शिल्पकला क्षेत्रात स्त्रियांची संख्या खूपच कमी. तरीही काही जणींनी याही क्षेत्रात आगळं स्थान निर्माण केलं आहे. महाराष्ट्रातल्या अरुणा गर्गे, स्वाती कापूसकर, भारती पित्रे आणि वंदना कोरी या नावाजलेल्या ‘शिल्पकर्ती’! या प्रत्येकीचं हुकमी माध्यम वेगळं आणि शैलीही वेगळी. आपल्याकडे सामान्य माणसाच्या ठायी शिल्पांचा आस्वाद घेण्याची रसिकता पुरेशी तयार झालेली नसताना या शिल्पकर्ती आपली वैशिष्ट्यं शिल्पांत ओतून ती अधिकाधिक लक्षवेधी करत आहेत. यंदाच्या ‘जागतिक शिल्प दिना’च्या (२७ एप्रिल) निमित्तानं त्यांच्याविषयी…

प्रतिभा वाघ

‘‘मी स्त्री असल्यानं लोकांनी माझ्या प्रतिभेवर विश्वास ठेवण्यास नकार दिला. कारण शिल्पकला हा नेहमीच पुरुषांचा उद्योग होता…’’ सुप्रसिद्ध शिल्पकर्ती कनकमूर्ती (२ डिसेंबर १९४२- १४ मे २०२१) या कर्नाटकात जन्मलेल्या स्त्रीचे हे उद्गार! त्या प्रामुख्यानं दगड याच शिल्पमाध्यमात काम करत. मात्र आता हे चित्र बदलू लागले आहे.

Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Chitra Wagh accuses MVA of making a deal with Maharashtra
मविआवर महाराष्ट्राचा सौदा केल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
Gaitonde
कलाकारण: बाजारप्रणीत इतिहासाच्या पलीकडले गायतोंडे
kiara advani and mithun chakravarti
मिथून चक्रवर्ती ते कियारा अडवाणी, बॉलीवूडमधील ‘या’ लोकप्रिय कलाकरांची खरी नावे माहित आहेत का?

दृक-कलेच्या चित्रकला क्षेत्रात स्त्रिया संख्येनं कमी आहेत आणि शिल्पकला क्षेत्रात तर त्याहूनही कमी! ‘कलावंत’ असा विचार करताना लिंगभेद मानायचा नाही, हे कितीही योग्य असलं तरी सत्यपरिस्थितीचा विचार करावाच लागेल. चित्रकलेच्या तुलनेत शिल्पकला नक्कीच आव्हानात्मक मानली जाते. मुळात प्रतिभा असली, तरीही शारीरिक कष्ट, स्टुडिओसाठी स्वतंत्र मोकळी जागा, याची गरज असतेच. तरीही आपल्याकडे, महाराष्ट्रात या क्षेत्रात काम करणाऱ्या शिल्पकर्ती आहेत याचा अभिमान वाटतो. अरुणा गर्गे, स्वाती कापूसकर, भारती पित्रे या तिघी चित्रकलेचं शिक्षण घेऊन विवाहानंतर शिल्पकलेकडे वळल्या. तर वंदना कोरी यांनी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मधून शिल्पकलेचीच पदविका घेतली.

अरुणा गर्गे

‘शिल्पाच्या उंचीपेक्षा त्यातल्या कलेचं मूल्य जपणं महत्त्वाचं!’ असं अरुणाताईंचं मत. बहात्तर वर्षांच्या अरुणाताईंचं शालेय शिक्षण वर्ध्याला महात्मा गांधीजींच्या ‘नयी तालीम’मध्ये झालं. नाशिकच्या ‘कलानिकेतन’मधून त्यांनी चित्रकलेची ‘जी.डी. आर्ट’ पदविका घेतली. त्यात कुशलता मिळवण्यासाठी विद्यार्थीदशेत जीवापाड मेहनत केली. १९७४ मध्ये सुप्रसिद्ध शिल्पकार मदन गर्गे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्या शिल्पकलेकडे वळल्या आणि त्यांची शिल्पं जगभरात पोहोचली. मूर्तीच्या डोळ्यांतील भाव आणि जिवंतपणा हे त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य.

