‘चतुरंग’मध्ये नेहमीच स्त्रीच्या आयुष्याचा बारकाईने विचार करत तिच्या जगण्याच्या विविध आयामांचा प्रामाणिकपणे लेखाजोखा मांडला जातो. स्त्रीवरच्या अन्यायअत्याचारांपासून ते तिने साध्य केलेल्या विविध कौतुकास्पद कामगिरींपर्यंत सारं काही. यंदाच्या १९ नोव्हेंबरच्या ‘आंतरराष्ट्रीय पुुरुष दिना’निमित्ताने डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या ‘पुरुषाचं घर, घरचा पुरुष’ या लेखाच्या माध्यमातून आम्ही आजच्या पुरुषांच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या ‘कौटुंबिक कर्तेपणा’बद्दल ‘ते त्याच्यावर लादलं गेलंय की आजही त्याला ते हवंय’ या विषयावर वाचकांना लिहितं केलं. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला, पुरुषस्त्री दोघांकडूनही. बहुतांश पत्रे मध्यमवर्गीय पुरुषांचीच परिस्थिती मांडणारी आहेत. आणि विचारलेल्या प्रश्नांपलीकडचीही आहेत, त्यामुळे काही निवडक आणि संपादित करून ही पत्रे प्रसिद्ध करीत आहोत. आजचे मध्यमवर्गीय पुरुष काय म्हणताहेत, अनुभवताहेत त्याचा वाचकांनीच घेतलेला हा कानोसा.

आजच्या पुरुषांनी केवळ कर्तेपणाचाच विचार न करता, भावनिक आधार आणि सहकार्य देणाच्या भूमिकेत प्रवेश करणे सुरू केले आहे. कुटुंब व्यवस्थेत स्त्रियांची वाढती भूमिका हे केवळ पुरुषांचे कर्तेपण कमी करणे नाही तर एक नवा समतोल निर्माण करणे आहे. निर्णय घेण्यात स्त्रिया अधिक सहभागी होत असल्यामुळे कुटुंबाचे आरोग्य आणि विकास वाढतो आहे. पारंपरिक विचारांमध्ये पुरुषाने कठोर आणि भावना न व्यक्त करणारा असावे, असे मानले जायचे. परंतु आजचा पुरुष भावनिकदृष्ट्या जाणीवसंपन्न झाला आहे आणि मानसिक आरोग्याला महत्त्व देतो. पूर्वीच्या पिढ्यांप्रमाणे नात्यांमध्ये कठोर भूमिका न घेता आजचा पुरुष संवाद साधतो आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. बऱ्याच पुरुषांना वाटते की कर्तेपण स्वीकारल्याने ते कुटुंबासाठी उपयुक्त ठरतील. पुरुषांमध्ये नैसर्गिक संरक्षणाची भावना असते. त्यामुळे त्यांना कुटुंबासाठी कर्ता होण्याची नैतिकता आवडते. कर्तेपणामधून पुरुषाला स्वत:चा ठसा उमटवण्याची संधी मिळते, विशेषत: जर तो कुटुंबाला पुढे नेण्यात यशस्वी झाला तर पारंपरिक समाजात पुरुषाकडून कर्तेपण अपेक्षित असते. ‘पुरुष आहेस तर कमावणं तुझं कर्तव्य आहे’ अशा अपेक्षा त्याच्यावर लादल्या जातात. पुरुषाच्या कर्तेपणावरून त्याचे व्यक्तिमत्त्व आणि कुटुंबाची स्थिती मोजली जाते. जर तो कर्तव्यात कमी पडला तर त्याला तिरस्कार किंवा अपमान सहन करावा लागू शकतो. जर पर्याय उपलब्ध झाला तर बरेच पुरुष कर्तेपणाचे पद सोडण्यास तयार असतील. हे पूर्णत: त्या पुरुषाच्या वैयक्तिक परिस्थिती, मनोवृत्ती आणि पर्यायाच्या स्वरूपावर अवलंबून आहे. कर्तेपण हे पुरुषाच्या आत्मसन्मानाशी जोडलेले असते. त्याला वाटते की पद सोडल्यास तो कुटुंबातील किंवा समाजातील स्थान गमावेल. काहींना कर्तेपद सोडणे म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या झटकून टाकणे असे वाटते. यामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. जर पत्नी किंवा जोडीदार आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, तर कर्तेपदाची जबाबदारी सामायिक करणे सोपे होते. जर समाजातील लैंगिक भूमिका बदलल्या आणि ‘पुरुषच कर्ता असायला हवा’ ही अपेक्षा कमी झाली, तर पुरुष हे पद सोडण्यास अधिक तयार होतील. कुटुंबातील इतर सदस्यांनीही कर्तेपण सामायिक करण्याची तयारी दाखवली तर त्याला पद सोडणे सुलभ होईल. – विलास शा. गोहणे

maharashtra government defends ladki bahin yojana in bombay high court
महिला सशक्तीकरणासाठी ‘लाडकी बहीण’; राज्य शासनाचे उच्च न्यायालयात उत्तर; अतिरिक्त भार पडत नसल्याचे स्पष्टीकरण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
PM Modi to dedicate 3 frontline naval combatants to nation
आत्मनिर्भरतेतील आव्हाने!
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
L&T , Subramaniam, 90 Hours Work , Work Hours ,
स्त्रीद्वेष्टेपणा की कर्मचाऱ्यांच्या शोषणाची पूर्वतयारी? 
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी

भातुकलीच्या खेळात हे आपसूकच असतं की मुलगी घरकाम करेल आणि मुलगा बाहेर कामाला जाईल. मुलं जे समाजात बघतात, त्याचंच अनुकरण करतात. हे एका व्यवस्थेने ठरवलं आहे, पितृसत्तेने. परंतु केवळ स्त्रियांनीच या व्यवस्थेचे परिणाम भोगले आहेत, असं मानणं हा प्रश्नाच्या फक्त एका बाजूने विचार करणं आहे. आपण स्त्रियांच्या समानतेबद्दल आणि स्वीकृतीबद्दल बोलत आलो आहोत; परंतु याच प्रयत्नात आपण पुरुषांच्या संघर्षांकडे दुर्लक्ष करतो. कल्पना करा एका मुलाची, ज्याला लहानपणापासून सांगितलं जातं की त्याने स्वत:च्या भावना व्यक्त करू नयेत, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं. त्याला पहिला प्रश्नच नेहमी विचारला जातो की नोकरी आहे का आणि असेल तर पगार किती आहे? लग्नाच्या वेळीही त्याची नोकरी व पगारच सर्वप्रथम पहिला जातो. सुरुवातीपासूनच पुरुषांना कुटुंबाचे ‘कमवते’ मानलं जातं, जे स्वत:च्या स्वप्नांचा त्याग करून कुटुंबासाठी जगतात. पण त्यांना ही जबाबदारी पेलायची आहे का? या मुद्द्यावर आपण आज विचार करतोय ही चर्चाच एक महत्त्वाचा टप्पा आहे असं मला वाटतं. जर स्त्रियांना केवळ घरकामासाठी जबाबदार मानणं चुकीचं असेल, तर पुरुषांना केवळ कमावण्यासाठी जबाबदार मानणंही तितकंच चुकीचं आहे. मला वाटतं, या समस्येचं सार हे आहे की आपण एकमेकांना सर्वप्रथम माणूस म्हणून पाहायला हवं. आपण सर्व माणूस आहोत, आणि प्रत्येकाला स्वत:चं आयुष्य कसं जगायचं, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. कोणत्याही कामांमध्ये स्पष्ट विभागणी असू नये. दोघांनीही समान जबाबदारी घ्यायला हवी. – देवयानी दीपक बोरसे

