डॉ. अंजली जोशी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लहान मूल सांभाळण्याची जबाबदारी आजही खूप कुटुंबांत आईवरच पडते. विभक्त कुटुंबांमुळे वडीलधाऱ्यांची साथ नाही, करिअरच्या बहाण्याखाली नवऱ्याकडून सहकार्य नाही, मदतनीस बायकांशी जुळवून घेताना उडणारा गोंधळ आणि काहींना तर आपलं करिअरच सोडून द्यावं लागणं, यात होणारे हाल स्त्रियांनाच कळू शकतील! आजच्या आव्हानात्मक पालकत्वाच्या काळात अशा समस्त आईंच्या मनातला कोलाहल शांत करता येईल का?..
‘‘प्राची, पार्थ फक्त पाच वर्षांचा आहे. एकामागून एक क्लासेसमध्ये चक्रासारखं त्याला फिरवत असता. तुला आणि प्रणवला त्याच्याबरोबर वेळ घालवायचा नसतो, म्हणून क्लासेसचं शुक्लकाष्ठ बिचाऱ्याच्या मागे लावून दिलंय!’’ पार्थचा ‘स्पीच अँड ड्रामा’चा क्लास संपण्याची वाट बघत मी गेटबाहेर उभी होते तेव्हा हे सगळं आठवत होतं. काल संध्याकाळी निघण्यापूर्वी सासूबाई म्हणाल्या ते अजूनही मनाला डंख मारत होतं. त्यांना सणसणीत उत्तर देण्याची तीव्र इच्छा मनात दाटून आली होती; पण त्या थोडय़ा दिवसांसाठी पाहुण्या म्हणून आल्या होत्या. आता परत जायला निघाल्या असताना बोललं तर थोडक्यासाठी वाईटपणा येईल, म्हणून ओठाशी आलेले शब्द मनात गिळून टाकले.
पार्थला वेळ द्यायचा म्हणून मी माझं करिअर सोडून दिलं, हे त्यांना चांगलं माहीत आहे. तरीही वाक्बाण मारून जखमी करतच असतात! शाळेतून आल्यावर पार्थ माझ्याबरोबरच असतो. किंचित जरी लक्ष निसटलं, तरी काही तरी उपद्वय़ाप करून ठेवतो. परवा मी फोनवर बोलत होते, तर बाथरूममध्ये जाऊन त्यानं पाण्याच्या भरलेल्या बादल्या उपडय़ा करून ठेवल्या. हल्ली मोबाइलचा हट्ट सुरू केलाय. नको त्या सवयी जडण्यापेक्षा क्लासला गेला तर नवीन काही तरी शिकणार नाही का? त्याला तिथे नेणं-आणणं हे मोठं काम आहे, हे दिसत नाही का त्यांना? तरी त्यांचे टोमणे चालूच असतात- ‘‘आमच्या वेळी तर सासू-सासऱ्यांपासून ते नातेवाईकांपर्यंत किती तरी माणसांचं आम्ही केलं; पण आताच्या मुलींसारखी कुरकुर केली नाही. हल्लीच्या मुलींना एक मूलसुद्धा झेपत नाही. आम्ही तर दोन वाढवली.’’ पण त्या सोयीस्करपणे हे विसरतात, की या सगळय़ांचं करताना त्यांना इतरांची मदतही मिळत होती. वेगळय़ा शहरात असल्यामुळे माझ्या किंवा प्रणवच्या आईबाबांची मदत नाही ना घेता येत आम्हाला! ती मिळाली असती तर नोकरी कशाला सोडली असती?
तेवढय़ात पार्थ बाहेर आला. ‘‘आई, आज टीचरनी एक नाटक बसवलंय. मी पायलट बनलोय. मी ना हेलिकॉप्टर चालवणार!’’ पार्थचा उत्साह ओसंडून वाहत होता. मनात आलं, आता कार्डबोर्डचं हेलिकॉप्टर बनवायलाच लागणार. त्यातून सुटका नाही आणि पायलटचा ड्रेस मिळेल असं भाडय़ाच्या कपडय़ांचं दुकानही शोधावं लागेल! शाळेत कुठले ना कुठले प्रोजेक्ट चालूच असतात. त्यांची मॉडेल्स नाही तर चार्ट्स करत रात्रंदिवस जागावं लागतं. त्यात आता याची भर! दर दिवशी कामं कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहेत.
