डॉ. मीनाव वैशंपायन

बाईपणाचं सार्थकम्हणजे घर उत्तमरीत्या सांभाळणं, मुलांचं संगोपन करणं, नवऱ्याची मर्जी सांभाळणं, कुटुंबासाठी स्वत:ला समर्पित करणं. १९५०-६० पर्यंत अमेरिकेतील स्त्रियांची मानसिकताही अशीच होती. बेट्टी फ्रीडन यांनी त्याला छेद देणाऱ्या द फेमिनाइन मिस्टिकया पुस्तकातून चूल आणि मूलया चौकटीत अडकलेल्या तेथील स्त्रियांच्या कथा-व्यथा मांडल्या. मला माझी ओळख हवी आहे, या विचाराचं भान या स्त्रियांना आलं आणि स्त्रीवादाच्या नव्या लाटेत स्त्री बाईपणाच्या अधिकारासाठी संघर्ष करू लागली.

पाश्चात्त्य देशांमध्ये स्त्रीवादाचा, स्त्रीसाहित्याचा विचार १९७५ या ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्षा’आधीपासून अनेक वर्षं पद्धतशीरपणे व जोमाने सुरू होता. स्त्रीच्या अंगभूत क्षमतांचा विकास व्हावा, तिच्या कौशल्यांचा तिच्या कुटुंबाबरोबर समाजालाही लाभ व्हावा, पुरुषप्रधान समाजाकडून तिच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाऊ नये, असे प्रयत्न होत होते. त्यांचे तपशील भिन्न असले, देशोदेशी, वेगळ्या काळात, हे प्रयत्न होत असले तरी सर्व चळवळींचा, तत्संबंधित साहित्याचा प्रमुख उद्देश स्त्रियांना सर्व बाबतीत समानाधिकार मिळवून देणं, सामाजिक घटक म्हणून समाजउभारणीत स्त्रीचा सहभाग घेणं हाच होता.

आधुनिक पाश्चात्त्य स्त्रीवादाचा उल्लेख काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांद्वारा निर्देशिला जातो. स्त्रीवादाच्या पहिल्या लाटेमध्ये (१८८०-१९२०) केल्या गेलेल्या प्रयत्नांमुळे स्त्रियांना मताधिकार मिळाला आणि वारसाहक्कांमधील लिंगभेदाधारित विषमता दूर व्हावी, असा प्रयत्न झाला. त्यानंतर दोन जागतिक महायुद्धांमुळे स्त्रीस्वातंत्र्यासाठीच्या चळवळी थंडावल्या होत्या.

दुसऱ्या महायुद्धानंतर सगळ्या जगाचं चित्र अनेक अर्थांनी बदललं. अनेक सामाजिक, आर्थिक, परिमाणं बदलली. अमेरिकेत युद्धावेळी सैन्यात भरती झालेले पुरुष युद्धानंतर घरी परतले. त्यांच्या जागी ज्या स्त्रिया काम करीत होत्या, त्यांनी पूर्वीसारखं घरातच, घरातली कामं करत राहावं अशी अपेक्षा होती. शिवाय प्रसिद्धीमाध्यमं, स्त्रियांसाठीची मासिकं, त्यांच्या समोर स्त्रियांचे आदर्श नमुने म्हणून जे काही मांडू लागली, जी दृश्ये दाखवू लागली, त्यातून स्त्रियांचं गृहिणीपद अधिक अधोरेखित केलं जात होतं.

‘बाईपणाचं सार्थक’ म्हणजे घर उत्तमरीत्या सांभाळणं, मुला-बाळांचं करणं, नवऱ्याची मर्जी सांभाळणं, त्याच्या सर्व प्रकारच्या गरजा पुरवण्यासाठी स्वत:ला समर्पित करणं. हेच तर तिचं स्त्रीत्व. त्या दशकात आदर्श स्त्रीची प्रतिमा ही एका कणखर, स्वतंत्र करिअर करणाऱ्या स्त्रीऐवजी घर व कुटुंब या मर्यादेत अडकलेली स्त्री अशी होत गेली. ही माध्यमं सगळी पुरुषांच्या मालकीची होती. त्यामुळे त्यांचा व्यवहार स्वाभाविकच पुरुषी परिप्रेक्ष्यातून होत होता. १९५०च्या आसपास अमेरिकेत उपनगरांची जी वाढ झाली, त्यातील बहुतेक सर्व कुटुंबे ही मध्यमवर्गीय, एककेंद्री-आईवडील व तीन-चार मुलं अशा स्वरूपाची होती.

