‘मेळघाट, चिखलदरा, मेमना.. सगळी ठिकाणं पर्यटकांना अभावानंच माहिती असलेली आणि तिथली खाद्यसंस्कृती तर आपल्याला अपरिचितच. या ठिकाणी एकटीनं फिरायचा अनुभव जसा अनोखा आहे, तसेच इथले पदार्थही आगळेवेगळेच आहेत. लाखेच्या डाळीचा डाळ-कांदा, लाल भात, चारोळीची खीर, कुटकीचा भात, पापडा, अशा अनेक पदार्थाविषयी मला इथे जाणून घेता आलं..’

मेळघाट हा अमरावतीमधला व्याघ्र प्रकल्प, म्हणूनच आपल्याला मेळघाटाची ओळख आहे. घनदाट मेळघाटात आणि पुन्हा एकदा नव्या आदिवासी भागात जाण्याची उत्सुकता मला होती. त्या वेळेस मी वर्ध्यात होते. ठरल्याप्रमाणे एकाच दिवसात विविध गावांना एक-दोन भेटी देऊन वर्ध्यातून साधारण १९०-२०० किलोमीटरचं अंतर मला कापायचं होते. नागपूरमधल्या मागच्या ड्रायव्हरच्या अनुभवानंतर आताशी ड्रायव्हिंगदेखील माझं मीच करू लागले होते. त्यामुळे रात्री खूप उशिरा ड्रायव्हिंग करायचं नाही, असा स्वत:च स्वत:ला नियम घालूनदेखील फार कमी वेळा मला तो पाळता आला. कारण आसपास, विशेषत: जंगली भागात राहण्याची, चांगलं खाण्याची सोय नसायची. मग ठरलेल्या ठिकाणी कोणतीही वेळ का असेना, जाणं क्रमप्राप्तच असायचं. मेळघाटातील सुप्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण- चिखलदरा. शाळेत शिकलेली ही माहिती पक्की होती. पण याच नयनरम्य चिखलदऱ्याला ऐतिहासिक, पौराणिक वारसाही मोठा आहे, हे मी आता अनुभवलं. मगाशी म्हटल्याप्रमाणे मला रात्रीचा प्रवास टाळता नाही आला आणि मी मिट्ट काळोखात रात्री जंगलातल्या रस्त्यानं वरती चिखलदऱ्याला जाण्यासाठी निघाले. रस्त्यावर कुठेही दिवे नाहीत, की माणसांची वर्दळ नाही. दाट धुकं आणि सुखद गारव्यामुळे चिखलदऱ्याचा घाट आणि रस्ता स्वर्गाहून कमी वाटत नव्हता. मिट्ट अंधार, अवघड घाट, दाट धुकं, यातून सांभाळत सांभाळत माझा प्रवास सुरू होता.

Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
How To Make Methi Paratha
Methi Paratha Recipe : मेथीचे बनवा मऊसूत पराठे! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी बेस्ट रेसिपी
Nagpur Prostitution , college girls Prostitution Nagpur,
नागपूर : झटपट पैशांचे आमिष! महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार, ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट….
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
shivali parab mother emotional after seeing the look of Mangla movie
‘मंगला’ चित्रपटातील शिवाली परबचा लूक पाहून आई झालेली भावुक; म्हणाल्या, “१२ तास चेहऱ्यावर मेकअप, जेवायला नाही अन्…”

रात्री मला तिथे पोहोचून माझ्यासाठी चांगलं हॉटेलदेखील शोधायचं होतं. एक चांगलं हॉटेल सापडलं. मॅनेजर म्हणाला, ‘‘तुम्ही इतक्या रात्री पोहोचलात. आता तुम्हाला खायला देण्यासाठी माझ्याकडे आणि संपूर्ण चिखलदऱ्यातही कुठेच काहीच नाही मिळणार! पण तुम्ही माझं स्वयंपाकघर वापरू शकता. माझ्याकडे मॅगी आहे, ती तुम्ही बनवून खा,’’ इतकं सांगून त्यांच्या स्वयंपाकघराचा ताबा त्यांनी माझ्याकडे दिला. जवळपास महिन्यानंतर मी अशी स्वयंपाकघरात काहीतरी शिजवून खाण्यासाठी आत गेले होते. माझ्या स्वयंपाकघराच्या आठवणीनं क्षणभर माझं मन व्याकूळ झालं. मॅगी खाऊन मस्त झोपी गेले. दुसऱ्या दिवशी मला जवळच्या आदिवासी भागात जायचं होतं. एकतर व्याघ्र प्रकल्प, शिवाय तिथे सतत घडणाऱ्या घटनांमुळे दुर्गम आदिवासी भागात जाणं थोडं मुश्कील होतं. काही वन अधिकाऱ्यांना फोन करावे लागले, त्यांना माझा उपक्रम समजावून पूर्वसंमती घ्यावी लागली. यादरम्यान मेमना तपासणी नाक्यावर बराच वेळ वाट पाहात बसावं लागलं होतं. मला खूप भूक लागली होती. पण जर परवानगी हवी असेल, तर ते ठिकाण सोडून जाणं शक्य नव्हतं. तिथले एक अधिकारी मला म्हणाले, ‘‘तुम्हाला जर जेवायचं असेल तर तिथे जाऊन जेवून या,’’ समोरच्या एका झोपडीकडे बोट दाखवत ते म्हणाले. ‘‘आम्ही डय़ुटीवर असताना तिथेच जेवतो.’’

