लग्नानंतरचे ते मंतरलेले दिवस. नव्या नवलाईने मी अहमदाबादला पोहोचले. माझ्या तैनातीसाठी आली होती, ‘थर्टी फाइव्ह ऑस्टिन.’ तिचीच ही धमाल सत्यकथा दिवाळीनिमित्त खास..
१९ ५४ साली माझं मनोहर यांच्याशी लग्न झालं आणि त्यांच्या नोकरीच्या गावी मी पुण्याहून अहमदाबादला गेले. हे तेव्हा कॅलिको मिलमध्ये नोकरी करत होते. गुजरात प्रांत नवीन, त्यामुळे गुजराती भाषा नवीन, अहमदाबाद गाव नवीन. अशा वातावरणात संसार सुरू होणार होता. लग्न होऊन फक्त ८ दिवस झाले होते. आयुष्याचा जोडीदार बरोबर होता. अंगावरच्या कपडय़ांना आणि दागिन्यांना अजून कोरा वास येत होता आणि या सगळ्या कोरेपणाचा सुखद अनुभव घेत मी अहमदाबाद स्टेशनवर उभी होते. स्टेशनवर छोटी छोटी दुकानं होती. त्यावरच्या सगळ्या पाटय़ा गुजराथी भाषेत होत्या. काही वाचता येत नव्हतं. मनोहर ट्रेनमधून सामान काढून घेण्याच्या गडबडीत होते.
इतक्यात माझ्या मागून एक जवळून पश्न आला, ‘‘बेन, केटला डागिना छे तमारे पासे?’’.. मी मान वळवून पाहिलं. एक हमाल हा प्रश्न विचारत होता. मी पटकन गळ्यातल्या दागिन्यांवर हात ठेवला आणि पुटपुटले, ‘‘तुला रे काय करायचंय, माझ्याजवळ किती दागिने आहेत ते?’’ इतक्यात सामान ठेवून आलेल्या मनोहर यांच्या लक्षात सगळा घोळ आला. ते पटकन माझ्याजवळ येत म्हणाले, ‘‘अगं, तुझे दागिने नाही तो विचारत आहे. डाग हे सामानाचे डाग!’’ ..मी थोडी ओशाळले. मनात आलं, आता इथं राहायचं म्हणजे प्रथम इथली भाषा शिकून घ्यायला हवी. मग आम्ही दोघं, तो हमाल, ते सामान सर्वजण स्टेशनच्या बाहेर आलो आणि ज्या ‘थर्टी फाइव्ह ऑस्टिन’ची मजा मी तुम्हाला सांगणार आहे, तो प्रवास इथूनच सुरू झाला..
       त्याचं काय झालं होतं की, लग्नाआधी आम्ही दोघं काही दिवस एकमेकांना पत्र लिहीत होतो. त्यात एकदा यांनी लिहिलं होतं, ‘‘मी एक गाडी घेतली आहे- ‘थर्टी फाइव्ह ऑस्टिन!’ आणि मी सध्या चालवायला शिकतो आहे. त्यासाठी ड्रायव्हर ठेवला आहे..’’  हे सगळं वाचून मी हुरळून गेले होते. कारण माझ्या माहेरी तेव्हा गाडी नव्हती. त्यामुळे लग्नानंतर नवऱ्याबरोबर आपण गाडीतून फिरणार याचा मला खूप आनंद झाला होता.
त्यामुळे अहमदाबाद स्टेशनच्या बाहेर आल्यावर कधी एकदा गाडी बघते, असं मला झालं होतं. बाहेर अहमदाबादमधल्या मिल ओनर्सच्या इंपोर्टेड गाडय़ांची भलीथोरली रांग लागली होती. त्या सगळ्याच इतक्या चांगल्या होत्या की, माझ्या मनात एक पोरकट विचार आला, की त्यातली कोणतीही आमची असती तरी मला चालणार होतं.. शेवटी न राहवून मी यांना अगदी अधीरतेनं विचारलं, ‘‘अहो, यातली आपली कुठली हो?’’
तर अगदी टोकाला इतरांच्या तुलनेत काडेपेटीसारख्या दिसणाऱ्या गाडीकडे बोट दाखवत म्हणाले, ‘‘तीऽऽबघ. शेवटची लाइट ब्लू रंगाची – छोटीशी!’’
माझा अर्धा हुरूप तिथेच गळून पडला आणि गाडीजवळ गेल्यावर उरलासुरलाही निघून गेला.
