|| उष:प्रभा पागे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चिपको आंदोलनातील स्त्रियांचा यशस्वी कडवा प्रतिकार असो की राजस्थानातील खेजडी गावी झाडांसाठी स्त्रियांनी दिलेले आत्मबलिदान! राजस्थानची अमृतादेवी, राचेल कार्सन, गौरादेवी, किंकरीदेवी, थिमक्का, केरळच्या डॉ. लता आणि आता पुण्याच्या शैलजा, अदिती यांना जोडणारा पदर एकच पर्यावरण रक्षण! खरोखर स्त्रियांच्या या शक्तीच्या सामर्थ्यांने दिपून जायला होते. पर्यावरणाच्या लढय़ात स्त्रिया अग्रभागी असल्याचे नेहमीच दिसते. कर्नाटकातल्या सालूमरदा थिमक्का यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. त्यानिमित्ताने या स्त्रियांच्या कार्याचा आढावा.
या वर्षीच्या पद्मश्री पुरस्कारामध्ये सालूमरदा थिमक्का यांचे नाव वाचले आणि पुरस्कार योग्य व्यक्तीला मिळाल्याचा आनंद वाटला. सालूमरदा म्हणजे झाडांची रांग, फौज म्हणू या आपण. थिमक्का यांचे ते विशेषण झाले कारण या बाईने आपल्या आयुष्यात आपल्या परिसरात जवळजवळ ४०० झाडे लावली. विशेष म्हणजे ही सर्व झाडे वडाची आहेत. वड, पिंपळ आणि औदुंबर या झाडांना अति प्राचीन काळापासून भारतीय संस्कृती आणि लोकजीवनामध्ये खास स्थान आहे. थिमक्का झाडे लावून थांबल्या नाहीत तर त्यांनी ती जोपासली आणि आता झाडांची ही फौज कर्नाटक राज्यातील बेंगळूरुजवळील हुळीकल ते कुडूर या राज्य मार्गावरील ४ किलोमीटरच्या पट्टय़ामध्ये उभी आहेत.
कोण आहेत या थिमक्का? असामान्य काम केलेली ही स्त्री आहे सामान्य समाजातील! आज वयाच्या शंभरीच्या उंबऱ्यावर ती उभी आहे. कर्नाटकातील तुमकुर जिल्ह्य़ातील गुबबी तालुक्यातील खेडय़ात त्यांचा जन्म झाला. गरिबीमुळे लहानपणापासून मजुरी करायला लागली. हुळीकल गावच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या चिक्कय्याबरोबर लग्न झाले. मजुरीवर काम करून पोट भरत होते, पण पोटी संतान नव्हते. त्यामुळे थिमक्का कष्टी व्हायच्या. मनाला काय विरंगुळा शोधावा? आसपास वडाची झाडे होती. थिमक्का आणि त्यांच्या नवऱ्याने झाडांच्या फांद्या तोडून त्यापासून रोपे बनवायला सुरुवात केली. शेजारच्या कुडूर गावाच्या परिसरात सुरुवातीला १० रोपे लावली. स्वत: पाणी आणून रोपांना घातले. रोपे जगताहेत पाहून पुढील वर्षी १५ झाडे तर तिसऱ्या वर्षी २० झाडे लावली. त्यासाठी त्यांनी कोणाचीही मदत मागितली नाही. हुळीकल ते कुडूर या दोन गावांतील ४ किलोमीटरच्या अंतरात थिमक्का आणि त्यांचा नवरा झाडे लावत राहिले. रोपांना पाणी घालायला ते बादल्यांनी पाणी वाहून आणीत. गुरांनी रोपे खाऊ नयेत म्हणून त्यांना काटेरी कुंपण घातले. बहुतेक रोपे पावसाळ्यात लावली म्हणजे रोपे शक्यतो पावसाच्या पाण्यावर वाढावीत. मुळात जिवट आणि चिवट असलेली ही रोपे चांगली वाढली. या जोडप्याला अपत्यहीन कसे म्हणायचे? ही झाडे म्हणजे त्यांची अपत्येच नाही का! या झाडांची