‘पुरुष’ हा शब्दच घमेंड, मिजास आणि अहंकार दर्शवण्यासाठी अनेक वेळा वापरला जातो. ‘पुरुषत्व सिद्ध करा! पुरुषत्व गाजवा! मी मर्द आहे!’ यासारख्या घोषणा आणि वाक्ये आपण वेळोवेळी सार्वजनिकरीत्या ऐकत असतो. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यांमध्ये पुरुषाकडे नैसर्गिकरीत्या मिळालेल्या शारीरिक शक्तीचा उपयोग त्याने शिकार मिळवणे आणि इतर हिंस्रा प्राण्यापासून व मानवी टोळ्यांपासून कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी नक्कीच जास्त क्षमतेने केला होता. स्त्रीकडे असणाऱ्या जननक्षमतेमुळे बालकाचे संगोपन तिच्याकडे आले नि त्यात ती शेकडो वर्षं अडकली. मात्र औद्याोगिकीकरण, संगणक युग आणि आताच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात स्त्री-पुरुष यांच्या प्रचलित काळापासून रूढ झालेल्या भूमिका डळमळीत होत गेल्या आहेत. म्हणूनच येत्या काळात ‘पुरुषत्व’ ही अन्यायकारक संकल्पना मोडीत निघाली पाहिजे. शारीरिक ताकद, धाडस, हिंसा यापेक्षा बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, नवकल्पकता याला महत्त्व आलेल्या या काळामध्ये पुरुषाने आपले स्थान स्त्रीला दिलं पाहिजे! असं म्हणण्यापेक्षा दोघांनी गाडीच्या दोन चाकांप्रमाणे कुटुंब,समाज व इतर ठिकाणच्या नेतृत्वाची धुरा हातात हात घालून सांभाळली पाहिजे! – किशोर जाधव

लग्न झाल्यावर लहानपणापासून पाहिलेल्या ‘पुुरुष’ या प्रतिमेला छेद गेला तो माझ्या किंवा माझ्या मैत्रिणींच्या यजमानांच्या रूपाने. शिक्षणाने आणि नोकरीनिमित्ताने आम्ही घराबाहेर पडलो तरी घरातल्या कामाची जबाबदारी आमच्यावरच असायची. आर्थिक स्वातंत्र्य जरी होतं तरी नोकरीतला कामाचा ताणही वाढत होता. घरातली स्त्री कर्तबगारीची शिखरं गाठत आहे हे जेव्हा घरातल्या पुरुषांच्या लक्षात येऊ लागलं तसतसं कामाची लक्ष्मणरेषाही बदलू लागली. काही वेळा ‘दुभत्या गायीच्या लाथा गोड’ अशा प्रकारचे टोमणेही त्याला सहन करावे लागले. पण घरातल्या स्त्रीची ओढाताण त्याच्याकडून पाहवली जात नव्हती, म्हणून त्याने स्वत:हूनच कामातली अर्धी जबाबदारी स्वत:कडे घेतली होती. अन् कर्ता पुरुष हे लेबल आपसूकच गळून पडलं. समाजमाध्यमांचा जीवनशैलीवर होणाऱ्या परिणामांमुळे स्त्रियांच्या मानसिकतेतही खूप बदल झाला आहे. स्त्री कमवत असेल त्या घरात एकटा पुरुषच कर्ता राहात नाही. अनेक निर्णय प्रक्रियेमध्ये घरातील स्त्रीच्या मतालाही महत्त्व दिलं जातं. समाजानंसुद्धा हा बदल स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा कर्ता पुरुष अशी एकेरी संकल्पना जाऊन त्या पुरुषाबरोबर कर्तबगार स्त्री ही संकल्पना रूढ होतेय. आणि पुरुषवर्ग पर्यायानं समाजही ते मान्य करतोय. – निर्मला जोशी

‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिना’निमित्ताने, खरं तर पुरुषांचं मानसिक आणि भावनिक आरोग्य, घरकामात सहभाग आणि विविध भूमिकांचा स्वीकार यावर अधिक विचार व्हायला हवा. कुटुंबाचे कर्तेपण जरी पुरुषाच्या खांद्यावर असले तरी ते नेहमी त्याला आवडत असेलच असे नाही. अनेक पुरुष ही जबाबदारी स्वीकारतात, कारण समाज त्यांना या भूमिकेत पाहतो आणि त्यासाठी दबाव टाकतो. जर पर्याय मिळाला तर काही पुरुष कदाचित हे पद सोडू इच्छित असतील, कारण आजच्या बदलत्या काळात अधिक लवचीक आणि समानतेकडे वाटचाल केली जात आहे. – निखिल लेनगुरे