पुढचे दोन डोळे (दिवे) दोन दिशांना होते. गाडीचा सगळा रंग उडाला होता. उजव्या बाजूला एक रबरी हॉर्न होता- पॉ पॉ करणारा! ..मी गाडीला प्रदक्षिणा घालून ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसले. दार बंद करायला गेले, तर पूर्वीच्या काळी आपल्या नहाणीघराला आडवी कडी असायची, तशी कडी होती. ती लावून घेऊन मी नीट बसले. आता माझं गाडीच्या आतल्या बाजूचं निरीक्षण सुरू झालं. मागली सीट सिंहासनासारखी उंच होती. पुढे एक पारा उडालेला फुटका आरसा लोंबकळत होता. माझं हे सगळं निरीक्षण चालू होतं, तोवर यांनी गाडीला चार हँडलं मारली आणि जेव्हा तिच्यात जीव आला, तेव्हा माझ्या शेजारच्या म्हणजे ड्रायव्हरच्या सीटवर येऊन बसले आणि खदडक, खदडक करत खडीचा इंजिनसारखी आमची वरात घराच्या दिशेनं निघाली..
मी चेहऱ्यावर कसलाही भाव न दर्शविता स्थितप्रज्ञासारखी बसून होते. कारण आमचं लव्ह मॅरेज नव्हतं, त्यामुळे नवऱ्याचा स्वभाव अजून माहीत झाला नव्हता. उगीच काहीतरी कॉमेंट केली आणि यांना आवडलं नाही तर काय करणार!
पण ‘हे’ मात्र मधून मधून तिरक्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत माझ्या प्रतिक्रिया अजमावत होते- गालातल्या गालात हसत! तरी मी मख्खच! थोडय़ा वेळानं म्हणाले, ‘‘७०० रुपयाला घेतली!’’ मी म्हटलं, ‘‘हो का?!’’ अर्थात त्या काळी ७०० रुपयेसुद्धा खूप वाटायचे.. आणि थोडय़ा वेळानं म्हणाले, ‘‘अगं, वाईट वाटून घेऊ नकोस. आपल्याकडे थोडे पैसे जमले ना की, आपण हिच्यापेक्षा चांगली गाडी घेऊ.’’ मी म्हटलं, ‘‘अहो, ही काय वाईट आहे? चार चाकं आहेत, वर टप आहे आणि चालतीय. आपल्याला आणखी काय हवं. फिरायला मिळाल्याशी कारण!’’ – एका दमात मी चार वाक्यं बोलून टाकली. नाहीतरी नवऱ्याला खूश करण्याचेच ते दिवस होते.
करता करता आमची वरात घरी आली आणि नंतर ती गाडी आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसली. तुम्हाला सांगते, रोज सकाळ झाली की, ‘हे’ हत्यारं घेऊन गाडीखाली शिरायचे. कधी बॉनेट उघडायचे, कधी डिकी उघडून स्टेपनी चेक करायचे. कधी हॉर्न-कधी काय कधी काय! अहो, रोजच तिचं काही ना काही बिघडलेलं असायचं.. ती जेव्हा चालायची तेव्हा डकाव डकाव करत थोडीतरी चालायची. पण एकदा का थांबली की थांबली. दोन दोन दिवस तिथून हलायची नाही..
..आणि अहमदाबादमधल्या सगळ्या पोलिसांना तिचं हे असं वेळीअवेळी थांबणं माहीत झालं होतं. त्यामुळे लांबून आमची गाडी येताना दिसली की, झटकन हात बदलून आम्हाला ते जाऊ द्यायचे. कारण त्यांना माहीत होतं की, ‘ही जर का चौकात थांबली तर आपल्यालाच ढकलायला लागेल, म्हणून हातानं आदबशीरपणे दाखवायचे- ‘पहले आप, पहले आप!’
मजा म्हणजे असल्या डबडय़ा गाडीसाठी आमच्या सोसायटीतले दोन बॅचलर्स कॅलिकोपर्यंत लिफ्ट मिळावी म्हणून थांबायचे. कारण त्यांना दोन बसेस टाळायच्या होत्या. पण यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की, ‘‘हे पाहा, मी पुरी गाडी थांबवणार नाही, ती साधारण स्लो झाली की तुम्ही आत उडय़ा टाका.’’ ते टाकायचे. संध्याकाळी पुन्हा तेच! ‘गाडी स्लो झाली की त्यांच्या बाहेर उडय़ा!’.. एकदा असं झालं, की त्या रबरी हॉर्नला पडलं भोक. तो वाजेनासा झाला. मग आमचा मिरचंदानी नावाचा मित्र होता तो कॅलिको मिल येईपर्यंत बाहेर तोंड काढून ‘बाजू बाजू’ असं ओरडत होता.
कधी कधी आम्ही दोघं रात्री मून लाइट ड्राइव्हला जायचो. पण तो आनंद १२ तास काही टिकायचा नाही. दुसऱ्या दिवशी सोसायटीतलं हमखास कुणीतरी विचारायचं, ‘‘रात्री नवे नवरानवरी ड्राइव्ह गेले होते वाटतं. आम्ही ‘आवाज’ ऐकला.’’ मग माझा चेहरा पडायचा!
एकदा माझे आई-वडील लेकीचा संसार बघायला पुण्याहून आले. यांना भलताच हुरूप आला. म्हणाले, ‘‘चल, तुझ्या आई-वडिलांना आपण अहमदाबाद शहर दाखवून आणू.’’ मला जरा धस्सच झालं. पण मी म्हटलं ‘‘बरं!’’ .. मग माझे आई-वडील मागच्या सिंहासनावर बसले आणि आम्ही दोघं पुढे! आमची कंडक्टेड टूअर निघाली आणि यांची कॉमेंट्रीही सुरू झाली.
‘‘..हा सारखेज रोड, हा एलिस ब्रिज, हा डावीकडचा रस्ता साबरमती आश्रमाकडे जातो, हा भद्र एरिया, हा तीन दरवाजा- रतनपोळ.. मग खूप लांब गेलो. म्हणाले.. हा काकरिया तलाव’’.. तुम्हाला खोटं वाटेल, पण माझे वडील या सर्व टूअरमध्ये त्यांच्या बाजूचा दरवाजा घट्ट ओढून धरून बसले होते आणि शेवटी शेवटी दमून जाऊन जावयाला खालच्या आवाजात काकुळतीनं म्हणाले, ‘‘आम्हाला दिसलं एवढं अहमदाबाद पुरे. आपण घरी जाऊ या.’’ त्यांना सारखी भीती वाटत होती की कुठल्याही क्षणी ते दार निखळून पडेल.
बाकी त्या गाडीबद्दल अशी धास्ती नेहमीच वाटायची. आमचे सगळे मित्र आम्हाला नेहमी विचारायचे, ‘‘निमकर, तुम्ही दोघं नवरा-बायको तुमच्या गाडीत नेहमी कडक आणि ताठ बसलेले का दिसता? कध्धी रिलॅक्स्ड दिसत नाही.’’ मी सांगायची, ‘‘अहो कसे रिलॅक्स्ड बसणार? या गाडीचा कुठला पार्ट केव्हा बाहेर येईल, याचा नेमच नाही. त्यामुळे सावध असतो.’’
आणि एकदा तसंच झालं. आम्ही दोघं कुठूनतरी गाडीतून येत होतो. ‘हे’ अगदी इंग्लिश गाणं म्हणायच्या मूडमध्ये होते. एवढय़ात एक चाक निघालं, ते शेतात जाऊन पडलं. ..पण असं काही झालं, तरी हे शांत असायचे. त्या दिवशी ते शेतात गेले. चाक घेऊन आले. ते मागच्या सीटवर टाकलं. गाडीच्या काचा लावून घेत गाडी लॉक केली आणि म्हणाले, ‘‘चल आपलं घर जवळच आहे. चालत जाऊ. या गाडीचं काय करायचं, ते उद्या बघू. तिला चोरसुद्धा चोरणार नाही..’’ पण दुसऱ्या दिवशी गंमत झाली. गाडी सगळ्या अहमदाबादला माहीत झाली होती. अगदी टॉक ऑफ दी टाऊन होती. तेव्हा तीन चाकावर गाडी उभी आहे पाहिल्यावर यांना मिलमध्ये फोनवर फोन यायला लागले, ‘‘निमकर, गाडी पाहिली रस्त्यात तीन चाकावर, तुम्ही दोघं बरे आहात ना?’’
तसं म्हणाल तर त्या गाडीनं खूप जणांची करमणूक केली. ‘खेर’ नावाचे जनरल मॅनेजर होते एका मिलमध्ये. आम्ही नवीन लग्न झालेले नवरा-बायको, शिवाय ‘मराठी’ म्हणून त्यांनी आम्हाला जेवायला बोलावलं. चौथ्या मजल्यावर घर होतं. जेवून परत निघालो, तेव्हा ते पण आमच्याबरोबर खाली उतरायला लागले. आम्ही म्हटलं, ‘‘आपण कशाला खाली येता? उगीच पुन्हा चार मजले चढायचे. आम्ही जाऊ. तीन-चार वेळा त्यांना सांगितलं तरी ते येत राहिले. शेवटी त्यांनी आम्हाला खरं कारण सांगितलं आणि म्हणाले, ‘‘मी तुम्हाला सोडायला येतच नाही आहे. मला गाडी कशी सुरू होते आणि चालते, हे पाहायचं आहे..!’’