किंमत करायला गेलो तर लाखाच्या घरात जाते. ( ही किंमत नुसत्या घनफूट लाकडाची. बाकी झाडाच्या-सावली, निवारा, पक्ष्यांना खायला फळे, उष्णता समतोल, खालची माती, प्राणवायू या सेवांची किंमत तर मोजण्यापलीकडची). झाडे लावायच्या कामात थिमक्काच्या पाठीशी उभा राहून आधार देणारा नवरा १९९१ मध्ये मरण पावला. त्यांनी लावलेल्या झाडांची काळजी आता सरकारी पातळीवर घेतली जाते. या कामाचे महत्त्व ओळखून १९९५ मध्ये त्यांना ‘नॅशनल सिटिझन अवॉर्ड’ मिळाले. ‘इंदिरा प्रियदíशनी सन्मान’ मिळाला. अनेक देशी-परदेशी संस्थांचे पुरस्कार, सन्मान त्यांना मिळाले. ‘बीबीसी’च्या २०१६ च्या प्रभावी स्त्रियांच्या जागतिक १०० स्त्रियांच्या यादीत थिमक्कांचा समावेश आहे.
अमेरिका-कॅलिफोíनया येथील लॉस एंजेलिस आणि ओकलँड येथील संस्थेचे नाव आहे ‘थिमक्का रेसोर्ससि फॉर एनव्हार्न्मेंट एज्युकेशन.’ शंभरीच्या असल्याने तब्येतीच्या तक्रारी असल्या तरी त्यांचे पर्यावरण संवर्धनाचे काम या ना त्या रूपात चालू राहिले आहे. देशभरातून वृक्षारोपण कार्यक्रमांची आमंत्रणे त्यांना येतात. पावसाचे पाणी साठवून हौद बांधण्याच्या स्थानिक कामामध्येही त्यांचा सहभाग आहे. नवऱ्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ आता त्यांना हॉस्पिटल उभे करायचे आहे.
मजुरी करणाऱ्या सामान्य स्त्रीने केलेल्या या असामान्य कामासारखे काम करणाऱ्या किंकरीदेवी यांची आठवण या प्रसंगी होणे अपरिहार्य आहे. किंकरीदेवी हिमाचल प्रदेशातील सिरमोर जिल्ह्य़ातील घातोन खेडय़ात १९२५ मध्ये दलित समाजात जन्मल्या. लहानपणापासून नोकर म्हणून कामाला लागल्या. १४व्या वर्षी बंधक मजुराशी त्यांचे लग्न झाले. काही वर्षांतच नवरा आजारी पडून मरण पावला. अशिक्षित असल्याने किंकरीदेवी झाडलोटसारखी कामे करू लागली. त्या सुमारास हिमाचल प्रदेशातील मोठय़ा भगतखानी खोदल्या जात होत्या. त्यामुळे पाण्याचे साठे नष्ट होत होते, भातशेती नष्ट होऊ लागली, सामान्य जनजीवनावर अनिष्ट परिणाम होऊ लागला. मजुरी करणाऱ्या या स्त्रीने बेकायदा खनन करणाऱ्या आणि खाणीतून उत्पन्न काढणाऱ्या बलाढय़ खाणमाफियाविरुद्ध लढा उभारला हे अगदी विशेष होते. तिच्यामागे ‘पीपल्स अॅक्शन फॉर पीपल इन नीड’ ही स्थानिक स्वयंसेवी संस्था उभी राहिली. त्यांनी जनहितार्थ खटला दाखल केला. खटल्याची सुनावणी होईना आणि खाण मालकांनी किंकारीदेवीविरुद्ध उलटा कांगावा सुरू केला. किंकरीदेवीला न्यायाच्या दारात आमरण उपोषणाला बसावे लागले. आता न्यायालयाला दखल घेणे भाग पडले. त्यांनी हिमालयातील खाणकामावर स्थगिती आणली. निसर्गाच्या मांडीवर वाढलेल्या किंकरीदेवीने आपले ऋण तर फेडलेच, पण सर्वसामान्यांच्या जगण्यावर आलेले संकटही निवारले. म्हणूनच १९९५ मध्ये बीजिंग इथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी दीप प्रज्वलन करण्याचा मान त्यांना मिळाला होता.
