palak-balakआजची आपली मुलं काय-काय गमावत आहेत याची यादी करायला बसलं तर अशा किती तरी गोष्टी सापडतात. ती निसर्ग गमावत आहेत. खेळ, भाषा गमावत आहेत. माणसांचं प्रेम, विश्वास गमावत आहेत. साधं अन्न, सुती कपडे यांचं सुख गमावत आहेत. शांती गमावत आहेत. त्यांचा अवकाश हरवत चालला आहे. खेळ बंद होत आहेत. मोबाइल, लॅपटॉप, आयपॅड, टी.व्ही. यांनी ती पोकळी भरणं शक्य नाही. मग पालकांनी करायचं तरी काय? आपल्या बालकांना जपण्याची जबाबदारी पालकांवरच आहे. कशी? तेच आपण पाहणार आहोत या सदरात. दर पंधरा दिवसांनी.

‘‘आ ता तुझा खेळ बास झाला, चल अभ्यासाला बस.’’
‘‘काय चाललंय गं तुझं? नुसता दंगा-धोपा दिवसभर. इथे बस आता मांडी घालून. हाताची घडी, तोंडावर बोट. एक शब्द नको मला.’’
‘‘आता पुन्हा तुमचा आवाज आला तर बघा जिन्यातच ठेवीन दोघांना.’’
ही घरोघरची संभाषणं आपल्याला परिचित आहेत. मुलं काही काळ ऐकल्यासारखं करतात आणि पुन्हा दंगा-आरडा-ओरडा सुरू.. हल्लीच्या मुलांची एक नवी स्टाइल ऐकली. काही विचारलं की ती आपल्यालाच विचारतात, ‘मी का सांगू?’ त्यांना काही काम सांगा की ती म्हणतात, ‘मी का करू?’ पालक थक्क होतात कारण त्यांच्या लहानपणी असं म्हणण्याचं स्वातंत्र्य नव्हतं! मग या मुलांवर काही बंधनं घालायची की नाही? विशेषत: त्यांच्या दंगा करण्यावर? उद्योग करण्यावर? नासधूस करण्यावर? मारामाऱ्या करण्यावर? आरडा-ओरडा करण्यावर? घर डोक्यावर घेण्यावर? हा दंगा, उद्योग, नासधूस, मारामाऱ्या, आरडा-ओरडा मुलं का करतात ते जरा समजून घेऊ या. आई, बाबा, आजी, आजोबा सर्वानीच हे समजून घ्यायला हवं.
मुलं हे सगळं करतात तो त्यांचा खेळ असतो, ती त्यांची क्रियाशीलता असते. पालकांना ती नको वाटते पण मुलांचा हा खेळ म्हणजे वरवरची करमणूक नसते. ते त्यांचं शिक्षण असतं. ती त्यांची विकासाची धडपड असते. त्यासाठी खेळ हा त्यांचा गंभीर प्रयत्न असतो. कधीपासून खेळतात मुलं? मुलांचं पहिलं खेळणं कोणतं असतं? तुम्ही म्हणाल खुळखुळा, चिमणाळं, पण हे उत्तर चुकीचं आहे. तुम्हाला नवल वाटेल, पण मुलांचं पहिलं खेळणं त्याची स्वत:ची गर्भावस्थेतली नाळ हे असतं. मूल आईच्या पोटात असल्यापासून खेळत असतं. ते आपली नाळ पकडतं, सोडतं, कधी-कधी ते नाळ इतकी घट्ट धरतं की, त्यातून त्याला मिळणारी हवा मिळत नाही. मग ते ती सोडून देतं.
जन्मल्यावर ती स्वत:च्या हाता-पायांशी खेळतात, जावळाशी खेळतात, नंतर चिमणाळ्याशी खेळतात. हातात वस्तू धरणं, त्यांच्याशी खेळणं तोंडात घालून चव बघणं, फेकून बघणं, टाकून बघणं प्रयोगांची मालिकाच चालू होते. आपण वस्तू हातात घेऊन तिला ओळखतो पण मुलाला ती तोंडात घातल्याशिवाय तिचं ज्ञान होत नाही, म्हणून मुलं ज्या वयात वस्तू तोंडात घालतात त्या वयात त्या हिसकावून घेणं बरोबर नाही. त्यांचं शिक्षण चालू असतं, वस्तू ओळखण्याचं, त्यांची चव पाहण्याचं, वस्तू स्वच्छ ठेवणं एवढंच आपण करावं.