          एकदा कॅलिको मिलमध्ये फ्रान्सहून डेलिगेशन आलं. ‘हे’ प्रवेशद्वाराजवळच गाडी पार्क करायचे. त्या लोकांना वाटलं, मिलची जुनी आठवण, म्हणून ही ‘अँटीक पीस’सारखी ठेवली असेल. पण ती ‘चालते’ हे समजल्यावर तिच्याभोवतीच सगळेजण जमले. तिचे सगळ्या अँगलनं फोटो काय, काय काय चाललं होतं.
एकदा मात्र प्रसंगच आला. आमच्या छोटेखानी बंगलेवजा सोसायटीत मागल्या बंगल्यात त्रिवेदी राहात होते. त्यांच्या सुनेचे नऊ महिने नऊ दिवस भरले होते आणि तिचं पोट लागलं दुखायला आणि त्रिवेदी धावत सांगायला आले, ‘‘निमकरसाहेब, माझ्या सुनेचं पोट दुखायला लागलंय. प्लीज, तुमच्या गाडीनं तिला प्रसूतिगृहात पोचवा.’’ मी जरा घाबरलेच. मनात आलं, गाडी जर अध्र्या रस्त्यात बंद पडली आणि ती बाई गाडीतच बाळंतीण झाली तर? आता ही जराशी अतिशयोक्ती वाटेल. पण मनात काय आलं ते सांगितलं! मी त्यांना म्हटलं, ‘‘त्रिवेदीसाहेब, अहो आम्हाला तुमच्या सुनेला घेऊन जायला काही नाही, पण तुम्ही बघताय रोज तिचं काय चाललंय ते. ती जायला नको का दवाखान्यापर्यंत?’’ त्रिवेदी पुन्हा आर्जवानं म्हणाले, ‘‘प्लीज, नाही म्हणू नका. सोसायटीत आज कुणाचीच गाडी दिसत नाही आहे. म्हणून तुमच्याकडे आलो..’’ शेवटी ती त्यांची सून कशीतरी गाडीत बसली. मी गाडीच्या पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं, ‘‘बाई गं शहाण्यासारखी वाग. मनातल्या मनात देवाचाही धावा केला आणि तुम्हाला सांगते, कशी शहाण्यासारखी प्रसूतिगृहापर्यंत गेली आणि परत आली.
तशी ती शहाणीच होती. पण पुढे तिचं फारच व्हायला लागलं. महिन्याच्या ३० दिवसांपैकी २५ दिवस बंद! मग यांनी विकून टाकायचं ठरवलं. ७०० रुपयाला घेतलेली गाडी ५०० रुपयाला देऊन टाकली.
ती घरातून गेली आणि मला खूप वाईट वाटलं. ती म्हणजे आमच्या घराची सदस्यच झाली होती. कशी का असेना, पण आम्ही तिच्यातून खूप फिरलो होतो. ते मंतरलेले दिवस मी कधीच विसरणार नाही. नंतरच्या आयुष्यात कुणी अगदी काँटेसा, बी. एम. डब्ल्यू, कॅडिलॅक किंवा अगदी मर्सिडीस जरी माझ्या घरासमोर ठेवली असती, तरी त्या गाडीची सर कशालाच आली नसती.

Case against former Shiv Sena corporator Mohan Ugle in Kalyan
कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर गुन्हा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Cockroach in Coffee
Cockroach in Coffee : मालाडच्या इनॉर्बिट मॉलमधल्या कॅफेत कोल्ड कॉफीत आढळलं झुरळ, ग्राहकाची थेट पोलिसात धाव
Who is Juli Vavilova, mystery woman present with Telegram CEO Pavel Durov during his arrest
टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव्हच्या अटकेदरम्यान त्यांच्याबरोबर असलेली गूढ महिला जुली वाविलोवा नक्की आहे तरी कोण?
Escaping with a girl met on Facebook Nagpur crime news
प्रेमविवाहानंतरही पतीचे विवाहित महिलेसोबत पलायन
Anurag dead body, post-mortem, custody,
शवविच्छेदनानंतर अनुरागचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
mumbai police marathi news
नेता अडकला, पण कार्यकर्ते खंबीर…मुंबईच्या रस्त्यावर आत्महत्येचे प्रात्यक्षिक…
Raj Thackeray Speech in Yavatmal
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भाषणात पॅराग्लायडरच्या गिरक्या; वर पाहात म्हणाले, “हा माणूस…”