‘टेलिब्रॅण्ड्स’ या टेलिशॉपिंगशी निगडित व्यवसायाची मुहूर्तमेढ मनीषा आणि पती हितेश इसरानी यांनी १९९५ मध्ये रोवली. विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून आज त्यांचं ‘टेलिब्रॅण्ड्स-हॉटब्रॅण्ड्स’ ४ कोटी घरांमध्ये पाहिलं जातं.  सुरुवातीची १० कोटी रुपयांची त्याची उलाढाल आता १२० कोटी रुपयांवर पोहोचली असून ४ हजार दालनांमध्ये त्यांची उत्पादनं आहेत.  ई-कॉमर्सचं फॅड येण्याआधीपासून सतत नफ्यात राहिलेल्या आणि वेगानं विस्तारणाऱ्या ‘टेलिब्रॅण्ड्स’ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा इसरानी यांच्याविषयी..

जन्म, बालपण विदेशात.. ऐन दहावी इयत्तेच्या वर्षांत भारतात परतणं.. नंतर कॉलेजच्या दिवसात एका मुलावर प्रेम जडणं.. घरच्यांचा विरोध होणं आणि त्यातून पुन्हा विदेशात रवानगी.. आणि शेवटी लग्नबंधनात अडकून.. उद्योगात भागीदार होत होत शेवट गोड होणं..  राजस्थानात काही वर्षांपूर्वी घडलेली ही सत्यकथा. भौगोलिक आणि सामाजिक स्थितीला साजेशी अशीच.  दूरचित्रवाणीवरील एखाद्या मालिकेचा प्रवास जसा गोड शेवटात होतो तसंच काहीसं मनीषा यांच्याबाबत झालं. मालिकेसारखं इथं एकमेकांचं दुरावणं आणि जवळ येणं तेवढं ताणलं गेलं नाही. उलट मनीषा व हितेश यांनी यांनी त्या काळात दाखविलेल्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ धोरणानं ते सोप्प झालं. ‘टेलिब्रॅण्ड्स’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आणि हितेश इसरानी यांची प्रेमकहाणी आता व्यवसायाची नवनवीन क्षितिजे धुंडाळते आहे.

‘‘माझा जन्म झांबियातील. तिथंच मी वाढले. नववीपर्यंतचं शिक्षणही तिथंच झालं. वडील डॉक्टर. वडिलांचं सामाजिक कार्यही तिथंच सुरू होतं. ते दक्षिण आफ्रिकेतील खेडय़ात जात. शिबिरं आयोजित करत. त्यांचं सर्वच, अगदी शेवटंचं कार्यही तिकडेच झालं..’’ मनीषा आपल्या भूतकाळाबद्दल सांगत होत्या. ‘‘दहावीसाठी मी भारतात आले. पुढे पदवीपर्यंत इथेच शिकले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी लंडनला गेले. ‘बिझनेस स्कूल ऑफ लंडन’, ‘युनिव्हसिटी ऑफ हल’मधून एमबीए केलं. विपणन (मार्केटिंग) हा विषय अभ्यासाला होता. त्यानंतर यूकेतच जर्मन बनावटीच्या स्कोडा कार कंपनीत तीन वर्षे नोकरी केली. ‘फोक्सव्ॉगन’ समूहातील या कंपनीचा सुरुवातीच्या कालावधीतील अनुभव खूपच मार्गदर्शक ठरला. इथेच मला हितेशच्या रूपाने जीवनाचा जोडीदार भेटला. वडिलांना पटत नव्हतं. ते म्हणायचे, ‘तू सोडून दे हे सगळं. त्याच्याबरोबर तू निव्वळ वेळ वाया घालवते आहेस.’ आमच्या नात्यासंदर्भात सकारात्मक काही घडेना शेवटी मी विदेशात उच्च शिक्षणासाठी गेले.’’

‘‘ हितेशच्या बाबतीत मला जे सांगितलं गेलं, तेच त्याला माझ्याविषयी सांगण्यात आलं. त्यांच्या कुटुंबीयांकडून. ‘कॉलेज में टाइमपास करता रहता है. कुछ ढंग का काम कर. लाइफ में काम आयेगा’ वगैरे वगैरे. हितेशच्या बहिणीचा चीनमध्ये उत्पादित वस्तूंचा कारखाना होता. तिचं म्हणणं भारतात उनाडक्या करण्यापेक्षा त्यात लक्ष घाल. पाहिजे तर परीक्षा वगैरे इथे चालू ठेव. त्याच्या बहिणीचा अमेरिकेतील याच क्षेत्रातला आणखी एक व्यवसाय स्थिरावलेला होता. बहिणीच्या आग्रहावरून हितेश चीनला गेला. तिथे काही दिवस राहून तो पुन्हा भारतात आला. व्यवसाय सुरू केला. मी भारतात आल्यानंतर त्याला मदत करु लागले. एका वर्तमानपत्रात त्याने सन ग्लासेसची जाहिरात दिली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ८ लाख रुपयांची मागणी नोंदवली गेली. पण अल्पावधीत ती पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे माल नव्हता. पैसे परत करण्याचं आम्ही ठरवलं.  पार्सल मी स्वत: तयार करायचे. डीडी (डिमांड ड्राफ्ट)चा जमाना होता तो. बँकेत जावं लागायचं. व्यवसायाच्या सुरुवातीचे दिवस होते ते. व्यवसायात स्थिरावण्यासाठी हितेश राजस्थान, दिल्ली फिरत होता. अचानक मुंबईतून त्याला पाठबळ मिळालं. तेव्ही जीपीओमध्ये (टपाल मुख्यालय) खन्ना नावाचे सरव्यवस्थापक होते. त्यांनी पाठिंबा दिला. तुझ्याकडे १,००० पार्सल असतील तर मी तुला ५,००० करिता सहकार्य करतो, असं म्हणत त्यांनी उभारी दिली. मित्र, कुटुंबांकडून काही रक्कम कर्ज म्हणून घेतली. व्यवसायासाठी म्हणून नंतरच्या टप्प्यात हितेशच्या वडिलांचा आधार मिळाला. माझे सासरे राजस्थान उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. आज निवृत्तीनंतर ते विविध समित्यांवर आहेत..’’