सगळं जगच त्यांना नवीन असतं त्यामुळे प्रत्येक गोष्ट म्हणजे खेळणंच असते. ती चालू लागली, बोलू लागली की ही क्रियाशीलता वाढत जाते. त्यांनी अशी धडपड करणं आवश्यकच असतं. ती त्यांची नैसर्गिक प्रेरणा असते. मुलं हातांनी जेवढय़ा गोष्टी करतील तितक्या त्यांच्या मेंदूतल्या पेशी एकमेकींना जोडल्या जातात. त्यांचं जाळं तयार होत जातं आणि त्यामुळे मुलांची समज वाढते. अर्थ कळतात, बुद्धी वाढते, आकलन वाढतं.
त्यामुळे रस्त्यात शाळेजवळ जशी पाटी असते तशी घरात पाटी लावली पाहिजे, ‘सावधान, पुढे शाळा आहे’, मुलं रस्त्यावर येतील, वाहने हळू चालवा, असा त्या पाटीचा अर्थ असतो. तसंच घरात ‘सावधान, मुलं खेळत आहेत,’ ती शिकत आहेत. त्यांना रागावू नका. मारू नका अशी पाटी हवी.
असं म्हणतात की, हातांची स्मरणशक्ती सर्वात जास्त असते. त्यामुळे जेवढे वेगवेगळे आकार, पोत, स्पर्श मुलं हाताळतील तेवढं चांगलं. मग त्यांना संधी मिळाली तर ती भाज्यांशी खेळतात, फळांशी खेळतात – भोपळ्याची साल, बिया, वेगवेगळी पानं, देठ, काडय़ा यांचे आकार करतात, वेलची, जायफळ, मिरे, लवंगा, डाळी, कडधान्य, जिरे, मोहरी असे वेगवेगळे पदार्थ त्यांना हाताळायला मिळाले पाहिजेत. दगड, पाणी, वाळू, माती, लाकडाचे तुकडे अशा नैसर्गिक गोष्टींचंही मुलांना आकर्षण असतं. बागेत गेलं की, पानं, फुलं, शेंगा यांचे विविध आकार, वास, स्पर्श मुलांना अनुभवता येतात. मुलांना रोज एक हिरवा तास मिळायला हवा. निसर्गाच्या सहवासात त्यांनी राहायला हवं. त्यातून त्यांच्या मनात किती तरी गोष्टी पेरल्या जातात.
 एका मुलाची एक फार सुंदर गोष्ट आहे. त्याचं घर आणि शाळा यांच्यामध्ये जंगल होतं. त्याला शाळेत जायला रोज उशीर व्हायचा. बाईंनी विचारलं की, तो म्हणायचा, मी तर खूप लवकर निघतो. शेवटी एकदा त्याच्या उशिरा येण्याचं कारण शोधायचं, असं बाई ठरवतात आणि त्याच्याबरोबर घरी जायला निघतात. वाटेत तो दर मिनिटाला बाईंना थांबवतो आणि त्या झाडावर टकटक केली की खारीची पिल्लं कशी दिसतात, या तळ्यात छोटा खडा फेकला की मासा कशी सुळकन् उडी मारतो, हा पानांचा ढीग डोक्यावर घेतला की कसा छान पाऊस पडतो, हा मोठा वृक्ष त्यावर बर्फ पडलं की किती सुंदर दिसतो. या झाडावर कशी पक्ष्यांची पिल्लं घरटय़ातून डोकावतात, असं किती-किती भरभरून आनंदानं उत्साहानं दाखवतो. त्याच्या उशिरा येण्याचं कारण बाईंना कळतं आणि शेवटी त्या त्याला सांगतात, ‘‘तुला उशीर झाला तरी हरकत नाही पण तू असा रोज खेळत खेळत येतोस तसाच येत जा.’’
