..त्या वृद्ध जोडप्याच्या पाया पडलो. मन भरून आलं होतं. आता कसं म्हणायचं की हल्ली जग कोरडं झालंय म्हणून. माणुसकी राहिली नाही. आहेत, चांगली माणसं आहेत; माया आहे, प्रेम, ओलावा सगळं आहे. आणि आयुष्यही इथेच आहे.
मैत्री ही लिंग, जात, भाषा, देश यापलीकडची असते याचे मला आलेले हे तीन सुंदर अनुभव.
मी आणि माझा नवरा आम्ही १०-१२ वर्षांपूर्वी केरळ ट्रिपला गेलो होतो तेव्हाची गोष्ट. एका डाकबंगल्यात उतरलो असता शेजारी स्वित्र्झलडच्या लोझेन गावाहून आलेली ३५ वर्षांची फ्रेंच डॉक्टर तरुणी. एकटीच भारतभ्रमण करत होती. तिची इंग्रजीची बोंब आणि आम्हाला फ्रेंचचा गंधही नाही. जेवायला एकत्र भेटलो. संवाद रंगले, मोडकेतोडके बोलणे, तरीही एकमेकींना पसंत पडलो. ती म्हणाली, ‘उद्या मी व्हाया मुंबई लोझेनला जाणार आहे. मुंबईत एक दिवस ‘ताज’ला थांबणारेय.’ मी तिला सुचलवं, ‘माझं घर इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक एअरपोर्टच्या मधोमध आहे. आम्ही आजच पोचतो आहोत मुंबईला. उद्या आलीस की माझ्याकडे राहा. परवा माझ्याकडून जा. कशाला इतका खर्च करून मुंबईच्या पार दुसऱ्या टोकाला जातेस?’
पटकन विश्वास टाकून ती म्हणाली, ‘ठीक आहे. मला पश्मिना शाली, कुरते घ्यायला, ज्यूट बॅग्ज घ्यायला मदत करशील?’ मी होकार दिल्यावर इतक्याशा ओळखीवर ही परदेशी बाई आमच्या घरी आली. आमच्यावर पूर्ण विश्वास टाकून आल्यावर शांत गाढ झोपली. गोऱ्या रंगाचं आणि केसांचं थोडं टेन्शन आलं खरं; पण गांधी मार्केट, पाली मार्केट हे गर्दीने ओसंडलेले भाग, माझ्या सासू-सासऱ्यांची दादरची दोन खोल्यांची छोटीशी जागा लहान मुलांच्या कुतुहलाने आणि उत्साहाने हिंडली. दुसऱ्या दिवशी भुर्रकन उडून गेलीसुद्धा. नंतर ई-मेलवर संपर्कात होती. दोन वर्षांनी माझा मुलगा-सून, तन्मय-अदिती युरोपला गेले तेव्हा तिच्याकडे दोन दिवस राहिले, तिच्या घरातून दिसणारा ‘मो-ब्लाँ’ पोटभर पाहून अनुभवून ताजेतवाने झाले. फ्रान्सची ‘फ्रान्सवाझी’ आणि भारतातील आम्ही, एका उत्कट भावसंबंधात बांधले गेलो, जवळ आलो.
माझी मुलगी आणि जावई- अमृता आणि सुश्रुत- अर्वाईन या कॅलिफोर्नियातील छोटय़ाशा गावात राहत होते तेव्हाची गोष्ट. माझा जावई सुश्रुत जॉन या गाइडकडे पोस्ट डॉक करत होता. तिथे या जॉनची पी.ए. होती ‘झेकिए ऑनसान’ नावाची ६० वर्षांची टर्किश बाई. आम्हाला एअरपोर्टवरून पिकअप, घर शोधायला मदत, मार्केट दाखवायला, लायब्ररी दाखवायला स्वत:ची गाडी घेऊन ही ‘तरुणी’ सतत पुढे. माझ्यापेक्षा कणभर मोठी ही बाई ड्रायव्हिंगपासून अपार्टमेंटमध्ये एकटी राहून सर्व कामे मॅनेज करत नव्हती तर आनंदाने, उत्साहाने समरसून जगत होती. शनिवार-रविवार ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनरला बोलवायची. कधी तिचे आणखीही काही मित्र यायचे. मोठ्ठं काचेचं जंगी टेबल, सुरेख कटलरी आणि त्याहून सुरेख जेवणं. ‘बुगर व्हीट’चा गाजर किंवा सफरचंद घालून केलेला केक, स्वत: भाजलेला पीटा ब्रेड, ऑलिव्ह्ज मश्रुम, पोटॅटो घालून बेक केलेलं भलंमोठ्ठं आम्लेट, घरी केलेला जॅम आणि डबल किटलीत केलेला अरोमायुक्त उअङवफ नावाचा टर्किश चहा! स्वत:च्या गाडीत घालून आम्हा सर्वाना बीचवर नेणे, त्यानुसार डिकीत चटई, चौकोनी तुकडे केलेले कलिंगड आणि फूट फोर्क्स अशी सुसज्जता. मॅनेजमेंटचे धडे घ्यावे ते हिच्याकडून! भल्यामोठय़ा युनिव्हर्सिटीतील झाडांची, पक्ष्यांची यद्ययावत माहिती. ६० व्या वर्षीसुद्धा तुकतुकीत कांती, घट्ट मस्क्युलर बॉडी. योगा, झपाझप चालणं, एरोबिक्स आणि प्राणायाम या सर्वाची पूर्ण माहिती आणि सराव.
