डॉ. नंदू मुलमुले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही कहाणी नानांची. त्यांचं वय ऐंशी. पण हे वय नाना गेले तेव्हाचं. नानांच्या आयुष्यात एका विचित्र विकारानं प्रवेश केला, ते जायच्या चार वर्ष आधी. तोवर वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले नाना एक आदर्श सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक होते. ही उपाधी त्यांना लागोपाठ चार वर्ष त्यांच्या पेन्शनर क्लबनंच बहाल केली होती. ही कहाणी नानांच्या पंचेचाळिशी ओलांडलेल्या धाकटया मुलाची, संजयचीही. किंबहुना ही कहाणी संजयचीच! कारण नाना होते आणि ते गेले त्यानंतरही संजयची विचित्र समस्या संपली नव्हती. त्या समस्येशी त्याची झालेली झुंज त्यानं मला ऐकवली होती. एक मानसरोगतज्ञ म्हणून आणि एक मित्र म्हणूनही.

ही कहाणी संजयच्या वहिनीची, पल्लवीचीही. संजयचा मोठा भाऊ सुरेश त्याच इमारतीत राहायचा; त्याची बायको पल्लवी. सुरेश इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर. तो कंपनीच्या कामानिमित्त दुबईला अनेकदा जायचा. एकदा गेला की पंधरा-वीस दिवस मुक्काम पडायचा. पल्लवीला नुकतीच एका कॉलेजमध्ये नोकरी लागली होती. त्यामुळे तिला इथे राहणं महत्त्वाचं होतं. मोठा मुलगा दहावीला, धाकटा शाळेत. ‘दुबईला काय, चार तासांत जाता येतं! शिवाय तिकडे नवरा दिवसाचे बारा तास बिझी. मग कशाला तेवढयासाठी नुकती लागलेली नोकरी सोडून जायचं? जोवर जमेल तोवर बघू,’ हा तिचा विचार. संजय अधेमध्ये त्यांच्या घरी येऊनजाऊन असे. सासू काही वर्षांपूर्वी कर्करोगानं गेली. त्यामुळे घरी फक्त सासरा. नव्या पिढीच्या भाषेत सगळं ‘ओके-लाइक’! सासरा कुणाच्या अध्यात ना मध्यात. कोपऱ्यात ठेवलेला अॅकन्टिक पीस! नानांची दखल त्यांची मुलंच घेत नव्हती, तर सून कुठे घेणार? नानांचं विश्व वेगळं, सुनेचं विश्व वेगळं. नानांनी आयुष्यात मोबाइल कधी वापरला नाही. सुनेच्या हातात लहानपणापासूनच मोबाइल. नानांनी हयातीत कधी कॉम्प्युटर वापरला नाही. सून घरी आली की सतत लॅपटॉपवर.

आणखी वाचा-मेंदूला कामाला लावताना..

कॅल्क्युलेटर पूर्वीच आले होते, मात्र अखेपर्यंत नानांनी तोंडपाठ बेरीज-वजाबाकीच्या जिवावर खतावण्या लिहिल्या. एक पैचीही चूक नाही. एकतर प्रत्येक काम स्वत: करायची सवय. हिशेबाचं काम चोख ठेवणं ही तर बँकेच्या नोकरीतली चाळीस वर्षांची कमाई. ही कामं कॅल्क्युलेटरकडून करून घ्यायची तर खात्री कशी देणार?.. आणि मग आपल्या रिकाम्या मेंदूचं करायचं काय? हा प्रश्न उरतोच. सगळी कामं ‘आउटसोर्स’ करता करता माणसाचं जगण्याचं प्रयोजनच उरत नाही, हा मुद्दा जुन्या पिढीच्या बाबतीत तरी महत्त्वाचा.

किरकोळ शरीरयष्टी, मोजकं जेवण, प्रकृती नीट सांभाळलेली. एखाद्या सणवारी दुपारी पुरणाची पोळी खाल्ली, तर रात्री जेवणार नाहीत. आयुष्यभर इमानेइतबारे नोकरी केली आणि निवृत्त झाल्यावर त्यांनी एका स्थानिक आमदाराच्या एजन्सीत व्यवस्थापकाचं काम सुरू केलं. तेवढीच पेन्शनीला पगाराची जोड! त्यांचं चोख काम त्या आमदारास इतकं आवडलं की ते नानांना निवृत्त होऊ देईनात. मात्र एके दिवशी नाना कॅश टॅली करण्यात चुकले. त्या दिवशी आमदाराची माफी मागून नानांनी नोकरी सोडली.

आता नानांचा वेळ घरीच जाऊ लागला. नातवंडांशी खेळणं, टीव्ही पाहणं, आसपासच्या समवयस्क मित्रमंडळींना भेटणं. तेही आपापल्या व्यापात व्यस्त. कुणी मुलांकडे परदेशी येऊनजाऊन, तर कुणी आजारी. कुणी कौटुंबिक विवंचनेत, कुणी शारीरिक व्याधीनं विकलांग झालेले. सून आणि मुलांच्या व्यग्रतेत नाना घरातल्या घरातच अडगळ झाले. घर चालवणारा माणूस बदलला की आपलंच घर परकं होऊन जातं. सकाळची घाईची वेळ, त्या वेळी बाथरूम अडवायची नाही. सूनबाईला सतरा कामं, त्या घाईच्या वेळी चहा मागायचा नाही, नातवाला शाळेत जायची घाई, त्या वेळी त्याच्याशी खेळायचं नाही, तो झोपल्यावर टीव्ही पाहायचा, नाहीतर त्याला सवय लागेल.. एक ना दोन. थोरला मुलगा दुबईहून आला की त्याच्या कामांचा बॅकलॉग, त्यामुळे फारसं बोलणं व्हायचं नाही. धाकटा संजय अधूनमधून चक्कर टाकायचा. कधी नाना त्याच्याकडे जाऊन बसायचे. अर्थात, परिस्थिती तिथेही सारखीच! संजयच्या सवयी नानांच्या अगदी विरुद्ध. बेशिस्त, बेताल,आणि माफक मद्यप्रेमीही. त्यामुळे बाप-लेकाचे संबंध यथातथाच. संजयची बायको सासऱ्याचा खेकटा आपल्यामागे लावून घ्यायला तयार नव्हती. ‘त्यांना (दीर-भावजयला) नानांचा फ्लॅट हवा आहे. मग त्यांनीच सांभाळावं,’ ही तिची स्पष्ट भूमिका. ती चुकीची आहे असंही वाटत नव्हतं.

आणखी वाचा-सांधा बदलताना : स्थित्यंतराचे पडसाद

निवृत्त माणूस आधी नोकरीतून जातो, मग कामातून! तरीही व्याधी शरीरात शिरेपर्यंत बरंच बरं चाललं होतं असं म्हणायचं! नानांच्या हातांना सूक्ष्म थरथर सुरू झाली. वयोमानानुसार असल्या गोष्टी चालत राहतात, असं म्हणेस्तोवर ती वाढत गेली. हळूहळू पेन धरणं, शर्टाची बटणं लावणं कठीण होऊ लागलं. शब्द अडखळू लागलं. शरीराचं वंगण कमी झाल्यासारखे हातपाय जणू जाम झाले. मेंदूरोगतज्ज्ञांनी निदान केलं, ‘पार्किन्सन्स डिसीज’. मेंदूच्या पेशींची झीज झाल्यानं होणारी व्याधी. अर्थात हे इतर अनेक कारणांपैकी एक. पार्किन्सन्स म्हणजे कंपवात हा डोपामीन या मेंदूरसायनाचा अभाव. नानांना त्यावर गोळया सुरू करण्यात आल्या. डोपामीनमुळे काहींना भ्रम होतात. त्यात मेंदूची झीज ही भर. नानांना भास होऊ लागले. ‘आजूबाजूचे लोक माझ्याबद्दल बोलताहेत, माझ्याकडेच बघून हसताहेत, माझ्या वाईटावर आहेत,’ वगैरे. त्यात एका विचित्र भ्रमाची भर पडली. ‘सून माझ्याकडे बघून अश्लील हातवारे करते आहे, मला नको ते इशारे करते आहे,’ असे त्यांना भास होऊ लागले.

थोरल्या भावाच्या अनुपस्थितीत संजय हे सारं प्रकरण हाताळत होता. थोरल्याचा फ्लॅट नानांचा, त्यामुळे ते तिथेच राहणं साहजिक. बायकोला सोबत होते म्हणूनही वडिलांना ठेवून घेणं थोरल्याच्या पथ्यावर. नाना धडधाकट असेपर्यंत कुठलाच प्रश्न नव्हता. पल्लवी मुलांचं करून, कॉलेजची नोकरी सावरून त्यांचं चहा-पाणी-जेवण सारं करीत होती. कंपवात सुरू झाल्यावर मात्र थोडी कुरबुर सुरू झाली. ‘‘संजय, माझ्या एकटीच्यानं नाही होणार. तुम्ही येऊन थांबत जा.’’ ती ‘नानांना तुमच्याकडे न्या,’ असं म्हणाली नाही. कारण ते एकतर चांगलं दिसलं नसतं, शिवाय फ्लॅटचा प्रश्न होता, हे नवरा-बायको दोघंही जाणून होते. सगळया नातेसंबंधांच्या मुळाशी आर्थिक हितसंबंध असतात हे नाकारण्यात काही अर्थ नाही, हे कटू; म्हणूनच सत्य.

संजयनं नानांच्या तैनातीत त्यांच्या घरीच जवळपास मुक्काम ठोकला. त्याच्या परीनं तो वडिलांची सगळी सेवा करत होताच, पल्लवीचीही जशीतशी साथ होती. तिच्या आईचं अखेरचं दुखणं तिनं पाहिलं होतं. मात्र या नव्या विचित्र भ्रमानं सारीच समीकरणं बदलली. हा संशयभ्रम आहे, वगैरे सारं समजावूनही पल्लवी बिथरायची ती बिथरलीच. एकतर नवरा सतत फिरतीवर, त्यात नानांच्या व्याधीचं हे विचित्र स्वरूप तिला असह्य होऊ लागलं. मनोविकारांच्या लक्षणांचं एक भ्रामक का असेना, सत्य असतं. ते समजून घेणं कठीण. खूप समजावूनही पल्लवी मुलांना घेऊन माहेरी निघून गेली.

