– अनोन्या दत्त
धूम्रपानाचं व्यसन आरोग्यासाठी वाईट, हे आता नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु या व्यसनातला स्त्री आणि पुरुष भेद अधोरेखित करणारा एक अहवाल नुकताच समोर आलाय. यातील एक दिलाशाची गोष्ट अशी, की देशात तंबाखूजन्य पदार्थांचा एकूण वापर कमी होतोय. मात्र त्याच वेळी किशोरावस्थेतल्या मुलींमध्ये मात्र धूम्रपानाचं प्रमाण दुपटीपेक्षा अधिक वाढलंय. आरोग्य मंत्रालयानं नुकताच ‘इंडिया टोबॅको कंट्रोल अहवाल’ प्रसिद्ध केला. त्यात नमूद केलेली आकडेवारी लक्षवेधी आहे. यासह जगभरात झालेल्या इतरही काही संशोधनांचा संदर्भ घेता मुली आणि स्त्रियांमधलं धूम्रपान त्यांना व्यसनी पुरुषांपेक्षा महागात पडू शकतं, असा निष्कर्ष निघतो.
गेल्या एका दशकात किशोरावस्थेतल्या मुलामुलींमध्ये धूम्रपानाचं प्रमाण वाढताना दिसून आलं. या अहवालानुसार या वयोगटातल्या मुलींमध्ये हे प्रमाण तीव्र होतं. २००९ ते २०१९ या कालावधीत मुलींमधल्या धूम्रपानाच्या प्रमाणात आधीपेक्षा ३.८ टक्क्यांनी वाढ होऊन ते ६.२ टक्के झालं. मुलांमधील धूम्रपानाच्या प्रमाणात मात्र याच काळात २.३ टक्क्यांची वाढ झाली. याच वेळी प्रौढांमधील धूम्रपानात मात्र पुरुषांत २.२ टक्क्यांची आणि स्त्रियांमध्ये ०.४ टक्क्यांची घट झाली. यातील आणखी एक लक्षवेधी गोष्ट अशी, की २०१७ मध्ये प्रौढ स्त्रियांमध्ये धूम्रपानाचं प्रमाण १.५ टक्के होतं आणि २०१९ मध्ये मुलींमध्ये मात्र ते याहून बरंच अधिक- म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे ६.२ टक्के होतं. खासकरून नवीन पिढीला धूम्रपान खुणावत असल्याचा हा पुरावा आहे.
अधिक मुलींना धूम्रपानाचं व्यसन का जडतंय?
किशोरावस्थेतील मुलींची वाढ वेगानं होत आहे आणि या वयातल्या मुलांप्रमाणेच त्यांनाही गोंधळलेपणा, त्यातून येणारी चिंतेची भावना दडपण्यासाठी, शिवाय ‘कूल’ दिसण्यासाठी धूम्रपानाचा आधार घ्यावासा वाटतोय. काही जणी समवयस्कांच्या दबावाला बळी पडतात, तर काही मुली भूक मारण्यासाठी धूम्रपान करतात.
हेही वाचा – माझी मैत्रीण: ‘या, स्वागत हैं, वेलकम!’
या अहवालाच्या संपादक आणि ‘पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया’च्या सार्वजनिक आरोग्य शास्त्रज्ञ मोनिका अरोरा सांगतात, ‘आजवर तंबाखू उत्पादनं बनवणाऱ्या कंपन्यांसाठी स्त्रिया हा बाजूला राहिलेला संभाव्य ग्राहक होता. आता मात्र धूम्रपान हे ‘फॅशनेबल’ असल्याचं दाखवणं आणि मुलीनं धूम्रपान करणं स्त्री सक्षमीकरणाचं प्रतीक मानणं सुरू झालं आहे. अर्थातच मुलींना ग्राहक म्हणून महत्त्व देणं सुरू झालं आहे. चित्रपट आणि टीव्हीवरील कार्यक्रमांत धूम्रपानाचं होणारं प्रदर्शन हा दुसरा मुद्दा. पडद्यावर धूम्रपानाचे प्रसंग दाखवताना बरोबर धूम्रपान आरोग्यास हानीकारक असल्याची सूचनाही दाखवायला हवी, हा नियम २०१२ मध्ये लागू करण्यात आला. तेव्हापासून पडद्यावर धूम्रपानाचे प्रसंग तुलनेनं कमी झाले. ‘ओटीटी’ माध्यमांसाठी मात्र हा नियम लागू नव्हता, तिथे धूम्रपानाच्या प्रसंगांत वाढ झाली. त्यामुळे मंत्रालयानं या माध्यमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही नवे नियम केले.’
सध्याचा आणखी एक ‘ट्रेंड’ म्हणजे ‘ई-सिगरेट्स’ सुरक्षित आहेत असं मत निर्माण करणं. मोनिका यांच्या मते, हा प्रवाह चिंताजनक आहे. त्या म्हणतात, ‘ई-सिगरेट्स विविध संकेतस्थळांवर वा ग्रे-मार्केटमध्ये सहज मिळतात. त्या खरेदी करताना ग्राहकाच्या वयाची खात्री केली जात नाही. हे नियमांच्या विरुद्धच आहे.’
स्त्रियांमध्ये आरोग्य समस्यांचा धोका अधिक
धूम्रपानामुळे श्वसनमार्गाचे आजार, फुप्फुसांचा कर्करोग आणि हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारख्या हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो, हे सर्वश्रुत आहे. शिवाय पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही धूम्रपानाचा संबंध वंध्यत्वाच्या समस्येशी जोडता येतो. परंतु स्त्रियांमध्ये धूम्रपानाचे काही वेगळे दुष्परिणामही बघायला मिळतात.
धूम्रपानाचं व्यसन असलेल्या गर्भवती स्त्रियांमध्ये भ्रूणाचा आकार लहान असणं, मुदतीपूर्वी बाळंत होणं, बाळाच्या फुप्फुसांमध्ये दोष असणं किंवा इतर काही जन्मजात व्यंग असण्याची शक्यता असते. धूम्रपानाच्या व्यसनामुळे प्रसूतीच्या वेळी अधिक रक्तस्राव होऊ शकतो. काही आरोग्यविषयक परिणाम दीर्घकालीन असतात. एका संशोधनानुसार धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये ५० वर्षांच्या आतच रजोनिवृत्ती येण्याचा धोका ४३ टक्क्यांनी जास्त असतो.
‘अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी’मध्ये २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार ५० वर्षांच्या आतल्या धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांना गंभीर स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता पुरुषांच्या तुलनेत अधिक असते. सिगारेटमधली रसायनं आणि इस्ट्रोजेन संप्रेरक यांच्यातल्या प्रक्रियेमुळे हे घडत असल्याचा कयास आहे. काही संशोधकांच्या मते, धूम्रपानाच्या परिणामांमुळे गर्भाशय मुखाच्या पेशींमधील जनुकांना धक्का लागू शकतो. त्यामुळे कर्करोग होऊ शकतो. ‘अमेरिकन कॅन्सर सोसायटी’च्या एका अभ्यासानुसार धूम्रपानामुळे स्तनांच्या कर्करोगात मृत्यू ओढवण्याचा धोका अधिक असतो.
किशोरावस्थेतल्या मुलामुलींत लैंगिक वैशिष्ट्यांमुळे असणारा फरक- ‘जेंडर गॅप’ आता कमी होतेय. तेच धूम्रपानाच्या बाबतीत दिसतं. २०१९ मध्ये ९.४ टक्के किशोर मुलं आणि ७.४ टक्के मुली तंबाखू वा तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करत होते. आताच जर या वयोगटात ही सवय कमी करण्याचे प्रयत्न कमी केले नाहीत, तर भविष्यात देशात धूम्रपान करणाऱ्यांचं प्रमाण वाढेल. त्यासाठी सरकारी अहवालात २०४० पर्यंत काय करायला हवं, याचा पथदर्शी आराखडा मांडण्यात आला आहे. २०२२ नंतर जन्मलेल्या मुलामुलींना तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती वा या उत्पादनांची प्रसिद्धी बघायला मिळू नये, नवीन तंबाखू उत्पादनं बाजारात येण्यास बंदी असावी आणि विक्रीस असलेल्या उत्पादनांची वेष्टनं कोरी असावीत, असे काही उपाय सुचवण्यात आले आहेत.
‘व्यसनी तो व्यसनी! त्यात स्त्री-पुरुष भेद तो काय?’ असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. परंतु स्त्री असल्यामुळे व्यसनाचे पुरुषांपेक्षा अधिक परिणाम सहन करावे लागण्याची शक्यता या अहवालाच्या निमित्तानं समोर आलीय. आजवर ग्राहक म्हणून विशेष लक्ष न दिलेल्या स्त्रियांना भविष्यात तंबाखू उत्पादनं बनवणाऱ्या कंपन्यांकडून निश्चित झुकतं माप दिलं जाईल. या दृष्टीनं हा अहवाल महत्त्वाचाच.
भाषांतर : संपदा सोवनी
(प्रसिद्धी २६ मे इंडियन एक्स्प्रेस आय पुरवणी)