं रंगवतो आणि मुलं मात्र शांतपणे त्याकडे दुर्लक्ष करतात. भावनांचा खेळ इथेच संपत नाही. राग आल्याबद्दल आणि तो शब्द आणि कृतीतून व्यक्त केल्याबद्दल आम्हालाच भीती वाटते आणि अपराधी भावना येते. आपल्या रागामुळे हे मूल काही ‘वेडंवाकडं’ पाऊल तर उचलणार नाही ना, याची आम्हाला धास्ती वाटते. मग आमचं प्रेम त्यांना पटवून देण्यासाठी आम्ही खूप सारवासारवी करतो, लंबेचौडे डायलॉग मारतो, काही तरी लाडिक वागायचा प्रयत्न करतो, प्रायश्चित्त म्हणून काही तरी वचनं, भेटवस्तू किंवा खाऊ देतो.
आमच्या आईबापांना असला त्रास फार कमी झाला किंवा झालाच नाही. आमच्या आजीआजोबांना तर या गोष्टी चमत्कारिकच वाटतील. आई-बाप आणि मुलांमध्ये असं काही घडू शकतं, यावर त्यांचा विश्वाससुद्धा बसणार नाही.
मुलांबद्दल असलेल्या या आमच्या सर्व भावना त्यांनाही वाटल्या असणारच. पण त्या त्यांच्या कृतीमध्ये आणि दैनंदिन वागण्यामध्ये त्यांनी दाखवल्या नसाव्यात. ‘मनातलं मनात ठेवायचं आणि आपण आपलं कर्तव्य करायचं’ असाच शिरस्ता असलेल्या या पिढ्या. निदान एकांतात तरी एकमेकांशी बोलताना मुलांबद्दल त्यांनी चर्चा केली असेल का? आम्ही ‘कपल’ म्हणून मुद्दाम ठरवून ‘रोमँटिक डिनर’साठी जातो आणि तिथेही मुलांबद्दलच बोलतो. असे गमतीदार प्रकार त्यांनी केले असतील का? नाहीच बहुतेक.
हेही वाचा – इतिश्री: चुकलं तर चुकलं!
या थोरल्या पिढ्यांच्या पालक म्हणून असलेल्या भावनांचा विचार केला, तर काही गोष्टी स्पष्ट आहेत-
मुलांना आपल्याबद्दल काय वाटतंय याची त्यांनी फारशी काळजी केली नाही. योग्य प्रसंगी मुलं आपल्या पाया पडत आहेत, हे त्यांना पुरेसं होतं.
त्यांच्या मनात स्पर्धा आणि ईर्षासुद्धा खूप जास्त नसावी असं वाटतं. मुलांच्या यशाबद्दल अभिमान आणि अपयशाबद्दल विषाद असला, तरी तो माफक प्रमाणात असावा.
मुलांचं यशापयश हे त्यांचंच कर्म आणि नशीब याचा परिपाक आहे. आपण आपलं कर्तव्य करून बाजूला व्हायचं, असा निर्लेप आणि त्रयस्थ भाव त्यांनी पाळला असं वाटतं.
मुलांची मोठी आजारपणं सोडली, तर त्यांना मुलांबद्दल फारशी सततची भीती नसावी. ‘वेडंवाकडं वागणं’ म्हणजे आपल्याशी अबोला किंवा आत्महत्या वगैरे नसून त्यांच्या मते शाळा बुडवणं किंवा जातीबाहेर प्रेम करणं वगैरे असावं.
आज जर आजूबाजूला बघितलं, तर स्पर्धा, ईर्षा, स्वाभिमान, मालकी, सर्वंकष सत्ता, सतत वाढणारं यश, या गोष्टींचा सर्व जगालाच ध्यास लागला आहे असं वाटतं. राष्ट्र, राज्य, प्रांत, जात, भाषा पातळीवर हाच हलकल्लोळ माजलेला दिसतोय. ‘व्हिजन आणि मिशन’ नावाखाली आमच्या कंपन्यासुद्धा हेच प्रकरण आमच्या गळ्यात सतत मारताहेत.
पण फक्त एका पिढीत याच भावना आमच्या घरात घुसतील आणि आमच्या पालकत्वाचा इतका ताबा घेतील, त्याला अंतर्बाह्य रंगवून टाकतील, आमच्या अनेक महत्त्वाच्या कृती त्यावरच चालतील, याची आम्हाला कल्पनाच आली नाही… आजिबात आली नाही!
सर्व पूर्वजांची शपथ घेऊन सांगतो… हे आमच्या हातून कसं घडून गेलं, कळलंच नाही हो!
chaturang@expressindia.com