एकमेकांना मदत करणं नेहमीच चांगलं असतं. किंबहुना ते निरोगीपणाचे लक्षण आहे, परंतु जेव्हा ते गृहीत धरणं होतं आणि समोरच्या व्यक्तीवर लादलं जातं तेव्हा मात्र त्याच्यासाठी ते त्रासदायक ठरू शकतं. अन्यथा मित्राने अडचणीच्या वेळी केलेली पैशांची मदत असो की शेजाऱ्यांकडे विश्वासाने ठेवायला दिलेली आपल्या घराची चावी असो अशा गृहीत धरण्यावरच तर आपलीं नाती समृद्ध होत असतात.

‘आ जोबांचे वय ‘क्ष’ वर्षे, आणि समीरच्या गाडीचा वेग ‘य’ किलोमीटर तासाला.’ असे गृहीत धरून गणित सोडविताना बाईंनी दोन समीकरणे फळ्यावर लिहिली. पटापट सोडवली. ‘क्ष’ आणि ‘य’ च्या किमती बरोबर काढून गणित सुटले, उत्तर बरोबर. गुण मिळाले पैकीच्यापैकी. असेच ‘क्ष, य’ गृहीत धरून आयुष्याचे गणित सुटले तर? तिथे गृहीत धरणे आहे, पण गणित सुटेल याची खात्री शून्य. असं अनेकदा होताना दिसतं. नातं कुठलंही असो, एकजण दुसऱ्याला गृहीत धरतो. त्याच्याजवळ आदर, माया,  दखल, किमान केलेल्याची जाणीव, दोन शब्दांचा उच्चार,  कौतुक काही काही नसतं. असतं ते फक्त गृहीत धरणं!
अगदी साध्या साध्या गोष्टींत अनेक जण दुसऱ्याला गृहीत धरतात. रवीला दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचायला लागायचं. पण रोज सकाळी कोण बाहेर जाणार त्यासाठी? त्याने सरळ सकाळी फिरायला जाणाऱ्या शेजारच्या आजोबांना विचारलं आणि त्यांनीही ते सहज मान्य केलं. त्या दिवसापासून आजोबा नित्यनेमाने रवीसाठीही वृत्तपत्र आणू लागले. एकदा सकाळीच आजोबांना ओळखीचे गृहस्थ भेटले आणि बोलता बोलता उशीर झाला. इकडे रवी अस्वस्थ झाला. रोजची सवय पडलेली. चिडचिड व्हायला लागली. तशातच तो ऑफिसला निघाला. गाडी बाहेर काढत असताना आजोबा दिसले. मागचा पुढचा विचार न करता रवी चिडून मोठय़ांदा म्हणाला, ‘‘किती उशीर? मला ऑफिसला निघायचं असतं पेपर वाचून, माहीत नाही का?’’ आजोबा क्षणभर शांत राहिले. मग ‘‘इतके दिवस आठवणीने आणि वेळेत आणत होतो ना पेपर. एखाद् दिवस होऊ शकतो उशीर. तू आता हे जे काही म्हणालास ते म्हणजे मी तो तुझ्या वेळेतच आणला पाहिजे हे तू गृहीत धरलंस. मला तुझ्या ऑफिस वेळेची कशी कल्पना असणार. त्यामुळे यापुढे मी कधीही वर्तमानपत्र आणणार नाही.’’ असं म्हणत ते पेपरसह वरती निघून गेले.
असंच उदाहरण राधाचं. राधा मुलाला शाळेत सोडून ऑफिसला जायची. नेहाच्या आईने राधाला विचारलं, ‘‘तुम्ही आमच्या घरावरूनच जाता. प्लीज नेहाला न्याल का? ती दारात उभी राहील.’’ दुसऱ्या दिवशी राधा आली, हॉर्न दिला, ‘आले’ म्हणत नेहा धावत धावत आली. दुचाकीवर राधाची पर्स, डबा, राजूची बॅग कसंबसं जागा करून नेहाची पिशवी लटकवली. पण दोन-तीन दिवसांनी राधाने तीन-चार हॉर्न मारले तरी माय-लेकी ‘आले आले’ करत उशीर करायच्या. त्या दोघांना सोडून ऑफिसला पोहोचायला राधाला रोजच उशीर व्हायला लागला. तसं तिने नेहाला नेणं थांबवलं. राधा शिष्ट ठरली.
