प्रशांत दळवी

‘चारचौघी’ नाटकातल्या आईचं ‘आईपण’ आणि ‘बाईपण’ हे जितकं त्या कुटुंबाचं, तितकंच त्या काळातल्या सामाजिक बदलांचाही एक भाग होतं. म्हणूनच की काय मग मी तिला संपूर्ण जाणून घेण्याचा अट्टहास करत बसलो नाही. कारण ती ‘आई’ जितकी माझी ‘निर्मिती’ होती.. तितकीच एका व्यापक भवतालाचीही निर्मिती होती..

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
The Nagpur Bench of Bombay High Court ruled on girls entitlement to maintenance
अविवाहित मुलीला वडिलांकडून पोटगी मिळू शकते? न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय….

खंरं तर आमच्या घरी अत्यंत मोकळंढाकळं आणि प्रागतिक वातावरण. त्यामुळे कुटुंबातल्या वातावरणामुळे अस्वस्थ होऊन वगैरे मी स्त्रियांच्या प्रश्नाकडे ओढला गेलो असं नव्हे. पण माझ्या पहिल्याच ‘स्त्री’ या एकांकिकेमुळे घरापलीकडच्या स्त्रियांकडे मी अधिक जागरूकतेनं पाहू लागलो हे मात्र खरं. पुढे माझ्या जवळ-जवळ प्रत्येक नाटकातली ‘स्त्री’ ही केवळ व्यक्तिरेखा न राहता तिनं घेतलेले निर्णय हे नाटकाचा केंद्रिबदू ठरू लागले. अर्थात हे काही ठरवून, बेतून केलेलं नव्हतं. ते इतकं उत्स्फूर्त, स्वाभाविक होतं की माझ्या सुचण्याचा, विचारपद्धतीचाच तो नैसर्गिक भाग होत गेला.

म्हणूनच की काय माझ्या ‘मदर्स हाऊस’ या पहिल्याच दोन अंकी नाटकातली ‘आई’ तिच्या पाच कलावंत मुलांना घेऊन एकटीच जंगलात राहते, कलेतली ‘ओरिजिनॅलिटी’ जपण्यासाठी, त्यांना बाहेरच्या जगातल्या अनुकरणापासून दूर ठेवण्यासाठी तिनं हा निर्णय घेतलाय. ‘ध्यानीमनी’मधली ‘आई’ मूल न होण्याच्या तिच्या दु:खावर आपल्या अफाट कल्पनाशक्तीनं मात करते आणि काल्पनिक ‘मोहित’ला वाढवते.. तर ‘सेलिब्रेशन’मधली ‘आई’ तिच्या मनातली खळबळ मुलांना सुनावण्यासाठी नवऱ्याच्या मृत्यूची बातमीसुद्धा काही काळ लपवण्याची धडपड करते. यातल्या प्रत्येक आईकडे अपत्याबरोबरच नाटकाच्या संकल्पनांनाही जन्म दिला..

या लेखात मला ‘चारचौघी’तल्या आईविषयी लिहावंसं वाटतंय. कारण वर उल्लेखलेल्या सगळ्या स्त्री व्यक्तिरेखांविषयी मी कधी मुलाखतींमधून, कधी मनोगतांमधून व्यक्त होत आलोय. शिवाय या सगळ्यांबद्दलचं माझं म्हणणं, माझी काही ठाम मतंही एव्हाना तयार झाली आहेत. पण ‘चारचौघी’तली ‘आई’ ही अशी व्यक्तिरेखा आहे जी अत्यंत समर्थपणे उभी तर राहिली, परंतु ती पुरेशी ‘सुस्पष्ट’ झाली आहे का? लेखक म्हणून मला ती संपूर्ण कळलीय का? ती माझ्या पूर्ण ओळखीची आहे का? तिच्याबद्दलचे काही प्रश्न अनुत्तरित राहिलेत का? मध्यवर्ती भूमिका असूनही या आईसाठी एखादं नाव द्यायचीही मला का गरज वाटली नसावी? असंही सारखं वाटत राहातं. कुणी त्याबद्दल विचारलं तर मी त्यांच्या शंकांचं निराकरण करणारी उत्तरंही देतो, त्यासाठी बुद्धी आणि कौशल्यही वापरतो, पण तरीही त्यानंतर मनातल्या शांततेत हे प्रश्न उरतातच. त्या व्यक्तिमत्त्वात असं काय रसायन आहे जे लोभवतं, हवंहवंसं वाटतं तरीही काही कंगोरे, कोपरे अंधारेच राहतात?

एका विवाहित पुरुषाशी निर्माण झालेल्या नात्यातून या आईनं तीन मुलींना जन्म दिला आहे. त्या पुरुषाशीच लग्न करण्याचा हट्ट न धरता तिनं तिच्या मुलींसह स्वतंत्रपणे आपलं वेगळं घर, कुटुंब निर्माण केलंय. तिन्ही मुलींना अत्यंत खुलेपणानं वाढवलंय. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलंय. त्यामुळे उपजत मिळालेल्या या निर्णय स्वातंत्र्यातूनच प्रत्येक मुलीनं आपली वाट निवडलीय. मोठी विद्या समाजशास्त्राची प्राध्यापक आहे आणि तिचा एका पत्रकाराशी विवाह झालाय. पुढचा मागचा विचार न करता मधल्या वैजूनं प्रेमविवाह केलाय. तर विनी या धाकटय़ा मुलीला तिच्या दोन जिवलग मित्रांबरोबर सहजीवन व्यतीत करावंसं वाटतंय. दोघांवरचंही तितकंच उत्कट प्रेम तिला उजवं-डावं करू देत नाहीए. मनातली ही भावना ती आईकडे स्वच्छपणे, प्रामाणिकपणे व्यक्त करते. आईनं तिच्या तारुण्यात घेतलेला एक वेगळा निर्णय ते आज विनीनं घेतलेला एक चाकोरीबाहेरचा निर्णय यांचं एक वर्तुळ जणू पूर्ण होतं किंवा नव्या वर्तुळासाठी अजून एक आरंभिबदू उमटवला जातो असंही म्हणता येईल.

स्वातंत्र्याबरोबरच या मुलींना निर्णयाच्या परिणामांना सामोरं जाण्याचं, त्याची जबाबदारी स्वीकारण्याचं ‘सामंजस्य’ही जणू त्यांच्या आईकडून वारसाहक्कानं मिळालंय. म्हणूनच कदाचित या आईनं आबांवर प्रेम तर केलं, पण त्या प्रेमाची भागीदार होताना त्यांच्या पहिल्या बायकोशी घटस्फोट घेण्याचा आग्रहही केला नाही. तिनं स्वत:चं पुरुषनिरपेक्ष कुटुंब निर्माण करण्याचं स्वातंत्र्यही घेतलं आणि आबांना त्यांच्या कुटुंबाचा भाग राहू देण्याची मोकळीकही दिली. मात्र पुढे जेव्हा विनीच्या वाढदिवशी ते येऊ शकणार नाहीत हे तिला कळतं तेव्हा ती तितक्याच स्वच्छपणे त्यांना त्यांच्या चुकीची जाणीवही करून देते. ही आई मुलींच्या प्रत्येक अडचणीत त्यांच्यामागे ठामपणे उभी राहते, पण जेव्हा विद्या तिला, ‘‘तू केलेल्या अपराधाची उत्तरं मला का द्यावी लागावीत?’’ असा जाब विचारते, तेव्हा तिला खडसावताना हीच आई स्पष्टपणे सांगते की, ‘‘मी अपराधी नाही. त्यामुळे माझ्या अपराधाचे िशतोडे तुझ्यावर उडण्याचा प्रश्नच नाही. मी स्वत:चा निर्णय पूर्ण जबाबदारीनं घेतलाय. त्यामुळे तुला जो निर्णय घ्यायचाय तो तुझ्या जबाबदारीवर. माझ्यावर दोष ढकलून नाही.’’

