लैंगिक संसर्ग म्हणजे ‘एचआयव्ही-एडस्’, या आपल्या मर्यादित ज्ञानापलीकडेही स्वैर लैंगिक संबंधांतून पसरू शकणारे अनेक आजार आहेत. मात्र वेळीच निदान झाल्यास पुढील गुंतागुंत टाळणंही सहज शक्य आहे. क्षणक मोहाच्या प्रसंगी लैंगिक संसर्गाबद्दलचं भान मनात असणं आणि त्या दृष्टीनं योग्य ती काळजी घेणं आवश्यकच, कारण एकाचा मोह त्याच्यासह जोडीदाराच्या वेदनेचं कारण बनू शकतो.
सेक्ससंदर्भात एकूण समाज म्हणून आपल्यामध्ये शास्त्रीय माहितीचा इतका अभाव आहे, की ‘एसटीडी’ म्हटलं, की अजूनही कित्येकांच्या डोळ्यांसमोर नव्वदच्या दशकातला टेलिफोनचा पिवळा बूथच येतो! वास्तविक ‘एसटीडी’ ही ‘सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज’ अर्थात वेगवेगळ्या लैंगिक आजारांना उद्देशून असलेली संज्ञा आहे. लैंगिक आजार म्हटलं की देखील आपली मजल ‘एचआयव्ही’च्या पुढे जात नाही. पण ‘एचआयव्ही’इतकेच गंभीर किंवा योग्य औषधोपचारांनी बरे होणारे इतर अनेक एसटीडी आहेत. त्यांची माहिती लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या प्रत्येक जोडप्यास असणं आवश्यक आहे. विवाहबाह्य संबंधांचं प्रमाण वाढतंय का, मुळात विवाहबंधनात अडकल्यावरही त्रयस्थ व्यक्तीबद्दल आकर्षण वाटण्याची कारणं, यामुळे होणारी संसाराची फरपट, याविषयी मागील लेखात आपण जाणून घेतलं. मात्र विवाहबाह्य संबंधांची व्याप्ती केवळ जोडीदाराची फसवणूक इतकीच मर्यादित नसून, असुरक्षित लैंगिक संबंधांचं पर्यवसान वेगवेगळ्या लैंगिक आजारांमध्ये (Sexually transmitted infections) होऊ शकतं, याची जाणीव किती लोकांना असते हा प्रश्नच आहे. त्यामुळेच विवाहबाह्य संबंधांइतकाच महत्त्वाचा विषय हा त्यातून उद्भवणाऱ्या शारीरिक आजाराचा ठरतो.
हेही वाचा – ..फिर भी तनहाईयों का शिकार आदमी
स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सेक्स थेरपिस्ट डॉ. नीलिमा देशपांडे यांच्याकडे एक तिशीची घटस्फोटित स्त्री उपचारांसाठी आली. ती लवकरच दुसरं लग्न करणार होती, पण तिला पाळीदरम्यान होणारा तीव्र स्वरुपाचा रक्तस्राव ही समस्या होती. वेगवेगळ्या औषधोपचारांनीही तिचा हा आजार बरा होत नव्हता. तिला आतल्या अंगाला सूज येणारा Pelvic Inflammatory Disease असल्याचं निदान झालं. तिच्या गर्भाशयात मोठ्या प्रमाणात जंतुसंसर्ग झाला होता. विशेष म्हणजे तिच्या घटस्फोटाला चार वर्षे झाली होती आणि दरम्यानच्या काळात तिचे अन्य कुठल्याही पुरुषाबरोबर शरीरसंबंध आले नव्हते. त्यामुळे तिला झालेल्या जंतुसंसर्गाचं कारण उलगडत नव्हतं. पण ते तिच्या आधीच्या पतीच्या स्वैर लैंगिक वर्तनात असल्याचं लवकरच निदान झालं. तिनं घटस्फोट घेण्याचं मुख्य कारण हे नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध हे होतं.