  खरं तर गृहीत धरणं नेहमीच चुकीचं नसतं. त्याचा गैरफायदा घेणं चुकीचं असतं. नात्यात आपण एकमेकांना गृहीतच धरत असतो. नवरा-बायको एकमेकांना, मुलं आपल्या आई-वडिलांना, आजी आजोबांना-नातवंडांना,  मित्र-मैत्रिणी एकमेकांना. त्यातूनच नातं बहरत असतं. नव्याने आलेल्या सुनेला आपल्या घराची, घरातल्या रितीरिवाजांची, लोकांची माहिती नसणार आणि मीच ते हळूहळू प्रेमाने शिकवायला हवं, हे सासूने गृहीत धरलं तरच त्यांचं नातं सशक्त होईल. आणि सासरी एखादी अप्रिय घटना घडली की ते दु:ख आईची कुसच समजून घेईल हे गृहीत धरणंही तितकंच सहज आहे. नोकरीतल्या  किंवा आयुष्यातल्या एखाद्या अपयशावर वडिलांच्या ठोस अनुभवाच्या मदतीने मात करता येईल, हेही गृहीत धरणंच आहे. मित्राने अडचणीच्या वेळी केलेली पैशांची मदत असो की शेजाऱ्यांकडे विश्वासाने ठेवायला दिलेली आपल्या घराची चावी असो. अशा गृहीत धरण्यावरच तर आपली नाती समृद्ध होत असतात.
नवरा-बायकोच्या नात्यात हे गृहीत धरणं कधी कधी फारच वाढतं. तेव्हा मन दुखण्यापलीकडे काहीच होत नाही. माझ्या भाचीचे, रश्मीचेच बघा..
मोहनच्या मित्रांकडे ते दोघं नियमित जात असत. आज तिला तिच्या मैत्रिणीकडे जायचं होतं त्याच्यासह, तर त्याचं तोंड वाकडं. घरी मोहनचाच शब्द चालायचा. तो म्हणेल तेच ऐकणं तिला भाग असायचं. पण कधी कधी रश्मीही आपलं गृहीत धरणं नाकारायची आणि वेगळा पवित्रा घ्यायची.
 रश्मी त्याला म्हणाली, ‘‘आपण आज माझ्या मैत्रिणीकडे, पमाकडे जाऊ  या.’’
‘‘मी, आणि तुझ्या मैत्रिणीकडे? काल तर भेटल्या सगळ्या मैत्रिणी.’’  त्याने चेहरा असा केला की ही काही तरी भयानक सांगतेय.
‘‘ते तुझे मित्र होते, आणि त्या त्यांच्या बायका. माझे नाहीत.’’
‘‘मी येणार नाही. तुझ्या मैत्रिणी आणि त्यांचे नवरे, भंपक सगळे.’’
‘‘म्हणजे मी काय तुझ्या मित्रांची कंपनी एन्जॉय करते की काय? केवळ तुला आनंद मिळतो म्हणून येते ना मी. मग माझ्या आनंदासाठी तू येणार नाहीस?’’
‘‘मला खूप कामं आहेत,’’ मोहन अडलेलाच.
‘‘ठीक आहे, इथून पुढे मला गृहीत धरायचे नाही. मी पुन्हा कधी तुझ्या मित्रांकडे येणार नाही.’’
रश्मीने निर्वाणीचं सांगितलं तेव्हा मात्र मोहनला उठणं भागच पडलं.
खरं तर नात्यांपलीकडेही आपण अनेक गोष्टी गृहीत धरत असतो. सूर्याने प्रकाश द्यायला हवा, मेघांनी पाऊस पाडायलाच हवा, घडय़ाळाने योग्य वेळ दाखवायलाच हवी, हृदयाने टिकटिक करायला हवी, पण जेव्हा हे सगळं विरुद्ध होतं तेव्हा आपल्याला त्या त्या गोष्टीची किंमत कळते. म्हणूनच आपण एखाद्या गोष्टीला वा व्यक्तीला फार गृहीत धरत नाही ना हे पाहायला हवं.  एकमेकांना मदत करणं नेहमीच चांगलं असतं. किंबहुना ते निरोगीपणाचं लक्षण आहे, परंतु जेव्हा ते गृहीत धरणं समोरच्या व्यक्तीवर लादलं जातं तेव्हा मात्र त्याच्यासाठी ते त्रासदायक ठरू शकतं.  
बहुसंख्य ऑफिसमध्ये असा एखादा ‘नारायण’ असतोच. ज्याला अनेक जण अगदी बॉसपासून चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यापर्यंत अनेक जण गृहीत धरतात. परंतु काही वेळा त्याची श्रीसारखी अवस्था होते. श्रीला सगळेच गृहीत धरायचे. त्यामुळे सगळे जण आपलं काम त्याच्यावर सोपवून चक्क सिगरेटी फुंकायला बाहेर पडायचे. इतकंच नाही तर महिला वर्गही आपले अर्धवट काम त्याच्यावर सोपवून गाडी पकडायला धावायच्या. आणि श्री मात्र रात्र रात्र थांबून ते काम पूर्ण करायचा. नव्याने रुजू झालेल्या संयुक्ताच्या हे लक्षात आलं.  तिला श्रीचा साधेपणा भावला, पण लोक गृहीत धरून घेत असलेला त्याचा फायदा तिला खटकायला लागला. काही महिने गेल्यावर मात्र तिने हळूहळू त्याच्या हे पचनी पाडायला सुरुवात केली. ‘‘मदत करायला हरकत नाही. करच तू. जे अडतील, ज्यांना गरज असेल त्यांच्यासाठी पुढाकार नक्की घे, परंतु लोकांनी तुला गृहीत धरणं योग्य नाही. आणि इतकं करून कोणी कौतुकही किंवा आदर तरी देतं  का उलट ‘ते काम करून ठेव रे, असे आदेश ते कसे काय देऊ शकतात? तू कुणाचाही नोकर नाहीस. प्रत्येकाला आपापल्या कामाचा पगार मिळतो. त्यामुळे एखादा दिवस ठीक आहे, पण  दरवेळी वर्षांमॅडमची बॅलन्सशीट तूच का टॅली करून द्यायची?’’
श्रीला संयुक्ताचं म्हणणं पटत होतं. तो म्हणाला, ‘‘पण नाही कसं म्हणणार?’’
‘‘तोंडाने. अगदी थेट. तुझा आत्मसन्मान हा तुझा आहे. तो टिकवणं हे फक्त तुझ्या हातात आहे. कोणी गृहीत का धरावं तुला? तू प्रेमाने सगळ्यांचं करतो म्हणून? आणि इतकं करून काल तू एक शंका विचारायला गेलास माधवीला तर कसं उडवून टाकलं तिने तुला? हे वाईट.  तू हुशार आहेस. थोडासा स्मार्ट हो. तू काहीही बोलणार नाही हे गृहीत धरून लोक तुझ्याशी कसंही वागतात, ते तू चालवून घेऊ नकोस. तुझ्याच लक्षात येईल. त्यांच्या नजरेत तू खूप खूप वर असशील.’’
श्रीला संयुक्ताचं म्हणणं थेट भिडलं. रात्रभर तो विचार करत राहिला. आपणच आपल्याला गृहीत धरणं थांबवू शकतो हे त्याला मनोमन पटलं. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला तो काही निर्णय घेऊनच. वर्षांबाईंनी नेहमीप्रमाणे बॅलन्स शीट त्याच्या टेबलवर सरकवली. तसं शांतपणे हसत तो त्यांना म्हणाला, ‘‘फॉर अ चेंज वर्षां मॅडम, या महिन्यात बॅलन्स शीटचं काम तुम्हीच केलंत तर?’’                 

Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
mazhi maitrin
माझी मैत्रीण : …आणि मैत्रीचे बंध दृढ झाले
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
state govt form committee to study implementation sub classification in sc reservation sparks controversy
दलित मतदारांत दुभंग? आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता