‘इतिश्री’ किंवा ‘क्लोजर’चा अर्थच असा, की भूतकाळातल्या सल, जखमांना स्पष्ट जाणिवेनं सामोरं जाणं, दुसऱ्यावर दोष न टाकता, स्वत:ची जेवढी असेल तेवढी जबाबदारी प्रामाणिकपणे मान्य करणं, आपल्या मनाच्या उलाढालींचं संतुलन फक्त आपणच करू शकतो याचं भान घेणं. ‘इतिश्री’चा हा शेवटचा लेख तुमचं मानसिक आणि पर्यायाने शारीरिक आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा उपाय सांगणारा…
साधारण दोन वर्षांपूर्वी, म्हणजे २०२३ च्या १४ जानेवारीला ‘एक प्रगल्भ सुरुवात’ या शीर्षकांतर्गत ‘चतुरंग’मध्ये मी एक लेख लिहिला होता. त्यामध्ये, आपल्या मनात अडकून बसलेल्या, सतत अस्वस्थ करणाऱ्या जुन्या गोष्टी चांगल्या पद्धतीने मनावेगळ्या करून नव्याने सुरुवात करणं (मूव्ह ऑन) या विषयाला धरून चार प्रसंग सांगितले होते. जुन्या घराच्या ‘वास्तू’मधली मानसिक गुंतवणूक, ब्रेक-अपनंतरचं जोडीदाराशी नातं, मोठ्या झालेल्या मुलाच्या लहानपणातच आई गुंतलेली असताना, मुलाच्या मनातल्या ‘बाँडिंग’च्या बदललेल्या व्याख्या आणि लहानपणी आपल्याला अनाथालयात सोडून निघून गेलेल्या आईबद्दलचा तिच्या मुलीच्या मनात उरलेला ‘सल’ असे चार विषय होते. त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘भावनिक परिपूर्ती – इमोशनल क्लोजर’वर आधारलेल्या या ‘इतिश्री’ सदराची ती नांदी असावी.
हेही वाचा – अधिक मुलांचा पर्याय खरंच आहे का?
२०२३चं पूर्ण वर्ष माझ्या मनात हा विषय नकळत रुजत होता. त्यामुळे, माझ्याकडे सल्ल्यासाठी येणाऱ्या लोकांच्या मनातले विविध प्रकारचे पुन्हा पुन्हा येणारे, ताण, चिंता, निराशा (Stress/ Anxiety/ Depression) पाहताना, सर्वाधिक समान समस्या मनात आपोआप नोंदवल्या गेल्या. ‘मुलं लग्न करायला /अपत्य होऊ द्यायला तयार नाहीत’ याबद्दल बहुसंख्य पालकांच्या मनातली तीव्र चिंता, ‘लग्न करू की नको?’ तेच कळत नाही, करायचं असेल तर योग्य जोडीदार कसा निवडायचा? लग्न झाल्यानंतर एकमेकांच्या अपेक्षा कशा ओळखायच्या? सांभाळायच्या? नाती कशी निभवायची?, पती-पत्नींची एकांताची गरज आणि नातलगांचा हस्तक्षेप, नवविवाहित सुनेकडून सासरच्यांच्या रूढ, अविवेकी अपेक्षा आणि समज-गैरसमज, विवाहबाह्य नातेसंबंध, मैत्रीतल्या अपेक्षा, पौंगडावस्थेतील मुलांचं वागणं आणि पालक, आजच्या तरुण पिढीचे ताण, बदललेल्या काळाची गरज पालकांना न समजणं, आई आणि मुलीची स्पर्धा, राग अशा अनेक विषयांचं महत्त्व आणि गरज मला माहीत होती. मात्र लेखांना आलेला प्रतिसाद पाहता, या समस्या किती मोठ्या प्रमाणात ‘सार्वत्रिक’ आहेत याची व्याप्ती मलाही नव्याने समजली. अशा समस्यांतून बाहेर पडण्याची वाट काही वाचकांना जरी दिसली असेल तरी ‘इतिश्री’चा हा लेखनप्रपंच सार्थकी लागला असं वाटेल.
समुदायासाठी लिहिताना, जास्तीत जास्त वाचकांना, ही ‘माझी’ समस्या मांडली आहे, असं वाटणं आणि त्याकडे रूढ दृष्टिकोनापेक्षा वेगळ्या दिशेनेही पाहता येऊ शकतं याची जाणीव करून देणं हा दृष्टिकोन होता. त्यामुळे मानसशास्त्रीय भाषा, संज्ञा आवर्जून टाळल्या. अतार्किक अपेक्षा, गोष्टींचं भयंकरीकरण, सर्वसामान्यीकरण, पूर्वग्रह, मनात चालणारी स्वगतं – ‘सेल्फ टॉक’ आदी. संकल्पना स्पष्ट करण्यासाठी रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आणि साधी भाषा वापरली. हे सुलभीकरण करण्याचा प्रयत्न मला समस्यांच्या आणखी मुळाशी नेत होता. स्पष्टता वाढल्यामुळे समस्यांचं समाधान सोपं वाटायचं, पण लिहितानाचं सुलभीकरण सोपं नव्हतं. काही वाचकांचा, ‘फारच कॉमन समस्या आहेत, किचकट समस्याही मांडाव्यात’ असाही सल्ला होता. मात्र मांडलेल्या समस्यांच्या सगळ्या मिती उलगडणं वृत्तपत्रीय विषय आणि शब्दसंख्येच्या मर्यादेत अवघड असल्यामुळे त्यातल्या जास्त महत्त्वाच्या वाटलेल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं. समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि विविध पर्याय मांडण्याचा उद्देश होता, कुणाचीही बाजू घेण्याचा नव्हता हेदेखील आवर्जून नमूद करायचंय.
मी समुपदेशनासाठी मुख्यत: डॉ. अल्बर्ट एलीस यांची विवेकनिष्ठ उपचारपद्धती (REBT) वापरते. यामध्ये भावनांचं व्यवस्थापन (मॅनेजमेंट) किंवा भावनांवर ताबा (कंट्रोल) ही संकल्पना नसते, तर भावनिक जाणीव / भावना आणि विचारांमधल्या संबंधाचं भान (अवेअरनेस) यावर काम केलं जातं. प्राधान्य आणि पर्याय यांचा विचार करायचा असतो. रूढार्थाने नॉर्मल समजल्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला, जगात कुठलं वागणं चूक/बरोबर, चांगलं/वाईट समजलं जातं याचं ‘वैश्विक ज्ञान’ असतंच. तरीही समस्या का सुटत नाहीत? जास्त किचकट का होतात? कारण बऱ्या-वाइटाचं ‘ज्ञान’ (नॉलेज) असणं आणि आपल्या स्वत:च्या बाबतीत, स्वत:च्या परिस्थितीत त्याचं ‘भान’ (रियलायझेशन) येणं यातलं अंतर खूप मोठं असतं, प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं. त्यामुळे प्रत्येकाला अडकवणारी चक्रं सारखी असली तरी कुठल्याही समस्येचं एकमेव ‘रामबाण’ उत्तर असू शकत नाही. प्रत्येकाचा स्वभाव, कौटुंबिक पार्श्वभूमी, कुटुंबीयांचे स्वभाव, पूर्वग्रह, पूर्वानुभव अशा अनेक घटकांवर ते अवलंबून असतं. मला काय हवंय? माझी गरज काय आहे? याचे प्राधान्यक्रम ठरवणं तसंच आपल्या स्वत:च्या परिस्थितीत आपल्या वागण्याचे, निर्णयाचे परिणाम काय होतील? निर्णयाची जबाबदारी आपण झेलू शकतो का? हे तपासणं महत्त्वाचं असतं. वागणं किंवा निर्णय योग्य की अयोग्य हे परिणामांवरूनच ठरतं.
हेही वाचा – एक होतं गृहिणी विधेयक!
कुटुंबीय, मित्र वगैरेंच्या अनुकरणातून, सिनेमा-नाटकं, वेबसेरीज पाहून, पुस्तकं वाचून आपण मन दुखवून घ्यायला, नकारात्मक प्रतिक्रिया द्यायला लहानपणापासून शिकतो. समर्थन, दोषारोप करणारे ‘सेल्फ-टॉक’ मनात फेर धरून असतात. भावनिक चक्रव्यूहात शिरायला अबोध वयापासूनच यायला लागतं. पण त्यातून बाहेर पडायचा रस्ता, भावना ओळखून प्रोसेस करणं शिकायचं राहून जातं. ही ‘भावनिक सजगता’ सामुदायिक पातळीवर पेरता येते का? ते पाहण्याचा ‘इतिश्री’ सदरातून प्रयत्न केला. ‘त्रास देणारे प्रश्नच बदलायचे’ हा यातला कळीचा आणि थेट मुद्दा. ‘ज्यांना लॉजिकल उत्तर नसतं, असे प्रश्न आपल्याला गरगरवत ठेवतात’. डोक्यात ‘केमिकल लोचा’ करणारे, ‘माझंच नशीब असं का?’ – Why Me?, तेव्हा तसं का घडलं? त्यांनी का गैरसमज करून घेतले? यासारखे, ज्याचं उत्तर नेमकं कोण देणार आहे ते माहीतच नसतं. असे ‘भावनिक’ प्रश्न बाजूला सरकवून त्याऐवजी उत्तरं असलेले लॉजिकल – ‘विवेकी’ प्रश्न शोधले तर उत्तर तरी मिळतं किंवा उत्तराकडे नेणारे नवे प्रश्न मिळतात. प्रत्यक्ष ‘डेटा’ तपासल्याने उत्तरं सरळच हातात पडतात आणि चक्रव्यूह तोडण्याचा रस्ता सापडतो, विचार आणि भावना यांचं संतुलन करण्याची ही पद्धत एकदा समजली, वापरली की सवयीने मनात रुजते आणि कायमची आपल्या स्वभावाचा भाग बनू शकते. मग भावनिक ताण कमी होतो किंवा त्यातून लवकर बाहेर पडता येतं. हा विचार या सदरातील सर्व कथांचा गाभा होता. ‘इतिश्री’तल्या लेखांमधून स्पष्ट किंवा सूचित केलेले काही प्रश्न जाता जाता टिप्स म्हणून :
मनात उमटणाऱ्या नेमक्या कोणत्या वाक्यांमुळे मला त्रास होतो? भावना ‘ट्रिगर’ होतात?