पुरुषाला कर्तेपणा हवाच असतो. तो समाजाने लादायचा प्रश्नच येत नाही. आजचा पुरुष त्या कर्तेपणाने पत्नीला साथ देतो. तिच्याशी विचारविनिमय करून दोघे निर्णय घेतात. त्यामुळे ते केवळ पती-पत्नीचे नाते न राहता मित्र-मैत्रिणीचे नाते होऊन जाते.अर्थात हे सर्व व्यक्तिसापेक्ष आहे. हल्ली वेगळीच विचारधारा वाहते आहे. पत्नी जर जास्त शिकलेली असेल, तिची गरुडझेप चालू असेल, तर तिचा पती घरादाराची धुरा वाहायला अथवा तिच्याबरोबर ‘डिपेंडंट व्हिजा’वर परदेशी जायलाही तयार होतो. हे नक्कीच कौतुकास्पद आहे! पत्नीच्या मनाचा विचार आणि तिला साथ देणे त्याच्या कर्तेपणाइतकेच त्याला महत्त्वाचे वाटते. – प्रज्ञा प्रदीप दळवी

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनादिवशी तरी कोणी पुरुषांच्या बाजूने लिहायला काय हरकत आहे, असा मला प्रश्न पडला. बाजूने लिहिणे याचा अर्थ पुरुषच सर्वश्रेष्ठ किंवा तो प्रत्येक वेळी बरोबरच असे नाही. तर समतोल विचार करून पुरुषांची संवेदनशीलता, प्रेम, आदर, त्यांची होणारी फसवणूक याविषयीसुद्धा नक्की लिहिता येऊ शकते. परंतु बहुतांश वेळा ‘पुरुषाची नकारात्मकता’ आपल्यासमोर मांडली जाते. अव्यक्त पुरुष व्यवस्थेला कळत नाही. चिंतेच्या सरणावर जळणारा पुरुष कुटुंबालाही दिसत नाही, असे मात्र खेदाने म्हणावे लागते. – योगेश सुवर्णा आनंदा

पूर्वी जर नवरा बायकोला घरकामात मदत करत असेल तर त्याला ‘जोरू का गुलाम’ म्हणून खिल्ली उडवली जायची आणि आता ‘कुकिंग अँड क्लीनिंग आर बेसिक स्किल्स बोथ मेन अँड वुमन शुड डू’ अशा सर्रास अपेक्षा वधू पक्षाकडून ऐकायला मिळतात. बदलत्या काळानुसार समाजाने (मूलत: स्त्रियांनी) पुरुषांच्या भूमिकेत सोयीस्कररीत्या वेळोवेळी बदल केलेला दिसतो. या दिनानिमित्त एवढेच की, यशस्वी पुरुषामागे एका जरी स्त्रीचा हात असेल तरी तो पुरेसा आहे; परंतु यशस्वी स्त्रीसाठी ‘चूल आणि मूल’ या बंधनातून मुक्त करणाऱ्या १९व्या शतकातल्या जोतिबांपासून ते नोकरदार बायकोला ऑफिसला स्वत: गाडीने सोडणाऱ्या २१व्या शतकापर्यंतच्या प्रत्येक पुरुषांचा हात आहे. – पूजा गुलाबदास सुपेकर

आजचा पुरुष आपल्या आयुष्यातील विविध पैलूंचे संतुलन साधत आधुनिक समाजात स्वत:ची ओळख निर्माण करतो आहे. कर्तेपणामध्ये विविध पैलू असतात जे त्याच्या जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये त्याला सक्षम बनवतात. कर्तेपणामुळे पुरुष आपल्या विविध जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास सक्षम होतो. कर्तेपणाच्या माध्यमातून पुरुष आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतो. हे त्याच्या कुटुंबाला सुरक्षितता आणि स्थैर्य प्रदान करते. कर्तेपणा पुरुषाला स्वतंत्र राहण्याची आणि स्वत:च्या निर्णयांवर आधारित काम करण्याची प्रेरणा देतो. हे त्याच्या आत्मनिर्भरतेचा आणि आत्मविश्वासाचा विकास करते. मात्र ते कर्तेपण नाकारायचा पर्याय मिळाला तर कर्तेपणाच्या भूमिकेतून सुटका होऊ शकते, परंतु त्यामुळे मानसिक स्वास्थ्यावर आणि आत्मसंतोषावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात, असे मला वाटते. – पुंडलिक हेगिष्टे