अशाच एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक स्त्री ही सगळी कामं करत असताना मनात विचार करत होती, ‘झालं? हे आणि असंच रोज, आयुष्यभर करत राहायचं? माझ्या शिक्षणाचा, मिळवलेल्या उत्तम गुणांचा उपयोग केवळ मुलांना प्राथमिक गोष्टी शिकवण्यापुरताच?’ तिची अस्वस्थता, असमाधान तिला गप्प बसू देईना. तिने आपल्या कॉलेजच्या मैत्रिणींशी संपर्क साधला आणि एक वेगळंच चित्र समोर आलं. त्या अस्वस्थतेने एका वेगळ्याच समस्येचा शोध तिला लागला. हा प्रश्न अनेकींना भेडसावत होता. नैराश्याने ग्रासलेल्या अनेक जणी वैद्याकीय उपचारही घेत होत्या. या स्त्रिया खरोखरी दु:खी होत्या का? ही कोणती समस्या? या बिननावाच्या समस्येचा शोध घेण्याच्या ध्यासानं पुढे जो इतिहास घडला त्या स्त्रीचं नाव होतं, बेट्टी फ्रीडन.

बेट्टी (गोल्डस्टीन) फ्रीडन या ४ फेब्रुवारी १९२१ रोजी अमेरिकेतील इलिऑनिस राज्यातील पिओरिया गावी एका ज्यू कुटुंबात जन्मल्या. कॅलिफोर्नियामधील बर्कले विद्यापीठातून ‘मानसशास्त्र’ या विषयात त्यांना उत्तम गुणांसह पदवी व शिष्यवृत्ती मिळाली. आपल्या मित्राला चांगले गुण मिळाले नाहीत, मग आपण कशी शिष्यवृत्ती घेऊन पुढे शिकायचं अशा तत्कालीन विचारसरणीच्या प्रभावाने त्यांनी पुढचं शिक्षण सोडलं. पण नंतर मित्रही सोडून गेला. नंतर त्यांचा विवाह कार्ल फ्रीडन यांच्याशी झाला, तीन मुलं झाली.

शाळा-महाविद्यालयाच्या नियतकालिकांमधून कवितालेखन, इतर लेखन करत, पुढे संपादन व काही प्रमाणात राजकीय स्वरूपाचे लेख त्यांनी लिहिले. त्यावेळी मित्रमंडळींमध्ये डाव्या विचारसरणीचीही मंडळी होती. त्यांच्यासाठी, कामगारांसंबंधित पत्रकारिताही केली. पण पुढे फारसा संपर्क राहिला नव्हता. १९५२मध्ये ‘ UE News’साठी काम करत असताना त्या गर्भवती आहेत या कारणावरून अचानक कामावरून काढण्यात आलं. त्यानंतर त्यांनी विविध नियतकालिकांमध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केलं.

या सर्व काळात समाजात स्त्रियांबाबत केल्या जाणाऱ्या भेदभावाचा अनुभव स्वत: घेतल्याने त्यांचं मन याबाबतीत अधिक सजग झालं होतं. नंतर आधी म्हटल्याप्रमाणे मैत्रिणी, इतर समवयस्क स्त्रिया यांच्या बाबतीत त्यांनी एक प्रश्नावली तयार करत सर्वेक्षण केलं आणि ‘नाव नसलेली समस्या’ या नावाने त्यांनी लेखमालिका लिहिली. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला.

अनेक गृहिणींना वाटू लागलं की, आपण एकट्या नाही, आपल्यासारख्या इतर कितीतरी आहेत. बेट्टी म्हणतात, ‘स्त्रीत्वाच्या या चुकीच्या प्रतिमेत कित्येक जणी अडकल्या, कोणी आपलं शिक्षण सोडलं, कोणी नवऱ्यांचं शिक्षण पुरं व्हावं म्हणून धडपड केली आणि जसजसं वय वाढत गेलं तसंतसं त्यांना एक पोकळी जाणवू लागली. या पुढे शिकणं वा आवडीची नोकरी करण्याची शक्यता संपली. आयुष्य निरर्थक वाटू लागलं.’ अशा अनेक हकिकतींनंतर फ्रीडन यांनी या प्रश्नाचं गांभीर्य ओळखून पुस्तकलेखनाची तयारी केली.

