पुरुषप्रधान समाजामध्ये स्त्रीला दुय्यम स्थान असणं, तिच्यावर अन्याय, अत्याचार होणं हे गृहीतच धरलं गेलं होतं, किंबहुना इतक्या वर्षांत ते आता समाजाच्या नसानसात आरपार गेलंय. मात्र त्यातून सुटण्याचा, मुक्तीचा क्षण कोणता असेल? तर ज्या क्षणी स्त्रीला त्या अन्यायाची जाणीव झाली आणि त्यातून आपली सुटका होऊ शकते याचा साक्षात्कार झाला, त्या क्षणी स्त्रीमुक्तीची बीजं तिच्या मनात रोवली गेली असावीत, असं म्हणायला हरकत नाही. मात्र ती प्रत्यक्षात यायला अनेक वाट्या-काट्यातून, स्थित्यंतरातून स्त्रीला जावं लागत आहे… जावं लागणार आहे…

कुणासाठी मुक्तीचा हा काळ पाश्चिमात्य फेमिनिझम आणि त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील लाटांचा असेल तर काहींसाठी १९७५च्या आंतरराष्ट्रीय महिला दिन, वर्ष, दशकापासूनचा असेल तर आपल्याकडे काही जण सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांनी खुल्या केलेल्या स्त्री शिक्षणाच्या दाराकडे बोट दाखवतील तर काही जण ते बोट त्याही आधीच्या संत परंपरेतील आपल्या स्त्री संतांकडे घेऊन जातील. तर काही जण त्याही आधीच्या बौद्ध परंपरेतील गौतमी मातेच्या बौद्ध भिक्षुणी संघाच्या आणि थेरीगाथांकडे वळवतील.

‘स्त्रीमुक्ती’चा जेव्हा विचार सुरू झाला तेव्हा वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या टप्प्यांवर, वेगवेगळ्या विचारधारांमध्ये स्त्रीच्या ‘माणूस’ असण्याचाही विचार झालाच आणि त्यातूनच ‘आजची’ स्त्री निर्माण झाली. पण म्हणजे ती पूर्णपणे ‘मुक्त’ झाली का? तर नाही. उलट ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या दोन विभागांत ती वाटली गेली. पुन्हा ‘आहे रे’ मधली स्त्री अन्यायमुक्त झाली का? तर त्याचही उत्तर बहुतांशी ‘नाही रे’ हेच येतंय. मग स्त्री चळवळीला इतक्या गोष्टी करूनही आणखी काय काय आणि कशा पद्धतीनं करावं लागणार आहे? याचा विचार करणं आज गरजेचं झालं आहे. किंबहुना अनेक प्रश्नांच्या जंजाळातून हळूहळू एक एक पदर सोडवत या स्त्री मुक्तीच्या जाणिवेपर्यंत पोहोचणं अपरिहार्य आहे. यातला सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, स्त्री -पुरुष समानता नसण्याचा. आज इतक्या वर्षांच्या उलथापालथीनंतरही समानतेचा विचार चर्चेचाच आणि वादविवादामध्येच का अडकतो आहे? त्यातला सुवर्णमध्य असू शकत नाही का?

आजच्या ८ मार्चच्या ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ विशेष पुरवणीत आम्ही सहा प्रातिनिधिक स्त्रियांचे अनुभव शब्दबद्ध केले आहेत. ज्यांचा १९७५ नंतरच्या स्त्री चळवळीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता. काही विशिष्ट विचारांनी प्रभावित होऊन या सगळ्याजणी या चळवळीत सक्रिय सहभागी झाल्या. त्यांचे अनुभव यात मांडले आहेत. स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यकर्त्यांनी केलेली आंदोलने, काढलेले मोर्चे यामुळे असंख्य स्त्रियांच्या विचारांत बदल होत गेला. स्त्रिया स्वत:ला, समाजाला प्रश्न विचारू लागल्या. ‘नाही’ म्हणण्याची ताकद त्यांच्यात आली. मुख्य म्हणजे स्त्रिया आर्थिक स्वतंत्र झाल्या. उच्च शिक्षण घेऊ लागल्या, विविध आणि उच्च पद भूषवू लागल्या. अगदी ग्रामीण आणि अगदी तळागाळातल्या मानल्या गेलेल्या ठिकाणच्या स्त्रियाही घराबाहेर पडू लागल्या. शिक्षण, छोटे-मोठे उद्योग करू लागल्या. मात्र सगळ्यांमुळे स्त्री चळवळीच्या यंदाच्या पन्नाशीतही या स्त्रियांचे प्रश्न संपले असं म्हणता येईल का? अत्याचाराच्या बाबतीत काही वेळा तर अमानुषतेचा कळस गाठला जातोय. काय उत्तर आहे या सगळ्यांवर?

‘स्त्री चळवळीची पन्नाशी’ साजरी करणाऱ्या या पुरवणीत सगळ्याच कार्यकर्त्या लेखिकांनी म्हटल्याप्रमाणे, स्त्री चळवळी आता अधिक जोमाने वाढायची गरज निर्माण झाली आहे.

Story img Loader