एखादे मूल किंवा विकलांग व्यक्तीला अमानवी शक्ती असल्याचे भासवून केलेली बुवाबाजी हा गुन्हा आहे. तसे केल्यास कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. मात्र अनेकांना याची कल्पना नसल्याने समाजातल्या अंधश्रद्धाळूपणाचा फायदा घेतला जातो. ‘दैवी शक्तीचा आदेश आहे’, असं सांगत शाळा सोडून भोंदूगिरी करणारा अनिल मात्र सजगतेमुळे या संकटातून वाचला आणि पदवीधर झाला…

उंच, गौरवर्णीय, धडधाकट तब्येत असणारा अनिल. वय केवळ १३ वर्षं, पण १५-१६ वर्षांचा असावा अशी वाटणारी शरीरयष्टी. इयत्ता सातवीमध्ये शिकणारा अनिल. ‘‘मला दैवी शक्तीचा आदेश आहे, म्हणून मी शाळा सोडली.’’ असं ठाम शब्दात सांगणारा अनिल आजही आठवतो.

दहा वर्षांपूर्वीचा प्रसंग. मी न्यायालयातील कामकाज आटोपून घरी आले होते. तेवढ्यात कमलचा फोन आला. ती म्हणाली, ‘‘ताई, आमच्या गावापासून ५-६ मैल अंतरावर एक बाबा आहे. दारूड्या नवऱ्याची दारू सुटावी, मूल-बाळ व्हावं, धंद्यात बरकत यावी म्हणून त्याच्याकडे अनेक लोक येतात. पण या भोंदूने मला फशिवलं. माझा नवरा मला नांदवीत नाही, म्हणून मी त्याच्याकडं जात व्हती, परतेक वेळी माझ्याकडून १०१ रुपयं, लिंबू-नारळ घेतलं. मी ११ वेळा जाऊन आले बघा, पण गुण मात्र नाही. आता देवाला चांदीची गाय दे म्हणतो, माझ्या सोबतिणींनाही असंच फशिवलं. आम्ही मोलमजुरी करणाऱ्या बाया, दोन-तीन हजाराला फसलो.’’ कमलशी बोलणं झाल्यानंतर मी तिच्याच गावात असलेल्या ‘अंनिस’ (अंधश्रद्धा निर्मूलन समिती)च्या माझ्या काही सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांना कमलने सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन येण्यास सांगितलं. दुसरा दिवस उजाडण्यापूर्वीच मला कमलच्याच गावातील एका पत्रकार मित्राने एक व्हिडीओ पाठवला. तो पाहून मी अवाक झाले. व्हिडीओतील अनिलचा ‘दरबार’, त्याचा एकूण अवतार आणि लोकांची गर्दी सर्वच विस्मयकारक होतं.

अनिल- खरं तर या १३ वर्षांच्या लहानग्याला भोंदू म्हणणं खूपच वेदनादायी आहे, पण ते सत्य होतं. तसं दुष्काळी पट्ट्यातलं अनिलचं छोटंसं गाव. घरात आई-वडील, दोन लहान भावंडं, आजी असं सहा लोकांचं कुटुंब. वडिलांची ४-५ एकर जिरायत शेती. शेतीवरच पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. अनिल व त्याची भावंडं शाळेत जात होती. जवळच्या तालुक्याच्या गावात अनिल इयत्ता सातवीत शिकत होता. परंतु अनिलच्या म्हणण्यानुसार, दैवी शक्तीच्या आदेशामुळे त्याने शाळा सोडली. अनिलच्या अंगात देवी संचारली. त्याच्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे देवीने त्याला दृष्टांत दिला. तेव्हापासून अनिल येणाऱ्या लोकांवर दैवी उपचार करायला लागला.

अनिल कुणाला लिंबू-उदी देत होता, तर कुणाला नारळ मंत्रून देत होता. प्रत्येक व्यक्तीकडून कमीत कमी शंभर रुपये घेतले जात होते. गुरुवार, मंगळवार व अमावास्या-पौर्णिमेला अनिलचा ‘दरबार’ भरत होता. सुमारे १५० ते २०० लोक या प्रत्येक दिवशी आपले प्रश्न घेऊन येत होते. अनिलच्या घराच्या ओसरीत मोठा लाकडी देव्हारा ठेवलेला होता. त्या देव्हाऱ्यातच देवीदेवतांच्या मोठ्या मूर्ती होत्या. त्यासमोर बसूनच अनिलचं कामकाज (?) चालत होतं. आलेले लोक काही ओसरीत, तर काही घराच्या समोरच्या पटांगणात बसत होते. अनिलची कमाई बक्कळ होती. माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून अनिलच्या ‘दरबारा’त जाण्याचा आमचा दिवस ठरला. सोबत सहकारी होते. प्रथम पोलीस ठाणं गाठलं. पोलीस निरीक्षकांना सविस्तर अर्ज देऊन पोलिसांची मदत मागितली.

पोलीस निरीक्षक संवेदनशील व कर्तव्यदक्ष होते. त्यांनी ताबडतोब मदत देण्याचं मान्य केलंच, शिवाय स्वत: आमच्या सोबत येण्यास तयार झाले. आम्ही कार्यकर्ते, पोलीस निरीक्षक व तीन हवालदार असा आमचा ताफा अनिलच्या ‘दरबारा’च्या दिशेने निघाला. चाहूल लागू नये म्हणून आमच्या गाड्या साधारण एक किमी अंतरावरच थांबवण्यात आल्या होत्या. मे महिन्यातलं रणरणतं ऊन होतं. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान आम्ही एक किमी अंतर पायी चालत ‘दरबारा’त पोहोचलो. साधारण २५-३० लोक होते. गर्दी ओसरली होती. माझ्यासोबत चळवळीतील माझे सहकारी कृष्णा चांदगुडे व पायल या स्त्री पोलीस हवालदार होत्या. पोलीस निरीक्षक व इतर सर्व आडबाजूला थांबले होते. ‘दरबारा’ची वेळ संपत आली होती. त्यामुळे पंधरा-वीस मिनिटांतच आम्हाला बोलावलं गेलं. मी रुग्ण आणि माझ्यासोबत असलेले सहकारी, कार्यकर्ते व स्त्री हवालदार माझे नातेवाईक बनले होते. अनिलला आम्ही प्रश्न विचारत होतो. अनिल सराईतपणे उत्तरं देत होता. माझ्या आजाराचे (बनावट आजार) देवतेची अवकृपा व माझ्या एका नातेवाईक स्त्रीने घरालाच करणी केली असं कारण त्यानं सांगितलं. एक धागा दिला, पारायण करणं व चांदीची गाय त्या देवतेला वाहण्याचा सल्ला अनिलनं मला दिला. स्त्री हवालदार पायल, अंदाजे वय २७-२८ वर्षं, उंच, सुदृढ बांध्याची स्त्री. माझ्या मागे उभं राहून त्या ते सर्व पाहात होत्या. आमची प्रश्नोत्तरे सुरू असतानाच मोठा आवाज झाला. मी मागे वळून बघितलं तर पायल धाडकन जमिनीवर पडल्या. मी घाईने उठवण्याचा प्रयत्न केला. माझ्या सहकाऱ्याकडे पाणी मागितलं. त्यांनी पाणी दिलंच नाही. कारण त्यांना वाटलं की, अनिलचा भांडाफोड करण्यासाठी हेही नाटकच आहे. पण मग ‘दरबारात’लं थोडं पाणी घेऊन पायलच्या तोंडावर शिंपडलं. हात-पाय चोळले. पायल सावध होऊन उठून बसल्या. त्यावेळी अनिलच्या अंगातील ‘संचार’ सुरूच होता. तो मध्ये काहीही बोलला नाही किंवा मदतही केली नाही. पुन्हा आमची प्रश्नोत्तरे सुरू झाली. अनिलला माझ्या कौटुंबिक समस्या (नसलेल्या) मी विचारत होते. तेवढ्यात पोलीस निरीक्षक व माझे इतर सहकारी ठरल्याप्रमाणे ‘दरबारा’त हजर झाले. पोलीस निरीक्षक गणवेशामध्ये होते. त्यांना पाहून अनिल क्षणभरही विचलित झाला नाही. तो बोलतच राहिला. अनिलचे वडील गाडीवानाचे (अंगात आलेल्या व्यक्तीसोबत मदतनीस म्हणून काम करणारी व्यक्ती) काम करत होते. अनिलनं दिलेलं उत्तर ते मला दुरुस्त करून सांगत होते. त्याचं स्पष्टीकरणही देत होते. पोलीस निरीक्षक कडाडले. ‘‘बंद कर हे तुझं सोंग-ढोंग’’ तेव्हा अनिल पोलीस निरीक्षकांना उद्देशून म्हणाला, ‘‘अज्ञान बालका, तू देवाच्या दरबारात आलास, तुझ्यावर देवाचे कृपाछत्र आहे, गुरूंचे आशीर्वाद आहेत…’’ अनिल थांबायला तयार नव्हता. पोलीस निरीक्षकांनी अनिलच्या वडिलांना ताब्यात घेतलं. तेव्हा मात्र अनिल थोडा अस्वस्थ झाला, तरीही तो धीटपणे त्यांच्याशी बोलतच राहिला. इतर लोकांशीही उर्मटपणे वागत होता. अनिलला, त्याच्या वडिलांना पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आलं. आम्ही सर्व पोलीस ठाण्यात गेलो. दरम्यान, अनिलचे पाठीराखे, हितचिंतक व भक्तगण पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले होते. आमच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहात होते. आम्ही ‘दरबार’ बंद होऊ देणार नाही, अशी निश्चयी भाषा बोलत होते. इकडे पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये मी, माझे सहकारी, अनिल, त्याचे वडील व काही नातेवाईक चर्चा करत होतो. अनिलला समजावण्याचा प्रयत्न सुरू होता. अनिलला अनेक प्रश्न विचारले. परंतु त्याचं उत्तर एकच,‘मला दैवी आदेश आहे.’ शेवटी अनिलच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्याचं ठरलं. तेव्हा मात्र तो वरमला. अनिलचे वडीलही सौम्यपणे बोलू लागले. त्या दोघांनीही माफी मागितली. यापुढे दैवी शक्तीचा दावा करून कोणाला फसवणार नाही, असं लेखी लिहून दिलं. अनिलचं वय, त्याचं भविष्य, शिक्षणाची हेळसांड या सर्व बाबी लक्षात घेऊन अनिलच्या वडिलांकडून माफिनामा लिहून घेतला. अनिलच्या शिक्षणाबाबतही त्यांच्याकडून लेखी आश्वासन घेतलं.

मी शिक्षणाचं महत्त्व, कायदेकानून, अनिलचं भविष्य याबाबत त्याच्या वडिलांशी चर्चा केली. त्याच्या शाळेतील मुख्याध्यापकांचा दूरध्वनी मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला. ‘‘अनिल मागच्या वर्षी शाळेत अनियमित होताच आणि यंदा तर तो गेले तीन महिने शाळेतच येत नाही. त्याच्या पालकांना अनेक वेळा शाळेत बोलावलं, समजावलं, पण उपयोग झाला नाही.’’ असं ते म्हणाले. तेव्हा अनिल यापुढे नियमित शाळेत येईल. अनिलच्या शाळेची जबाबदारी आपणा सर्वांचीच आहे, असं म्हणून अनिलच्या वडिलांचेही मुख्याध्यापकांशी बोलणं करून दिलं. त्यांनीही, ‘अनिलला नियमित शाळेत पाठवीन’, असं मुख्याध्यापकांना सांगितलं.

अनिलचं संपूर्ण प्रकरण चांगल्या पद्धतीनं मार्गी लागलं. नंतर हवालदार पायलशी एकदा बोलले. त्या ‘दरबारा’त अचानक कोसळण्यामागचं कारण मला जाणून घ्यायचं होतं. त्या म्हणाल्या, ‘‘ त्यांच्या अंगात आलेलं पाहून भीती वाटली, हे खरं असलं तर काय? या विचाराचा मला खूप ताण आला… आणि पुढे काय झालं मला कळलंच नाही.’’ तेव्हा त्यांच्याशीही बाबा-दरबार, स्त्रियांची फसवणूक, अंधश्रद्धा यावर १५-२० मिनिटं चर्चा केली. त्यांना सारं काही समजावून सांगितलं.

अनिलची भोंदूगिरी बंद झाली. शाळा नियमित सुरू झाली. अधूनमधून मी मुख्याध्यापकांशी संपर्क साधत होते. सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे आता अनिल पदवीधर झाला आहे. कापडाचं दुकान चालवतो आहे. मुळातच चुणचुणीत असलेल्या अनिलचा व्यवसायात चांगला जम बसला आहे.

महाराष्ट्र हे जादूटोणाविरोधी कायदा करणारं देशातील पहिलं राज्य आहे. महाराष्ट्रात २०१३ मध्ये ‘जादूटोणाविरोधी कायदा’ मंजूर झाला. या कायद्याच्या ‘कलम २’मध्ये असलेल्या शेड्यूल (१३)मध्ये एखादं मूल किंवा विकलांग व्यक्तीला अमानवी शक्ती असल्याचे भासवून केलेली बुवाबाजी हा गुन्हा आहे. त्यासाठी सहा महिने ते सात वर्षांपर्यंत कारावास व पाच हजार ते पन्नास हजार रुपये दंडापर्यंतची शिक्षा होऊ शकते. पोलीस खात्याचे सहकार्य, कार्यकर्त्यांची तत्परता, मुख्याध्यापकांचा चांगुलपणा, अनिलच्या कुटुंबाचे सहकार्य यामुळे अनिल मोठ्या संकटातून वाचला. मनावर झालेले बालपणापासूनचे संस्कार, भीतीचा पगडा, विशिष्ट वातावरणाबद्दल वाटणारी गूढता यातून पायलसारखी पोलीस हवालदार असलेली स्त्रीसुद्धा घाबरून कोसळते हे वास्तव. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार-अंगीकार हे संविधानात प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे. त्याचा अंमल होऊन निर्भय नागरिक तयार झाला तर समाज निर्भय बनेल.

(या लेखातील व्यक्तींची नावे बदललेली आहेत.)
ranjanagawande@gmail.com