सध्या सुरू असलेले महेंद्र कानिटकर यांचे ‘स्त्री-पु. वगैरे वगैरे’ हे सदर विवाह संस्था, त्यामधील अडथळे, पती-पत्नी यांच्यातील दुरावा यावर समुपदेशन करणारे उत्तम सदर आहे. १५ डिसेंबरच्या पुरवणीतील त्याचा लेख व उदाहरणे योग्य पद्धतीने मांडली आहेत. पण यात उल्लेख असलेली स्त्रीची भूमिका जशी आहे तशी पुरुषांची का नसते, त्यांना का नाही वाटत आपला संसार सुखाचा असावा? बरेचदा प्रयत्न स्त्रियाच करत असतात. काही अंशीच पुरुष प्रयत्न करणारे असतात. ज्या लोकांच्या संसारामध्ये एकही जण पाऊल मागे घेण्यास राजी नसेल तर अशा परिस्थितीत काय करावे? बरेच लोक त्यांचे संसार अगदी खेचल्यासारखे रेटत असतात आणि सोसत सोसत लग्नाची पंचवीशी गाठतात. खरं म्हणजे हेच वय धोक्याचं असतं. आजाराला आमंत्रण देणारं असतं. केवळ मानसिक स्वास्थ्य नसल्यामुळे, अशा परिस्थितीत मला वाटतं समजून घेणारी व्यक्ती जीवनात आली तर रडत-कुढत जगण्यापेक्षा नव्या व्यक्तीचा स्वीकार करताना मुलांच्या जबाबदारीतून बाहेर पडून पुढे न अडकता, मोहात न पडता नवा मार्ग स्वीकारावा. आतापर्यंत करायचे राहून गेलेल्या गोष्टीत जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करावा.
याच अंकातील अॅड. जाई वैद्य यांचा ‘नवऱ्याकडून बलात्कार’ हा लेख वाचताना प्रश्न पडतो की, फक्त पुरुषांमधेच ही वासना असते का? स्त्रीला नसते का? शरीरसुख हे फुलवत घ्यायचे असते. ज्याप्रमाणे झाडावर कळी येते व उमलते अगदी त्याप्रमाणे हे सुख घेतले पाहिजे. तरच त्या सुखाची गोडी व त्यातून मिळणारे, पाझरणारे प्रेम मिळू लागेल आणि ही वेळ येणार नाही. ज्याप्रमाणे एखाद्या प्रकरणी पुरुष जास्त शांत असेल आणि स्त्रीच्या भावना आवरता येत नसतील तर अशा वेळेस बायकोने मागणी केली तर त्याला काय म्हणायचे? बायकोने केलेला बलात्कार? पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रीच्या भावनांना विशेष महत्त्व दिले गेलेले नाही. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा नवरा-बायकोच्या बाबतीतही असतीलच ना? दोन्ही लेख वाचनीय व विचार करायला लावणारे आहेत.
-गौरी गोगटे, नाशिक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा