मीना कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आई-वडील हे पहिले गुरू असतात. शाळा नावाच्या विद्यामंदिरात त्यांचं बोट धरुनच प्रवेश होतो. संस्कारांचं बीज आई- वडिलांकडून, भावंडांसोबत पेरलं जात होतं आणि व्यक्तिमत्वाची जडणघडण शाळेत होत होती. अनेक शिक्षकांचा सहवास लाभला, ते सर्वच वंदनीय; पण माझ्या आयुष्याची शिदोरी संपन्न व्हायला एका उत्तम शिक्षकांचा मोलाचा वाटा होता. ते माझे वडील- त्र्यंबक बापुजी काळे!

ते ‘बी.ए.बी.टी.’ झाले होते. अध्यापनातील एक आदरणीय व्यक्ती. साधं धोतर, पांढराशुभ्र शर्ट, डोक्यावर काळी टोपी आणि सगळय़ांच ऋतूंत कायम काळी छत्री वापरणारे! इंग्रजी, मराठी, संस्कृत विषयांवर त्यांचं विशेष प्रभुत्व होतं. संस्कृतचा गाढा अभ्यास होताच, पण मराठी-इंग्रजीवरही नितांत प्रेम होतं त्यांचं. कोणताही विषय शिकवण्यापूर्वी अभ्यास करून वेगवेगळय़ा संदर्भातली टिपणं ते काढत. मला अगदी पहिलीपासून अकरावीपर्यंत त्यांनीच शिकवलं. कविता, धडे शिकवताना आवाजातले चढउतार असे असायचे, की इतक्या लहान वयातही आशय समजून जायचा. आज पन्नास वर्षांनंतरही त्या कविता मुखोद्गत आहेत. इंग्रजी लेखन वाचताना ‘पॉझ’ घेत, अभिनय करत शिकवायचे. संस्कृत संधी फोडून वाचलं की कसा लगेच अर्थ लक्षात येतो, असे अनेक बारकावे त्यांनी शिकवले. त्यामुळे मला इंग्रजीची कधी भीती वाटत नसे.

आठवी ते अकरावी इयत्तेचं संस्कृत मला वडिलांनीच शिकवलं, कारण आमच्या शाळेत ‘अर्धमागधी’ होतं. संस्कृतचं व्याकरण वडिलांनी इतकं छान पक्कं करून घेतलं, की आजही त्यातली रूपं, धातु लक्षात आहेत. पाठय़पुस्तकातले धडे, त्यात विशेष लक्षात राहण्यासारखे काही भाग- म्हणजे ‘पतिगृहम् याति शकुंतला’, ‘हेमंत वर्णनम्’, मेघदूत नाटकातील काही भाग अभ्यासाला होते. ते शिकवताना त्यातील श्रृंगाररस, अलंकारातील मजेशीर गमती, तसेच ऋतू वर्णनातील सौंदर्य टिपताना ते इतके समरस होत, की ऐकतच राहावंसं वाटे. इतकं ज्ञानभांडार होतं त्यांच्याकडे, पण कधी त्यांना अहंकार शिवला नाही. भोळा स्वभाव होता त्यांचा. मुक्तहस्ते ज्ञानदान केलं त्यांनी आयुष्यभर. बरं, नुसतं पुस्तकी शिक्षण नाही, तर विविध स्पर्धेत भाग घेण्यासाठी दट्टय़ा असायचा त्यांचा. शाळेतही ते खूप स्पर्धा आयोजित करायचे. वक्तृत्व स्पर्धेसाठीचं मार्गदर्शन ते इतकं सुंदर करत, की त्यामुळे मला मुद्देसूद लिहिण्या-बोलण्याची सवय झाली. क्रीडा, संगीत,अभिनय यातून स्वत:ची कुवत ओळखायला त्यांनीच मला शिकवलं. आपण काय करू शकतो, याचा नेमका अंदाज मला त्यामुळे आला.

लग्नानंतर सोळा वर्षांनी मी हायस्कूलच्या मुलांच्या संस्कृतच्या शिकवण्या घेतल्या. पण मला अजिबात अडचण आली नाही. अनेक वक्र्तृत्व स्पर्धेत परीक्षक म्हणूनही काम करण्याची संधी मला मिळाली. प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याच्या भाषणाचं परीक्षण मोजक्या शब्दांत, न दुखवता सांगू शकले. संयोजकही त्यावर खूप खूष व्हायचे. आता जाणवतं, की या सगळय़ाची मुळं काळे सरांच्या- अर्थात वडिलांच्या शिकवण्यात होती. मी एक गृहिणी आहे. आज वय ७८. बरंचसं शिक्षण ग्रामीण संस्कारांत झालं आणि लग्नानंतर मध्यम शहरात वास्तव्य असल्यानं आजूबाजूला खूप बदल बघितले. पुढे येण्याचे मार्ग खुले झाले. ललित लेख, प्रवासवर्णनं लिहिण्याची प्रेरणा सर्वस्वी वडिलांकडूनच घेतली होती. त्याच जोरावर पुढे मी अमराठी मुलांनाही मराठी शिकवलं, त्यांना निबंधासाठी मार्गदर्शनही केलं. त्यांनाही मराठीची गोडी लागते, हे पाहिलं.

मी ‘बी. ए. मराठी’ होऊन जेव्हा ‘बी. एड.’ करायच्या विचारात होते, तेव्हा ‘तुझ्या मराठीला कोण विचारतं?’ असं म्हणून मला हिणवलं गेलं होतं. पण सध्या मराठीलाच चांगले शिक्षक मिळत नाहीत हे बघते, तेव्हा असं वाटतं, की भाषांचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देणारे, भाषेचा रसाळपणा मुलांपर्यंत पोहोचवणारे काळे सरांसारखे- अर्थात माझ्या वडिलांसारखे आणखी खूप खूप शिक्षक हवेत.