पार्थला आता फुटबॉलसाठी न्यायचं होतं. त्याच्याकडे पाहताना वाटलं, की पार्थच्या सहवासात कामांची दगदग सुसह्य होते, हे मात्र खरं! त्याचा कोवळा स्पर्श, निरागस चेहरा, बालिश बोलणं, हे ताण विसरण्याचं टॉनिक आहे. त्याच्या बाललीला अनुभवण्याचा आनंद अनोखा आहे. तिथल्या मैदानावर त्याला मनसोक्त हुंदडताना पाहून वाटलं, त्याच्यातल्या सळसळणाऱ्या ऊर्जेला इथे कशी मुक्त वाट मिळते. खेळायला बरोबरीची मुलं मिळतात. नाही तर घरी बसून काय करणार? बिल्डिंगमध्ये पार्थच्या वयाची मुलं नाहीत.
मागच्या पिढीला कळतच नाही, की हल्लीच्या पालकांना काय काय आव्हानं आहेत ती! ते सगळं स्वत:च्या काळात तोलतात. पूर्वी पालकत्व इतकं अवघड नव्हतं. खेळण्यासाठी आजूबाजूला मित्रमैत्रिणी असत. बिल्डिंगमध्ये खेळायला थोडीफार तरी मोकळी जागा मिळायची. हल्ली जिथे जागा मिळेल तिथे गाडय़ा पार्क केलेल्या असतात. मुलांपुढेही आतासारखी प्रलोभनं नव्हती. मोबाइल नव्हता. टीव्ही थोडा वेळ असायचा. शाळेतल्या प्रोजेक्ट्समध्ये पालकांचा सहभाग नगण्य होता. मुख्य म्हणजे त्या वेळी परक्या माणसांबद्दलही विश्वास आणि सुरक्षितता वाटायची. मला शाळेत रिक्षावाले काका सोडायचे; पण हल्ली स्कूल बस असो नाही तर रिक्षा; मुलांना एकटय़ानं पाठवणं सुरक्षित वाटेनासं झालंय. पार्थला सुरुवातीला आम्ही स्कूल बसमधून शाळेत पाठवायचो; पण बसमधली मोठी मुलं त्याला दमदाटी करायला लागली. आता प्रणव त्याला शाळेत सोडतो आणि मी आणायला जाते. तरी म्हणे पार्थला वेळ देत नाही!
स्वत:चं उंचावत जाणारं करिअर सोडून देणं सोपं असतं का? त्यासाठी कुठल्या दिव्यातून गेलेय हे माझं मलाच माहीत! पार्थच्या जन्मापासूनच्या सगळय़ा स्मृती आता मनाच्या काठावर जमा झाल्या आहेत. सहा महिन्यांची बाळंतपणाची रजा मी आणखी काही दिवस वाढवून घेतली, तरी शेवटी नोकरीवर रुजू व्हायला लागलंच. सुरुवातीला पार्थला घरी सांभाळायला येणाऱ्या बायकांचे प्रयोग करून पाहिले. त्यातली एक जण सारख्या दांडय़ा मारायची आणि ऐन वेळी कळवायची. ऑफिसला न जाता मला घरीच थांबायला लागायचं. मग चिडचिड व्हायची ती वेगळीच! एक जण तर लहानग्या पार्थला मोबाइल देऊन स्वत:ची कामं करत बसायची. ऑफिसमध्ये काम करता करता फोनमधून सीसी टीव्हीचं फुटेज बघत बसणं हे एक नवीन काम अंगावर पडलं माझ्या. मध्ये एकदा पार्थ रात्री अंथरूण ओलं करायला लागला, झोपेत दचकून उठायला लागला. खोलात जाऊन शोध घेतला तेव्हा कळलं, की सांभाळायची बाई ‘माझं ऐकलं नाहीस तर रस्त्यावरचे भिकारी तुला पळवून नेतील’ असा धाक त्याला घालायची.