बऱ्याच संदर्भांची जुळवाजुळव करत पुस्तक पुरं व्हायला पाच वर्षं लागली. ‘द फेमिनाइन मिस्टिक’(१९६३) हे ते पुस्तक. या पुस्तकातून त्यांनी अमेरिकी समाजातील तत्कालीन स्त्रीचं वास्तव चित्र उभं केलं. यात स्त्रियांच्या वाढत्या मानसिक अस्वस्थतेच्या अनेक कहाण्या सांगितल्या. समाजाने माध्यमांद्वारा ज्या स्त्रीप्रतिमांचं चित्रण केलं त्या किती चुकीच्या आणि स्त्रीवर अन्याय करणाऱ्या आहेत हे फ्रीडन यांनी दाखवलं.

स्त्रीत्वाचं सार्थक घरातल्या फरशा चकचकीत करणं किंवा वेगवेगळे जॅम-जेलीचे प्रकार करण्यात नाही. स्त्रीला तिची स्वत:ची वेगळी ओळख हवी, तिच्या क्षमतांचा पूर्ण विकास झाला, तर ती आनंदी होईल. तिला कुटुंब हवं आहेच, पण तिची ओळख केवळ ‘टॉमची आई’ किंवा ‘जॉनची बायको’ अशी न राहता ‘मी एमिली’ म्हणून व्हावी असं तिला वाटतं ते योग्यच आहे. असं त्या म्हणत.

फ्रीडन म्हणतात, ‘स्त्रियांचं असमाधान, जाणवणारी मानसिक पोकळी, आपली ओळख निर्माण करण्याची गरज ही अमेरिकी स्त्रीची खरी समस्या आहे. आजवर ही समस्या सामाजिक दडपणामुळे अव्यक्त राहिली, दबली गेली. या समस्येला आपणच कारण आहोत असा ती चुकीचा समज करून घेत स्वत:लाच दोष देत राहिली. विकास, आत्मविकास हा मानवी गुण आहे आणि तो प्रत्येकाचा अधिकार आहे.’

‘पुरुषांप्रमाणेच स्त्रियाही सर्व प्रकारची कामे करू शकतात, कोणत्याही जबाबदाऱ्या पेलू शकतात. दुसऱ्या महायुद्धात ज्या स्त्रियांनी सर्व प्रकारची कामं युद्धभूमीवरही यशस्वीपणे केली, त्या आता जबाबदारी घेऊ शकत नाहीत का? युद्धकाळात अमेरिकेतील सिएटलमधल्या बोईंग विमानांच्या कंपनीत अनेक स्त्रियांनी महत्त्वाची कामे यशस्वी केली, त्यांना आता शांतताकाळात कंपनीचे मुख्यपद सांभाळता येणार नाही का?’

विचार करायला लावणाऱ्या फ्रीडन यांच्या ‘द फेमिनाइन मिस्टिक’ या पुस्तकाला उदंड प्रतिसाद मिळाला. लाखो प्रती खपल्या. असंख्य स्त्रियांनी पत्रं पाठवून आपल्या ‘मनची बात’ व्यक्त केल्याबद्दल आभार मानले. ललितेतर वाङ्मयातले हे सर्वोत्तम पुस्तक ठरले. एवढंच नाही तर तोवर थंडावलेल्या स्त्रीचळवळीला, स्त्रीवादाच्या दुसऱ्या लाटेला याच पुस्तकामुळे मोठी चालना दिली.

फ्रेंच अभ्यासक, लेखक सिमॉन द बोव्हार यांच्या ‘द सेकंड सेक्स’ या पुस्तकाने स्त्रियांच्या समाजातील दुय्यम स्थानाची प्रकर्षानं जाणीव करून दिली आणि बेट्टी फ्रीडन यांच्या ‘द फेमिनाइन मिस्टिक’ या पुस्तकाने स्त्रियांना आपणच आपल्या विकासाचा मार्ग अनुसरत स्वत:ला सुख मिळवत, समाजाच्या उभारणीत सहभाग घेतला पाहिजे याचं भान दिलं. त्यात त्यांनी स्त्री-पुरुषांच्या पारंपरिक भूमिकांना गरजेप्रमाणे छेद दिला पाहिजे, कोणीही कोणतीही भूमिका स्वीकारली पाहिजे याचा आग्रह धरला. फ्रीडन यांनी एकूण पाच पुस्तकं व आत्मचरित्र लिहिलं. पण ‘द फेमिनाइन मिस्टिक’ या पुस्तकाने त्यांना अनन्य ओळख दिली.