एकीकडे विद्याला सुनावतानाचा तिचा हा परखडपणा दिसतो, तर दुसरीकडे एका प्रसंगात वैजूच्या नवऱ्याला खडसावताना हीच आई म्हणते, ‘‘माझ्या मुलींची मी लग्न केली ती त्यांचा आनंद वाढावा म्हणून, पण त्या जर अशा पिचून जाणार असतील तर माझ्या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमी उघडे आहेत, श्रीकांत! आणि त्यासाठी लोक काय म्हणतील याची भीती बाळगणारी नाहीय मी.’’ मुलींसाठी सदोदित आपल्या घराचे दरवाजे खुले ठेवणारी हीच आई विनीचा दोन मित्रांबरोबर एकत्र राहण्याचा निर्णय ऐकते तेव्हा ‘‘विनी, आपले निर्णय चुकीचे नसतात. पण ते काळाच्या फार पुढचे असतात.. शिवाय असे निर्णय एखाद्या झपाटल्याक्षणी घेताना आपल्याला पुढे आपल्या पोटाच्या अवकाशात काही निर्माण होणार असल्याची जाणीवही नसते. पण नंतर जेव्हा मुलं होतात तेव्हा कॉम्प्युटरशी खेळणाऱ्या या आधुनिक मुलांना आई मात्र श्यामचीच हवी असते. एखाद्या वेगळ्या निर्णयानं पन्नास वर्षे पुढे गेलेल्या आपल्याला ही मुलं क्षणभरात पुन्हा पन्नास वर्षे मागे खेचून आणतात.’’ असं सांगायलाही ती विसरत नाही.

केवळ वेगळा निर्णय घेणं यात कर्तृत्व नाही तर त्याबरोबर ओघानं येणाऱ्या परिणामांचीही जबाबदारी घेणं यात खरं ‘कर्तृत्व’ दडलेलं आहे हे ती चांगलंच जाणून आहे. म्हणूनच ती मुलींना ‘रेडीमेड सोल्युशन्स’ न देता विचार करायला प्रवृत्त करते. भावनेपेक्षा विवेकावर भर द्यायला शिकवते, वादविवाद स्पर्धेत पाठांतर करून बक्षीस मिळण्यापेक्षा विषयाची दुसरी बाजू समजून घेण्याबद्दल आग्रही राहते. त्यामुळे पहिल्या अंकातल्या भाषणासाठी आईकडून ‘रेडीमेड’ मुद्दय़ांची मागणी करणाऱ्या अवखळ विनीचं तिसऱ्या अंकात एका समंजस युवतीत रूपांतर झालेलं दिसतं. नाटकातल्या या आईचं हेच खरं यश! त्यामुळे तिच्या व्यक्तिरेखेच्या संदर्भातले, ‘ही आई जर इतकी सुशिक्षित आहे तर तिनं तीन मुली का होऊ दिल्या?’, ‘तुम्ही अशी बाई प्रत्यक्ष कुठे पाहिली आहे का?’, ‘या आईच्या भूतकाळामुळेच तिच्या मुलींची अशी परवड झाली आहे का?’, ‘या मुली आबांचं नाव लावतात का?’ असे सगळे व्यावहारिक प्रश्न मग गौण वाटायला लागतात. विद्याचा घटस्फोट, वैजूचा अपयशी प्रेमविवाह किंवा विनीचा जोडीदार निवडतानाचा संभ्रम ही त्या मुलींची किंवा आईची अपयशी वाटचाल न वाटता व्यक्ती म्हणून प्रगल्भ होण्याचाच प्रवास वाटतो. वरवर त्या पराभूत वाटत असल्या तरी कथानकाच्या प्रवासात माणूस म्हणून त्या उन्नतच होताना दिसतात. मग ‘आई’बद्दलच्या संदिग्धतेचे व्यावहारिक प्रश्न धूसर होत जातात आणि लक्षात राहते ती तिची ‘स्वत्व’ आणि ‘सत्त्व’ जपण्यासाठीची तळमळ. म्हणूनच प्रेक्षकांनी तिचा हा ‘दुसरेपणा’ही आपलेपणानं स्वीकारला. यासाठी मला प्रेक्षकांच्या प्रगल्भतेला दाद द्यावीशी वाटते. कुणाला ती स्वाभिमानी, ताठ कण्याची, कणखर, खंबीर म्हणून आवडली, कुणाला मुलींविषयीची तिची संवेदनशीलता भावली, तर कुणाला तिच्यातली आधुनिक संवेदना महत्त्वाची वाटली. हळूहळू हे पटत गेलं की आपल्या जवळचा एखादा माणूस तरी आपल्याला पूर्णपणे कळलाय असं आपण छातीठोकपणे म्हणू शकतो का? एखादी आईसुद्धा जन्म दिलेल्या मुलाला शंभर टक्के ओळखते असं म्हणण्याचं धाडस करेल का? मग माझा तरी नाटककार म्हणून ही आई मला आतून बाहेरून संपूर्ण माहितीय असा अट्टहास का असावा? हळूहळू जाणवत गेलं की आईभोवती लपेटली गेलेली ही संदिग्धताच त्या व्यक्तिरेखेचं वैशिष्टय़ आहे. म्हणूनच तिच्या विषयीच्या अनेक शक्यता छान खुल्या राहिल्या आहेत. नाटकात तिला स्वत:चं नाव नसलं तरी तिनं नावलौकिक कमावलेला आहे. पाहणारा प्रत्येकजण तिच्या विषयीचे आपले अंदाज बांधू शकतो. प्रत्येकजण ती आवडण्याचं वेगळं कारण सांगू शकतो. तिच्याविषयी सहानुभूती, करुणा वाटण्यापेक्षा त्यांना आदर वाटतो. कालांतरानं असंही लक्षात आलं की, व्यक्तिरेखेत तर्कविसंगती नसली तर मग संदिग्धताही लोभस वाटते.

हे नाटक उभं करताना चंदूनं (चंद्रकांत कुलकर्णी) त्याच्या दिग्दर्शकीय प्रतिभेतील परिपक्वता या नाटकाला दिली. ‘श्री चिंतामणी’च्या निर्मात्या लता नार्वेकर यांनी नाटकाला बंडखोरपणा दिला. वंदना गुप्तेनं ‘विद्या’ला कुठेही ‘प्राध्यापकी’ न होऊ देता आपल्या अभिनयातला ‘चार्म’ दिला. आसावरी, प्रबोध, प्रतीक्षा, सुनील आणि मिलिंद यांनी त्यांची सहजता आणि समरसता दिली. तर दीपा श्रीराम यांनी आपला ‘आब’ आणि ‘ताठ कणा’ या ‘आई’ला बहाल केला! दीपाजी रंगमंचावर आल्या की या आईतलं ‘वेगळेपण’ नेमकं काय आहे हे नव्यानं सांगायची गरजच उरायची नाही. त्यांच्या अस्तित्वातच ते विचारीपण नखशिखांत सामावलेलं होतं.

..प्रत्येक व्यक्तिरेखा ही त्या-त्या नाटकातली अविभाज्य व्यक्तिमत्त्व तर असतातच, पण त्याचबरोबर त्या नाटकातल्या आशयाचं, लेखकाच्या विचारांचं, त्या काळाचं प्रतिनिधित्वही करत असतात. कारण प्रत्येक नाटक हे त्या नाटककाराच्या विचार प्रवासातला एक टप्पा असतो. १९७५ नंतर स्त्री मुक्ती चळवळीनं जे वातावरण ढवळून निघालं त्यात अशी जीवनाचा अर्थ शोधणारी, आपल्या अस्मितेसाठी लढणारी, चाकोरीबाहेरचा निर्णय घेणारी अनेक स्त्री व्यक्तिमत्त्वं मला जवळून पाहता आली. साहित्यात, स्त्री आत्मचरित्रांमध्येही त्यांचं ठाशीव प्रतिबिंब उमटलेलं होतं.. ‘चारचौघी’तल्या आईचं ‘आईपण’ आणि ‘बाईपण’ हे जितकं त्या कुटुंबाचं, तितकंच त्या काळातल्या सामाजिक बदलांचाही एक भाग होतं. म्हणूनच की काय मग मी तिला संपूर्ण जाणून घेण्याचा अट्टहास करत बसलो नाही. कारण ती ‘आई’ जितकी माझी ‘निर्मिती’ होती.. तितकीच एका व्यापक भवतालाचीही निर्मिती होती..

(सदर समाप्त)

pradalvi@gmail.com

chaturang@expressindia.com

Story img Loader