अविनाश नारकी

मी कोण आहे आणि मला कोण व्हायचं आहे, याची स्वच्छ शहाणीव ज्याच्याकडे आहे त्याच्यात आमूलाग्र बदल होणं अपरिहार्य आहे. मंजुळाला ती जाणीव असल्यानेच तिला तसं घडवणारा मास्तर तिला भेटतो. परिस्थितीशरण नसलेली, बुद्धिमान, संवेदनशील आणि आत्मसन्मानाचं स्फुल्लिंग फुलवणारी मंजुळा प्रचंड मेहनतीनं ‘फुलराणीभाषाराणी’ होते. स्त्रीनं मनाशी ठरवलं, तर ती आपला निर्धार पूर्ण करतेच हे जगभरातल्या स्त्रियांचं वैशिष्ट्य मंजुळा सामर्थ्यानं दाखवते.

Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ओबीसी म्हणून त्यांना फक्त मुलगा अन् पुतण्या दिसतो”, राष्ट्रवादीच्याच नेत्याची भुजबळांवर खोचक टीका
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Rahul Gandhi On Somnath Suryavanshi
Rahul Gandhi : राहुल गांधींचा गंभीर आरोप, “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यानेच त्याची हत्या…”
atrocities committed on name of religion in world are due to misconceptions says Sarsangchalak mohan bhagwat
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, “चुकीच्या समजुतीतून धर्माच्या नावाखाली अत्याचार…”
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
nitin raut Devendra fadnavis
गुंडांना खुद्द मुख्यमंत्र्यांचे संरक्षण, डॉ. नितीन राऊत म्हणाले…
Inquiry into cases in Beed Parbhani through retired judges Nagpur news
बीड, परभणीतील प्रकरणांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

कोणतीही कलाकृती ही कालातीत केव्हा होते? जेव्हा तिच्याकडे प्रचलित व्यवस्थेसमोर आव्हान निर्माण करण्याची क्षमता प्राप्त झालेली असते. त्या कलाकृतीजवळ ही क्षमता प्राप्त करून देण्यासाठी काही हत्यारं (tools) असतात. जॉर्ज बर्नार्ड शॉ लिखित ‘पिग्मॅलियन’ या नाट्यकृतीचं स्वैर रूपांतर पु.ल. देशपांडे यांनी ‘ती फुलराणी’ या कालातीत नाट्यकृतीमध्ये केले. ‘पिग्मॅलियन’ आणि ‘ती फुलराणी’जवळ सामाजिक स्तरभेदांच्या व्यवस्थेला आव्हान देण्याची क्षमता आहे आणि ते आव्हान देत असताना या दोघांनीही भाषेच्या माध्यमाचं हत्यार वापरलं आहे. जगभरात, जरी योग्य नसले तरी, सगळीकडेच भाषेवरून, उच्चारावरून स्तरभेद मानले जातात. ही परिस्थिती शतकानुशतके तशीच आहे. ही समस्या केंद्रस्थानी ठेवून ‘ती फुलराणी’चं लेखन पु.लं.नी केलं आहे. यात प्राध्यापक अशोक जहागीरदार ही भूमिका करत असताना मला जाणवलं की, यातील सर्वच पात्रांची पेरणी या समस्येला दूर करण्यासाठी झाली आहे.

‘ती फुलराणी’ या नाटकाचं आणखी एक सार्वकालिक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे नाटक, स्त्रीच्या सक्षमीकरणाचं, तिच्या ठायी उपजत असलेल्या परिस्थितीशी झगडून स्वत:ला सिद्ध करण्याच्या क्षमतेच्या गौरवाचंही नाटक आहे. यातील प्रमुख स्त्रीपात्र असलेली मंजुळा अल्पशिक्षित आहे, पण स्वत:च्या बळावर आपल्या सभोवती असलेल्या जगात, तिच्या व्यवसायाच्या परिघातील उच्च वर्तुळात एक सक्षम, सन्माननीय व्यक्ती म्हणून तिची ओळख निर्माण व्हावी अशी तिची तीव्र इच्छा आहे.त्या ईर्षेने ती झगडत राहते. हा झगडा मंजुळेच्या भवतालात जसा सुरू आहे तसा तो तिच्या अंतरंगातदेखील सुरू आहे. तिच्या या प्रयत्नांना मदत करणारेही जेव्हा तिचा उपमर्द करू धजतात, तेव्हा तिच्यातील स्फुल्लिंग तितक्याच ताकदीने तळपून उठते. यासाठी मंजुळेला तिच्यातील स्त्रीत्वाबरोबरच आत्मसन्मानाची जाणीव उपकारक ठरते. ती व्यक्त होण्यासाठी तिला भाषेचे माध्यम उपयोगी पडते.

आणखी वाचा-सांधा बदलताना : मन करा रे थोर!

