|| सुप्रिया विनोद
रंगमंचावर ‘इंदिरा’ घडवताना मीही अधिक खंबीर होतच होते. वर्तमानपत्राचं पहिलं पान ‘राजकारणातलं मला काही कळत नाही’ म्हणत उलटणारी मी, अनेक नेत्यांचा, राजकारणातल्या प्रवाहांचा, डावपेचांचा अभ्यास करीत अधिक सुजाण नागरिक झाले होते. ‘व्यक्तिरेखेच्या मनातलं चेहऱ्यावर उमटतं’ यात समाधान मानणारी मी, या भूमिकेत शिरून, मनातलं चेहऱ्यावर दिसू न देताही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात वाकबगार झाले होते; पण एवढंच नव्हतं.. ‘इंदिरा’ मला खरंच जवळची वाटू लागली होती.
सुदैवानं, वयाच्या सातव्या वर्षांपासून मला रंगभूमीवर उत्तमोत्तम भूमिका करायला मिळाल्या. विविधता ही किती! ‘अलबत्या गलबत्या’मधल्या उंदरापासून ते ‘इंदिरा’मधल्या जगप्रसिद्ध नेत्यापर्यंत! रत्नाकर मतकरी आणि सत्यदेव दुबे या दोन दिग्गजांनी मला घडवलं आणि त्यांच्यासह आणखीही डझनभर कसलेल्या दिग्दर्शकांचं मार्गदर्शन मला लाभलं, हे माझं परमभाग्य. ज्या भूमिकांनी माझा दर्जा उंचावला, मला अभिनेत्री म्हणून ओळख दिली आणि माझ्या व्यक्तिमत्त्वावर अमीट छाप सोडली, अशा भूमिका १५-१६ तरी आहेतच. अशा विशेष भूमिकांपैकी सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका म्हणजे ‘इंदिरा’!
दहा वर्षांपूर्वी माझ्या वाढदिवसाला माझ्या बाबांनी (रत्नाकर मतकरी) मला ‘इंदिरा’ नाटक वाचून दाखवलं. म्हणाले, ‘‘ही भूमिका तुला माझ्याकडून वाढदिवसाची भेट!’’ या नाटकाआधी बाबांनी ‘प्रियतमा’ हे एकमेव नाटक मला डोळ्यांसमोर ठेवून लिहिलं होतं, ज्यात काम करण्याची संधी मला मिळाली नव्हती. याही वेळी ती मिळेल, अशा भ्रमात मी मुळीच नव्हते, पण तरीही, केवळ एका लेखकाच्याच मुलीला मिळू शकेल, अशा या अमूल्य भेटीनं मी अर्थातच आनंदले; पण नंतर जादूच झाली! बाबांनी हिंदी चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना माझे फोटो पाठवले आणि त्या फोटोंवर फक्त इंदिराजींच्या केसांचा आकार डकवताच विक्रमजींना त्यात हुबेहूब इंदिरा गांधी दिसल्या! इतक्या हुबेहूब, की त्यांनी जब्बार पटेलांना ‘यशवंतराव चव्हाण’ चित्रपटासाठी माझं नाव सुचवलं नि त्यात मी लगेच ‘इंदिरा’ झालेही! चित्रपटासाठी माझ्यातून इंदिरा घडवताना जब्बार पटेलांनी जे कष्ट घेतले, ती माझ्या नाटकातल्या इंदिरेची पहिली तालीम होती. एखादा ‘सायलेंट शॉट’ असेल, अगदी नुसतं कॉरिडॉरमधून चालत जायचं असेल, तरीही पटेल मला त्या वेळची इंदिराजींची मानसिकता, तेव्हाची राजकीय परिस्थिती समजावून सांगत. त्यांच्या शांत चेहऱ्याआडच्या कल्लोळाची कल्पना देत आणि मगच तो शॉट घेत. ‘इंदिरा’ समजणं आणि व्यक्त करणं किती अवघड आहे, हे मला तिथे कळलं.
तीन वर्षांपूर्वी जेव्हा ‘इंदिरा’ नाटकाच्या तालमी सुरू झाल्या, तेव्हा ‘यशवंतराव’ प्रदर्शित होऊन माझी ‘इंदिरा’ लोकांना पसंत पडलेली होती. त्यामुळे नाटकातली भूमिका निर्विवाद माझ्याकडे चालत आली. स्क्रिप्ट हातात घेताच पहिली गोष्ट जाणवली ती ही, की तीन अंक – तीन तास रंगमंचावर इंदिराजी म्हणून वावरणं आणि प्रेक्षकांना ते खरं वाटायला लावणं, हे शिवधनुष्य आहे! ‘इंदिरा’ची भाषा वेगळीच होती. जड शब्दांनी भरलेली लांबलचक वाक्यं, स्वगतं – एका दमात म्हणायची होती. (आधी त्यात हिंदी शब्दही होते, पण त्यामुळे मिश्र आणि गोंधळाची भाषा होईल असं वाटून त्याच वजनाचे मराठी शब्द ठेवले आणि प्रेक्षकांसाठी जणू संपूर्ण नाटक हिंदी भाषेतच घडतं आहे, पण आपल्या कानावर मराठी भाषांतर पडतं आहे, असा आभास तयार केला – (जो यशस्वी झाला.) संवादांमध्ये – भाषा अगदी रोजच्या बोलण्यातली असल्याप्रमाणे उच्चारली जायला हवी होती. चोख पाठांतराला पर्याय नव्हता.
मी रोज दिवसभर साडी नेसून सर्वासोबत तालीम आणि रात्री एकटी पाठांतर करायचे, अगदी पहाटेपर्यंत. १४ व्या दिवशी माझे तीनही अंक बारकाव्यांसकट आणि हालचालींसकट पाठ झाले. आता मी बाबांच्या मार्गदर्शनाखाली इंदिराजींच्या बारीकसारीक लकबींवर काम सुरू केलं. त्यांच्यावरचे माहितीपट, छायाचित्रं नजरेसमोर सतत असतच. त्यांचं भराभर चालणं, डोक्यावरून पदर घेणं, ताठ मान, ओठ दातांखाली मुडपणं.. मी नाटकभर त्यांच्या लकबी नुसत्या पेरल्या नाहीत, तर माझ्यात मुरवल्या. प्रत्येक पात्रासोबतच्या त्यांच्या वर्तनात नात्याप्रमाणे ठळक बदल दाखवला. नाटक संपूर्णपणे त्यांच्या घरात घडत असल्यामुळे तेजस्वी कणखर ‘इंदिराजीं’सोबतच घाबरलेली ‘इंदू’; हरलेली, थकलेली ‘इंदिरा’; प्रेमळ ममी आणि हुकमत गाजवणाऱ्या ‘मम्मीजी’ ही रूपं अधोरेखित केली. जनतेसमोर इंदिराजींनी शेवटपर्यंत ताठच होत्या; पण माझ्या मनात आलं, की आयुष्यभर जीवघेणे आघात पचवणाऱ्या, घणाघाती सभांसाठी मैलोन्मैल चालणाऱ्या, पंतप्रधानपदामुळे अत्यंत धावपळीचा दिनक्रम वर्षांनुवर्ष राखणाऱ्या, क्वचित व्याधींनाही तोंड देणाऱ्या इंदिराजींचं वय उतरतीला लागल्यावर त्यांचं घरातलं ‘पोश्चर’ वेगळं असेल का? मग मी तिसऱ्या अंकात त्यांच्या उभं राहण्यातला ताठपणा थोडा कमी केला. पाठीला कळेल.. न कळेलसा बाक ठेवला. त्या घराबाहेर पडताना मात्र प्रयत्नपूर्वक ताठ चालत जाताना दाखवल्या. या माझ्या ‘वर्किंग’चं तिसऱ्या अंकातल्या सर्वस्वी वेगळ्या ‘बेअिरग’चं अनेकांनी कौतुक केलं; पण तरीही, इंदिराजींची जनतेच्या मनातली ‘कणखर’ प्रतिमाच शेवटी जिंकली. अनेकांनी ‘इंदिराजी कायम ताठच होत्या,’ असे छातीठोकपणे दाखले दिले. बाबांनीही मग मला नाइलाजानं, तीन अंकांत एकूण ९ वर्षांचा काळ असूनही वावरण्यात सारखाच ताठपणा ठेवायला सांगितला. मीही दिग्दर्शकाचा शब्द प्रमाण मानला
ही ‘इंदिरा’ घडवण्यात सिंहाचा वाटा होता विक्रमजींचा. केवळ अर्ध्या तासात ते फक्त आयब्रो पेन्सिलने माझ्या चेहऱ्यावर रेघा काढून इंदिराजींच्या चेहऱ्याशी साम्य जुळवीत भुवया गडद करीत. समोर त्यांच्या साहाय्यकाच्या हातात इंदिराजींचा फोटो असे. चित्रकारानं मॉडेल पाहून स्केच करावं, तसे ते ही रंगभूषा करीत. सवयीनं मीही ती बरीचशी शिकून घेतली. सुरेंद्रजींनी केसांच्या टोपात पांढऱ्या बटांची अशी रचना केली होती, की त्या एकत्र असताना कमी वाटत आणि पसरल्यावर पुढच्या वयात येणारं केसांचं जास्त पांढरेपण त्यातून प्रतीत होई. संपूर्ण नाटकात मी १२ साडय़ा आणि ६ वेळा ब्लाऊजेस बदलत असे. तेही प्रत्येक वेळी दोन प्रवेशांमधल्या एक-दीड मिनिटांच्या अंधारात. अभिनयापेक्षाही या कसरतीने दमछाक अधिक होई.
माझं सुदैव, की माझी ‘इंदिरा’ पहिल्या प्रयोगापासूनच लोकांनी डोक्यावर घेतली. त्यांना तिची विषण्ण अवस्थेतली स्वगतं तिच्या स्फूर्तिदायक भाषणांइतकीच खरी वाटली. आणीबाणीमुळे अजूनही इंदिराजींवर राग धरणाऱ्या मोठय़ा समाजालाही मी इंदिराजींमधली आई, त्यांचे विजय, त्यांचे पराभव या सगळ्याशी एकरूप करू शकले. त्यांच्या दु:खात रडवू शकले आणि त्यांच्या राखेतून पुन्हा उभं राहण्याला टाळ्यांची दाद मिळवू शकले. पत्रकारांनीही माझं भरभरून कौतुक केलं आणि मग नाटकाला येणारा प्रेक्षक, असामान्य इंदिराजींमधली स्त्री- एक सामान्य व्यक्ती पाहण्याच्या तयारीनंच येऊ लागला. प्रत्येक प्रयोगानंतर इंदिराभक्त रंगपटात येऊन ‘आज इंदिराजींचं दर्शन झालं!’ म्हणत माझ्या पायांवर डोकं ठेवत, तर इंदिराद्वेष्टे ‘आज ‘इंदिरा’ समग्र कळली’ अशी कबुली देत. या भूमिकेनं मला प्रत्येक प्रयोगाला एका वेगळ्याच जगात नेलं.
पहिल्या प्रयोगाला भूमिका प्रेक्षकांना आवडल्यामुळे मी आनंदित झाले खरी, पण समोर काही वेगळंच वाढून ठेवलं होतं! या नाटकात इंदिराजींचं आयुष्य यथातथ्य मांडल्यामुळे कोणत्याच पक्षाला या नाटकानं फायदा नाही, असा साक्षात्कार होऊन आमच्या निर्मात्यानं पहिल्याच प्रयोगानंतर नाटक बंद करण्याचा निर्णय घेतला! या अनर्थाची बातमी वाऱ्यासारखी पसरली; पण नाटक चालू राहावं म्हणून कुणीही प्रयत्नसुद्धा केला नाही. या काळात कुणी बाबांना माझ्या मन:स्थितीबद्दल विचारलं, तर ते म्हणायचे, ‘‘ज्या नेत्याची भूमिका ती करते आहे, त्यांनी भोगलेल्या यातनांच्या मानानं हा त्रास क्षुल्लक आहे!’’
हे खरंच होतं. ‘इंदिरा’ घडवताना मीही अधिक खंबीर होतच होते. त्या भव्य पटाचा भाग होताना माझं सामान्यत्व विसरून जात होते. वर्तमानपत्राचं पहिलं पान ‘राजकारणातलं मला काही कळत नाही’ म्हणत उलटणारी मी, अनेक नेत्यांचा, राजकारणातल्या प्रवाहांचा, डावपेचांचा अभ्यास करीत अधिक सुजाण नागरिक झाले होते. ‘व्यक्तिरेखेच्या मनातलं चेहऱ्यावर उमटतं’ यात समाधान मानणारी मी, या भूमिकेत शिरून, मनातलं चेहऱ्यावर दिसू न देताही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात वाकबगार झाले होते; पण एवढंच नव्हतं.. ‘इंदिरा’ मला खरंच जवळची वाटू लागली होती. आपल्याच व्यापात गढलेले नामांकित वडील तरीही त्यांचं आपल्या लेकरावर घारीसारखं लक्ष असणं – मुलीसोबतचा त्यांचा अतूट बंध.. हे सगळं माझ्या अनुभवाचं होतं. कितीही कष्ट केले, तरीही प्रसिद्ध कुटुंबातल्या मुलांवरचं समाजाचं अपेक्षांचं ओझं संपतच नाही, त्यांच्या अंतर्मुख असण्याला ‘गुँगी गुडिया’ सहजपणे म्हटलं जाऊ शकतं, हा माझाही अनुभव होता. लहान वयात इंदिराजींची आई त्यांना सोडून गेली – सुदैवानं ते पराकोटीचं दु:ख मी अनुभवलं नव्हतं – पण आई तिच्या कामांमुळे दूर गेल्यामुळे आईविना वर्षांनुवर्ष राहण्यातलं कोरडेपण माझ्या परिचयाचं होतं. इंदिराजींच्या उत्तुंगतेची सर मला निश्चितच नव्हती, पण त्याच्या मनोव्यापारांमागचा हिशेब मला लागला होता..
त्यामुळेच, नाटक सुरू होताच बंद होऊनही मी शांत राहिले, सहजपणे.
अचानक एके दिवशी नाटकातल्या सुयश पुरोहितची आपण होऊन ओळख काढून
अॅड. मीलन टोपकर अवतरले आणि मला ‘इंदिरा’ पुढे चालू ठेवायचंय म्हणाले! माझा नवरा मिलिंद विनोद आणि भाऊ मकरंद तोरसकर यांनी अथक प्रयत्नांनी मोठी पदरमोड करून मूळ निर्मात्याकडून नाटक सोडवलं – १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर म्हणजे दोन महिन्यांनी नाटक पुन्हा सुरू झालं, हे स्वप्नवत्च!
अनेक मान्यवरांनी, मोठमोठय़ा नेत्यांनी नाटक आवर्जून पाहिलं. माझ्या वाटय़ाला अमाप कौतुक आलं. पारितोषिकांनी गौरवही झाला. नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग दणक्यात झाला. तरीही, समाजाने या वेगळ्या नाटकाची मनोमन दखल जरूर घेतली, पण राजकारणापलीकडे विचार करून ‘एक उत्तम नाटक’ म्हणून त्याला भक्कम लोकाश्रय देण्याची जबाबदारी टाळली, हा अनेक चांगल्या नाटकांना येणारा अनुभव इथेही आलाच.
मी हसून पुढच्या प्रोजेक्टकडे वळले. इंदिराजींकडून तेवढं तरी मी शिकलेच आहे!
supriya.m.vinod@gmail.com
chaturang@expressindia.com