सध्या सुरू असलेले महेंद्र कानिटकर यांचे ‘स्त्री-पु. वगैरे वगैरे’ हे सदर विवाह संस्था, त्यामधील अडथळे, पती-पत्नी यांच्यातील दुरावा यावर समुपदेशन करणारे उत्तम सदर आहे. १५ डिसेंबरच्या पुरवणीतील त्याचा लेख व उदाहरणे योग्य पद्धतीने मांडली आहेत. पण यात उल्लेख असलेली स्त्रीची भूमिका जशी आहे तशी पुरुषांची का नसते, त्यांना का नाही वाटत आपला संसार सुखाचा असावा? बरेचदा प्रयत्न स्त्रियाच करत असतात. काही अंशीच पुरुष प्रयत्न करणारे असतात. ज्या लोकांच्या संसारामध्ये एकही जण पाऊल मागे घेण्यास राजी नसेल तर अशा परिस्थितीत काय करावे? बरेच लोक त्यांचे संसार अगदी खेचल्यासारखे रेटत असतात आणि सोसत सोसत लग्नाची पंचवीशी गाठतात. खरं म्हणजे हेच वय धोक्याचं असतं. आजाराला आमंत्रण देणारं असतं. केवळ मानसिक स्वास्थ्य नसल्यामुळे, अशा परिस्थितीत मला वाटतं समजून घेणारी व्यक्ती जीवनात आली तर रडत-कुढत जगण्यापेक्षा नव्या व्यक्तीचा स्वीकार करताना मुलांच्या जबाबदारीतून बाहेर पडून पुढे न अडकता, मोहात न पडता नवा मार्ग स्वीकारावा. आतापर्यंत करायचे राहून गेलेल्या गोष्टीत जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करावा.
याच अंकातील अॅड. जाई वैद्य यांचा ‘नवऱ्याकडून बलात्कार’ हा लेख वाचताना प्रश्न पडतो की, फक्त पुरुषांमधेच ही वासना असते का? स्त्रीला नसते का? शरीरसुख हे फुलवत घ्यायचे असते. ज्याप्रमाणे झाडावर कळी येते व उमलते अगदी त्याप्रमाणे हे सुख घेतले पाहिजे. तरच त्या सुखाची गोडी व त्यातून मिळणारे, पाझरणारे प्रेम मिळू लागेल आणि ही वेळ येणार नाही. ज्याप्रमाणे एखाद्या प्रकरणी पुरुष जास्त शांत असेल आणि स्त्रीच्या भावना आवरता येत नसतील तर अशा वेळेस बायकोने मागणी केली तर त्याला काय म्हणायचे? बायकोने केलेला बलात्कार? पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रीच्या भावनांना विशेष महत्त्व दिले गेलेले नाही. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा नवरा-बायकोच्या बाबतीतही असतीलच ना? दोन्ही लेख वाचनीय व विचार करायला लावणारे आहेत.
-गौरी गोगटे, नाशिक
‘त्यांना’ही द्या संयमाचे डोस !
अॅड. जाई वैद्य यांनी ‘नवऱ्याकडून बलात्कार’ या लेखात एक मुद्दा मांडला आहे की, बाईचा तिच्या शरीरावरचा हक्क विचारात घेताना तिच्या जोडीदाराची लंगिक उपासमार होणार नाही ना, यावर चर्चा होणे गरजेचे आहे. तर नवऱ्याची लंगिक गरज तो प्रसंगी जबरदस्तीने बायकोकडून पूर्ण करेल असेच समजायचे का? आणि असेल तर याच न्यायाने -आपल्या जोडीदाराच्या लंगिक गरजेची परिपूर्ती करणे हे कर्तव्य मानले तर, जर नवरा त्याबाबतीत कमी पडत असेल तर बायकोने काय करावे यावरही विचार होणे गरजेचे आहे. नाहीतर बाईला फक्त संयमाचे सल्ले मिळणार असतील तर ते अन्यायकारक आहे.
नवऱ्याने केलेल्या जबरदस्तीला बलात्कार केव्हा म्हणावे? माझ्या दृष्टीने जर नवऱ्याने तिला आíथकदृष्टय़ा परावलंबी केले असेल आणि ती आपल्याला सोडून जाऊच शकत नाही याची खात्री पटल्यामुळे तो तिच्यावर संभोगाची जबरदस्ती करत असेल तर अशा परिस्थितीत तो बलात्कारच समजला जावा. आपल्या लग्न ठरवण्याच्या पद्धती सदोष आहेत. एकमेकांना आवडणे ही गोष्ट दुय्यम मानली जाते. लग्न संबंध जोडताना जात,धर्म, पसा, शिक्षण या वरवरच्या गोष्टींना महत्त्व दिले जाते. पण मुळात लग्न यशस्वी होण्यासाठी ही व्यक्ती मनापासून आवडण्याची जी गोष्ट असते ती विचारातच घेतली जात नाही. त्यामुळेही असे प्रश्न निर्माण होतात असे वाटते.
आमच्या जवळच्या नातेवाईकांपकी दोन जोडप्यांची उदाहरणे. (दोन्ही उदाहरणे ५० वर्षांपूर्वी लग्न झालेल्या जोडप्यांची आहेत.) एका जोडप्यातील नवरा सेक्स करण्यास पूर्णपणे असमर्थ होता. त्याची बायको टेलरींगचे शिक्षण झालेली व शाळेत नोकरी मिळू शकणारी होती. पण पुरुषार्थाच्या कल्पनांमुळे त्याने तिला नोकरी करू दिली नाही. मूल होत नाही म्हणून तिची सासू तिच्या मागे कटकट करायची. सोबतीला नातेवाईकांकडूनचे टोमणे होतेच. तिला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागे. या सर्व प्रकारांमुळे ती चिडचिडी व विक्षिप्त झाली. आपला नवरा षंढ आहे हे तिने आम्हाला तिच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी सांगितले. खरंतर त्याने सुरुवातीलाच आपल्यातील दोष मान्य करुन घटस्फोट द्यायला हवा होता. पण एवढी न्यायबुध्दी भारतीय नवऱ्यात कुठली असायला?
दुसऱ्या उदाहरणातील जोडप्याला तीन अपत्ये. पण तिची कामेच्छा नवऱ्याकडून पूर्ण होत नसे. तिने घटस्फोट घेण्याची इच्छा आपल्या वडिलांकडे व्यक्त केली. पण त्यांनी त्यास आडकाठी आणली. त्यामुळे तिने नोकराबरोबर संबंध ठेवले . अशा वेळी ती बाई दोषी ठरते का? कारण पुरुष जेंव्हा असे वागतो तेंव्हा त्याचे समर्थन केले जाते. हे चुकीचेच आहे.
स्मिता पटवर्धन, सांगली</p>