दीपा देशमुख

लग्नानंतर स्त्रीवर बेमालूम घातली जाणारी बंधनं, त्यातून होणारा कोंडमारा, नवऱ्याची मर्जी सांभाळायचा ताण आणि अनेकींना सहन करावी लागणारी कौटुंबिक हिंसा, हे चित्र आपल्या समाजाला नवं नाही. खूप चित्रपटांत आपण ते पाहिलं आहे. ‘जया जया जया जया हे’ या मल्याळम् चित्रपटाची नायिका मात्र केवळ ही परिस्थिती पालटत नाही, तर नवऱ्याला त्याच्याच वागणुकीची चव चाखायला देते. स्त्रीच्या बाबतीत समाजात ठासून भरलेल्या दुटप्पीपणाला आरसा दाखवणारा हा खुसखुशीत चित्रपट पाहायलाच हवा.

Nagpur Bharosa Cell , Nagpur , Bharosa Cell,
नागपूर : विस्कटलेल्या १६ हजार ८४३ कुटुंबियांना पोलिसांचा ‘भरोसा’
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
maharashtra government defends ladki bahin yojana in bombay high court
महिला सशक्तीकरणासाठी ‘लाडकी बहीण’; राज्य शासनाचे उच्च न्यायालयात उत्तर; अतिरिक्त भार पडत नसल्याचे स्पष्टीकरण
psychiatrist sexually abused nearly hundred women in Hudakeshwar area
नागपूर : खळबळजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषण…
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
case filed against entertainment company owner for unpaid dues of 1 25 crore rupees
कौटुंबिक वादातून महिलेवर चाकूने वार करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; बाणेर भागातील हाॅटेलमधील घटना
L&T , Subramaniam, 90 Hours Work , Work Hours ,
स्त्रीद्वेष्टेपणा की कर्मचाऱ्यांच्या शोषणाची पूर्वतयारी? 

जिजाबाई, ताराबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई यांसारख्या अनेक कर्तृत्ववान आणि पराक्रमी स्त्रियांनी स्त्रीला तिच्या अस्तित्वाची खऱ्या अर्थानं जाणीव करून दिली. प्रतिकूल परिस्थितीत, संघर्षमय वातावरणात, चिवटपणे, चिकाटीनं मार्ग काढत कसं पुढे जात राहायचं, हे या कणखर स्त्रियांनी दाखवलं. त्यांची चरित्रं वाचताना, त्यांचं काम आणि आयुष्य यांचा पट उलगडून बघताना स्वातंत्र्य मागून मिळत नसतं, तर ते स्वत: अथक प्रयत्नांतून मिळवावं लागतं, याची जाणीव होते. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये स्त्रीचं दुय्यमत्व असलेलं रूप आपण पडद्यावर पाहिलं आहे. पण काही चित्रपट मनोरंजनाबरोबर समाजप्रबोधन करत, समाजातल्या या दुटप्पीपणावर कठोरपणे भाष्य करणारेही झाले. स्त्रीनं कष्टानं मिळवलेल्या स्वातंत्र्याची रंजक गोष्ट सांगणारा अलीकडचा मल्याळम् चित्रपट म्हणजे ‘जया जया जया जया हे’.

आज मुली स्वकर्तृत्वानं प्रत्येक क्षेत्रात चमकताहेत असं आपण म्हणतो, तरी भारतातल्या बहुतांश कुटुंबांतल्या मुलीची कहाणी जवळपास सारखीच असते. अनेक कुटुंबांत मुलीचा जन्म झाल्यावर, ‘पहिली बेटी धनाची पेटी’ म्हणत आनंद साजरा केला जातो, पण दुसऱ्या खेपेस मात्र ‘आता मुलगा झाला पाहिजे’ या भावनेनं घरातला प्रत्येक सदस्य वंशाच्या दिव्याची वाट बघू लागतो. बालवयात मुलगा असो की मुलगी, त्यांच्या बाललीलांचं कोडकौतुक होतं. मुलीचा आवेश पाहून तिला झाशीची राणी, इंदिरा गांधी, वगैरे विशेषणं बहाल केली जातात! तीच मुलगी वयात येते, तेव्हा मात्र तिनं काय करावं, यापेक्षा काय करू नये, याची एक मोठी यादी तिची प्रतीक्षा करत असते. तिनं काय कपडे घालावेत, काय घालू नयेत, किती मोठय़ाने बोलावं-हसावं किंवा दात दाखवत हसू नये, किती वेळ बाहेर राहावं किंवा ‘सातच्या आत घरात’ असावं, याविषयी अलिखित नियम तयार केले जातात आणि त्यातून त्या मुलीनं बंडखोरपणा केला किंवा काही घरांत जरी तिच्या पालकांनीच तिला पुरेशी अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली, तरी लग्न झाल्यानंतर अनेकींच्या बाबतीत ‘पहिले पाढे पंचावन्न’ असं चित्र निर्माण होतं. ‘या घरात हे चालणार नाही’ असा पाढा तिच्यासमोर वाचला जातो आणि पुष्कळ कुटुंबांत तिला ती स्त्री आहे, दुय्यम आहे, याची जाणीवही वारंवार करून दिली जाते.