हेही वाचा… सूर संवाद: मी राधिका!

स्वच्छ झोपडी. एका बाजूला चूल मांडलेली आणि एक मध्यम वयाची स्त्री स्वयंपाकाची तयारी करीत होती. अधिकाऱ्यानं सांगितलं होतं, की तिला आम्ही सर्वजण आणि तिच्या गावातले लोकदेखील ‘बूढी माँ’ म्हणूनच ओळखतात. वयाने ३५-४० ची दिसणारी ही स्त्री ‘बूढी माँ’ का बरं असेल? मला आश्चर्य वाटलं. ‘बूढी माँ’ला तिचं घर चालवण्यासाठी हे झोपडीतलं छोटंसं हॉटेल चालवावं लागतं. मोडक्या-तोडक्या हिंदीत आमचा संवाद सुरू झाला. एखाद्या कलाकारानं तन्मयतेनं मातीची मूर्ती साकारावी, तशी दोन्ही हातांच्या साहाय्यानं पिठाच्या गोळय़ापासून सुंदर आकार साकारात चुलीवरची मस्त, खरपूस भाकरी, अगदी साधासाच मसाला घालून लाखेच्या डाळीचा चरचरीत डाळ-कांदा आणि मऊशार लाल भात. साधा आणि तृप्त करणारा स्वयंपाक तिनं माझ्यासाठी केला. तिथे जेवून, थोडा वेळ तिच्याशी गप्पा मारून मी मेमना गावात पोहोचले. तिथल्या अधिकाऱ्यांनी माझ्याबरोबर मदत म्हणून एक कनिष्ठ अधिकारी पाठवला होता. मेमन्याचा आणि इथल्या प्रत्येक गावातला प्रवास म्हणजे स्वर्गच इथे अवतरला आहे, याची वारंवार प्रचीती देणारा होता. या भागात कोरकू हा आदिवासी समाज मोठय़ा प्रमाणावर आहे. आता इथले काही लोक मराठी बोलू लागले आहेत, मात्र जुन्या लोकांना अजूनही मराठी येत नसल्यामुळे त्यांचे पदार्थ, संस्कृती, कला हे मला मध्यस्थांच्या माध्यमातूनच समजून घ्यावं लागत होतं. चारं म्हणजे चारोळी यांच्यात बरीच लोकप्रिय असावी. जसं तिकडे गडचिरोलीमध्ये मोह. चारापासून ते पोळी, खीर, लाडू बनवतात.

चारं हे देवाणघेवाणीच्या व्यवहारातलंदेखील एक प्रमुख साधन होतं, हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल. पण या चाराच्या बदल्यात आदिवासी लोक पूर्वी मीठ विकत घेत. हे ऐकून मी चाटच पडले. कारण चारोळी शहरात जणू सोन्याच्या मोलानं मिळते आणि मीठ तुलनेनं खूपच क्षुल्लक भावात मिळतं. आणि खीर किंवा एखाद्या गोड पदार्थात सोबतीचा हा मेवा आपण थोडय़ाशा प्रमाणात वापरतो आणि इथे तर चक्क त्याचीच खीर बनवली जाते. पण ही चारं फोडणं हेदेखील खूप अवघड काम आहे. त्यांच्या या कष्टाचं मोल इतक्या कमी भावात व्हावं, हे मनाला रुचलं नाही. सगळय़ाच आदिवासी समाजातले लोक मला खूप प्रेमळ आणि दिलखुलास वाटले. इथेही हाच अनुभव आला. गप्पा, पदार्थ झाल्यानंतर घरातील मुखिया ढोल, पावा आणि घुंगरूंचं एक त्यांचं पारंपरिक वाद्य घेऊन आमच्यात येऊन बसला. एकाच्या पाव्यावरच्या सुरेल सुरावर स्त्रियांनी फेर धरून, गाणं गात नृत्य सुरू केलं. मीही त्यांच्या स्टेप्स समजून घेऊन त्यांच्यासोबत त्यांच्या ‘थापटी’ या पारंपरिक नृत्यात मनमुराद नाचले. हा काही स्थानिक समुदायांबरोबरचा माझा पहिलाच अनुभव नव्हता. आतापर्यंत बंजारा नृत्य, इतर काही आदिवासी समाजातील गाणी आणि नृत्य, लोकखेळ अशा अनेक प्रकारांत मी त्यांच्यासोबत सहभागी झाले आहे. पण प्रत्येक वेळी येणारा अनुभव, अनुभूती ही अवर्णनीय.