खरोखर स्त्रियांच्या या शक्तीच्या सामर्थ्यांने दिपून जायला होते. पर्यावरणाच्या लढय़ात स्त्रिया अग्रभागी असल्याचे दिसते. राचेल कार्सनने रासायनिक कीटकनाशकाविरुद्ध दिलेला लढा आठवूया किंवा आठवूया चिपको आंदोलनातील स्त्रियांचा यशस्वी कडवा प्रतिकार आणि त्याहीपूर्वी १७३० मध्ये राजस्थानातील खेजडी गावी झाडांसाठी स्त्रियांनी दिलेले आत्मबलिदान! राजस्थानच्या रूक्ष वाळवंटी प्रदेशातील लोकांचा जीवनाधार आहे तो ‘खेजडी’चा वृक्ष-(Prosopis cineraria). जळण, गुरांना चारा, बसायला सावली, शेतीच्या अवजारांना लाकूड देणारा, स्थानिकांच्या गरजा भागविणारा हा कल्पवृक्ष. राजाच्या नव्या महालासाठी लाकूड हवे म्हणून खेजरीची झाडे तोडायला आलेल्या सनिकांचा प्रतिकार केला तो अमृतादेवी आणि तिच्या तीन मुलींनी, त्यांनी झाडे वाचवण्यासाठी झाडांना मिठी मारली. सत्तेचा माज असलेल्या सनिकांनी त्यांच्यासकट झाडावर कुऱ्हाडीचे घाव घातले. अमृतादेवी आणि तिच्या मुलींनी झाडांसाठी आत्मबलिदान केले, आणि मग गावकरीही झाडांच्या रक्षणासाठी धावून आले. ३०० हून जास्त लोकांचे बलिदान झाडांसाठी पडले तेव्हा राजा भानावर आला आणि हे हत्याकांड थांबले. झाडांच्या, एकूणच निसर्गसंपदेच्या रक्षण आणि संवर्धनाची आंच ही निसर्गपुत्रांना असते. त्यातही स्त्रियांचे निसर्गाशी घट्ट नाते असते. पाणी, लाकूड, जळण, औषधं, निवारा सगळ्यासाठी त्या परिसरातील निसर्गसृष्टीवरच अवलंबून असतात. हिमालयातील उत्तराखंड राज्यात स्थानिकांनी-(यातही स्त्रियांचा पुढाकार होता.)- निसर्गसंवर्धनाचा नवा अध्याय रचला. हे राज्य हिमालयाच्या मांडीवर वसलेले. पर्वतउतारावरचे जंगल स्थानिकांचे मायबाप. स्थानिकांच्या गरजा भागविणारे, त्या जंगलाच्या संवर्धनातच आपले हित असल्याची त्यांना जाणीव आहे. ब्रिटिश राज गेले, पण त्यांचेच अन्याय्य धोरण स्वातंत्र्योत्तर काळात चालू आहे. जंगलांवरच्या स्थानिकांच्या हक्कापासून त्यांना वंचित केले गेले. वनखाते व्यापारी तत्त्वावर मोठय़ा उद्योगांना जंगल विकतात. ठेकेदार जंगले तोडतात. यात सामान्य माणसाच्या जीवनावश्यक गोष्टीपासून तो वंचित होतो. त्याच्या वाटेला येते ते फक्त मजुरी काम. शिवाय बाहेरून जंगलतोड करायला आलेल्यांचा ताणही तेथील निसर्गावर पडतो. यासाठी १९६४ मध्ये चंडीप्रसाद भट्ट यांनी चमोली जिल्ह्य़ात ‘दशोली ग्राम स्वराज संघा’ची स्थापना केली. बेसुमार होणारी वृक्षतोड आणि त्याचा परिणाम म्हणून होणारे वाळवंटीकरण, पाणी, चारा लाकूडफाटय़ाचा