मला नेहमीच जाणवलं की, फुलराणी मंजुळा हे पात्र भाषा म्हणून तर येत नाही ना? प्रत्येक भाषेचं, बोलीचं स्वत:चं सौंदर्य असतं. ते अनाघ्रात सौंदर्य मंजुळाच्या व्यक्तिरेखेतून प्रतीत होतं, तर प्रा. अशोक जहागीरदार हा तथाकथित उच्चभ्रू आणि स्वत:ला अभिजात म्हणवून घेणाऱ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतो. अशोक जहागीरदार हा भाषेची जडणघडण कशी असावी, तिचं सौंदर्य कशात आहे याचा शोध घेणारा अभ्यासक आहे आणि मंजुळा ही फुलविक्रीचा व्यवसाय करण्यासाठी बोलीचा प्रभावी वापर करणारी त्याच्या दृष्टीने, दुय्यम दर्जाची व्यक्ती आहे. मंजुळाला आपल्या व्यवसायासाठी आपल्या वाणीला तिच्याजवळ नसलेलं अभिजात सौंदर्य प्राप्त करून देऊन स्वत:ला सिद्ध करण्याची अनिवार ओढ आहे. तिला ‘फ्लोरिस्टाच्या शॉपा’मधली विक्रेती व्हायचं आहे. तिला तिच्यासमोर टॅक्सीमध्ये बसून, तिच्याकडे तुच्छतेची नजर टाकत जाणाऱ्या लोकांचा राग येतो. आर्थिक व सामाजिक दृष्टीनं निम्न स्तरावर असलेल्या मंजुळाचा माझी भाषा सुधारायला हवी असा हट्ट आहे. यासाठी ती तिचा अपमान करणाऱ्या अशोक जहागीरदारकडे येते. प्रारंभी तो तिला नाकारतो; पण नंतर त्याचे स्नेही विसुभाऊ, यांच्या आग्रहासाठी आणि एक प्रयोग करण्यासाठी तो ती विनंती स्वीकारतो. मंजुळाचं अशोक जहागीरदारच्या घरी आगमन होतं. एका फुलराणीचं आधी भाषाराणीत आणि नंतर महाराणीत रूपांतर होतं.

या प्रक्रियेदरम्यान घडत असलेल्या विविध प्रसंगांतून ‘ती फुलराणी’ हे नाटक घडत जातं. मी या नाटकात अशोक जहागीरदारची भूमिका केली होती, अमृता सुभाषनं मंजुळाची भूमिका अतिशय समजुतीनं आणि ताकदीनं केली होती. अशोकची मानसिकता समजून घेत असताना, पु.लं.नी संहितेत अनेक जागा निर्माण करून ठेवल्या आहेत. मला त्या जागा समजून घ्याव्या लागल्या. मंजुळाच्या नितांत सुंदरतेनं बेतलेल्या पात्राच्या अनेक पैलूंना समजून घ्यावं लागलं. बुद्धिमत्ता आणि भाषा यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो. आपल्या भाषेवर आपल्या भवतालाचा परिणाम होत असतो व त्यातून भाषासंस्कार घडत जातो. मंजुळा हे पात्र मुळातच बुद्धिमान व संवेदनशील आहे. अशोकच्या तोंडून जेव्हा ती बालकवींची ‘हिरवे, हिरवे गार गालिचे’ ही कविता ऐकते, तेव्हा ती हळवी होते, कवितेच्या अंतरंगात अलगद शिरते. तिचं अंतरंग आणि बहिर्रंग भावमय होतं. आईच्या संदर्भातील ओळी येतात तेव्हा त्या उच्चारताना ती ओलावते. अशोकच्या नजरेतून तिचे उच्चार चुकतात, पण तिच्या भावना सच्च्या असतात. लहानपणीच गेलेल्या आईच्या कुशीत बसता न आल्याचं दु:ख त्या ‘अशुद्ध’ उच्चारणातून जाणवत राहातं. मी या मुलीतलं ‘अ-उच्चभ्रू’ बहिर्रंग बदलून तिचं अंतरंग व बहिर्रंग- दोन्ही बदलवून तथाकथित लब्धप्रतिष्ठित लोकांना निरुत्तर करण्याइतपत सक्षम करीन असा अशोकचा निर्धार असतो. मंजुळा ही अंतरंगातून विलक्षण सामर्थ्यशाली स्त्री सशक्तपणे स्वत:चा व अशोकचा निर्धार पूर्णत्वाला नेते. स्त्रीनं मनाशी ठरवलं, तर ती आपला निर्धार पूर्ण करतेच हे जगभरातल्या स्त्रियांचं वैशिष्ट्य मंजुळा सामर्थ्यानं दाखवते.

आणखी वाचा-दु:ख ‘एकुलत्या एक’ मुलांचं!

