माधुरी दीक्षित
‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट आजही गर्दी खेचतो आहे. अनेक जणी या चित्रपटाशी आपलं नातं सांगताहेत, अनेकींना स्वत:ची गोष्ट त्यात सापडते आहे, परंतु चित्रपटाने त्यापलीकडे जायला हवं. हा चित्रपट तसा जातो का? ‘मंगळागौर’ नृत्याची स्पर्धा होती म्हणून सगळय़ा एकत्र आल्या, व्यक्त झाल्या, तात्कालिक का होईना, आपापल्या दु:खातून मोकळ्या झाल्या हे बाजारशक्तीचे गौरवीकरण वाटतं, त्या बहिणींचे वा पर्यायाने स्त्रीचे हे सक्षमीकरण आहे का?
‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट अजूनही गाजतोय. छान भट्टी जमून आलीये.. ‘माहेरची साडी’ या चित्रपटानंतर एखाद्या चित्रपटाला स्त्रियांची इतकी गर्दी झालीये.. त्या छान नटून थटून अनेकानेक दिवसांनी गटागटाने बाहेर पडल्यात.. सर्व स्तरांतील सगळय़ा जणी जाताहेत या चित्रपटाला.. स्त्रियांच्या काळजाला हात घालणारी साधी सरळ आणि ‘स्त्रियांची’ कथा यात सांगितली आहे, अशा कौतुकाच्या बोलांचा वर्षांव ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटावर होत आहे. उत्तम अभिनयाने नटलेल्या सफाईदार निर्मितीमुळं चित्रपट बघण्याच्या आनंदात जशी भर पडलीये तशी स्त्रियांना काय आवडतं, काय महत्त्वाचं वाटतं, त्यांना त्यांच्या ‘खासगी अवकाशावर’ हक्क सांगायला काय भाग पाडतंय, किंवा त्यांच्या संदर्भात कालचक्र कसं फिरतं ते जवळून न्याहाळण्याची संधीसुद्धा या चित्रपटानं दिलीये.
मात्र आज त्यातल्या खेळांच्या गाण्यांत वर्णिलेलं ना माहेर राहिलंय, ना सासर, ना तशी लाड करणारी किंवा छळणारी नाती आणि ना राहिलाय, तो घरातल्याच चार स्त्रियांना जमवून, दिवसभर कुटुंबाचे हवे-नको बघून मग पैदा केलेला ‘स्त्रियांचा खासगी अवकाश’. अशा अनेकींच्या जीवनाशी ‘डिसकनेक्टेड’ वा तुटलेल्या उत्सवाला पडद्यावर पाहायला इतक्या मोठय़ा संख्येने स्त्रिया का जाताहेत? किंवा मुळात आधुनिक शहरी जीवनशैली असणारी, परंपरेला बहुतांश मागे सोडलेली, किंवा परंपरेला केवळ कर्तव्य म्हणून निभावणारी चित्रपटातली स्त्रीपात्रे ‘मंगळागौर’ स्पर्धेत का भाग घेतात? या प्रश्नांची उत्तरे या चित्रपटाचं निर्माण होणं आणि त्याचं लोकप्रिय होणं उघड करतात, म्हणूनच ती उत्तरे शोधायला हवीत.
काळ बदलला, जीवनाची कल्पना आणि जीवनशैली बदलली, तसं राजकारणही बदललं आहे. ‘आपली संस्कृती’ विषयी नवा अभिमान, राजकारणाची मोहीम म्हणून सुरू करण्यात आला आहे. सगळय़ांची संस्कृती सारखी नसते याचा सोयीस्कर विसर पाडण्यात या मोहिमेचा फायदा आहे. माध्यमांद्वारे, त्यांच्या गारुडाचा उपयोग करून घेऊन ते सहज साध्य करता येतं. खरं पाहता ‘मंगळागौर’ पूजा एक आवश्यक धार्मिक विधी म्हणून गांभीर्याने करण्याचा आग्रह आज बहुतांशी जुनी पिढी धरते. त्यांना त्यातली धार्मिक श्रद्धा, मुलाबाळांनी बहरलेला संसार आणि कुटुंबाच्या धार्मिक अधिष्ठानाला सांभाळणारी नवी गृहिणी यांचं महत्त्व वाटतं. तसं अधेमधे, नव्या जीवनशैलीमधून ‘संस्कृती’ लयाला जाऊ नये म्हणून, मंगळागौरीसारखे उत्सव कसे पिचलेल्या स्त्रियांना एक मोकळा अवकाश निर्माण करून द्यायचे (म्हणजे त्या पुन्हा सेवेसी सिद्ध होतील!). अशी स्पष्टीकरणं-नव्हे गौरवीकरण-आधुनिक स्त्रियांना पटावीत म्हणून, समोर येत राहतात.