हेही वाचा – शिक्षणातली वाढती डिजिटल दरी!

मदन गर्गे हे भव्य स्मारक शिल्पांकरिता प्रसिद्ध होते. अरुणाताई त्यांचं शिल्प पूर्णत्वाला जाईपर्यंत बरोबरीनं काम करत, मग शिल्पाचं माध्यम कोणतंही असो. ‘गर्गे स्टुडिओ’ मध्ये घडवलं जाणारं शिल्पं म्हणजे नुसता पुतळा नसतो, तर त्या व्यक्तीचे विचार, जीवन, व्यापक कार्य, या सगळ्यांचा विचार होऊन घडवलेलं ते स्मारकशिल्प असतं. लॉस एंजेलिसजवळील ‘रिव्हरसाइड’ शहरात उभारण्यात आलेलं ब्राँझमधलं ११ फूट बाय ६ फूट उंचीचं महात्मा गांधींचं ‘टॉवर ऑफ ह्युमन व्हॅल्यूज’ हे शिल्प जगभरातून येणाऱ्या व्यक्तींसाठी लक्षवेधी ठरलं. गर्गे उभयतांनी घडवलेल्या या शिल्पात अरुणाताईंचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. मूर्तीत प्राण ओतण्याचं त्यांचं कौशल्य इथे जाणवतं.

‘गर्गे स्टुडिओ’च्या आजवरच्या शंभर वर्षांच्या वाटचालीवर ‘मृद्गंध’ हे पुस्तक अरुणाताई पूर्ण करत आहेत. त्यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ. तेजस गर्गे महाराष्ट्र शासनाच्या ‘पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालया’चे विद्यामान संचालक आहेत. दुसरे पुत्र श्रेयस यांनी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मधून शिल्पकलेची पदविका घेतली आहे. गर्गे स्टुडिओचा वारसा ही तिसरी पिढी सांभाळत आहे.

स्वाती कापूसकर

मूळच्या नाशिकच्या, पण सध्या पुण्यात स्थायिक झालेल्या स्वातीताई कापूसकर यांनी १९८५ मध्ये पुण्याच्या ‘अभिनव कला महाविद्यालया’तून चित्रकलेची पदविका घेतली. त्यांनी २०१० मध्ये आपली चित्रं आणि शिल्पं यांचं एकत्रित प्रदर्शन केलं. त्याच वेळी ‘कुछ इस तरह भी’ हे स्वत:ची सुंदर रेखाटनं, शिल्पांच्या प्रतिमा असलेलं गुजराती, मराठी, हिंदी कवितांचं पुस्तकही प्रकाशित केलं.

चित्रकला पदविका पूर्ण झाल्यावर त्या शरद कापूसकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांच्या स्टुडिओत वावरताना त्या माती आणि ब्राँझ या दोन माध्यमांत शिल्पकृती घडवू लागल्या. शरदजी वास्तववादी शैलीत काम करतात आणि स्वातीताईंची पेंटिंग्ज अमूर्त शैलीची, तर शिल्पं प्रातिनिधिक (Representetive) स्वरूपाची आहेत. आपल्या मार्गानं त्या फुलत राहिल्या. टेराकोटा हे त्यांचं आवडतं माध्यम. मातीचा मूळ रंग, ती भाजल्यावर बदलणारा रंग, हे दोन्ही त्यांना प्रिय आहे. यामधून आपण व्यक्त होऊ शकतो, याचा त्यांना आनंद आहे. कलावंताला प्रयोग करणं, शिकणं आवडतंच. स्वातीताईंनी नाशिक-पुणे प्रवास करून भारतीय विद्या (Indology) या विषयाचा अभ्यास केला. स्कॉटलंडला एका ओपन स्टुडिओमध्ये ओतकामाची प्रगत पद्धती शिकण्यासाठी गेल्या असता एका छोट्या बेटावर वीस-पंचवीस कलावंतांबरोबर एकत्र काम करण्याचा अनुभव त्यांनी घेतला.

आपलं काम त्या स्वतंत्रपणे करत असल्या तरी शरदजींच्या प्रकल्पांमध्ये तांत्रिक मदत त्या आवडीनं करतात. अर्थात ते काम दोघांचंही असतं. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी केलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प त्याचंच उदाहरण. स्वातीताईंच्या कामात एक निराळीच गंमत मला जाणवली. काहींमधली सहजता-गतिमानता, तर काही शिल्पांमधली स्तब्धता, तर कधी गतिमानता आणि स्तब्धता यांमध्ये पकडलेले क्षण. मुक्ताविष्कार! त्यांनी टेराकोटामध्ये घडवलेले दागिने सुंदर, नावीन्यपूर्ण आणि पारंपरिकही. थोडासा लोककलेचा बाज असलेले. टेराकोटामध्ये त्यांनी बनवलेले दिवे तर अप्रतिम आहेत. स्वातीताईंनी एक खंत मात्र बोलून दाखवली, ‘‘कलाकृतीचा आस्वाद कोऱ्या मनानं घ्यायला हवा. कोणतीही कलाकृती घडवायला खूप वेळ लागतो. पण आपल्याकडे सर्वसामान्य माणूस एक-दोन मिनिटांत पाहून मोकळा होतो! कलाकृतीचा आनंद घेणं शिकायला हवं.’’

वंदना कोरी

वंदना कोरी ही तरुण शिल्पकर्ती, ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’मधून शिल्पकलेची पदविका घेतलेली! कुटुंबाकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे आणि प्रचंड इच्छाशक्तीमुळे अनेक अडचणींवर मात करत वंदना शिल्पनिर्मिती करत आहेत. दगड, लाकूड, धातू, फायबर, ही माध्यमं त्या हाताळतात. एखादी संकल्पना घेऊन शिल्पनिर्मिती करणं त्यांना आवडतं. ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’, ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’, ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’, यांच्या पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. ‘काळा घोडा फेस्टिव्हल’मध्ये त्यांनी घडवलेल्या चौदा फूट उंचीच्या फायबर माध्यमातल्या बाहुलीच्या शिल्पाची रसिकांनी वाहवा केली. वंदना या मुंबईत शीव (सायन) मध्ये राहतात. त्यांचा स्टुडिओ विरारजवळ नायगाव येथे आहे. रोज लोकलनं प्रवास करून स्टुडिओला जातात. घर आणि स्टुडिओ जवळ-जवळ असणं ही या शिल्पकर्तींची गरज आहे. वंदना यांच्या मते शासनाकडून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. त्या दिवसाची अनेक शिल्पकार-शिल्पकर्ती वाट पाहात आहेत.

भारती पित्रे

कागदी लगदा हे फार जुनं माध्यम आहे. या माध्यमात आधुनिक जीवनातले क्षण साकारणाऱ्या भारतीताई पित्रे यांची शिल्पं त्यांच्या खास शैलीमुळे रसिकांना आवडतात. मुंबईच्या ‘सोफिया कला महाविद्यालया’तून उपयोजित कलेची पदविका घेतलेल्या भारतीताई उत्तम कथाचित्रं करत असतानाच कागदी लगदा वा पेपरमॅशेच्या एका कार्यशाळेमुळे या नव्या माध्यमातून शिल्पं घडवू लागल्या. त्या पुण्यात काम करतात. समोर असलेल्या, दिसलेल्या व्यक्तींमध्ये त्या अनेकदा प्राणी, पक्षी यांच्या स्वभाव- गुणांचं साम्य शोधतात; नव्हे त्यांना ते जाणवतं आणि त्याचा सुंदर मेळ त्या आपल्या शिल्पांत साधतात. या शिल्पांना विनोदाची झालर असते. पाहणाऱ्याला ती आनंद देतात. त्यांचं प्रत्येक शिल्प सकारात्मकताच दाखवतं. प्रौढ स्त्रियांच्या बेडौल बांध्यातूनही त्या सुंदरता दाखवतात. मोबाइलवर वेळ घालवणाऱ्या एका जोडप्याला असलेले गाढवाचे चेहरे, सायकलवर दुधाच्या बाटल्या आणि किटली घेऊन उभी असलेली, साडी नेसलेली गाय, मोटारसायकलवरून निवडणुकीच्या प्रचाराला निघालेले कावळा आणि पोपट हे मानवी रूपांत दिसतात. सिग्नलजवळचा ढेरपोट्या पोलीस, शाळेच्या बसची वाट पाहणारी मुलं, मुंबईच्या चाळी, असे दैनंदिन विषय त्यांच्या हस्तस्पर्शानं कलाकृतीत रूपांतरित झाले आहेत.

कलावंत आपल्याच विश्वात दंग असतो. पण भारतीताई मात्र आपल्या कलासाधनेबरोबर कोकणातल्या कलावंत तरुण मुलांना उत्तम व्यासपीठही मिळवून देत आहेत. भारतीताईंचे सासरे वसंत पित्रे आणि सासूबाई विमलताई यांच्या प्रयत्नांतून देवरुखचं कला महाविद्यालय सुरू झालं. रत्नागिरी आणि आजूबाजूच्या गावांतील कलावंत मुलांचा त्यामुळे फायदा झाला. ‘देवरुख कॉलेज ऑफ आर्ट’च्या सल्लागार समितीवर त्या आहेत. तसंच ‘पित्रे फाऊंडेशन’च्या विश्वस्त आहेत. कोकणातील कलावंत आपलं गाव सोडून शहराकडे जाऊ नयेत, यासाठी त्यांचं संपूर्ण कुटुंब प्रयत्न करत आहे. ‘ओली माती’ हा त्यांचा ब्रँड सुंदर आणि कलात्मक वस्तूंसाठी ओळखला जातो. भारतीताई त्याच्या संचालक आणि डिझाइन डायरेक्टर आहेत. कोकणातलं नैसर्गिक साहित्य, कागदी लगदा, सिरॅमिक्स, यातून सुबक शोभेच्या वस्तू, जेवणाच्या टेबलावर मांडण्यासाठी बशा आणि इतर वस्तू बनवण्यासाठी त्या मार्गदर्शन करतात. आंब्याची पेटी, खंड्या पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरं, पोत्यात भरलेले कांदे-लसूण-लाल मिरची यांच्या छोट्या आकारातील प्रतिकृती, घर, बैलगाडी, रिक्षा, एवढंच नाही, तर केळीच्या पानावर लिंबाची फोड, कांद्याची चकती आणि तळलेल्या माशाची तुकडी… सारं काही हुबेहूब!

हेही वाचा – स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका

कोकणातल्या या कलाकारांना विपणन, समोरच्या व्यक्तीला आपल्या कलाकृतीबद्दल समजावून सांगणं, याचं प्रशिक्षण दिलं जातं. भारतीताईंचे पुत्र वरुण यात जातीनं लक्ष घालतात. पती अजय पित्रे उत्तेजन देतात आणि आर्थिक हातभार लावतात. आता ‘ओली माती’मधील मंडळींबरोबर मोठमोठे प्रकल्प भारतीताई करत आहेत. सध्या त्या एका कंपनीकरिता मुंगी आणि वारूळ या संकल्पनेवर एक प्रकल्प करताहेत. दूरदृष्टी असलेल्या, मेहनती, सांघिकपणे काम करणाऱ्या, भविष्यासाठी अन्नसाठ्याची तरतूद करणाऱ्या मुंगीचं प्रतीक या कंपनीच्या ध्येयाला अनुरूप वाटलं. यात भारतीताईंनी मुंग्यांची सुंदर शिल्पं साकार केली आहेत. दुर्बिणीतून दूरवरचं पाहणारी मुंगी, वर्तमानपत्र, पुस्तक वाचणारी मुंगी, हे कल्पकतापूर्ण आहे. प्राण्यांना मानवी रूपात प्रातिनिधिक स्वरूपात दाखवणं हे भारतीताईंच्या कलानिर्मितीचं वैशिष्ट्य.

शिल्पकर्ती कनकमूर्तींचा काळ आता बदललाय. स्त्री शिल्पकर्तींच्या प्रतिभेवर लोक विश्वास ठेवू लागले आहेत. कलाकृतींचा आनंद घेऊ लागले आहेत. यापुढेही अधिकाधिक चित्रकर्ती आणि शिल्पकर्तींच्या कलाकृती रसिकांपर्यंत पोहोचाव्यात, हीच यंदाच्या ‘जागतिक शिल्प दिना’च्या (एप्रिलचा शेवटचा शनिवार) निमित्तानं शुभेच्छा!

plwagh55@gmail.com