‘आजचा पुरुष कसा आहे?’ याचे एका वाक्यात उत्तर द्यायचे तर तो ‘समजूतदार’ आहे. मला तरी तो तसा दिसतो. वेळ मिळेल तसा सुट्टीच्या दिवशी, सणवारांना, कुटुंबाबरोबर आनंद लुटताना दिसतो. तसे वागायला समाजाने त्याला भाग पाडलेले नाही, तर शिक्षण, सुशिक्षितपणा, जबाबदारी, सहचारिणीचे सहकार्य, प्रोत्साहन यामुळे पुरुषात समजूतदारपणा आला आहे. मोठा बदल म्हणजे पुरुष स्वत:च्या मताला, निर्णयाला, कल्पनेला, बदलत्या सामाजिक परिस्थितीला बघून, कुटुंबाशी चर्चा करून निर्णय घेताना दिसतो. ऑफिसमधील सहकाऱ्यांचा ग्रुप, सहाध्यायी मित्रांचा ग्रुप, सोशल मीडियाचा ग्रुप आदी ग्रुपमध्ये जे चालले आहे तो डोळसपणे बघतो आणि निर्णय घेतो. आजचा पुरुष घरात अधिक रमतो. घरातले सगळेच सुशिक्षित झाले आहेत. त्यामुळे एकमेकांचा विचार करतात. आनंद मिळवतात. म्हणूनच महिला दिनाचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच पुरुष दिनाचेही आहे. – अरविंद खडमकर

आजच्या युगात घरातील सर्व बाबतीत पुरुषाला लक्ष देणं शक्य होईल का, असा प्रश्न निर्माण होतो, विशेषत: जेव्हा त्याची बायको पूर्णवेळ गृहिणी असेल तेव्हा. कारण नोकरीसाठी सकाळपासून रात्रीपर्यंत होणारी दमछाक, आरोग्य, प्रवास, ताण यातून काही त्याची सुटकाच नाही. घरातल्या या कर्त्या पुरुषाला सगळ्या गोष्टी करताना होणारी घुसमट कोणाला सांगायची याचं उत्तर मात्र नाही, कारण भावना कुठे व्यक्त कराव्यात हा खरा प्रश्न आहे. पूर्वी मोठे कुटुंब असे. त्यात विचारांची देवाणघेवाण होत असे. आता छोटेच कुटुंब असल्यानेच सर्व बाबतीत पुरुषच जबाबदार मानला जातो. – शशिकांत कुलकर्णी

आधुनिक समाजामध्ये बदलत्या परिस्थितीनुरूप कामांचे स्वरूप बदलते आहे. पुरुषांनाही कर्तेपणाचे ओझे नकोसे झाल्यासारखे वाटते कारण आजच्या काळात घर-कुटुंब सांभाळणे, पैसे कमावणे, वडीलधाऱ्यांची काळजी घेणे यांसारख्या अनेक गोष्टी आव्हानात्मक होऊ लागल्या आहेत. याशिवाय या सगळ्या रेट्यात तो कुटुंबाला देखील वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे कुटुंबात एक कर्ता असण्यापेक्षा आई-वडील दोघांनाही समान स्थान मिळणे गरजेचे आहे. ज्यामुळे लैंगिक असमानतेचे वाढलेले हिंसक रूप आटोक्यात येऊन कुटुंबाला एक कौटुंबिक वातावरण लाभेल. – पृथ्वीराज मोरे