खरं तर समकालीन हिंदी व्यावसायिक चित्रपटांसारखा हा चित्रपटसुद्धा नाच-गाण्याचा चित्रपट आहे. उत्सवी भावनांचा, जिंकण्याची कथा सांगणारा चित्रपट आहे, म्हणजे चित्रपटांच्या परंपरेला धरून चालणारा आहे. छोटय़ामोठय़ा शहरांच्या गल्ली-बोळातले कोरिओग्राफी क्लासेस बघितले, तर आज संपूर्ण भारत नाचतोय, असं म्हटलं तर चूक होणार नाही. ‘रिआलिटी शो’ आणि स्पर्धाच्या निमित्तानं माध्यमं आणि ‘आयटम नंबर्स’च्या निमित्तानं चित्रपट सर्व वयोगटाच्या लोकांना, लग्न, पाटर्य़ा, संमेलनं, वीकेंडचं चिलिंग अशा वेगवेगळ्या प्रसंगी एकत्र येऊन नाचायला प्रवृत्त करताहेत. अशावेळी मंगळागौरीची गाणी आणि नृत्यरूपी समूह खेळांचं औत्सुक्य आकर्षक वाटू शकतं. म्हणून तर या चित्रपटात आपण एकेका बहिणीच्या सांसारिक कथांचं, दु:खाचं किंवा भूतकाळाचं आवर्तन झालं की नाच-गाण्याची वाट पाहतो, तशीच या चित्रपटाची रचना आहे.
हा चित्रपट मंगळागौरीच्या ‘स्पर्धेत’ उतरण्याची कथा सांगतो. स्पर्धेला चांगलं २५ लाख रुपयांचं बक्षीस आहे. ज्या बहिणींची गोष्ट या चित्रपटात सांगितली आहे, त्यातल्या अनेकींना संसाराची आणि आत्मसन्मानाची गरज म्हणून पैसे मिळवायची गरज आहे. त्या स्पर्धेसाठी रोख बक्षीस आहे, म्हणून सामील होताहेत, कौशल्य दाखवण्यासाठी किंवा परंपरेच्या अभिमानासाठी नाही. परंपरेचं, संस्कृतीचं निर्वाहन करणं बाजारशक्तीनं आज, हरतऱ्हेच्या वस्तू, जागा आणि सेवा पुरवून एका अर्थी सोप्पं करून टाकलंय. पण त्याचबरोबर पारंपरिक गोष्टींच्या केवळ दृश्यात्मकतेवर म्हणजेच ‘दिसणाऱ्या’ गोष्टींवर भर देऊन त्यांच्या उत्सवी रूपालाच पुढे आणलंय. साहजिकच इथे स्टेजवरचा नाच आहे, मंगळागौरीचा विधी नाही. प्रस्तुतीची स्पर्धा आहे, तीही कुठल्या महिला मंडळाने आयोजित केलेली, काहीतरी जुन्या गोष्टी घेऊन बसल्यासारखं वाटायला लावणारी वगैरे नाही तर मॉलमध्ये फॉर्म भरून आणि ‘रिआलिटी शो’वाले जसं स्टुडिओ सेटिंगमध्ये शूट करतात तशी, नव्या फॅशनची आहे. त्यासाठी सराव, वेशभूषा, केशभूषा अशी ‘विकतची’ तयारी आहे, ‘वाईल्ड कार्ड एन्ट्री’ आहे – हे सगळं आजच्या जमान्यात चाललेलंच, पडद्यावर येतं आहे, म्हणून त्याच्याशी समरूप होणं प्रेक्षकाला सोप्पं आहे. शिवाय इथे आजच्या पिढीतल्या मुली किंवा तरुण सुना, ज्यांनी परंपरेनुसार ‘मंगळागौर’ खेळायची आहे, त्या आहेत कुठे? चित्रपटातल्या बहिणींच्या मुली आणि सुना त्यांच्या आरोग्याच्या, करियरच्या किंवा कौशल्य दाखवण्याच्या संधीच्या शोधात आहेत.
महाराष्ट्राच्या सुधारणेच्या चळवळींनी, इथल्या प्रबोधन पर्वानं, जात आणि लिंगभेदावर आधारित शोषणाला उघड केलं. त्यासाठी थेट प्रश्न मांडले. कशाशी लढावं लागणार आहे त्याच्या वैचारिक रूपावरून नजर ढळू दिली नाही. ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट स्त्री-प्रधान दिसला तरी ‘मनोरंजन’ करणं आणि व्यावसायिक यश मिळवण्याच्या नादात स्त्रियांची खरी लढाई ज्याच्याशी आहे त्या सामाजिक, कौटुंबिक, वैचारिक व्यवस्थेला भिडणं टाळतो. पुन्हा एकदा खऱ्या प्रश्नांना भिडण्याची संधी एका प्रबळ परिणाम साधणाऱ्या माध्यमाने घालवली, याची खंत वाटते. कारण चाळिसेक वर्षांपूर्वी आलेल्या ‘उंबरठा’सारख्या एका चित्रपटाने स्त्रीचा व्यवस्थेविरुद्ध संघर्ष रंगवताना प्रेक्षकांच्या अनुनयाची भूमिका नाकारली होती, प्रेक्षकांना भावेल अशा सुखांताकडे जाण्याचं टाळलं होतं, आणि एक ठोस विचार मांडला होता.
स्पर्धेला ज्या जाताहेत त्या आयुष्याची जवळपास दुसरी इनिंग खेळणाऱ्या स्त्रिया आहेत, पारंपरिक पद्धतीने संसार करून श्रेयापासून आणि स्व-अवकाशापासून वंचित राहिलेल्या अशा बहुसंख्य स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत. त्याला त्यांची दाखवलेली वयं, आणि वजनं हातभार लावतात. त्यांची स्पर्धेत सहभागी होण्याची प्रेरणा, दुसऱ्यावरती मात करणं, स्वत:ला सिद्ध करणं आणि बक्षिसाचे पैसे मिळवणं अशा रीतीची आहे. स्पर्धेच्या कथेतल्या भावनिक जागा हरेक बहिणीच्या जीवनातल्या, संसारातल्या दुखऱ्या नसा पकडून फुलवल्या असल्या, आणि प्रेक्षकांना त्यात आपापला नवरा, बहिणी, सासरे दिसण्याची सोय केली असली तरी याच कथानकानुसार चित्रपटातील स्पर्धा हा बाजारशक्तीने वैयक्तिक जीवनात केलेला हस्तक्षेप आहे. स्पर्धा होती म्हणून सगळय़ा एकत्र आल्या, व्यक्त झाल्या, तात्कालिक का होईना, पण आपापल्या दु:खातून मुक्त झाल्या हे बाजारशक्तीचे गौरवीकरण आहे, त्या बहिणींचे सक्षमीकरण वाटत नाही. प्रसंगांना भावनिकतेची जोड दिल्यानं ते फारसं लक्षात येत नाही. चित्रपटातल्या बहिणी आपापल्या समस्यांनी ग्रस्त आहेत, पण त्या थेट सोडवण्याऐवजी त्या स्पर्धेला जाणं हेच आपलं आव्हान मानून बसतात. त्यांचा संघर्ष हा चित्रपट असा फिरवतो. सगळ्यांचा संघर्ष एकच करून टाकतो आणि हाताळायला सोपा करतो. प्रेक्षकांना त्यात गुंतवतो. चित्रपटातल्या सासऱ्यांनी, अण्णांनी सुनेच्या हातावर दही घातलं असलं तरी ती घरी आल्यावर तशीच राबणार आहे, नातसूनही तशीच त्यांना घाबरणार आहे. हे जीवनाचं वास्तव आहे.
हे पुरुषप्रधानतेचं सत्तास्थान एखाद्या घटनेनं हिरावून घेण्याचा चित्रपटातला प्रसंग किंवा कल्पना, वास्तव जीवनात निव्वळ भावनिक मूल्य असणारा ठरतो. स्त्रियांना त्यांच्या कामासाठी, स्वप्नपूर्तीसाठी आधार, मान्यता मिळवणं इतकं सोपं नसतं. या संदर्भात,‘भारी’ स्त्रियांचा चित्रपट पाहायला अत्यल्प पुरुष जाताहेत, किंवा या चित्रपटाला ‘बायकांचा चित्रपट’ असं जे बिरुद मिळालंय, निर्माते-दिग्दर्शकांना पुरुष प्रेक्षकांना वारंवार आवाहन करावं लागतं आहे, ही घटना बोलकी आहे. अजून स्त्री आणि पुरुषामधली भेदाची भिंत, आणि पुरुषाचं वरचं स्थान भक्कम असल्याचं दाखवणारी आहे. खरंतर ‘भारी’ पुरुषांचा (हाणामारीचा किंवा देशप्रेमाचा) चित्रपट पाहायला असंख्य स्त्रिया जातात, पण उलटं घडत नाही.
हा चित्रपट, एकीकडे जसा बदलत्या सांस्कृतिक फॅशन्सचा कथानकासाठी आधार घेतो, तसा दुसरीकडे मात्र मराठी चित्रपटाची नमुनेदार लक्षणे दाखवून तीच वाट चोखाळतो. त्यातली दोन ठळक लक्षणं म्हणजे प्रेक्षकांना डोळय़ांतून पाणी काढायला लावणं आणि प्रबोधन करणं. लग्नानंतर गाणं सोडण्याचं मान्य करून बोटातली अंगठी फिरवून ठेवणं, खाष्ट सासऱ्यांनी हातावर दही घालणं, मुलीच्या आजाराने मावशी आणि आईमधला दुरावा संपणं वगैरे डोळे टिपायचे प्रसंग आणि मंगळागौर ‘लग्न झालेल्या बायकाच खेलता है’, स्पोर्ट्स ब्रा महाग आणि आरामदायक असतात, कोरिओग्राफी, कन्सल्टन्सी आवश्यक असते, इत्यादी प्रबोधन करत हा चित्रपट पारंपरिक वाटेने जातो.
मग मराठी चित्रपटाची पारंपरिक लक्षणं दाखवणाऱ्या, बाजारशक्तीला पाठबळ देणाऱ्या, तिचं नकळत उदात्तीकरण करणाऱ्या परंपरेला विषय म्हणून वापरणाऱ्या चित्रपटाला नव्या युगातल्या स्त्रियांचा चित्रपट म्हणायचं का? तो लोकप्रिय झाला म्हणजे स्त्री प्रेक्षकांना पटला असं म्हणता येईल का? लोकप्रियता संख्येवर ठरवण्याची रीत आहे, पण प्रेक्षकांची संख्या विचारांचं प्राबल्य दाखवते का? असे प्रश्न यानिमित्ताने समोर येतात. चित्रपट सांगतो तसा ‘मंगळागौरी’च्या निमित्ताने होणाऱ्या नृत्याला जर स्त्रियांचा अवकाश समजायचा असेल, तर विसाव्या शतकात स्त्रियांचं आत्मभान जागवणारी स्त्री-मुक्ती चळवळ त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही असं म्हणायचं का? कारण इथं ज्या प्रकारच्या स्त्रियांच्या ‘अवकाशाचा’ आसरा घेतला गेला आहे, तो अवकाश पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्थेच्या लक्षणांनी युक्त आहे. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ हे मान्य केल्याशिवाय आणि नवं काय हवं याचा वैचारिक गृहपाठ नीट केल्याशिवाय समाजात नवीन काही निर्माण होत नसतं. महाराष्ट्राच्या सुधारणेच्या चळवळींनी, इथल्या प्रबोधन पर्वानं, जात आणि लिंगभेदावर आधारित शोषणाला उघड केलं, लोकांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास जागवून शोषणाचा प्रतिकार करण्यासाठी बळ दिलं. त्यासाठी प्रश्न थेट मांडले. कशाशी लढावं लागणार आहे त्याच्या वैचारिक रूपावरून नजर ढळू दिली नाही. पण हा चित्रपट स्त्री-प्रधान दिसला तरी ‘मनोरंजन’ करण्याचं काम नीट पार पाडण्याच्या आणि व्यावसायिक यश मिळवण्याच्या नादात स्त्रियांची खरी लढाई ज्याच्याशी आहे त्या सामाजिक, कौटुंबिक, वैचारिक व्यवस्थेला भिडणं टाळतो. अन्यथा तो ‘गंभीर’ किंवा ‘कलात्मक’ होण्याचा ‘धोका (!)’ असतो. परंतु संघर्ष रंगवण्याच्या चित्रपटाने केलेल्या या विशिष्ट निवडीमुळे पुन्हा एकदा खऱ्या प्रश्नांना भिडण्याची संधी एका प्रबळ परिणाम साधणाऱ्या माध्यमाने घालवली, याची खंत वाटते. कारण जवळपास चाळिसेक वर्षांपूर्वी आलेल्या ‘उंबरठा’सारख्या एका मराठी चित्रपटाने स्त्रीचा व्यवस्थेविरुद्ध संघर्ष रंगवताना प्रेक्षकांच्या अनुनयाची भूमिका नाकारली होती, प्रेक्षकांना भावेल अशा सुखांताकडे जाण्याचं टाळलं होतं, आणि एक ठोस विचार मांडला होता.
त्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक राजकारणाचा राजकीय वापर होण्याच्या युगात ‘बाईपण भारी देवा’ म्हणणाऱ्या चित्रपटाच्या अशा मांडणीमुळे मग इथं संस्कृतीची एक फॅशन होते, संघर्ष संपल्याचा चुकीचा भास होतो, परंपरेचा विनाचिकित्सा जागर होतो. प्रबळ बाजारशक्तीशी हातमिळवणी करणाऱ्या, माध्यमांतर्फे कूटनीती करणाऱ्यांच्या हाती आणखी एक सांस्कृतिक कोलीत दिल्याचा भास होतो आणि ‘काहीपण भारी देवा’ म्हणण्याचा मोह होतो.
(लेखिका नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत.)
mmd_ pune@yahoo.com