डॉ. नीलिमा सांगतात, ‘‘कोणत्याही उपचारांची दिशा ठरवताना रुग्णाचा पूर्वेतिहास महत्त्वाचा ठरतो. या प्रकरणात पतीचे किमान तीन-चार स्त्रियांबरोबर संबंध होते, ही महत्त्वाची बाब रुग्णानं सांगितली नव्हती. बऱ्याचदा लैंगिक आजारांचा संसर्ग झाल्यावरही काही काळ ती निद्रावस्थेत (dormant) राहू शकतात. त्यामुळे असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यावर पुढच्या काही दिवसांत काही शारीरिक त्रास न झाल्यास लैंगिक आजारांची भीती संपली, अशा परस्पर निष्कर्षांवर येणं चुकीचं ठरतं. या केसचा विचार करता त्या स्त्रीबरोबरच तिच्या आधीच्या पतीनंही उपचार घेणं आवश्यक ठरतं.’’ विवाहबाह्य शारीरिक संबंध टाळणं तर आवश्यक आहेच, पण विवाहापूर्वीही एकापेक्षा अधिक लैंगिक जोडीदार असल्यास लैंगिक आजारांच्या प्रादुर्भावाचा धोका बळावतो, हा मुद्दा अधोरेखित करताना इचलकरंजी इथल्या त्वचारोगतज्ञ डॉ. वर्षां पोतदार सांगतात, ‘‘एखाद्या व्यक्तीला लैंगिक आजार आहे की नाही, हे बऱ्याचदा त्याच्या बाह्य रुपावरून कळत नाही. त्यामुळे लैंगिक संबंधांच्या वेळी निरोध वापरणं अत्यावश्यक ठरतं. पण निरोध वापरल्यानं केवळ जननेंद्रियांचा थेट संपर्क टळतो. पण वेगवेगळ्या लैंगिक आजारांमध्ये जननेंद्रियांव्यतिरिक्त शरीराच्या अन्य भागांतही पुरळ येणं, मस येणं, बुरशीसदृश जंतूसंसर्ग होणं, अशी लक्षणं असतात आणि लैंगिक संबंधांदरम्यान त्याचा प्रादुर्भाव दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. त्यामुळेच लैंगिक पूर्वेतिहास माहिती नसलेल्या कोणाही त्रयस्थाबरोबरचे शरीरसंबंध हे लैंगिक दुखण्याला आमंत्रण देणारे ठरू शकतात. म्हणूनच संयम, खबरदारी महत्त्वाची ठरते.’’
जोडीदाराच्या एकनिष्ठतेवर आपला पूर्ण विश्वास असल्यानं आपल्याला लैंगिक आजारांचा धोका नाही, असं विवाहितांना वाटत असलं, तरी वस्तुस्थिती वेगळी असू शकते. हर्पिस (Herpes) किंवा Human Papilloma Virus ( HPV) यांसारख्या आजारांचे विषाणू अनेक वर्षे शरीरात निद्रितावस्थेत राहू शकतात, हा मुद्दा एका वैद्यकीय पोर्टलवर अधोरेखित करण्यात आला आहे. ‘एचपीव्ही’संदर्भात सध्या जनजागृती सुरू असून, बारा वर्षांपुढील मुलामुलींना या विषाणूची लस देण्याचं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येतं. याचं मुख्य कारण म्हणजे एचपीव्ही विषाणूमुळे स्त्रियांना गर्भाशयमुखाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
एका रुग्णाच्या अनुभवाविषयी सांगताना डॉ. नीलिमा नमूद करतात, ‘‘त्या स्त्रीचं वय ५८ होतं. ओटीपोटात होणाऱ्या वेदना आणि रजोनिवृत्ती उलटून पाचेक वर्षे झाल्यावर योनीमार्गातून सुरू झालेला तीव्र स्वरुपाचा रक्तस्राव ही त्यांची प्रमुख समस्या होती. त्यांना होत असलेल्या वेदनांमुळे त्यांची तपासणी करणंही अवघड जात होतं. त्यांचं लग्न वयाच्या चौदाव्या वर्षी झालं होतं, तर मूल साधारण अठराव्या वर्षी झालं होतं. त्यांच्यात आणि पतीमध्ये साधारण दहा वर्षांचं अंतर होतं. लग्न झालं तेव्हा त्यांचं वय लहान असल्यामुळे पहिला शरीरसंबंध लग्नानंतर दोनेक वर्षांनी घडला होता. ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या तपासण्यांमधून त्यांना गर्भाशयमुखाचा कर्करोग असल्याचं निदान झालं. त्याचं मूळ हे वयातल्या मोठ्या अंतरामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे त्यांच्या पतीनं केलेल्या विवाहबाह्य संबंधांत होतं. त्यांना पतीकडून ‘एचपीव्ही’ची लागण झाली होती. दुसरीकडे या वयात डॉक्टर जननेंद्रियांची तपासणी करणार, याचा संकोच, लाज, भीती यांमुळे होईल तोवर या स्त्रीनं दुखणं अंगावरच काढलं होतं. परिणामी हा कर्करोग चांगलाच फोफावला होता आणि दुखणं त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली होती.’’
डॉ. विठ्ठल प्रभू लिखित ‘निरामय कामजीवन’ या पुस्तकात असुरक्षित शरीरसंबंधांतून संक्रमित होणाऱ्या लैंगिक आजारांमध्ये एचआयव्ही, हिपेटायटिस बी, हिपेटायटिस सी, सिफिलिस, गोनोऱ्हिया, शँक्रॉइड, व्हेनेरिअल वॉर्ट, हर्पिस जेनिटालिस आणि बुरशीजन्य संसर्गाचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. जननेंद्रियांवर होणाऱ्या जखमा, पस, लघवीदरम्यान होणारी जळजळ, जननेंद्रियांवर येणारी सूज, अन्य अवयवांवर येणाऱ्या गाठी, मस, पुरळ ही बहुतेकदा आजारांची-जंतूसंसर्गाची लक्षणं असतात.
हेही वाचा – जॉर्जियाचा ‘रिव्हेंज पॉर्न’ लढा!
या लेखाची तयारी करताना ग्रामीण भागातल्या एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात पॅथॉलॉजी विभागात कार्यरत असलेल्या डॉक्टरांशी बोलण्याचा योग आला. त्यांच्या महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयाद्वारे परिसरातल्या शेकडो गावांना माफक दरात वैद्यकीय उपचार पुरवले जातात. आपलं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर या डॉक्टरांनी सांगितलं, की त्यांच्या मेडिकल लॅबमध्ये दरमहा एचआयव्ही, हिपेटायटिस बीच्या सरासरी अडीच ते तीन हजार चाचण्या होतात. तर सिफिलिसच्या दीड ते दोन हजार चाचण्या होतात. कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी, तसंच प्रसुतीपूर्वीही या गंभीर आजारांच्या चाचण्या होत असल्यानं हा आकडा लक्षणीय असू शकतो असं गृहीत धरलं, तरी या चाचण्यांतून प्रत्यक्ष आजाराचं निदान होणाऱ्या म्हणजेच ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचं प्रमाण हे काळजी करण्यासारखं आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ अशी चालू वर्षांतली आकडेवारी त्यांनी संकलित करून दिली. यानुसार गेल्या दहा महिन्यांत या एका रुग्णालयात एचआयव्हीच्या २७३, हिपेटायटिस बीच्या ३२४, तर सिफिलिसच्या ५८ नवीन रुग्णांचं निदान झालंय. एका खासगी रुग्णालयातली ही आकडेवारी असेल, तर सरकारी रुग्णालयांतली आकडेवारी यापेक्षा निश्चित अधिक असण्याची शक्यता आहे. आज लोकांमध्ये एसटीडीची भीती राहिलेली नाहीये, हा मुद्दा अधोरेखित करताना फॅमिली फिजिशियन डॉ. अमित थत्ते सांगतात, ‘‘सिफिलिस, गोनोऱ्हिया या लैंगिक आजारांवर प्रभावी औषधोपचार आज उपलब्ध आहेत. सिफिलिसवर उपचार न केल्यास पुढच्या स्टेजमध्ये त्याचा हृदयावर, मेंदूवर परिणाम होत असला, तरी वेळीच निदान झाल्यास काही दिवसांच्या अँटिबायोटिकनं रोग्याला आराम मिळू शकतो. एचआयव्ही, हिपेटायटिस बी, एचपीव्ही हे विषाणूजन्य संसर्ग एकदा झाल्यास आयुष्यभर सोबत राहत असले, तरी या गंभीर आजारांवर औषधोपचार उपलब्ध आहेत.’’
‘ओपन मॅरेज’ आणि मुक्त नातेसंबंध हा आजच्या युगाचा ट्रेंड मानला तरी स्वातंत्र्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीचं भान प्रत्येकानं ठेवण्याची गरज आहे. डॉ. नीलिमा सांगतात, ‘‘तुम्ही ओपन रिलेशनमध्ये असाल, तर दर तीन महिन्यांनी एसटीडी स्क्रीनिंग चाचणी करायलाच हवी. याशिवाय कुठल्याही नवीन जोडीदाराबरोबर शारीरिक जवळीक साधण्यापूर्वी दोघांनीही ही चाचणी करून घेऊन दोघांमध्ये कोणते लैंगिक संसर्ग नाहीयेत ना, याची खात्री करून घ्यावी. सरकारी रुग्णालयांबरोबरच आता खासगी लॅब्जमध्येही या चाचण्या केल्या जातात. याशिवाय असुरक्षित लैंगिक संबंध आल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावं. ‘एचपीव्ही’सह अनेक लैंगिक संसर्गावर आज लस उपलब्ध असून, मुक्त नातेसंबंधांत असणाऱ्या प्रत्येकानं त्या घेणं आवश्यक आहे.’’
मोनिका गजेंद्रगडकर यांच्या ‘भूप’ या कथासंग्रहातल्या ‘अनोळखी’ या कथेची नायिका असलेली आजी अमेरिकेतील नातीच्या स्वैर वर्तनाविषयी चिंतन करताना म्हणते, ‘मुक्त आयुष्य जगण्याच्या या कल्पना कोणत्या? स्वातंत्र्याच्या, मजेच्या की उपभोगाच्या! हे सुख, आनंद म्हणायचं तरी कसलं! केवळ शरीराशी संबंध असणारं? एकमेकांना आजमावायचं ते ते त्या शरीराच्या माध्यमातून. ना त्यातून निर्माण होणाऱ्या कसल्याही नात्याची शाश्वती, ना मागे उरणारे बंध.. आयुष्य आपलं, आपल्याच मालकीचं असतं खरं; पण त्याच्याशी इतकं स्वातंत्र्य घेऊन खेळता येतं? तेवढा आपला आपल्या आयुष्यावर तरी अधिकार असतो?’ लैंगिक सुखाच्या क्षणिक मोहापायी अवघं आयुष्य पणाला लावण्यापूर्वी प्रत्येकानं एकदा थांबून विचार करायला हवा.
niranjan@soundsgreat.in