‘जया जया जया जया हे’ या चित्रपटाची नायिका- जयाभारती- ‘जया’ ही अशा एका मध्यमवर्गीय, कर्मठ कुटुंबातली मुलगी. मुलाच्या पाठीवर तिचा जन्म झाल्यानं घरात आनंदाचं वातावरण पसरलेलं असतं, पण लहानपणी कौतुकानं ‘इंदिरा गांधी’ असं विशेषण बहाल करणारे पालक ती वयात येताच तिच्यावर बंधनं घालायला सुरुवात करतात. लग्नाच्या बाजारात काय काय आवश्यक आहे, याची काळजी घेत तिला शिकवलं जातं. तारुण्याच्या उंबरठय़ावर असलेली जया एका तरुण प्राध्यापकाच्या प्रेमात पडते. कार्यकर्ता असलेला हा प्राध्यापक कामगार, कष्टकरी स्त्रियांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवत असतो. समानतेच्या, स्त्री-स्वातंत्र्याच्या, समान वेतनाच्या गप्पा मारत असतो. मात्र जयाच्या बाबतीत तिनं सोशल मीडियावरचा तिचा फोटो का बदलला? कॉलेजला ती अमुक एका पोशाखात का आली? ती कुणाशी बोलली, यावरून मालकीहक्क गाजवू पाहतो. त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली जया त्याच्या या दांभिक वागण्यानं संभ्रमात पडते आणि त्याच्याशी नातं तोडते.

जयाच्या घरात तिच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागताच ते तिचं लग्न ठरवायच्या मागे लागतात. शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न पाहणारी जया लग्नास विरोध दर्शवते, पण तिचं मत आणि स्वप्नं विचारात न घेता तिचं लग्न करून देण्यात येतं. संसार सुरू होताच, घरातल्या पुरुषाचं महत्त्व, त्याच्या अपेक्षा पूर्ण करणं, त्याच्या विक्षिप्त स्वभावाला, अहंकाराला जपणं, अशी कसरत करत जया दिवस काढू लागते. असह्य झाल्यावर माहेरी आपलं मन मोकळं करते. पण ‘आता तेच तुझं माहेर आणि तेच तुझं सासर’ म्हणत तिच्यासाठी माहेरचे दरवाजे बंद असल्याचं सूचित केलं जातं. नव्याचे नऊ दिवस संपताच, लहानसहान कारणांवरून नवऱ्याची जयाला रोजची मारहाण सुरू होते. सासू आणि नणंद यासुद्धा तिला समजावताना म्हणतात, ‘‘संसारात भांडय़ाला भांडं लागतंच, तूच तडजोड कर.’’ हळूहळू जया कोमेजून जायला लागते. दिग्दर्शकानं या चित्रपटातून बारीकसारीक प्रसंगामधून अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा सासरच्या घरात पाऊल टाकल्यावर जयाला भिंतीवरची सासऱ्याचा फोटो असलेली फोटोफ्रेम, टीपॉयवरची काच, शोकेसची काच अशा प्रत्येक गोष्टीला तडा गेलेला दिसतो. या सगळय़ा निरस वातावरणात ती जुळवून घेण्याचा प्रयत्न करते.

एका क्षणी मात्र ‘फक्त रडून उपयोग नाही, इतर कुणावर अवलंबून राहूनही उपयोग नाही. आपल्यालाच यातून मार्ग काढावा लागेल,’ हे जयाला उमगतं. ती स्वत:च्या संरक्षणाचा मार्ग शोधते. इतकंच नाही, तर स्वावलंबीही होते. तिचा हा प्रवास फार रोचक, मनोरंजक आणि उद्बोधक आहे. अतिशय विचारपूर्वक योजना आखून आणि साळसूदपणे जया नवऱ्याला त्याच्याच वागणुकीची चव चाखायला देते. पण हे लक्षात आल्यावर नवरा पलटवार करण्याची नवी योजना आखतो. स्त्रीनं फार बंड करू नये यासाठी चतुराईनं जे उपाय काढले जातात, त्यात तिच्या पदरात एक-दोन मुलं पडली की ती संसारात अडकली जाईल आणि नवऱ्यावर अवलंबून राहून संसाराचा गाडा निमूटपणे ओढत बसेल, हाही एक विचार असतो. माहेर आणि सासर, दोन्हीकडून पािठबा नाकारण्यात आलेली, लग्नापायी शिक्षण अर्धवट राहिलेली, स्वत:चं अर्थार्जन न करणारी स्त्री जाईल तरी कुठे? या समाजाच्या रीतीचा बेमालूम फायदा जयाचा नवरा उठवू पाहतो. या विश्वासघातकी वागण्यानं मात्र जयाला जबरदस्त हादरा बसतो. घडलेल्या घटनांनी हताश झालेली, पण आत्मसन्मान जागा असलेली जया पडत, धडपडत कशी उभी राहते हे बघण्यासारखं आहे. संसाराची संपूर्ण जबाबदारी स्त्रीवरच आहे हे ठामपणे मानणारा समाज सत्य दिसत असूनही स्त्रीच कशी दोषी आहे याकडे कसं बोट दाखवतो, हे वास्तव जयाच्या वाटचालीच्या निमित्तानं चित्रपटात मार्मिकपणे दाखवलं आहे.

जयाच्या भूमिकेत दर्शना राजेंद्रन् आणि नवरा- राजेशच्या भूमिकेत बेसिल जोसेफ यांनी बहार उडवली आहे. न्यायाधीशाच्या भूमिकेत असलेली मंजू पिल्लई ही अभिनेत्रीही आपला खास ठसा उमटवते. लग्नात विनाकारण रीत म्हणून रडणारे नातेवाईक आणि त्यांच्याकडे विचित्र नजरेनं बघणारी, रडू न येणारी जया, हा प्रसंग फारच मजेशीर आणि माणसांच्या नाटकीपणाचं दर्शन घडवणारा. जयाविरुद्ध कट रचण्यात मदत करणाऱ्या राजेशच्या भावाला २०० वेळा न्याय, समता आणि स्वातंत्र्य हे तीन शब्द लिहून आणायला पाठवणारी न्यायाधीश, हा न्यायालयातला प्रसंगही धमाल आणणारा. जया स्वत:च्या पायांवर उभी राहते त्यानंतर नवऱ्याला शेवटच्या प्रसंगात भेटतानाही तिच्यातला मूळचा खेळकर स्वभाव आणि त्याला असलेली आत्मविश्वासाची झळाळी स्पष्ट दिसते.

हा चित्रपट सरळसोटपणे सादर केला असता तर कदाचित तो बघावासा वाटला नसता. पण दिग्दर्शक विपीन दास यांनी चित्रपटाला दिलेली व्यंगात्मक ट्रीटमेंट इतकी छान आहे, की प्रत्येक प्रसंगी प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं आणि त्याच वेळी तो अंतर्मुखही होतो. हा चित्रपट स्त्री-सक्षमीकरणावर भाष्य करतोच, पण त्याचबरोबर आजही जुनाट विचारांना चिकटून असलेल्या बहुतांश घरांतल्या स्त्रियांची स्थिती काय आहे, हे दाखवतो. पती-पत्नीच्या नात्यावर नेमकं बोट ठेवतो. केवळ शारीरिक ताकदीला जे पुरुष मर्दानगी/ पौरुष समजतात, त्यांना सणसणीत चपराक या चित्रपटानं दिली आहे.
सिमॉन द बोव्हाचं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ती म्हणते, ‘तिचे पंख छाटले जातात आणि तिला उडता येत नाही असा आरोप तिच्यावर केला जातो!’ लहानपणापासून सद्गुणी स्त्रीची आणि त्यातही चांगल्या सुनेची ‘समाजमान्य’ लक्षणं काय, हे मुलींना सांगितलं जातं. ती सुशील हवी, शांत हवी, घरातल्या सर्व जबाबदाऱ्या निभावणारी हवी. इतरांच्या सुखात तिनं आपलं सुख शोधायला हवं. त्यांच्या अस्तित्वात तिचं अस्तित्व असायला हवं. सौंदर्याच्या दृष्टिकोनातून तिचे केस लांब असावेत, नाही तर लग्नाच्या बाजारात तिचं मूल्य कमी होऊ शकतं! ही मानसिकता आपल्या ‘पुढारलेल्या’ समाजातही लपलेली दिसते.

मल्याळम् चित्रपटांचे विषय आणि त्या कथांना त्यांनी दिलेली ट्रीटमेंट अनोखी असते, हे आपण अनेक चित्रपटांत पाहिलं आहे. त्यांचे चित्रपट भडक नसतात. अगदी चित्रपटातल्या पात्रांचा मेकअप, वेशभूषासुद्धा इतकी सहजस्वाभाविक असते, की ती पात्रं आपल्या आसपास वावरत आहेत असाच भास होतो.

केवळ स्त्रीची दयनीय अवस्था दाखवणाऱ्या रडतराऊ चित्रपटांसमोर ‘जया जया जया जया हे’ आपलं वेगळेपण दाखवतो. ‘आहे त्या परिस्थितीत राहा’ हे सांगण्याऐवजी एक स्त्री काय करू शकते याचं अवास्तव वर्णन न करता अतिशय संयमितपणे मार्ग काढतो. स्वत्व, स्वाभिमान अबाधित ठेवणाऱ्या आजच्या स्त्रीची खुसखुशीत गोष्ट म्हणून तो पाहायलाच हवा. हा चित्रपट सध्या ‘डिस्ने हॉटस्टार’वर उपलब्ध आहे.

adipaa@gmail.com

Story img Loader