बेट्टी फ्रीडन यांनी ओळखलं होतं की, केवळ लेखन हे समाजभान जागं करण्याचं मर्यादित साधन ठरू शकतं. त्यासाठी स्त्रियांची संघटना निर्माण झाली पाहिजे, जी सर्व प्रकारच्या, सर्व स्तरातील स्त्रियांना एकत्र आणून मोठ्या प्रमाणावर बदल घडवू शकते. फ्रीडन यांच्या मते, केवळ पुरुषांविरुद्ध आमचा लढा नाहीच. कारण स्त्रियांप्रमाणेच पुरुषही समाजाने लादलेल्या प्रतिमेचे बळी आहेत. त्यांना त्या प्रतिमेविरुद्ध जाऊन वागता येत नाही. हे सारं प्रत्येक वेळी जाणीवपूर्वकच घडतं असं नाही. पण ते समाजाच्या मानसिक चौकटीत घट्ट रुतलं आहे. कोणत्याही बाबतीत प्रगती घडवायची असेल तर कळीचा मुद्दा हा असतो की, जुन्या गोष्टी आपण नव्या दृष्टिकोनातून पण चिकित्सकपणे पाहाव्यात.

पुस्तकाच्या अमाप यशानंतर फ्रीडन यांनी समविचारी स्त्रियांच्या मदतीने ‘National Organization for Women- NOW’ या संस्थेची स्थापना केली. सरकारने कायदे केले तरी त्यांची अंमलबजावणी होत नाही, ते बासनात बांधलेल्या स्थितीतच राहतात यासाठी प्रयत्न आवश्यक होते. तसेच अमेरिकी स्त्रीच्या या कुंठितावस्थेमध्ये समाजमाध्यमांप्रमाणेच ताठर शैक्षणिक धोरणे, अकारण मदत नाकारणारे इतर तज्ज्ञ, जाहिरातदार यांचाही वाटा आहे असं फ्रीडन यांचं म्हणणं होतं. या संघटनेद्वारा सतत पाठपुरावा करत फ्रीडन व संघटनेतील इतर स्त्रिया यांनी नोकरीच्या ठिकाणी लिंगभेदावर आधारित राबवला जाणारा वेतनभेद दूर करणारा कायदा लागू करायला लावला.

सर्वात महत्त्वाचं हे की, स्त्रीला गर्भपात करण्याचा वा संतती होऊ देणं वा न देणं हे ठरवण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला व शेवटी तो मान्य करून घेतला. यामुळे स्त्रियांचं जीवन सुधारण्यास बरीच मदत झाली. फ्रीडन यांचं असं स्पष्ट मत होतं की, स्त्रियांना स्वत:जवळील क्षमता पूर्ण सामर्थ्यानिशी वापरायच्या असतील, तर तुम्ही समाजव्यवस्थांमध्ये प्रत्यक्ष उतरल्याशिवाय तुमचा आवाज प्रभावी ठरत नाही. स्त्रियांना स्वत:ची ओळख निर्माण करत स्वातंत्र्य मिळवायचं असेल, तर त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणं ही प्राथमिक अट आहे.

पण तेवढंच पुरेसं नाही. या व्यवस्थेतील विवाह, नोकऱ्या, कुटुंब, घरं, वैद्याकीय मदत यांसारख्या कितीतरी गोष्टींसंबंधीच्या कायद्यांचं पुनर्विलोकन करून त्यात सुधारणा करणंही गरजेचं आहे. आपला आत्मसन्मान राखत, स्त्रियांना जर कुटुंब, त्यातलं प्रेम मिळवायचं असेल तर त्यांनी या गोष्टींचा समतोल साधला पाहिजे. शिवाय जोडीदाराचं सुख हवंसं वाटणं हे नैसर्गिक आहे. समजूतदार सहजीवनाने आयुष्य सुखी होऊ शकतं हे लक्षात घ्यावं, असे सांगणाऱ्या फ्रीडन यांनी सामान्य स्त्रियांच्या दुखऱ्या नसेवर सांगितलेला उपाय साऱ्यांनी करून पाहणं जरुरीचं आहे.

स्त्री चळवळीला नवीन दिशा देत संघटनेचं पाठबळ उभं करणाऱ्या फ्रीडन यांच्याविषयी ‘यांनी आमचं आयुष्य बदललं’, असे म्हणणाऱ्या लाखो स्त्रियांना आजही ‘द फेमिनाइन मिस्टिक’ समकालीनच वाटावं यातच फ्रीडन यांचं जीवनसार्थक असलं तरी ती आपल्या समाजाची शोकांतिका आहे.