इकडे कोरकू आदिवासी आहेत, तसाच इथे जवळच्या काही गावांमध्ये गवळी समाजदेखील मोठय़ा प्रमाणावर आहे. इतिहासाची पानं पलटली तर समजतं की या गवळी समाजाचा या भूमीवरचा वास हा खूप पूर्वीपासूनचा आहे. बोली, राहणीमान, दागिने, कपडे अगदी अनोखे आणि निराळे. मला प्रत्येक गावात भावलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक घराच्या भिंतींना बाहेरून रंग एकच- फिरोजी किंवा पिरोजा

(Turquoise) आणि पांढरा. प्रत्येकाचं अंगण स्वच्छ सारवलेलं. गावात अगदी दोन-तीनच वयस्कर बाया होत्या. इथल्या जुन्या पिढीलाही मराठी नाही येत. तरीही तरुण मुलांच्या मदतीनं आजींसोबत माझा संवाद सुरू झाला. विशेष म्हणजे आज्यांआधी माझा विषय गावातल्या पंधरा-सोळा वर्षांच्या मुलांना पटकन समजला. ते या आज्यांना ‘‘ते सांग ना, हे सांग ना,’’ म्हणून सुचवू लागले. गोकुळाष्टमी, ‘गईगोंधन दिन’ (दिवाळीचा दुसरा दिवस) हे त्यांचे महत्त्वाचे सण. गोकुळाष्टमीला काला केला जातो, तो ‘कुटकी’ या भरड धान्यापासून. कुटकीचा भात यांच्या आहारातला मुख्य घटक. मात्र आताशी कुटकीचं पीक फारसं घेतलं जात नाही. घरात उरलेली थोडीशी कुटकी मला दाखवण्यासाठी एका आजीबाईंनी आणली. गोकुळाष्टमीला जमिनीवर अथवा भिंतीवर गोकुळ काढण्याची प्रथा आहे. गोपाळ (कृष्ण) आणि त्यांचे सवंगडी, गायी, वृक्ष असं ते चित्र असतं.

गो-पालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय. त्यामुळे साहजिकच दुधाचं उत्पादन मुबलक प्रमाणात होतं. त्यामुळे ‘टुरिस्ट स्पॉट’च्या ठिकाणी मलई रबडी, बर्फी असे दुधापासून बनलेले अनेक पदार्थ चाखायला मिळतात. महाबळेश्वरप्रमाणे इथेही स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकेल, असा विचार काही वर्षांपूर्वी कोण्या एका शेतकऱ्याच्या डोक्यात आला आणि तो सफल झाला. त्यानुसार आजूबाजूच्या शेतकऱ्यांनीही त्याचे अनुकरण केले. रस्त्याच्या कडेला असलेल्या या शेतीत परवानगीनं आपण स्ट्रॉबेरी तोडण्याचा आणि ताजी स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद घेऊ शकता.

या भागात प्रवास करताना गवळी, राजस्थानी लोक अनेक ठिकाणी भेटले. ‘तुम्ही इथे कधीपासून आहात?,’ याचं उत्तर ‘मालूम नहीं, पर परदादा के परदादा से पहले हो सकता हैं।’’ असं काहीसं उत्तर असायचं. पण इथल्या ‘गढी’ हा वारसा बराच जुना आहे हे सांगण्यासाठी जणू आजही तग धरून अभिमानानं उभ्या आहेत. मी चिखलदऱ्याला जाण्यापूर्वी चांदूर बाजार इथं गेले होते. एका काष्ठशिल्पकाराच्या घरी. यांच्या घरातली प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कलेमध्ये पारंगत. एक भाऊ सुंदर काष्ठशिल्पं बनवतो, तर एक सर्व पाढे न थांबता उलट म्हणू शकतो. वडिलांनी अनेक जुन्या नाण्यांचा मोठा संग्रह केला आहे आणि ठिकठिकाणी ते त्यांची प्रदर्शनं भरवतात. त्यांच्या इथे पूर्वीच्या काळी राजस्थानमधून स्थलांतरित झालेल्या काही स्त्रिया मला भेटल्या. ‘पापडा’ हा त्यांचा पारंपरिक पदार्थ. गहू ओलवून, सुकवून बारीक दळून त्याची कणीक भिजवली जाते. मग रुमाल रोटी अथवा मांडय़ांप्रमाणे मोठय़ा आणि पातळ पोळय़ा (चपात्या) लाटून घ्यायच्या आणि पापड जसे सुकवतो तसा हा पापडा उन्हात सुकवून घ्यायचा. सुकलेल्या पापडाचा चुरा करून डब्यात भरून ठेवायचा आणि गरज असेल तेव्हा पोह्याप्रमाणे, फोडणीच्या पोळीप्रमाणे किंवा गोड करायचा असल्यास दही आणि साखर घालून खायचा. पापडा जरी मूळ महाराष्ट्रीय पदार्थ नसला, तरी तो इथल्या मातीत रुजला आहे. आणि या लोकांप्रमाणेच महाराष्ट्रातल्या इतर समाजांनीदेखील त्याला आपलंसं केलं आहे. या स्त्रियांनी नुकताच केलेला पापडा चुरून, फोडणी घालून मला खायला दिला. फोडणीच्या पोळीचा एका वेगळय़ा रूपातील हा भाऊ मला खूपच आवडला! (क्रमश:)

parandekar.shilpa@gmail.com

Story img Loader