अभाव थोपविणे, हा या संस्था स्थापनेचा उद्देश होता. ठेकेदार उद्योजक आणि राजकारणी यांच्यातील स्वार्थी हेतूने झालेली अभद्र युती जनसामान्यांच्या हिताविरोधी होती. या संस्थेने ही अभद्र युती उघडी पाडली. गांधीजींच्या अिहसक मार्गाने ही चळवळ लढा देत होती. पर्यावरणाशी स्त्रियांचे नाते असल्याने स्त्रिया या चळवळीशी जोडल्या गेल्या आणि ‘स्त्रीवादी पर्यावरण चळवळ’ असे नवे परिमाण त्याला मिळाले. १९७० मध्ये अलकनंदा नदीला आलेल्या पुराने वृक्षतोडीचे दुष्परिणाम ठळकपणे लोकांनी अनुभवले, त्या भागातील विकासाच्या मिषाने केलेले बांधकामही डोंगर, जमीन खचणे असे विनाशक ठरले. १९७१ मध्ये वन खात्याच्या अनिष्ट धोरणाविरुद्ध लोक संगठित झाले. त्यांनी जंगलतोडीला विरोध केला, पण सरकारी धोरणात बदल झाला नाही. स्थानिकांच्या गरजा भागविण्यासाठी १० झाडांना तोडायची परवानगी मिळाली नाही मात्र क्रीडा साहित्य बनविणाऱ्या हैदराबादच्या व्यापारी कंपनीला ३०० झाडे तोडायची परवानगी मिळाली. तेव्हा ग्रामसभेत ठराव करून लोकांनी ढोल-ताशांच्या, आणि घोषणांच्या दणदणात ठेकेदारांना माघारी पाठवले. ठिकठिकाणी झाडांना मिठी मारून झाडे वाचविण्याचा दृढ संकल्प दाखविला. हेच ते चिपको आंदोलन. १९७४ मध्ये वन खात्याने २५०० झाडांचा लिलाव लावला. मोठय़ा कारखानदारांनी त्यात बोली लावली. पण चिपको आंदोलकांनी केलेल्या प्रचंड विरोधापुढे सरकारला माघार घ्यावी लागली. सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अिहसक मार्गाने केलेल्या चिपको आंदोलनाने नवा इतिहास लिहिला. यात आघाडीवर होत्या त्या ‘ग्रामीण महिला मंगल’ गटाच्या महिला गौरादेवी, सुरक्षादेवी, सुदेशादेवी आणि बचनीदेवी.
पर्यावरणाशी निगडित असणारा शहरांनी निर्माण केलेला प्रदूषित नद्यांचा प्रश्नही पुण्यासारख्या शहरात उग्र झाला आहे. त्यासाठीही लढा उभा करावा लागतो आहे. आणि तो लढा पुण्यातील स्त्रियांनीच खांद्यावर घेतला आहे, त्याचे नेतृत्व करीत आहेत उच्चशिक्षित शैलजा आणि अदिती. त्यांना अनुयायी मिळाल्या आहेत, पण कार्यकर्त्यांची संख्या आणि एकजूट वाढली तर हा लढा यशस्वी होईल.
राजस्थानची १८ व्या शतकातील अमृतादेवी, गेल्या शतकातील राचेल कार्सन, गौरादेवी, या शतकातील किंकरीदेवी, थिमक्का, केरळच्या डॉ. लता आणि आता पुण्याच्या शैलजा, अदिती यांना जोडणारा पदर एकच – पर्यावरणाचा दिवा या पदराखालीच सुरक्षित राहील याची खात्री वाटते.
ushaprabhapage@gmail.com
chaturang@expressindia.com