अशोक जहागीरदार तिला अनेकदा तिचा अपमान करतो. मला जाणवलेलं त्याचं एक कारण म्हणजे त्याला तिचा निर्धार तपासून घ्यायचा असतो, तिला जर उघड उघड प्रोत्साहन दिलं तर ती कदाचित आपल्या ध्येयापासून ढळेल, असं त्याला वाटत राहातं. तिनं महाराणीसारखा विचार करावा, ही त्याची भूमिका, तर मंजुळा मात्र तिच्या समजुतीनुसार रुमाल आणून दे, चप्पल आणून दे अशी आपल्या गुरूसेवेची भूमिका सांभाळत राहते.

मंजुळाच्या व्यक्तिरेखेला कितीतरी पदर आहेत. मंजुळा हे एक स्त्री पात्र समाजातले तिला व्यवसायानिमित्त भेटणारे विविध प्रकारचे पुरुष, गुरू, गुरूमित्र, तिचे वडील अशा प्रत्येक पुरुषांबरोबर वेगवेगळ्या प्रकारे वावरते, त्यावेळी तथाकथित अडाणी स्त्रीजवळ असलेली उपजत शहाणीव सतत व्यक्त होताना दिसत राहते. अशोकला कधी विनंती करायची, त्याच्या कलानं कधी घ्यायचं, त्याच्यावर कधी भडकायचं याचे तिचे स्वत:चे आडाखे आहेत. विसुभाऊ तिला सन्मानानं वागवतात म्हणून त्यांना योग्य सन्मान द्यायचा, बापाबरोबर बापाचं नातं टिकवायचं हे ती बरोबर सांभाळते. ती स्वत:च्या पायावर उभी आहे, याचा तिला सार्थ अभिमान आहे, पण गर्व नाही.

मंजुळानं एका पार्टीत एका संस्थानाची ‘कथित महाराणी’ म्हणून स्वत:ला सिद्ध केल्यानंतर या यशामुळे हरखून गेलेला अशोक स्वत:चीच पाठ थोपटून घेत असताना मंजुळा, त्याच्यावर भडकते व त्याला चप्पल फेकून मारते. माझा यात काहीच वाटा नाही का? मी दिवस-रात्र मेहनत केलेली नाही का? यासाठी मीही माझं सर्वस्व पणाला लावलं आहे, त्याची तुला किंमत नाही का? असे थेट प्रश्न ती त्याला विचारते. मंजुळाच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैविध्यपूर्ण छटा पु.लं.नी सामर्थ्यानं दाखवलेल्या आहेत. त्यांची मंजुळा कुठेही आक्रस्ताळी होत नाही की कुठेही परिस्थितीशरण होत नाही. पु.लं.नी मंजुळा व अशोक यांच्यातला नातेबंध संवेदनशीलतेनं हाताळला आहे. वयानं मोठा असलेला अशोक हा मंजुळाचा बाप होत नाही, मित्र होत नाही, प्रियकरही ठरत नाही. परस्परांसमवेत वागताना दोघंही संवेदनशील व्यक्ती म्हणूनच राहतात. मराठी नाटकांमध्ये फार क्वचित अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा घडल्या आहेत. एकमेकांच्या अनुपस्थितीत जेव्हा त्यांना परस्परांच्या भावनांसंबंधी साक्षात्कार होतो, तो साक्षात्कारही पु.लं.नी सामर्थ्यानं सांभाळला आहे. या नाटकाचा तोल जराही ढळत नाही.

आणखी वाचा-माझी मैत्रीण: मैत्रीचं माहेरघर

महाराष्ट्रात बोलीवैविध्य आहे यामुळे पु.लं.नी नायकाला उच्चारशास्त्रज्ञ बनवलं व त्याच्या निमित्ताने मराठी रसिकाला भाषेकडे पाहण्याचा संपूर्ण वेगळा आणि काळाच्या अतीत नेणारा दृष्टिकोन दिला. भाषिक उच्चारांवर सामाजिक स्तरभेद ठरत असतात, तसाच आजही स्त्रीला दुय्यम स्थानी लेखणारा समाज आहे. मंजुळा विसुभाऊंना सांगते, ‘अडाणी बाईला बाईसाहेब व्हायचं असेल तर तिच्या डोळ्यांसमोर चांगलं वागणारं माणूस असावं लागतं. बाई वागते कशी यापेक्षा तिला वागवलं कसं जातं त्याप्रमाणं ती वागणार. तुम्ही मला मंजुळाबाई असं म्हणालात ना तेव्हापासून माझं खरं शिक्षण सुरू झालं.’ आजही आपल्या समाजाला या प्रकाराच्या दृष्टिकोनाची गरज आहे, हे दुर्दैवी असलं तरी खरं आहे.

avinashnarkar@ymail.com

शब्दांकन : डॉ. नितीन आरेकर
nitinarekar@gmail.com

Story img Loader