एखाद्या गोष्टीला ‘नाही’ म्हणायचं असताना ‘हो’ म्हटलं जातं, त्यामागे मला कशाची भीती वाटते? ती किती तार्किक आहे?
थोड्या काळासाठी मला माझा ‘कम्फर्ट झोन’ बाजूला ठेवून दुसऱ्याच्या जागेवरून पाहता येईल का?
गेल्या कित्येक वर्षांत एखादी गोष्ट घडली नसेल, तर ती यापुढे कशावरून घडेल? काय बदललं पाहिजे? त्यातलं काय खरोखर बदलता येईल?
मला जर माझा स्वभाव बदलता येत नसेल तर दुसऱ्याने बदलावं, माझ्या इच्छेप्रमाणे वागावं अशी अपेक्षा मी का करावी?
वर्षांनुवर्षाचे मनातले सल आणखी किती काळ उगाळायचे? मागे जाऊन बदलण्यासाठी माझ्याकडे टाइम मशीन आहे का?
माझ्या अपेक्षा जुन्या संदर्भातूनच होताहेत का? काळ बदलला म्हणजे नेमकं काय बदललं?
आपण आपल्याच काळाच्या फुग्यात अडकून त्रास करून घ्यायचा, की काळाची पावलं ओळखून अपेक्षांना वळवून घ्यायचं?
माझ्या वागण्यातून संदेश कुठला जातोय? मला वागण्यातून कुठला परिणाम हवाय?
कालपर्यंत चुकलं असेलही पण आज, घडलेल्या गोष्टीतली ‘माझी जबाबदारी’ किती? माझ्या हातात आता काय आहे? यापुढे काय करणं शक्य आहे?
स्वत:च्या मनाच्या शांतीसाठी थोडेसे वैचारिक कष्ट घेण्याची ज्यांची तयारी असेल, त्यांना स्वत:ला छळणारे, उत्तर नसलेले भावनिक प्रश्न शोधणे आणि त्या जागी वर दिलेल्या प्रश्नांसारखे उत्तर मिळणारे प्रश्न ठेवणे हा स्वाध्याय उपयोगी पडू शकतो.
‘इतिश्री’ किंवा ‘क्लोजर’चा अर्थच असा, की भूतकाळातल्या सल, जखमांना स्पष्ट जाणिवेनं सामोरं जाणं, दुसऱ्यावर दोष न टाकता, स्वत:ची जेवढी असेल तेवढी जबाबदारी प्रामाणिकपणे मान्य करणं, आपल्या मनाच्या उलाढालींचं संतुलन फक्त आपणच करू शकतो याचं भान घेणं. वस्तुस्थितीचा स्वीकार होणं आणि त्या परिस्थितीतून काहीतरी शिकून स्वत: वाढणं. आपण सगळे मिळून ‘आज’मध्ये जगायला शिकणं हा नव्या वर्षांचा संकल्प करू या, भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्त होऊन एकमेकांना शुभेच्छा देऊ या. कवी/गायक स्वानंद किरकिरे यांच्या ‘रे मन’ या गीतातल्या काही चपखल ओळी शेअर करून आपल्या सर्वांचा निरोप घेते.
रे मन…
भीड हैं खयालोंकी, एक अकेला मन।
खींचता दिशा दिशा, तनाव बेरहम ।
नोचती, खरोंचती, ये सोच जखम दे ।
कोई मेरे मनको, लगा दे मरहम ।
दिल मे जो सहमा सहमा डर है, या मलाल है।
सच कहूं, जो भी है वो सिर्फ एक खयाल है ।
तेरेही तसव्वूरोंका खोखला कमाल है ।
मुस्कुरा, क्यूं दर्द की लडियाँ पिरोता रे ।
खोल दे, तू इस घडी सुकून का झरोका रे ।। (तसव्वूर = कल्पना)
neelima.kirane1@gmail.com