मृत्यूची भीती अनोखी असते. ती सतत ‘भीती’ या रूपात तुमच्या समोर येतेच असं नाही, पण रोजच्या जगण्यात एक असुरक्षिततेचा वास भरून ठेवते.
अलीकडेच एक व्हिडीओ पाहण्यात आला. Sadie doesn’t want her brother to grow up अशा नावाचा हा व्हिडीओ. या व्हिडीओत ३-४ वर्षांची चिमुरडी तिच्या लहानग्या भावासोबत बसली आहे. ती चिमुरडी धाय मोकलून रडत आहे आणि आपल्या भावाला जवळ घेत म्हणत आहे, I don’t want him to grow up. He is so cute. I love his little smiles… I want him to stay little..दोन-चार हुंदके देऊन म्हणतेय, .. and I don’t want to die when I am hundred! ‘मोठं होणं’ आणि ‘मृत्यू येणं’ या दोन गोष्टी ज्या वयात समजायला लागतात त्या वयात किती भीती वाटते त्यांची!
एक वय असं होतं जेव्हा मला पटकन मोठं व्हायचं होतं. वाढदिवसाच्या दिवशी मी ‘एका वर्षांने खरंच मोठी झाले आहे का’ याचा पुरावा शोधत असे. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी आरशासमोर उभं राहून मी पाहत असे की ‘हातपाय लांबीनं वाढलेत का.. किमान कालच्या रात्रीत उंची तरी वाढली आहे का.’’ पण मी ‘मोठी झाले आहे’ याचा कोणताही पुरावा वाढदिवसाच्या एका रात्रीत मिळत नसे. मन खट्ट होत असे. ‘‘वाढदिवसाला नेमकं काय वाढतं.. वय वाढतं म्हणजे काय..?’’ असं मनात येत राही. लवकर मोठं होण्याचं हे वेड तेव्हा थांबलं जेव्हा माझी पणजी वारली. मी साधारण ५-६ वर्षांची असेन. ती वारली म्हणजे आता ती पुन्हा कधीच भेटणार नाही, हे कुणी तरी समजावून सांगितलं. ‘‘पणजी देवाघरी का गेली?’’ या माझ्या प्रश्नाचं उत्तर कुणी तरी ‘ती वयानं खूप मोठी होती म्हणून’ असं दिलं; तेव्हा माझ्यातल्या लहानगीला पहिला धक्का बसला असावा. माणूस वयानं मोठा झाला की ‘देवाघरी’ जातो म्हणून मला मोठं नाही व्हायचं; इतकंच समजण्याचं वय होतं ते.
दुसरी-तिसरीत असताना मला एक नवीन शोध लागला. माझ्या शाळेतल्या बऱ्याच मत्रिणींच्या आयांची वयं ही माझ्या आईपेक्षा कमी होती. मला समजलेल्या ‘लॉजिक’नुसार माझी आई ही मत्रिणींच्या आयांपेक्षा मोठी होती आणि हे चांगलंच धोक्याचं चिन्ह होतं. घरी येऊन मी आईला ‘पणजीचं वय काय होतं’ असं विचारलं. त्यानंतर आईला तिचं वय काय होतं ते विचारलं आणि या व्हिडीओतल्या मुलीसारखीच धाय मोकलून रडायला लागले. आई सांगते की ‘९३ आणि ३८ यात खूप अंतर असतं’ हे समजावताना तिच्या बिचारीच्या नाकी नऊ आले होते!