तिथे असताना निस्सीमचा पाच महिन्यांचा वाढदिवस केला. औक्षण, ओवाळणे, आठय़ावर चढवणे, डोक्यावर दूर्वा, कापूस या सगळय़ाचा अर्थ तिला फार आवडला. लाल कुंकू आणि हळद हेही हौसेनं लावून घेतलं. मी परत भारतात यायची वेळ झाली तेव्हा म्हणाली, ‘जायच्या आधी एक रात्र माझ्याकडे राहायला येशील का?’ मी ‘हो’ म्हटल्यावर ती खूपच खूश झाली. मला कवेतच घेतलं. स्वत:च्या बेडवर, स्वत: विणलेली पांढरीशुभ्र बेडशीट घालून मला झोपायला सांगितलं आणि स्वत: सोफ्यावर झोपली. दोन्ही मुली अमेरिकेत, पण दूर न्यूयॉर्कला; एकीचा घटस्फोट झालेला तर दुसरीला लग्नच करायचं नव्हतं. नवरा गेलेला. पण डिप्रेशनला जागा न देता अंगणात रंगीबेरंगी फुलं फुलवायला घेणारी ‘लिव्ह लाइफ टू द फुलेस्ट’ म्हणणारी माझी टफ मैत्रीण ‘झेकिए.’ अर्वाइन सोडताना मुलगी, नातू सोडून यायचं म्हणून डोळय़ांतून महापूर आलाच, पण त्यातले काही अश्रू माझ्या मैत्रिणीला सोडून जायचे म्हणूनही होते.
आणि आता ही गेल्या आठवडय़ातील गोष्ट. आम्ही ‘धरमशाला’ला गेला होतो. फिरताना वाटेत एक लोकरीचे दुकान दिसले. नातवंडांसाठी स्वेटर्स घ्यायला आत शिरले. २-३ गोजिरवाणे स्वेटर्स घेतले, तेवढय़ात तिथे बसलेल्या वयस्क स्त्रीने विचारले, ‘टिक्का नहीं लगाते?’ हिमाचलची खासियत म्हणजे टिक्का आणि सिंदूर. यातून थोडय़ा गप्पा सुरू झाल्या. ही वृद्धा ८५ ची, सासरे ९०चे आणि ५०ची प्रेमसुधा म्हणजे सून असे तिघे मिळून हा लोकर व्यवसाय करत होते. दुकानाची मागील बाजू घरात उघडते. घर कसले? गढीच मोठ्ठी थोरली. मीही जरा विचारलं, ‘दो दिन से आलू पराठे खा रही हूँ, इतने अच्छे हमारे नहीं बनते,’ कृती सांगण्याऐवजी प्रेमसुधा म्हणाली, ‘आप कल सुबह मेरे घर नाश्ते पे आइये, मैं खिलाऊंगी और साथ में सिरकडंगी भी?’ मला अशी पारंपरिक हिमालयीन पाककृती, तिचे रसोईघर बघायची कल्पना आवडली. पटकन ‘हो’ कसं म्हणू, म्हणून आढेवेढे घेतले, पण त्यांच्या अगत्यापुढे काही चालले नाही. शेवटी उद्याचा वादा करून आम्ही हॉटेलवर परतलो.
दुसऱ्या दिवशी ९ वाजता त्यांच्या घरी गेलो. घर इतकं मोठ्ठं की अबब! आपली ४-५ बीएचके त्यात मावली असती. मागे छोटंसं शेत, गच्ची. याला म्हणावी सुबत्ता, सधनता आणि जीवाला शांती. मस्त करारे आलू पराठे, भरवाँ करेले आणि दही खाऊन क्षुधाशांती आणि मनाची तृप्ती झाली. प्रेमसुधा आम्हाला वाढत होती आणि वृद्ध सासूसासरे पहाडी + पंजाबी + हिंदीत आमच्याशी गप्पा मारत होते. २५ वर्षांपूर्वी त्यांची बेटी आणि दामाद जम्मूला जाताना बसमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या स्फोटात ठार झाले होते. म्हातारी हे सांगत असताना कंपवात झालेले सासरे अधिकच कापू लागले. दोघांनी आमचे हात हातात घेतले आणि म्हणाले, ‘इस उमर में बहबहके अभी आँसू भी सूख गए!’
आम्ही निघू म्हटलं, कारण आमची फ्लाइटची वेळ झाली होती. म्हातारी सावरली. आतून एक कागदी पिशवी (हिमाचलमध्ये प्लास्टिक पिशवी वापरत नाहीत) आणली आणि मला दिली. मला अतिशय भरून आलं. एकतर सुरेख ब्रेकफास्ट दिलाच होता. मला ती भेटवस्तू घेववेना. म्हातारी म्हणाली, ‘मी तुझ्या आईसारखी आहे. शादीशुदा औरत ऐसेही नहीं जाएगी! कुछ जादा नहीं, बस माथे का सिंदूर है.’ आपण ओटी भरतो ना तसा प्रकार. त्या पिशवीत एक छोटी स्नोची डबी, एक कंगवा, मरून रंगाच्या खडय़ाच्या ६ पंजाबी बांगडय़ा, २ टिकल्यांची पाकिटे, १ नारळ आणि ५० रुपयांची एक नोट! इतकं सारं होतं. त्या वृद्ध जोडप्याच्या पाया पडलो. मन भरून आलं होतं. आता कसं म्हणायचं की हल्ली जग कोरडं झालंय म्हणून. माणुसकी राहिली नाही. आहेत, चांगली माणसं आहेत; माया आहे, प्रेम, ओलावा सगळं आहे. आणि आयुष्यही इथेच आहे. श्रद्धा आहे. दोन प्रेमाचे शब्द बस्स! हे असे क्षण, अनुभवाचे, आपल्याला बळ देतात, नाही का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा