रेणू दांडेकर
अनीश आणि अशिता नाथ स्वत:च्या खर्चाने ‘दि गुड हार्वेस्ट स्कूल’ चालवतात. ही भारतातील पहिली मुलींसाठीची शेतीशाळा आहे. मुलींना मूल्यशिक्षणपण मिळतेच. शिवाय जबाबदार अन्ननिर्माती म्हणूनही शिक्षण मिळते. या शाळेत फी नाही. शिवाय शिकण्यासाठी नि वाढण्यासाठी सुरक्षित, स्वतंत्र पर्यावरणही इथे मिळते. ही शाळा काही विषय नेहमीचे घेत असली तरी मुख्यत: भर आहे तो परिपूर्ण शेतनिर्मितीच्या शिक्षणावरच. उत्तर प्रदेशातील उन्नावजवळ पश्चिम गाव येथील ‘दि गुड हार्वेस्ट स्कूल’विषयी..
उत्तर प्रदेशातील उन्नावजवळील पश्चिम गाव येथील ‘दि गुड हार्वेस्ट स्कूल’. एका सामाजिक जाणिवेतून जन्मलेली ही शाळा म्हणजे भारतातील पहिली मुलींसाठी असणारी शेतीशाळा आहे. या शाळेची सुरुवात २०१६ मध्ये अशिता आणि अनीश नाथ यांनी केली. हे जोडपं मुळचं लखनौचं. पण या जगावेगळ्या शाळेचा निर्णय त्यांनी का घेतला असावा?
अनीश नाथ आयटी कंपनीत नोकरीला होते. २००६ च्या सुमारास त्यांनी आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि शेतीत विशेष रुची असल्याने त्या दृष्टीने २०१३ मध्ये उन्नावजवळ एक लहानशी जागा घेतली. त्यांना शेती करायची होती. त्यातून उत्पन्न घ्यायचे होते. त्या दृष्टीने त्याने प्रयत्न सुरू केले, परंतु प्रत्यक्ष चित्र फारच वेगळं होतं. आपलं कर्ज फेडण्यास शेतकरी जमीन विकताहेत, असे त्यांच्या लक्षात आले. इतकंच नाही तर शेतकरी अनेक वेळा सर्वस्व विकून नोकरीधंद्याच्या शोधात बाहेर पडतानाही बघितलं. तेव्हाच अनीशने ‘कृषी विज्ञान केंद्रा’ची मदत घेऊन शेतकऱ्यांना भेटायचं ठरवलं. भेटीगाठी सुरू झाल्या. यात तीन वर्षे गेली. पण काहीच घडेना. अनीशची पत्नी अशिता लखनौमधील एका शाळेत शिकवत होत्या.
मुलांना शिकवताना त्यांची ‘प्रगती’ पाहून शिक्षणप्रणालीतील भीषणता दोघांच्या लक्षात येऊ लागली होती. मुलं शाळेत येतात, पण त्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, शाळा शाळांतून अभ्यासविषयक एकूणच उदासीनता असल्याचं चित्र दिसत होतं. तेव्हाच त्यांच्या मनात शाळेने आकार घेतला. यातही वेगळेपणा होता. उत्तर भारतात मुलग्यांचे शिक्षण सहज होते, पण मुलींचे शिक्षण मागे पडते आहे. बऱ्याच मुली घरातील परंपरागत शेतीत मदत करत आहेत. शेतीच्या वातावरणातच त्या वाढताहेत. अशा वेळी त्यांना शेती शिक्षणच दिलं तर? असं शिक्षण देता येईल का, जे अधिक मौलिक, शेतीनिष्ठ आणि त्यांच्या पालकांना शेतीशिक्षण देणारे असेल? यातूनच मुलींसाठी शेतीशाळा सुरू करण्याचा विचार पक्का झाला आणि पश्चिम गावातल्या शेतकरी पालकांना भेटणे सुरू झाले.
शाळा सुरू झाली. शाळेचे नाव ठेवले, ‘द गुड हार्वेस्ट स्कूल’. सुरुवातीला १० मुली आणि स्वत: अनीश-अशिता हे दोन शिक्षक शाळेत हजर झाले. दोन ते अडीच वर्षांतच अडीच ते तेरा वयोगटातील ४५ मुली आपलं घर समजून शाळेत हजर झाल्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या शेतीशाळेत कोणतीही इतर शाळांसारखी रचना नाही. सर्व मुली एकत्र बसतात, आठवडय़ाचे नियोजन होते. कोणताही साचेबंद अभ्यासक्रम नाही. इंग्रजी, हिंदी, गणित हे विषयही शिकवले जातात. ‘गुरुजी’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेकडून त्यांनी पुस्तकांची मदत घेतली. अनीश प्रामुख्याने शेती हा विषय शिकवतात. अर्थात यासाठी संगणकाची मदत घेतली जाते. इथे मुली केवळ नेहमीचीच भाजी नाही तर ब्रोकोली, जांभळा कोबी अशाही भाज्या पिकवतात.
मुलींना श्रमदानाचा आनंद तर मिळतोच, पण प्रत्यक्ष मळा फुललेला, बहरलेला पाहून त्यांच्या डोळ्यांत निर्मितीचा आनंद उभा राहतो. मुलींच्या सहली अशा शेतीशी निगडित ठिकाणांना भेटी देतात. एकदा या मुली मशरूम उत्पादनाच्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी लखनौला जाऊन आल्या आणि फलस्वरूप पश्चिम गावात येऊन त्यांनी मशरूमची लागवड केली. या शेती विषयात भाजीपाला, फळफळावळ, मधुमक्षिका पालन, हेसुद्धा विषय शिकवले जातातच. मुलींनी एक ‘मृत्तिकाघर’ही बांधलंय. वेगवेगळे स्वयंसेवक इथे येतात, शिकतात-शिकवतात. मुलींचा जेव्हा पहिला भूगोलाचा तास झाला तेव्हा आपल्याभोवती एवढं जग आहे हे समजल्यावर त्यांना आश्चर्यच वाटलं. पहिल्यांदा त्या गावाबाहेरचं जग जाणून घेत होत्या. एवढं या मुलींचं जग सीमित आहे. आता त्यांच्या पालकांनी या जोडप्याला समजूनही घेतलंय. पालकांना मुलींच्या सुरक्षिततेविषयी खात्री पटलीय. शाळा सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या काळात जातीव्यवस्था अगदी घट्ट होती तीही मोडायला लागलीय.
अनीश आणि अशिता स्वत:च्या खर्चाने ही शाळा चालवतात. ही शाळा म्हणजे हिरवाईचं शिक्षण (ग्रीन एज्युकेशन) देणारी शाळा आहे. मुलींना मूल्यशिक्षणपण मिळतेच. शिवाय जबाबदार अन्ननिर्माती म्हणूनही शिक्षण मिळते. या शाळेत फी नाही. शिवाय शिकण्यासाठी नि वाढण्यासाठी सुरक्षित, स्वतंत्र पर्यावरणही इथे मिळते. ही शाळा काही विषय नेहमीचे घेत असली तरी मुख्यत: भर आहे तो परिपूर्ण शेतनिर्मितीच्या शिक्षणावरच. इथून बाहेर पडणाऱ्या मुलींच्या मनात शेतीबद्दल कायमस्वरूपी आदर असेल.
वास्तविक असा समज आहे की शेती हा पुरुषप्रधान व्यवसाय आहे, पण वास्तव तसे नाही. शेतीच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी घडतात, कराव्या लागतात, त्या सर्व स्त्रियाच करतात. (बियाणांच्या निवडीपासून ते पीक घेण्यापर्यंत). पण समाजाला अजूनही त्यांच्या कष्टाचं भान, किंमत नाही. ही शाळा मुलींना शेळीसंदर्भातील योग्य, सुधारित, निसर्गाचे भान ठेवणारे, पर्यारवणनिष्ठ निर्णय घेण्यास तयार करत आहे. अनीश-अशिता यांचा विश्वास आहे की शिक्षणाचे भविष्य हे शेती आहे, हिरवाई आहे.
आज वास्तव हे आहे की भारतातील (एकूण मुलींपैकी) ४८ टक्के ग्रामीण मुलींचे विवाह वयाच्या १८ वर्षांपूर्वी होतात. सामान्यत: ५६ टक्के मुली (१५ ते १९ वयोगटातल्या) अॅनॅमिक वा रक्तक्षयी आहेत. स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे झाली तरी चांगलं शिक्षण आपण ग्रामीण भारतापर्यंत नेऊ शकलो नाही. अनीश-अशिता ज्या पश्चिम गावात काम करतायत तिथे फक्त ७० कुटुंबे आहेत. ही कुटुंबं, लैंगिक विषमता, कमी उत्पन्न आणि शिक्षणातून गळती या समस्यांना तोंड देणारी होती. याला पर्याय काय? नेहमीच्या शाळा या समस्यांवर काम करतात का?
ही सुरुवात आहे पण समाजातील प्रश्नांना उत्तरे शिक्षणच देऊ शकेल या विश्वासावर ही शाळा उभी आहे. शहरातल्या मुली आणि ग्रामीण भागात जगणाऱ्या मुली यांच्यात बराच फरक आहे. केवळ तंत्रज्ञान उपलब्ध होऊन जीवनविचार बदलत नाहीत. जे काम वर्षांनुवर्षे रोज केले जाते त्याला प्रतिष्ठा शिक्षणातूनच मिळायला हवी. म्हणूनच ही शाळा मुलींना पुस्तकात बांधत नाही. त्यांना खऱ्या बदलाला सामोरं नेण्यासाठी ती विचारपूर्वक एक सुरक्षित आणि प्रेरक वातावरण देते. हे केवळ शाळेतच नाही तर शाळा ‘निसर्गसंपन्न शिक्षणाचा विचार’ त्यांच्या घरापर्यंत नेतेय. या मुलींना तेवढय़ाच शहरातल्या मुलींइतक्याच विकासाच्या संधी मिळतायत. समाजातील समूहांना शाळेत एकत्र यायची संधी मिळतेय. शेतकरी शाळेत येतात, इथे असणाऱ्या शेती ग्रंथालयाचा फायदा घेतात.
‘द हार्वेस्ट स्कूल’ बियांची बँकही चालवते. स्थानिक शेतकऱ्यांकडून बियाणं घेतली जातात आणि त्यांना जैवविविधता राखण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. इथल्या अभ्यासक्रमात ‘शेती’ केंद्रस्थानी आहे. भविष्यात शेती व्यवसाय सुरू होऊन ही शाळा स्वयंअर्थसाहाय्यचलित होईल. स्त्रियांना उत्तेजन देण्यासाठी पाठिंबा दिला जाईल. इथे कुणीही काम करायची इच्छा आणि शेतीबद्दल वेगळं ज्ञान असणाऱ्या स्वयंसेवकानं यावं आणि आपलं ज्ञान द्यावं. ही शाळा शेतीनिष्ठ असली तरी केवळ शेती व्यवसाय करून पैसे मिळवणे हा हेतू नाहीच तर भारतातल्या ग्रामीण भागातल्या मुलींना समानता म्हणजे काय याचं भान यावं, जात-धर्म-पंथ याच्या पलीकडे जाऊन मानव तयार व्हावा, शेतीला आणि मुलींच्या शेतीश्रमाला प्राधान्य हा मूळ हेतू आहे.
कोणालाही पडणारा प्रश्न मला पडला की सगळे चालते कसे? अनीश आणि अशितानं याचंही नियोजन केलंय. अनिश त्याच्या गाडीने गावागावात मुलींना आणण्यासाठी जातो. या तीन फेऱ्या होतात. पहिल्या फेरीच्या मुली त्यांची शेतीची कामं सुरू करतात. ही कामं त्यांना आदल्या दिवशी सांगितली जातात. यात प्राण्यांची देखभाल, झाडांचे निरीक्षण आणि त्यांच्या नोंदी, पाणी घालणे यांचा समावेश असतो. नऊ वाजेपर्यंत सर्व मुली शाळेत पोचलेल्या असतात. इथे अनौपचारिक परिपाठाला सुरुवात होते. गाणी, योगा, नृत्य, काल शिकलेल्या संकल्पनांवर चर्चा, गावागावातल्या शेतीविषयक मुद्दय़ावर चर्चा असा परिपाठ असतो. नंतर मुली गटागटातून मग आपापल्या वर्गात जातात. अर्थात हे वर्ग झाडाखालीच आहेत. वर्गातले काम तीन ते साडेतीन तास चालते आणि ४५ मिनिटे सहशालेय उपक्रम होतात. दोन वाजता पुन्हा अनीश मुलींना घरी सोडायला जातात.
या सगळ्याचा अगदी बारकाईने अभ्यास करावा लागेल. कारण पूर्वी शेतीशाळा होत्या. त्या बंद केल्या गेल्या. अनीश-अशिता जाणीवपूर्वक शेतीला पारंपरिक शाळेत आणू इच्छितात. ग्रामीण भागात चांगले शिक्षण नव्हे तर उद्याच्या ग्रामीण भारताची गरज लक्षात घेऊन शेतीशिक्षण देण्याचा प्रयत्न करतायत. कदाचित हाती नक्की काहीतरी येण्यास काही वर्षे जावी लागतील. ही अशी पहिली शाळा आहे जिथे शेती हा मुख्य विषय मानला गेलाय. शिकण्याच्या वेगवेगळ्या पातळ्या लक्षात घेतल्या गेल्यात. नैसर्गिक शेतीवर प्रामुख्याने भर देऊन इथे मुली शेतीतंत्र आत्मसात करतात. मुलींना अनेक शेतकऱ्यांशी आणि त्यांच्या शेतीशी जोडले जाते. जुन्या पद्धतींपेक्षा वेगळ्या पद्धतीने शेती कशी करता येते याचे प्रत्यक्ष धडे मुली घेतात. प्रथमत: पूर्णपणे अनौपचारिक पद्धतीने शिकणाऱ्या मुली नेहमीचा औपचारिक प्रवाह पटकन आत्मसात करून पुढील प्रवास सुरू करतात. खरंतर १३-१४ वर्षांच्या मुली कुटुंबाची सर्व जबाबारी पेलतातच. शाळेचे वेगळेपण मुलींच्या जीवनाशी निगडित असल्यामुळे मुली खूप ओढीने, तळमळीने शाळेत येतात.
१९८९ मध्ये भारतीय स्त्री कामगारांचा (फक्त कारखान्याशी हा शब्द निगडित नाही) एक अहवाल प्रसिद्ध झाला. शेतीत काम करणाऱ्यांपैकी ८५ टक्के स्त्रिया आहेत. यात स्वत:ची शेती करणाऱ्या किंवा दुसऱ्याच्या शेतावर जाणाऱ्या स्त्रिया सहभागी आहेत. या सगळ्या अहवालाचा आणि परिस्थितीचा, मुलींच्या जगण्यातील विविध वास्तवांचा, कॉपरेरेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या अनीश यांनी अभ्यास केला. म्हणूनच ही शाळा एकदम सुरू झाली नाही तर अनेक बाजूंनी या दोघांनी पूर्वतयारी केलीय. नेहमीच्या अभ्यासात मुली मागं असतात त्यामागे मोठय़ा सामाजिक समस्या आहेत. मुलींसाठी नेहमीचे शिक्षण आयुष्य बदलायला पुरेसे नाही. ते त्यांच्या रोजच्या जगण्यातील कौशल्यांचा विकास करत नाही. म्हणून हे दोघे मुलींच्या भूमिकेतून शेती विषयाचा मुख्य विषय, केंद्रबिंदू म्हणून मांडणी करतायत.
या मुलींच्या ज्ञानाचे मूल्यमापन कसे केले जाते? तर, रोज मुलींच्या कामाचे, विचारांचे निरीक्षण करून वर्षांच्या शेवटी श्रेणी दिली जाते. शेती हा इतका मूलभूत आणि सर्वव्यापी विषय आहे, की यात शास्त्र, पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, शरीर शिक्षण, भूगोल, गणित यांचाही समावेश होतो. नेमका हा समावेशच रोजच्या शिकवण्याचा भाग होतोय. मुलींच्या वयानुसार शेती शिक्षणाची मांडणी करताना त्या त्या वेळचा ऋतूही लक्षात घेतला जातो. तिथल्या ग्रामीण परिसराची गरज लक्षात घेऊन शाळा सुरू केल्यामुळे की काय, लोकांचा विश्वास बसला. लोकांकडूनच कौशल्यांची देणगी, अर्थमदत, मिळायला सुरुवात झाली. खरं तर सहशिक्षणाची गरज आहेच. पण उपलब्ध निधी, जागा आणि ‘उत्तमच मिळालं पाहिजे’ हा ध्यास यामुळे हा प्रयोग फक्त मुलींपुरता मर्यादित राहिलाय. शिवाय मुलांना संधी सहज मिळतात, पण मुली मात्र कायम मागे राहतात, नव्हे त्यांना तसे राहावे लागते. म्हणूनच अनीश-अशिताचा हा वेगळ्या वाटेचा ध्यास मोलाचा आहे. त्यांना काही कमी न पडू देणं ही समाजाची जबाबदारी आहे. सगळे आर्थिक समृद्धीचे रस्ते बंद करून ही खडतर वाट या दोघांनी आपली मानलीय. हा प्रयोग बघितल्यावर विचार येतो, कोण म्हणतं समाजातून निष्ठा, ध्यास, समर्पण, त्याग नष्ट झालंय? अनीश-अशिता यांनी उभी केलेली शेतीशाळा हे याचं उत्तर आहे.
शाळेचा पत्ता – पश्चिम गाव, जाब्रेला. असाही ब्लॉक, पूर्वा जिल्हा, उन्नाव (उत्तर प्रदेश)
शाळेच्या ऑफिसचा पत्ता आहे – ५९०/४२ इंद्रपुरी कॉलनी, रायबरेली रोड, एसजीपीजीआयजवळ, लखनौ (उत्तर प्रदेश) २२६०१४. यांचा ईमेल आयडी आहे –
thegoodharvestchool@gmail.com
renudandekar@gmail.com
chaturang@expressindia.com