विभावरी देशपांडे  vibhawari.deshpande@gmail.com

‘छोटय़ाश्या सुट्टीत’ या नाटकातली उत्तरा अनेक बाबतीत माझ्यासारखी होती आणि अनेक बाबतीत भिन्नही. त्यामुळे भूमिकेशी एकरूप होताहोता तटस्थपणे तिच्याकडे पाहण्याची प्रक्रिया रोचक होती. यात दिग्दर्शकाने माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि दिलेलं स्वातंत्र्य या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. आणि याबतीत मोहितसारखा दुसरा दिग्दर्शक नाही. कलाकाराला तो एका जागी उभा करतो आणि एक शोध सुरू करून देतो. तशीच त्याने माझी आणि उत्तराची तोंडओळख करून दिली. आमच्यातली साम्यस्थळं आणि भेद मला दिसू लागले..

कलाकार कायम कशाच्या तरी शोधात असतो, असं कायम म्हटलं जातं. जरा रोमँटिक वाटलं तरी हे खरंच आहे, असं मला वाटतं. माणूस, लेखिका आणि अभिनेत्री या तीनही पातळ्यांवर मी हा प्रयत्न करते आहे. यातूनच सतत काही तरी नवीन करण्याची, नव्या, अनोळखी वाटा धुंडाळण्याची गरज मला वाटते.

माझ्या सुदैवाने खूप लहान वयात सत्यदेव दुबेंसारखा महान रंगकर्मी मला गुरुस्थानी लाभला. दुबेजींनी अभिनयच नाही, तर नाटक, कला आणि आयुष्य या सगळ्याकडे पाहण्याची एक दृष्टी दिली. वेगवेगळ्या नाटकीय विचारधारांच्या अनेक दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. त्यातली मला सगळ्यात जवळची वाटणारी भूमिका म्हणजे सचिन कुंडलकर लिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘छोटय़ाश्या सुट्टीत’ या नाटकातली उत्तरा.

मी आणि मोहित अनेक वर्ष एकमेकांना ओळखत आहोत. एक दिवस तो मला म्हणाला, ‘‘एक नाटक वाचायचं आहे. तुला जर आवडलं तर त्यातली एक भूमिका तू करावीस असं मला वाटतं.’’ मोहितच्या बुद्धिमत्तेवर, दिग्दर्शक म्हणून त्याच्यात असलेल्या अफाट गुणवत्तेबद्दल मला कायमच खात्री होती. त्यामुळे, ‘‘तू हे काम करावंस असं मला वाटतंय,’’ म्हटल्यावर माझा होकार निश्चित होता.

नाटक ऐकलं आणि मी हरखून गेले. आजच्या काळातल्या, एका उच्चशिक्षित, उच्चभ्रू समाजातल्या, स्वत:चं अवकाश शोधू पाहणाऱ्या आणि निरनिराळ्या परस्परविरोधी ‘इझम्स’च्या जंजाळात अडकून, एक साधं सोपं निखळ जगणं हरवून बसलेल्या चार तरुणांची ही गोष्ट. या सगळ्यात वास्तवाच्या सगळ्यात जवळ असणारा, कार्तिक, त्याच्याबरोबर ‘लिव्ह इन’मध्ये असणारी, हुशार, विचारी, प्रायोगिक सिनेमांमधून उत्तमोत्तम भूमिका करणारी, स्टार स्टेटस असणारी मनस्वी उत्तरा, तिचा बालमित्र असलेला आणि अनेक वर्षांपूर्वी कॅनडाला स्थलांतरित झालेला सायरस आणि त्याचा पार्टनर, व्योम. उत्तराला तिच्या बुद्धीविषयी, अभिनयक्षमतेविषयी आणि स्टार स्टेटसविषयी रास्त अभिमान आहे, किंबहुना काहीसा अहंगंड आहे. आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत, उजवे आहोत या जाणिवेत ती इतकी हरवली आहे, की साधं, सोपं आणि कुठलीही बिरुदं न मिरवणारं एक जगणं असू शकतं आणि ते खूप सुंदर असतं हेच ती विसरली आहे. कार्तिकचं तिच्यावर मनापासून प्रेम आहे. ती अगदी नवखी अभिनेत्री असल्यापासून तो तिच्यासोबत आहे. तिच्यात घडत गेलेला हा बदल त्याने जवळून पहिला आहे, तिचं आतून भरकटत जाणं त्याला जाणवलं आहे पण तिच्याविषयीच्या प्रेमापोटी आणि तिच्या आक्रमक स्वभावाच्या भीतीपोटी तो गप्प आहे.

सायरस आणि व्योम चार दिवस सुट्टीला कार्तिक आणि उत्तराकडे येतात. त्यांच्यात घडलेल्या निरनिराळ्या संवादातून आणि घटनांमधून या पात्रांच्या आत्तापर्यंतच्या स्वत:विषयीच्या कल्पना, धारणा यांना मुळातून सुरुंग लागतो. त्यांनी आपल्याभोवती निर्माण केलेले कोष, भिंती गळून पडतात आणि स्वत:चा, आपल्या वास्तवाचा, नात्यांचा पुन्हा नव्याने विचार करण्याची गरज आहे याची त्यांना लख्ख जाणीव होते आणि हा मूलभूत बदल प्रामुख्याने उत्तराच्या बाबतीत घडतो, माणूस म्हणून. कलाकार म्हणून माझ्या इतक्या जवळ जाणारी व्यक्तिरेखा मला तोपर्यंत मिळाली नव्हती. सचिनची अत्यंत सशक्त आणि समृद्ध संहिता आणि ती मंचित करण्याची मोहितची प्रभावी शैली यामुळे हा काळ माझ्यासाठी भारावून टाकणारा होता. सारंग साठय़े, नीलेश फळ, शिव सिंग, रुपाली भावे, सुप्रिया गोखले असे उत्तमोत्तम सहकलाकारही माझ्यासोबत होते.

उत्तरा अनेक बाबतींत माझ्यासारखी होती आणि अनेक बाबतीत भिन्नही. त्यामुळे भूमिकेशी एकरूप होताहोता तटस्थपणे तिच्याकडे पाहण्याची प्रक्रिया फारच रोचक होती. कुठल्याही भूमिकेचा अभ्यास करण्याचं कुठलं विशिष्ट तंत्र मला अवगत नाही. पण समोर आलेल्या व्यक्तिरेखेच्या मनात, गाभ्यात शिरून तिची मानसिकता जाणून घेण्याचा प्रयत्न मी करते. तिच्यात आणि माझ्यात एखादं समान सूत्र शोधण्याचा प्रयत्न करते. आणि तो धागा पकडून तिच्या आणखी जास्त जवळ जाते. मग हळूहळू तिचा आवाज सापडतो, तिची देहबोली सापडते, विशिष्ट लकबी सापडतात. याचबरोबर आवश्यक ते वाचन, संशोधनही करत राहते. यात दिग्दर्शकाने माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि दिलेलं स्वातंत्र्य या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. आणि याबतीत मोहितसारखा दुसरा दिग्दर्शक नाही. कलाकाराला तो एका जागी उभा करतो आणि एक शोध सुरू करून देतो. तसंच त्याने माझी आणि उत्तराची तोंडओळख करून दिली. आमच्यातली साम्यस्थळं आणि भेद मला दिसू लागले. मी हुशार आहे, स्वतंत्र आहे, मनस्वी आहे पण उत्तराइतका आत्मविश्वास आणि आक्रमकता माझ्यापाशी नाही. (आता बारा वर्षांनंतर माझ्यात एक वैचारिक आणि तात्त्विक आक्रमकता आली असेल पण तेव्हा ती नव्हती.) उत्तरा सुंदर आहे आणि तिला त्याची जाणीव आहे. मी सुंदर आहे असं मला कधीच वाटलं नाही. पण उत्तराने मला त्या जाणिवेपर्यंत नेलं. तिने चित्रपटसृष्टीत मिळवलेलं स्थान माझ्यापाशी नाही. त्यामुळे तिच्याबद्दल मला एक आकर्षण वाटत होतं. तिच्या आईच्या व्यक्तिरेखेत आणि माझ्या आईत खूप साम्य होतं. मोहितने आमचं नातं आम्हाला शोधू दिलं आणि माझ्या नकळत त्या नात्याला दिग्दर्शक म्हणून तो आकार देऊ लागला. त्याने मला कधीच, ‘हे असं म्हणू नकोस, असं करू नकोस,’ असं सांगितलं नाही. पण अत्यंत सफाईने त्या संपूर्ण नाटकाच्या साच्यात उत्तराला बसवण्यासाठी माझा शोध पुढे नेत राहिला. हळूहळू उत्तरा लेखकाच्या पेनातून आणि दिग्दर्शकाच्या नजरेतून बाहेर पडून माझा आकार घेऊ लागली आणि मी तिचा. माझ्यात असलेल्या अनेक अंत:प्रेरणांची आणि जाणिवांची ओळख मला नव्याने होऊ लागली. अनेक गोष्टींच्या निचरा, कॅथार्सिस उत्तराच्या माध्यमातून होऊ लागला.

एका प्रसंगाच्या शेवटी उत्तरा तिच्या खोलीत निघून जाते आणि कार्तिक बाहेर असतो. मोहितने मला एक सूचना दिली. एक्झिट घेतल्यानंतर आतून जिवाच्या आकांताने कार्तिकला हाक मारायची. घडलेलं काहीच नसतानाही. तो म्हणाला, ‘‘एखादं क्षुल्लक कारण असू शकेल, जसं की चादर नीट घातलेली नाही.’’ पण उत्तराचा अनाठायी आक्रस्ताळा स्वभाव आणि कार्तिकची हतबलता व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग त्याला सापडला होता. विभा म्हणून मला हे कारण मुळीच पटत नव्हतं. पण माझ्यातलं आणि उत्तरामधलं उरलेलं अंतर पार करण्याची ही एक उत्तम संधी होती. तो आक्रोश मला सहज जमणारा नव्हता. मी प्रयत्न करत राहिले पण मोहितचं समाधान होईना. एक दिवस मला जमत नाही या अगतिकतेतून एक प्रचंड किंकाळी माझ्यातून बाहेर आली. पुढचा काही काळ माझ्यासकट सगळे स्तब्ध झाले. मी धाय मोकलून रडू लागले. मोहितने शांतपणे जवळ येऊन मला मिठी मारली. त्या क्षणी मला उत्तरा खऱ्या अर्थाने सापडली.

नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या पंधरा दिवस आधी मी आई होणार असल्याचं मला कळलं. मोहित माझा मित्र असल्याने त्याला आनंद झाला, पण नाटकाचं काय होणार या विचाराने तो अस्वस्थही झाला. आता आपल्याला नाटक सोडावं लागणार असंच मला वाटत होतं. आणि हा निर्णय त्याने घेतला असता तर त्यात काहीच गैर नव्हतं. पण मोहितनं तसं होऊ दिलं नाही. ‘‘तुझं पोट दिसेपर्यंत किंवा तुला शारीरिक, मानसिक त्रास होत नाही तोपर्यंत तूच प्रयोग करणार,’’ असं आश्वासन त्यानं मला दिलं. त्या क्षणी उत्तरापासून दूर जावं लागणार नाही हा आनंद आणि आपण आई होणार हा आनंद माझ्यासाठी एकसारखाच होता. मोहितसकट माझ्या सहकलाकारांनी माझी खूप काळजी घेतली, मला संपूर्ण सहकार्य केलं. पुढच्या एका महिन्यात उत्तरा अधिकाधिक उलगडत गेली, माझ्या जवळ येत गेली. माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या तात्कालिक प्रश्नांना समस्यांना स्वीकारण्याची, माझ्या सहकाऱ्यांशी असलेल्या नात्याकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी मला उत्तराने दिली. तिने माझी स्वत:शी नव्याने ओळख करून दिली.

मी सातवा महिना लागेपर्यंत प्रयोग केले. मग मात्र मोहितने उत्तराला अमृता सुभाषच्या स्वाधीन केलं. अमृता अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री आहे. माझी अत्यंत चांगली मत्रीण आहे. तिनं उत्तराला नवं रूप दिलं. जे निर्वविाद उत्तमच होतं. पण मी उत्तरात इतकी गुंतले होते की मी तिचा प्रयोग पाहणं टाळलं. उत्तरा इतकी माझी होती की दुसऱ्या कुणीही ती साकारलेली पाहण्यासाठी असलेला मनाचा मोठेपणा माझ्यापाशी नव्हता. आजतागायत कुठल्याच व्यक्तिरेखेत मी भावनिकरीत्या इतकी गुंतलेली नाही.

chaturang@expressindia.com