‘रिकामं बसायचं नाही, सतत काही तरी शिकत राहायचं’ ही वडिलांची शिस्त लहानपणीच अंगात मुरल्याने, मी निवृत्त होण्याआधीच वर्ष-दोन वर्ष, भविष्यातील रिकामा वेळ कसा सत्कारणी लावता येईल याची पूर्वतयारी सुरू केली होती.
योगासनांची मला उपजतच आवड. शाळा, कॉलेजमध्ये असल्यापासूनच मी योगासने करत होते. मात्र निवृत्तीच्या उंबरठय़ावर, मी ठरवून ठाण्यातील ‘घंटाळी मित्र मंडळ’ संस्थेचे दोन अभ्यासक्रम – योग शिक्षक पदविका आणि योग उपचार पद्धती पाठोपाठ केले.या अडीच वर्षांच्या योगशिक्षणानंतर मी गेली १६ वर्षे ‘घंटाळी मित्र मंडळा’त योगासन वर्ग घेत आहे. हा वर्ग सकाळी सहा ते साडेसात या वेळेत असतो. त्याआधी पाऊण तास माझा चालण्याचा व्यायाम. त्यामुळे दवाखान्याची पायरी चढण्याची वेळ माझ्यावर येत नाही. या वर्गामुळे पहाटे पाच ही माझी उठण्याची वेळ ठरून गेलीय. सुट्टीच्या दिवशीही मी लोळत पडलेय, असं कधीही होत नाही. लवकर उठल्याने स्वयंपाकही सकाळी ९ च्या आत तयार असतो. मग काय, इतर उद्योगांसाठी वेळच वेळ!
मला फिरण्याची खूप आवड; पण नवरा घरात रमणारा. तसंच आपल्याला वेळ असेल तेव्हा मैत्रिणींना जमेलच असं नाही. म्हणून निवृत्तीनंतर मी धीर करून एकटय़ाने (अर्थात प्रवासी कंपन्यांबरोबर) फिरायला सुरुवात केली. बोलक्या स्वभावामुळे जाईन तिथे कंपनी मिळाली आणि देशविदेशात भरपूर भटकंती झाली. त्यामुळे आज शंभर मैत्रिणींची अमूल्य ठेव माझ्यापाशी आहे.अर्थात तत्पूर्वी निवृत्त होता होता मी ‘राष्ट्र सेविका समिती’ आणि नंतर ‘रुद्राणी पुरोहिता मंडळ’ यांच्याकडे शास्त्रशुद्ध पौरोहित्य शिकले, तेही सहा वर्ष. त्यानंतर सहस्रचंद्रदर्शन,लग्न, मुंज इत्यादी विधींसाठी लागणारे मंत्र, स्तोत्रं मुखोद्गत केली. तेव्हापासून आम्ही या कार्यक्रमांना ग्रुपने जातो. रोजच्या मंत्रपठणाने मेंदू तल्लख राहिलाय, असं मला वाटतं. या उपक्रमाला इतका चांगला प्रतिसाद मिळतो की, नवरात्रीत आमचे नऊही दिवस आरक्षित असतात.
वर्तमानपत्रातील माझ्या राशीसंदर्भात लिहिलेलं भविष्य वाचण्याचा मला पूर्वीपासूनच नाद होता. त्यामुळे ज्योतिषशास्त्र शिकायचं हे मी आधीच ठरवलं होतं. यामुळे मी या शास्त्राचे प्राथमिक व प्रगत असे प्रत्येकी तीन वर्षांचे कोर्स नोकरी सांभाळून केले होतेच; परंतु नातवंडात गुरफटल्यामुळे यावर मी या वर्षी जानेवारीत आम्ही मंडळातर्फे सहा जणींनी जव्हार येथे जाऊन २०० आदिवासी जोडप्यांचे सामुदायिक विवाह लावले. हा सोहळा बघायला खूप गर्दी जमली होती. आश्चर्य म्हणजे, आदिवासी मुलांना बरेच श्लोक पाठ होते. वधूंमधील दोघी तर इंजिनीअर होत्या. आदिवासींची पुढील पिढी आता अशिक्षित राहिली नाही हे पाहून खूप बरं वाटलं. हे काम आम्ही सामाजिक बांधिलकी मानून केलं. त्यामुळे मिळालेला आनंद अधिक मोलाचा. तो चेहऱ्यावरही दिसतो. त्यामुळे आज ‘सत्तरी’ उलटून गेली तरी आमचा नूर ‘सतराचा’ आहे असं इतरांचं म्हणणं!
याशिवाय गेलं वर्षभर मी ‘पुष्पौषधी’ आणि ‘बारा क्षार’ हे दोन अभ्यासक्रम ऑनलाइन करत आहे. या औषधांचे प्रयोग मी जेव्हा माझ्यावर आणि जवळच्या नातेवाईकांवर केले तेव्हा मला आश्चर्यकारक परिणाम मिळाले. त्यामुळे या विषयांवर सखोल अभ्यास करायचा माझा निर्धार आहे.
सतत नवं काही शिकत राहण्याचा आणि कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहण्याचा वारसा मला वडिलांकडून मिळाला. निवृत्तीनंतर ते घरच्या घरी उदबत्त्या करीत. त्यांच्या शेवटी दिवसांत अगदी अंथरुणावर असताना ते कॅसिनो शिकले. मृत्यूनंतर घरात लावायचा आपला फोटोही त्यांनी आधीच शोधून ठेवला होता. आज सतत कार्यमग्न राहण्याचे लाभ अनुभवताना हेच शब्द ओठांवर येतात..
पित्याने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा ।
smitadixit123 @rediffmail. com