आपली संस्कृती, समाज पुरुषप्रधान आहे, पण आपले घर हे बहुतांश प्रमाणात स्त्रीप्रधान आहे किंबहुना आईप्रधान आहे. माझे समस्त स्त्री वर्गाला सांगणे आहे. जगातले काही पुरुष हे राक्षसी वृतीचे आहेत मान्य पण सगळ्यांनाच त्या पारड्यात बसवणार का? आपले नातेवाईक, मित्रमंडळी चांगली, सहनशील असल्याचेही आपण अनुभवतोच. त्यांनाही आपल्या हक्काच्या स्वयंपाकघरात मोकळेपणाने वावरू द्या. बाबा या विषयावर किंबहुना पुरुषांवर साहित्य तसे कमी आहे. पुरुषही अवघड परिस्थितीतून जात असतील, त्यांच्याही मनाची घालमेल होत असेल त्याचाही विचार आपण करायला हवाय. त्यांच्यावरही खूप काही लिहिलं गेलं पाहिजे. – वृषाली कुलकर्णी

आमच्यासारख्या पुरुषाबद्दल मुळात सहानुभूतीने लिहावे असे कोणाला वाटते हेच मुळात सुखदायक आहे, असेच हा लेख वाचून वाटले. पुरुषाला अनेक प्रकारची विशेषणे दिली गेली आहेत. पण पुरुष हे पुरुषपणाचं आवरण सांभाळताना थकून गेलेले आहेत, हे कोणी ओळखत नाही. त्यांनी केलेले अत्याचार सदासर्वदा लेखनाचा विषय असतो, परंतु त्यांच्या त्रासाकडे बहुतांश वेळा सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्यांनासुद्धा मानसिक, शारीरिक आधाराची गरज असते. माणूस म्हणून सर्व आवश्यक गोष्टी पुरुषांनाही लागू होतात. त्यांचाही विचार व्हावा. – नीलेश रामभाऊ मोरे

शहरी वातावरणात पिढ्यान्पिढ्या कर्तेपण जे पुरुषाकडे आलेलं आहे त्याने त्याची दमछाक झालेली आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. त्याचबरोबर वयोमर्यादा वाढल्यामुळे वृद्ध आई-बाप एकटेपणाच्या झळीने कसे जीवन कंठीत आहेत याचा विचार मुलं मोठी झाल्यावर करतातच असं नाही. त्यामुळे घरातील वृद्ध पुरुषाला बाहेरील कामाबरोबर इतकी वर्षं संसाराचं ओझं घेतलेल्या वृद्ध पत्नीलाही सहकार्य करावं लागतं. उसनं अवसान आणून तो कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न करीत राहातो. ही कर्तेपणाची जबाबदारी घेणं त्याला समाज भाग पाडीत नसून कुटुंबव्यवस्था, तरुणाईचे स्वतंत्र जीवन भाग पाडीत आहे. पुरुषाला पद सोडण्यासाठी समाजाने काहीही पर्याय ठेवला नाही. शेवटी ते वृद्ध दाम्पत्याचं घर नसतं तर ते केवळ पुरुषाचंच घर असतं. – पद्माकर सोनुशेठ शिरवाडकर

स्त्रीची जशी अनेक स्थित्यंतरं पाहायला मिळतात तशीच पुरुषांचीही. स्त्रिया एकमेकींना दु:ख सांगून मोकळ्या होतात. पण पुरुष असं करतोच असं नाही. काही घरात पुरुषाची भूमिका स्त्री आणि स्त्रीची भूमिका पुरुष पार पाडतो. त्यामुळे जर पर्याय मिळाला तर आवश्यकतेनुसार कर्तेपण आपोआपच बदलू शकते. जर पुरुष अधिक काळ कामानिमित्त बाहेरगावी राहत असेल तर आपसूकच कर्तेपण स्त्रीकडे येते. स्त्रीने घर स्थिर ठेवलं तर पुरुष घराबाहेर शर्थीने लढू शकतो, त्याचप्रमाणे पुरुष भक्कम असेल तर स्त्री कर्तृत्व गाजवू शकते. दोघांची एकमेकांना साथ असेल तर परिपूर्णता येऊ शकते. – अमोल अरुण दाते