मग एक पाळणाघर शोधलं; पण पार्थ रडून रडून ते डोक्यावर घ्यायचा. प्रणवचं सतत टुरिंग चालू असतं. त्यामुळे पाळणाघरातून थेट मलाच फोन यायचा. नवीन काय वाढून ठेवलंय या विचारानं धस्स व्हायचं. आपण वेळ देऊ शकत नाही म्हणून पार्थला हे सहन करावं लागतंय, याचा गिल्ट फणा काढून बाहेर यायचा. कित्येकदा ऑफिसचं काम अर्ध्यावर सोडून मला पाळणाघरात जावं लागायचं. सहकाऱ्यांचे टोमणे सहन करायला लागायचे, ते वेगळेच. शिवाय आपण ऑफिसच्या कामाला न्याय देऊ शकत नाही याचाही गिल्ट यायचा. पाळणाघरात पार्थचं बस्तान कसंबसं बसतंय असं वाटू लागलं, तेव्हाच तो प्रसंग घडला. पार्थच्या हातापायांवर खरचटलेलं दिसलं म्हणून मी विचारलं, तर तो म्हणाला, ‘‘आज नूपुर आणि करणचं भांडण झालं. म्हणून माझी करणशी मारामारी झाली.’’
‘‘अरे, पण तू का पडलास मध्ये?’’ मी विचारलं.
‘‘नूपुर माझी जीएफ आहे ना..’’ ‘जीएफ’ म्हणजे ‘गर्लफ्रेंड’, याचं आकलन व्हायलाही मला वेळ लागला. हे लोण इतक्या लहान- तीन वर्षांच्या मुलांपर्यंत पोहोचलंय! माझ्या मेंदूत झिणझिण्या आल्या.
‘‘कधीपासून?’’ मी चिंतेनं विचारलं.
‘‘पाळणाघरातल्या सगळय़ा मुलांनी कधीच जोडय़ा लावल्या आहेत. आता आमची ‘किसिंग कॉम्पिटिशन’पण होणार आहे!’’ पार्थ नेहमीच्याच निरागसतेनं म्हणाला.
त्या रात्री मला आणि प्रणवला झोप लागली नाही. असले संस्कार होऊन पार्थ उद्या वेडय़ावाकडय़ा मार्गाला लागला, तर त्याला आपणच जबाबदार राहू, असं सारखं मनात येत होतं. दुसऱ्या पाळणाघरात ठेवलं तरी हा नाही तर दुसरा प्रकार. लक्षात येऊनही पावलं उचलली नाहीत, तर आयुष्यभर अपराधी वाटेल. आपल्या नोकरीमुळे पार्थला इतरांवर सोपवावं लागतंय याचा गिल्ट काटय़ासारखा खुपू लागला. सकाळ उजाडेपर्यंत नोकरी सोडण्याचा माझा निर्णय पक्का झाला होता. शक्य होईल तेवढं पार्थला डोळय़ांसमोर ठेवायचं, अशी पक्की खूणगाठ आम्ही मनाशी बांधली होती.
