जगात जेवढे म्हणून तंटे-बखेडे होतात त्यांचे मूळ कारण म्हणजे कोणत्या ना कोणत्या दिव्य गुणाचा अभाव हेच आहे. माणसामाणसांमध्ये जी भिन्नता आढळून येते, तीसुद्धा कोणत्या ना कोणत्या दिव्य गुणाच्या उणिवेमुळेच होय. तेव्हा दुर्गुण सोडून दिव्य गुण धारण करण्यासाठी प्रोत्साहन देणे हेच जगातील सर्व तत्त्वज्ञानाचे व धर्मग्रंथाचेही उद्दिष्ट आहे.
अंतर्मुखता, गांभीर्य, धैर्य, शीतलता, नम्रता, संतुष्टता, सरलता हे सर्वही दिव्य गुण आहेत. या सर्वही गुणांमध्ये आणखी एक महान गुण आहे, सहनशीलता. कोणतंही श्रेष्ठ उद्दिष्ट गाठायचं म्हणजे सारं काही सहन करावं लागतं. एकदा एक गुराखी चरण्यासाठी जंगलात घेऊन गेला होता. गुरांना चरण्यासाठी सोडून दिल्यावर एकटाच एका झाडाखाली बसला. वेळ घालवण्यासाठी म्हणून जवळच पडलेल्या एका दगडाने दुसऱ्या दगडावर आघात करू लागला. दोन-तीन आघात झाल्याबरोबर तो दगड तुटला व थोडय़ा अंतरावर जाऊन पडला. गुराख्याने दुसरा दगड घेतला व आता या दगडावरही तो तसेच आघात करू लागला. या दगडाने मात्र ते सर्व घाव सहन केले व आश्चर्याची गोष्ट म्हणजे संध्याकाळपर्यंत त्या दगडाचे एका सुंदर मूर्तीत रूपांतर झाले. त्या गुराखीने ती मूर्ती तेथेच ठेवली व गुरांना घेऊन निघून गेला. रस्त्यावरून जाणाऱ्या शेतमजुरांना जेव्हा ती मूर्ती दिसली तेव्हा त्यांना वाटले की हा तर चमत्कारच झाला. सकाळी तर येथे मूर्ती नव्हती. प्रभूने आपल्यासाठीच ही मूर्ती पाठवली असेल. अवश्य आपणास या मूर्तीसाठी मंदिर बनवावे लागेल, असे म्हणून ग्रामस्थांनी सगळ्यांच्या सहयोगाने तेथे मंदिर बनवून त्यात या मूर्तीची स्थापना केली.
या मूर्तीवर वाहण्यासाठी नारळ फोडायला दगड हवा होता म्हणून एक ग्रामस्थ खाली पडलेला एक दगड उचलतो तर तो तोच दगड असतो जो त्या गुराख्यांच्या फक्त दोन-तीन प्रहारांनी तुटलेला असतो. त्याला मंदिराच्या दरवाजाजवळ ठेवले जाते. आता रोज त्याच्यावर नारळ फोडले जातात. एकदा कुणीही नसताना त्या मूर्तीने अचानक दरवाजातील दगडाला विचारले, ‘काय मित्रा, कसा आहेस?’ तेव्हा उत्तरादाखल दगड म्हणाला, ‘‘काही नको विचारू बाबा. दिवसभर झालेल्या आघातांना तू सहन केलंस, पण आता तुझी पूजा होते आहे, पण मी मात्र एक-दोन आघातांनी घाबरून गेलो. पण आता मात्र रोजच माझ्या शरीरावर आघात होत आहेत. याचा पश्चात्ताप मला आयुष्यभर राहील.’’ कदाचित म्हणूनच म्हटले जाते, ‘टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.’ दगडापासून मूर्ती जेव्हा घडत असते, तेव्हा तिला घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. दगडापासून मूर्ती जेव्हा घडत असते, तेव्हा तिला घाव मोठय़ा आनंदाने सहन करावे लागतात. याउलट जे दगड हे घाव न सोसता तुटून पडतात. त्यांचा वापर मंदिराच्या बांधकामात केला जातो. सागराच्या किंवा नदीच्या लाटांशी टक्कर देत देत त्यातील दगडही पूजनीय प्रतिमा शालिग्राम बनतात.
सहनशीलता धारण करीत देवत्व येई अंगी।
अन्यथा मूर्ती ती अपुरी, पूजन न होई जगी।
मात्र बऱ्याच अंशी जनमानसात सहनशीलतेचा अभाव दिसतो. ‘आम्हीच का म्हणून सहन करायचं,’ असा प्रश्न सगळ्यांना सतावत असतो, माझ्याऐवजी दुसरा कोणी असता तर कधीच एक घाव दोन तुकडे करून मोकळा झाला असता. आपल्याला वाटतं, समोरची व्यक्ती बदलत नाही, पण जर तो बदलत नाही, आपण तर बदलू शकतो ना! आपली कृती त्याची वृत्ती बदलू शकते. म्हणूनच असं म्हटलं जातं, ‘बदल न लो, बदल के दिखाओ।’ सहनशील व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत उदास होत नाही, खचून जात नाही. ती राईचा पर्वत करत नाही, उलट राईलाही राईसमान अनुभवते. येशू ख्रिस्तानेदेखील मरतेवेळी सांगितले की ‘हे प्रभो, त्यांनी मला जिवे मारले ते अज्ञानी आहेत. त्यांना तू क्षमा कर.’ जी व्यक्ती स्वामी दयानंदांना विष देण्यास निमित्त बनली, त्या व्यक्तीलाही स्वामींनी क्षमा केलं. गुरू गोविंदसिंगांची दोन छोटी मुलं हसत-हसत भिंतीत चिणली गेली. मीरेनेही प्रभुप्रेमामुळे विषाचा प्याला सहजगत्या स्वीकारला. संत एकनाथदेखील सहनशक्तीचा मेरुमणी होते. सहन केल्याने आपली मनाची शक्ती वाढते व आपली पवित्रताही. सहनशील माणसाची लक्षणे अशी की, कोणी त्याची निंदा करो, त्याच्याशी कठोरतेने बोलो, याचा चेहरा आनंदी राहतो. त्यावर मलूलतेचे चिन्ह दिसत नाही. गीतेतही म्हटलंय, ‘तुल्यनिंदा स्तुतिर्मोनि संतुष्टो येन केनचित’ अर्थात प्रत्येकाला जीवनात मान-अपमान-निंदा, हार-जीत यांचा सामना करावाच लागतो. पण विपरीत परिस्थितीतही सहनशीलता आपणास शांत व अचल मुख्य म्हणजे आनंदात ठेवू शकते.
एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना म्हणाले, ‘‘मी तुम्हाला एका बिकट कामगिरीसाठी जवळच्या प्रदेशात पाठवणार आहे. तेथील लोकांना तुम्ही काही सांगितलं व त्यांनी तुमचं ऐकलं नाही तर तुम्ही काय कराल?’’ शिष्यांनी उत्तर दिले, ‘‘तथागत, असं झालं तर आम्ही समजू येथील लोक फारच चांगले आहेत. त्यांनी आमचं ऐकून घेतलं नाही हे खरं. पण उलटून शिव्या तर दिल्या नाहीत?’’ यावर तथागत म्हणाले, ‘‘ठीक आहे. त्यांनी तुम्हाला शिव्या दिल्या, काही अपशब्द वापरले तर तुम्ही काय कराल?’’ शिष्य म्हणाले, ‘‘तरीदेखील आम्ही समजू इथले लोक चांगले आहेत. त्यांनी आम्हाला फक्त शिव्याच दिल्या, मारहाण तर केली नाही.’’ पुन्हा तथागत म्हणाले, ‘‘पण जर त्यांनी तुम्हाला मारलं तर?’’ शिष्य म्हणाले, ‘‘आम्ही म्हणू की हे लोक किती चांगले आहेत, कारण यांनी आमचा जीव तर घेतला नाही.’’ पुन्हा तथागत म्हणाले, ‘‘समजा, त्यांनी तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तर?’’ शिष्य म्हणाले, ‘‘आम्ही असेच समजू की या प्रदेशातील लोक सज्जन आहेत. त्यांनी आम्हाला भगवंताचं काम करतानाच भगवंताच्या पायापाशी पोहचवलं?’’ शिष्याचे हे उत्तर ऐकून तथागत हसले व म्हणाले, ‘‘तुम्ही कसोटीत उत्तीर्ण झालात.’’ अशा प्रकारची पराकोटीची सहनशीलता अंगीकारल्यामुळे तुम्हाला कुठेही हमखास यश प्राप्त होईल.
कधी-कधी किरकोळ गैरसमजुतींनी अनेक वर्षांची मैत्री, ऋणानुबंध धोक्यात येतात, केवळ सहनशक्तीच्या कमतरतेमुळे हे घडते. परंतु तुमच्याशी उगाच वैर बाळगणाऱ्या, तुमच्याशी भांडणाऱ्या विरोधकाचाही तुमच्या मधुर शुभभावना व शुभकामनांद्वारे सहनशीलतेचा पाठ तुम्ही शिकवू शकता. एका ऑफिसात काही दिवसांपूर्वी घडलेली एक गोष्ट आठवते. एक ऑफिसर त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एका कारकुनाला अद्वातद्वा बोलला. त्या बोलण्यात शिव्यांचाही समावेश होता. तरीही तो कारकून मात्र शांत उभा होता. त्याच्यावर आपल्या बोलण्याचा काहीएक परिणाम होत नाही, असे पाहून तो अधिकारी आणखी चिडला. त्याचा राग एवढा नियंत्रणाबाहेर गेला की अक्षरश: तो त्या कारकुनाच्या अंगावर थुंंकला. तरीही तो कारकून शांतपणे समोर असलेल्या वॉश बेसिनकडे गेला व त्याने आपला चेहरा धुतला व तसाच पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसला. ते पाहून त्याचा अधिकारी शरमला. तो त्याच्या टेबलाजवळ आला व त्याला विचारू लागला, ‘‘मी तुझ्याशी एवढं वाईट वागलो तरीही तू एक चकार काढला नाहीस हे कसे काय?’’ तेव्हा तो कारकून म्हणाला, ‘‘जे काम फक्त पाण्याने होऊ शकतं ते करण्यासाठी मी दगड का हातात घेऊ?’’ हे ऐकल्याबरोबर त्या अधिकाऱ्याचे हृदयपरिवर्तन झाले.
सहनशीलतेची शक्ती ही आपली अविनाशी दौलत आहे. ही दौलत प्रत्येकाला वाढवायला हवी. स्वत:च्या कल्याणासाठीच नव्हे तर इतरांच्याही कल्याणासाठी ‘विश्वची माझे घर’ ही संकल्पना आपणास मान्य आहे. म्हणून आपल्या सर्व आपल्यांसाठी सहनशीलतेची कास धरायचीच. म्हणूनच तर म्हटले जाते-
जो सहन करतो, तोच शहेनशाह बनतो.
(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ओम शांती मीडिया या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रकाशित झालेल्या आध्यात्मिक प्रवचनांचा हा अनुवाद )