वय वाढत गेलं तसं मृत्यूविषयीचं भय तीव्र होत गेलं आणि तितकीच त्याविषयी उत्सुकताही तीव्र होत गेली. पुस्तकात येणारे ‘सजीव’ आणि ‘निर्जीव’ हे शब्द नीट समजू लागले. काही प्रश्न मात्र पिच्छा पुरवीत असत, ‘‘आकाश निर्जीव कसं? काय काय घडतं आकाशात, तरीही ते निर्जीव? ते जन्माला कसं आलं? ते मरतं की नाही?’’ इथपासून ते, ‘‘देव-देवी सजीव असणार! मग ते मरत कसे नाहीत’ इथपर्यंत!’’ टीव्हीवरच्या कुठल्या तरी मालिकेत स्वर्गातून (म्हणजे आकाशातून!) रेडय़ावरून येणारा यमदूत दाखवला होता. ‘‘हा यम आकाशातून रेडय़ावर बसून (पंख नसताना!) कसा येतो आणि कोण ठरवतं कुठल्या माणसाला कधी स्वर्गात न्यायचं ते?’’ अशाही प्रश्नांवर बरंच डोकं खपवावं लागायचं. मृत्यूविषयी ‘स्वीकार’भाव यायला किती वेळ जावा लागतो! एक तर मृत्यू हा अतिशय कुरूप वाटतो, दु:खद वाटतो आणि त्यात तो ‘अटळ’ आहे, हे मान्य करायचं!
मृत जिवाच्या आठवणीला कसं सुंदर रूप देता येतं हे सगळ्यात पहिल्यांदा मी अनुभवलं ते ‘गरवारे बालभवन’मध्ये. पाचवी-सहावीतच असेन. ‘बालभवन’मध्ये आमच्या मागे मागे करणारा, अत्यंत लाघवी असा आमचा ‘बहादूर’ नावाचा कुत्रा होता. एक दिवस अचानक समजलं की तो गेला. आम्ही सगळी मुलं खूप रडत होतो. सगळं ‘बालभवन’ शांत शांत होतं. शोभाताईंनी (शोभा भागवत) आम्हाला खूप प्रेमानं समजावलं. बहादूर लांब गेलाय असं वाटू नये म्हणून त्याला बालभवनच्याच मातीत पुरण्याचा निर्णय झाला. आम्हा सगळ्यांसमोर बहादूरला शेवटचा निरोप देण्यात आला. आपण खेळतोय त्याच मातीत आतमध्ये कुठे तरी बहादूरही शांतपणे पहुडलेला आहे, ही भावना त्याच्या मृत्यूचं दु:ख हलकं करणारी होती. मुलांपकी कुणी ना कुणी तरी बहादूरच्या समाधीला रोज फुलं-पानं वाहात असे. ती जागा दु:खाची जागा उरली नाही तर सुखद आठवणींचा स्रोत बनून राहिली!
मृत्यूची भीती अनोखी असते. ती सतत ‘भीती’ या रूपात तुमच्या समोर येतेच असं नाही, पण रोजच्या जगण्यात एक असुरक्षिततेचा वास भरून ठेवते. माझी आजी आजारी होती तेव्हा ही असुरक्षितता फार तीव्रतेनं जाणवायची. तेव्हा मी १७-१८ वर्षांची असेन. आजीचं मेंदूचं ऑपरेशन करायचं होतं. घरातले सगळेच जण अस्वस्थ होते. मला आठवतंय की त्या काळात मी कुणीही न सांगता देवाची प्रार्थना करत असे. असुरक्षिततेला तोंड देण्यासाठी मोठय़ा आशेनं मी कशाला तरी धरू पाहत होते. ते काही तरी म्हणजे बहुधा ‘देव’ असावा. आजीवर माझा इतका जीव होता की आजीला कधीच काहीच होऊ नये याकरिता माझ्या देवाकडे आणाभाका सुरू होत्या. आजी ऑपरेशनमधून वाचली खरी, पण एकाच वर्षांत मोठी चुटपुट लावून निघून गेली. तेव्हा प्रकर्षांनं जाणवलं की या असुरक्षितता नामक राक्षसाला देवही मारू शकत नाही. श्रद्धा असलीच तर बापडी जगायला बळ देईल, पण ती मृत्यूला परतवू शकणार नाही, हे उघड सत्य मान्य करताना मात्र फार त्रास झाला.
मृत्यूला समजून घेण्याच्या या प्रवासात एक गोष्ट मनानं पक्की समजून घेतली ती म्हणजे मृत्यूनं दु:ख होतं ते एका जीवाचं शरीर हिरावून घेतल्यानं नव्हे. दु:ख होतं ते त्या मनाची जी स्पंदनं आपल्या आजूबाजूला असतात, त्याच्या अस्तित्वातलं जे चतन्य आपण अनुभवत असतो; तेच हरवलं आहे, या साक्षात्कारानं. गोव्याला जी सेंट फ्रान्सिस झेवियर यांची बॅसिलिका आहे, तेथे त्यांचं मृत शरीर एका काचेच्या पेटीत गेली कित्येक वर्षे जतन करून ठेवलं आहे. ते पाहिलं तेव्हा वाटलं, ‘असंच माझ्या गेलेल्या प्रियजनांचं शरीर जतन करून ठेवलं असतं तर? मला का नाही सुचलं हे? आजीचा चेहरा मला पाहता आला असता!’, हा विचार क्षणभर सुखावणारा असला तरी तो अंगावर काटा आणणारा आहे. आजीचं ‘आजीपण’ मला अशा काचेच्या पेटीत थोडीच ठेवता येणार आहे! त्यापेक्षा ‘मृत्यू’ नावाच्या या कडू गोळीला गिळलेलं बरं. निदान आठवणींच्या पेटीच्या चाव्या इतर कुणाच्या हातात नसतात, हे आपलं भाग्य समजू या!
अजूनही ही कडू गोळी गिळताना त्रास होतोच. मला काय अगदी थोरा-मोठय़ांनाही होत असणार! मृत्यूच्या असुरक्षिततेला आव्हान देण्याचं सामथ्र्य तर फारच कमी जणांच्या अंगी असतं. मला मात्र अजूनही मृत्यू नावाची घटना समजेच्या पलीकडली वाटते. साने गुरुजींच्या ‘भारतीय संस्कृती’ या पुस्तकात ‘मृत्यूचे महाकाव्य’ नावाचा फार सुंदर लेख आहे. त्यात त्यांनी काही भावपूर्ण ओळी लिहिल्या आहेत-
‘कर ले श्रिंगार चतुर अलबेली.
साजन के घर जाना होगा..
मिट्टी ओढावन मिट्टी बिछावन..
मिट्टीमें मिल जाना होगा..
नहाले घोले शीस गुंथा ले..
फिर वहांसे नही आना होगा..’
या ओळी वाचल्या की जाणवतं मृत्यूचं कुरूप वाटणं फार सोपं आहे, मात्र मृत्यूतलं ‘काव्य’ समजून घेणं महाकठीण! वयाचा आणि मृत्यूचा संबंध नसतो, हे लख्ख समजलं आहे खरं पण कोणत्या धर्यानं साने गुरुजी याच मृत्यूला ‘साजन के घर जाना होगा’ म्हणत आहेत, हे कधी समजणार?
… and I don’t want to die when I am hundred! असं व्हिडीओत रडत म्हणणाऱ्या त्या चिमुरडीचा एक अंश अजूनही माझ्यात आहेच की! मग या प्रवासात काय समजले मी? त्या चिमुरडीत आणि माझ्यात काय फरक? ‘संधिप्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटो यावी’ या बा.भ. बोरकरांच्या ओळींमधली आर्तता आताशा मला दु:खद वाटत नाही, इतकाच काय तो फरक!
मृत्यू एक गूढ
मृत्यूची भीती अनोखी असते. ती सतत ‘भीती’ या रूपात तुमच्या समोर येतेच असं नाही, पण रोजच्या जगण्यात एक असुरक्षिततेचा वास भरून ठेवते.
आणखी वाचा
First published on: 04-10-2014 at 01:29 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The mystery of death