आता उरले दोघे भाऊ आणि विकलांग वडील. त्यातही संजयला पुढाकार घ्यावा लागला. नाना बिछान्याला खिळले तेव्हा शुश्रूषा केली. तासंतास त्यांच्याजवळ बसून, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताना त्याला बालपणी पाहिलेले वडील आठवू लागले. वडिलांचं तारुण्य, मध्यमवय आणि पाहता पाहता आलेलं वार्धक्य.. कधी थकले वडील? कधी एकटे पडले? विकलांग झाले? दखलही घेतली नाही आपण. निरुपयोगी झाले म्हणून?

आणखी वाचा-स्त्री ‘वि’श्व : स्त्री हक्कांचे नेपाळी पडसाद

त्यापुढचा महिना संजयचे रात्री-बेरात्री मला फोन येऊ लागले. नानांच्या प्रकृतीतल्या लहानसहान चढउतारांची तो अतिकाळजी करू लागला. कंपवात कधी कधी अतिवेगानं शरीर आवळून घेतो. पाण्याचा छोटा घोटही गिळणं अवघड होऊन बसतं. कवी ग्रेस यांचे शब्द वापरायचे झाल्यास ‘साऱ्या इंद्रियांची माया प्राणात गोठून जाते, त्याच्या आभाळाचा घाट चढणे’ अवघड होऊन जाते.

नानांची शक्ती व्याधीच्या रेटयापुढे हळूहळू क्षीण पडू लागली. त्यांचं बोलणं कमी होत चाललं होतंच. आता उच्चारही अस्पष्ट होऊ लागले. मात्र बाप-लेकामध्ये बोलणं असताना जो ‘संवाद’ होऊ शकला नव्हता, तो आता निशब्द अवस्थेत होऊ लागला. नानांची ती स्थिर नजर संजयला सारं काही सांगून गेली. त्यांची कळकळ, त्यांची काळजी, तुटलेला ‘वाद-संवाद तो हितकारी,’ मूक अवस्थेत सारं घडत होतं. शब्दांवाचून कळले सारे, हे फक्त प्रेमातच होतं असं नाही. मरणातही होतं. कारण प्रेमात होतो तसा मृत्यूतही विलय होतो.

‘‘डॉक्टर, या तीस दिवसांत मी दोन गोष्टी अनुभवल्या..’’ संजय सांगत होता. ‘‘आई-वडील तुम्हाला नुसतं जगणं शिकवतात असं नाही, तर मृत्यू स्वीकारणंही शिकवतात. फक्त त्यांची अखेपर्यंत साथ करायला हवी. नानांनी मला मृत्यू शिकवला. नाना रडले नाहीत. शांतपणे स्वत:ची झीज स्वीकारत गेले. आणि एक गोष्ट..’’ संजय अडखळला. ‘‘मी त्या काळात तुम्हाला खूप त्रास दिला. रात्री-अपरात्री फोन केले, कारण..’’

मी कारण ओळखलं होतं. वडिलांची, आपलीही या वेदनेतून सुटका व्हावी, या विचाराची परिणती सुप्त मनात ‘वडील मरावेत’ अशी होते. त्यानं अपराधी भावनेचा प्रचंड दबाव निर्माण होतो. हे सगळे अंतर्मनात चालणारे सुप्त, अशब्द विचार. ते दाबून टाकण्यासाठी माणूस अतीव काळजी करू लागतो. त्या अपराधी भावनेपोटीच संजय मला बेरात्री फोन करत होता. ही ‘रिअॅतक्शन फॉर्मेशन’- प्रतिक्रियात्मक अवस्था. मनाची नैसर्गिक संरक्षक व्यवस्था. अस्वस्थ संजयला जेव्हा ते समजलं, त्या दिवशी तो अपराधगंडातून मुक्त झाला. त्याचा जगण्याशी, मृत्यूच्या वास्तवाशी, आयुष्यभर नव्हता तो वडिलांशी मुक्त संवाद सुरू झाला.

यथावकाश पल्लवी परत आली. नानांच्या जाण्याआधी. कदाचित तिलाही माणसाला समजून घेण्याचा, त्याच्या वागणुकीचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करण्याची सुबुद्धी झाली असेल. आमचे पूर्वजांशी संवाद असे सुरू होतात, होत राहतात. ते हयात असताना झाले तर उत्तम; नसताना झाले तरी पुढली पिढी मुक्त होत राहते. जीवन सुरू राहतं. ‘मरण्यात खरोखर जग जगते’ ते असं. नानांसारखं.

nmmulmule@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There should be free communication between parents and children mrj
Show comments