१९७५ मध्ये ‘वुमन स्टेटस रिपोर्ट’ने भारतातल्या स्त्रियांची दयनीय अवस्था समोर आली. आणि स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या पद्धतीने राबवण्यात आल्या. परावलंबन नाकारून स्वावलंबनाच्या दिशेने स्त्रियांचा प्रवास सुरू झाला. त्याची जाणीव आजच्या तरुणालाही होऊ लागली आहे. आयटी क्षेत्रात काम करणारी मुले या बाबतीत झपाट्याने बदलत आहेत. आपल्याच तोलामोलाची जोडीदार त्यांना जपायची आहे. भूमिका बदलत आहेत. समाज काय म्हणेल ही भीती आजच्या तरुणांना नाही. आता कुठे फटफटायला लागलेलं आहे. सूर्योदय होईलच. – शैला सावंत

हल्ली मुलेमुली लग्न न करण्याचा, ‘लिव्हइन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा, मुले न होऊ देण्याचा निर्णय घेताना दिसतात. त्यामुळे ‘समाज त्यांना विशिष्ट पद्धतीने वागायला भाग पाडू शकत नाही’ हे अनेकांनी सिद्ध केलं आहे. आज केवळ पुरुष नाही, तर स्त्रियाही कर्त्याच्या भूमिकेमध्ये दिसतात. स्त्रियांची कामेजबाबदारी, पुरुषांची कामेजबाबदारी, यामधील सीमारेषा पुसट झाली आहे. मुलांच्या संगोपनामध्ये स्वयंपाकासकट घरातील कामांमध्ये मदत करणाऱ्या पुरुषांचे आणि अर्थार्जन करणाऱ्या, घराबाहेरची कामे समर्थपणे सांभाळणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढले आहे. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक समस्यांना तोंड देण्याचे बळ त्यांच्याकडे आहे. केवळ पुरुषच कर्ता नसून स्त्रियाही कर्तेपण सांभाळताना दिसतात. त्यामुळे गरज असेल तर कर्तेपण घरातील स्त्रीकडे द्यायला पुरुष तयार होतात. थोडक्यात, आजचे पुरुष समाजाने लादले आहे म्हणून नाही, तर स्वखुशीने कर्तेपण स्वीकारून, निभावून नेत आहेत. यामध्ये स्त्रियांचाही मोलाचा वाटा आहे. कर्त्या नवऱ्याला त्या पाठिंबा देतात. आजचे पुरुष कर्तेपण स्वीकारायला सक्षम आणि इच्छुक आहेत. – डॉ. संजीवनी राहणे

या वाचकांनीही पत्रे पाठवली

अनिल ठोंबरे, सुरेखा द . नाफडे, भक्ती बेलापूरकर, सूर्यकांत भोसले , प्रा. डी एम कानडजे,श्रीकांत जोशी, विनायक विठ्ठल गोंधळी, धीरज, स्वाती रवींद्र वाबळे, सुरेश वराडे, अजीज शेख, भास्कर देशमुख, राहुल मोटघरे, डॉ. अश्विनी डोले, सुनील जावळी, शेखर डोहोळे, अनघा अनिल ठोंबरे, राहुल प्रल्हाद काळे, उषा पाटील, किशोर गोनाटे, व्यंकट पाटील, नंदकिशोर भोळे , सोमेश लामतुरे, कार्तिक जैसवाल, अनिरुद्ध कांबळे, धनश्री शिरोडकरजोगळेकर, मोहन गद्रे, प्रगती अहिरे, श्रीनिवास डोंगर, विद्या चिकटे, निकिता आभाळे , विजय भोसले, चेतन पंडित,अॅड. सौमित्र साळुंके आशा बुरसे, शशिकला शेळकेदेशमुख, सुनील बेडे, स्मिता विवेक शेणवी, नीलकंठ वसंत मांडके, डॉ. वर्षा झाडे, उपेंद्र रोहनकर, रसिका सावंत, आकाश काळे , गिरीश जोशी, प्रा डॉ. मोहन खडसे, श्रद्धा कांदळगावकर, नागेश काळे, डॉ. श्रीकांत कामतकर,

Story img Loader