नोकरी सोडून आता दोन वर्ष झाली तरी गिल्टला पूर्णविराम मिळाला नाही. आताच्या गिल्टचं स्वरूप वेगळं आहे. ऐन भरात असलेलं करिअर अर्ध्यावर सोडून स्वत:वर आपण अन्याय केला आहे, याबद्दलचा गिल्ट कधी तरी उफाळून वर येतो. नोकरीतल्या स्मृती मनात दाटून येतात. आता ते दिवस फक्त आठवणीतच राहिले आहेत याची खंत मनाला जखमी करते. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर जगाच्या बाजारात आपण निरुपयोगी ठरत चाललो आहोत, ही जाणीव मन पोखरून काढते. स्वत:ला अद्ययावत ठेवण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करण्याची गरज आहे व आपण ते करू शकत नाही, याचं वाईट वाटत राहतं. मध्यंतरी घरून करता येण्यासारखी काही कामं करून पाहिली; परंतु पार्थच्या कामाच्या पसाऱ्यात ती पूर्ण करता आली नाहीत. गिल्टचा अजून एक थर मनावर चढला. प्रत्येक दिवशी वाटतं, की पार्थ कधी मोठा होईल आणि मी नोकरी करायला लागेन.. पण केली तरी ती पूर्वीच्या तडफेनं करता येईल का, अशी धास्ती वाटत राहते. दोन वर्षांत तंत्रज्ञानात प्रचंड बदल झालेत, प्रत्यक्ष कामाशी संपर्क तुटलाय. जितके जास्त दिवस पळताहेत, तेवढा बाहेरच्या कामाचा आत्मविश्वास कमी होत चाललाय.
पार्थला घेऊन घरी आले, तर आजी दिसली नाही बघून त्यानं भोकाड पसरलं. ‘‘मी नाही एकटा झोपणार! मी आता तुमच्या खोलीतच झोपणार.’’ तो हुंदके देत म्हणत होता. रोज रात्री पार्थ आमच्याच खोलीत झोपायचा. उशिरापर्यंत जागा राहायचा. मला आणि प्रणवला धड मोकळेपणी बोलता यायचं नाही. टीव्हीवरचे कार्यक्रम पार्थच्या वयाला योग्य नाहीत म्हणून बंद करायला लागायचे. कित्येक दिवसांत आम्ही जवळही येऊ शकलो नव्हतो. बाजूला पार्थ असताना तो उठला तर किंवा त्यानं पाहिलं तर, अशी धाकधूक वाटत राहायची. शरीर फुलूनच यायचं नाही. दोघांचीही चिडचिड व्हायची. कधी कधी पार्थवरही राग निघायचा. पार्थला वेगळय़ा खोलीत झोपायची सवय लावायला आम्ही नुकतीच सुरुवात केली होती. अर्थात आपल्या काळजाच्या तुकडय़ाला थोडय़ा वेळासाठी का होईना पण दूर करणं सोपं नव्हतं. मनावर दगड ठेवूनच ते करत होते; पण सासूबाई आल्यावर या सगळय़ा प्रयत्नांवर पाणी फिरलं. पार्थला त्या स्वत:जवळ घेऊन झोपायच्या. एकदा मोडलेली सवय पार्थला परत लावणं किती मुश्कील आहे.. ते सांगितलं, तर वर मलाच म्हणाल्या, ‘‘तू पार्थवर सारखी चिडचिड करत राहतेस. लहान वयात मुलाला आईचा स्पर्श आणि माया मिळाली नाही तर मुलांची प्रेमाची भूक अपुरी राहते.’’
सासूबाई निघून गेल्या; पण मनावर व्रण उमटवून गेल्या. वाटलं, की त्यांना विचारावं, की आईपणाचं ओझं तुम्हीही अनुभवलं असेल ना कधी तरी? हे ओझं वाहताना तुमच्यातली आई कधी हतबल झाली असेल, तर कधी चिंतित. कधी चिडचिडी झाली असेल, तर कधी धास्तावलेली असेल. कधी तिनं आईपणाचा आनंद भरभरून घेतला असेल, तर कधी ती अपराधीपणात बुडून गेली असेल. कधी ‘सुपरमॉम’ झाली असेल, तर कधी ‘आई म्हणून तू कशी कमी पडतेयस,’ असं टोचून बोलणाऱ्या सासूबाईंना बोल लावत असेल. पिढी बदलली आहे; पण आई तीच आहे. ओझ्यांचा भार मात्र वाढला आहे. तुमचा नुसता शब्दांचा आधार मिळाला तरी हा भार सुसह्य होईल. मग आईपणाचं ओझं वाटून न घेता जीवनातल्या या वळणबिंदूकडे अधिक सम्यकतेनं पाहता येईल.