 जेन साही प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांनी त्यांच्या ‘शिक्षण आणि शांती’ या पुस्तकात असं लिहिलं आहे की, ‘‘शाळेला आपण स्कूल म्हणतो. स्कूल म्हणजे शिकायची जागा. हा शब्द मूळ ग्रीक ‘स्कोल’ या शब्दापासून आला आहे. स्कोल म्हणजे ग्रीक भाषेत निवांतपणा. याचा अर्थ मागे राहणं किंवा विश्रांती घेणं असाही आहे. ग्रीकांनी याचं असंही स्पष्टीकरण केलं आहे की, ही ‘मनाची ग्रहणशील अवस्था’ असते. ती प्रत्यक्ष अनुभवावी लागते. काठावर उभं न राहता अनुभवात बुडी मारावी लागते. हे रिकामपण म्हणजे फावला वेळ नाही किंवा निष्क्रियता नाही तर त्याचा अर्थ ‘अर्थपूर्णतेचा उत्सव’ असाही आहे. हा निवांतपणा आपल्याला जीवनाच्या परिपूर्णतेकडे नेतो त्यात काम आणि कर्तव्य यांचा समावेश असतो. ‘अर्थपूर्ण अवकाश’ असाही त्याचा अर्थ आहे.’’
मुलांचा खेळ या अर्थानं अर्थपूर्ण असतो. मुलांना असा निवांतपणा मिळावा म्हणून त्यांना पूर्वी गुरुगृही आश्रमात पाठवत असावेत नाही तर अर्थार्जनाच्या गृहस्थाश्रमाच्या धकाधकीत मुलांवर किती अन्याय होतो हे ज्यांना लहान मुलं आहेत त्यांना विचारावं.
आमच्याकडे बालभवनात एक आजी गोष्टी-गाणी सांगायला आल्या होत्या. समोर ३ ते ६ वयाची मुलं होती. एका गाण्यात मक्याचं कणीस म्हणतं, मी कपडय़ांवर कपडे घालतो. असं का म्हटलं असेल? असा प्रश्न त्यांनी मुलांना विचारला. कोणालाही त्याचं उत्तर देता आलं नाही. मका, कणीस हे शब्द त्यांना नवीन होते आणि कपडय़ांवर कपडे ही कल्पनाही अपरिचित होती. या मुलांच्या काही आयाही कार्यक्रमात होत्या. त्या म्हणाल्या, ‘कॉर्न’ म्हणा म्हणजे मुलांना कळेल. कणीस त्यांना कळणार नाही कारण आम्ही घरी कणसातून काढलेल्या दाण्यांची पाकिटंच आणतो आणि म्हणूनच त्यांनी कणसावरची पानं पाहिलेली नाहीत. शहरात राहिल्यामुळे मुलं काय-काय गमावत आहेत याचा शोध घ्यायला हवा.
मातृभाषेचा तर विविध प्रकारे अंत होतो आहे. मुलं विचारतात, ‘तुम्ही माझी मदत कराल का?’ हे हिंदीचं भाषांतर झालं. ‘मला मदत कराल का?’ हे मराठी आहे. ‘मी गॅदरिंगला साडी घालणार आहे.’ साडी घालत नाहीत ती नेसतात, इतर कपडे घालतात, असो.
आपली मुलं काय-काय गमावत आहेत याची यादी करायला बसलं तर अशा किती तरी गोष्टी सापडतात. ती निसर्ग गमावत आहेत. हालचाल, खेळ, भाषा गमावत आहेत. माणसांचं प्रेम, विश्वास गमावत आहेत. साधं अन्न, सुती कपडे यांचं सुख गमावत आहेत. शांती गमावत आहेत. त्यांचा अवकाश हरवत चालला आहे. खेळ बंद होत आहेत. मोबाइल, लॅपटॉप, आयपॅड, टी.व्ही. यांनी ती पोकळी भरणं शक्य नाही.
मग पालकांनी करायचं तरी काय? खूप काही आहे करण्याजोगं. तेच आपण पाहणार आहोत या सदरात. पुन्हा भेटूच.   
शोभा भागवत

Story img Loader