मनीषा आणि हितेश दोघांनी व्यवसायात भागिदारी घेतली आणि लगेचच लग्नाचाही निर्णय घेतला. त्यांना  तीन मुले असून पैकी सर्वात मोठा कॉलेजमध्ये शिकतोय.
‘टेलिब्रॅण्ड्स’ या टेलिशॉपिंगशी निगडित व्यवसायाची मुहूर्तमेढ मनीषा आणि हितेश इसरानी यांनी १९९५ मध्ये रोवली. जानेवारी २०१६ पासून ‘टेलिब्रॅण्ड्स’ने स्वत:च्या दूरचित्रवाहिनीकरिता स्वतंत्र ‘एचबीएन (हॉटबॅ्रण्ड्स नेटवर्क) इंडिया’ हे नाव धारण केलं आहे. कंपनी अन्य वाहिन्यांवर‘ टेलिब्रॅण्ड्स’ याच तिच्या पूर्वीच्या नावाने उत्पादनांच्या प्रसाराचं कार्य करत राहणार आहे.  दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवरुन ‘टेलिब्रॅण्ड्स-हॉटब्रॅण्ड्स’ आज ४ कोटी घरांमध्ये पाहिलं जातं. व्हिडीओकॉन, डिश, केसीसीएल, एशियानेट आदी वाहिनी प्रसारक कंपन्यांवर ते दिसतं. बांगलादेश, भूतान, पाकिस्तान आदी देशात असणारी ही कंपनी आता युरोप, लॅटिन अमेरिकेतही विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी, किरकोळ विक्री, संकेतस्थळ यानंतरचा कंपनीचा माध्यम प्रवास आता मोबाइलसारख्या मंचावरूनही होत आहे.
टेलिब्रॅण्डसची १८ वर्षांपूर्वीची उलाढाल अवघी १० कोटी रुपयांची होती. ती आता १२० कोटी रुपयांवर गेली आहे. ४,००० दालनांमध्ये तिची उत्पादनं आहेत. कंपनीची स्वत:चीही २०० दालनं आहेत. ठाण्यातील वागळे इस्टेटमधल्या औद्योगिक पट्टय़ात ‘टेलिब्रॅण्ड्स’चा आता स्टुडिओ, निर्मिती व्यवस्थाही आहे. वाहिनी व्यवसायाचं संपूर्ण काम मनीषा पाहतात.

मनीषा यांचं वेगळं काम :
टेलिशॉपिंग आणि फिटनेस यांचा जवळचा संबंध. तेव्हा ‘टेलिशॉपिंग’ या माध्यमाची जबाबदारी पाहत असताना वेगळ्या वाटेवर स्वत:ला झोकून देण्याची त्यांची मनीषा आहे, नव्हे त्यांनी कार्य सुरू केलं आहे. पॅरा अ‍ॅथलेटिक्स (ऑलिम्पिककरिता तयारी करणाऱ्या अपंग व्यक्ती) यांच्या प्रशिक्षण, तयारी पासून ते त्यांच्या फिटनेससाठी आवश्यक ते सर्व सहकार्य त्या करत आहेत. शिवाय आपल्या स्वतंत्र वाहिनीच्या माध्यमातून सध्या या विषयावरील १३ भागांची मालिकाच त्या तयार करत आहेत. सरकारकडून केवळ अशा व्यक्तींना पुरस्कार देऊन होणार नाही तर त्यांचं खरं कर्तृत्व, त्यांची आव्हानं या माध्यमातून समोर यायला हवीत, ही मनीषा यांची भावना. टेलिशॉपिंगमधील महत्त्वाचा पल्ला पार केल्यानंतर आहे त्या व्यवसायाची जोड त्या माध्यमातून देऊ पाहतायेत.

टेलिब्रॅण्ड्स-हॉटब्रॅण्ड्स :
टेलिशॉपिंगमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विशेषत: सिने अभिनेते-अभिनेत्रींच्या अनेक वाहिन्या झळकल्या आहेत. मात्र गेली सलग दोन दशकं सतत नफ्यात राहिलेली ‘टेलिब्रॅण्ड्स-हॉटब्रॅण्ड्स’ ही एकमेव साखळी. चीनमधल्या वस्तू आपल्या मंचावर विकायच्या तर त्यांची गुणवत्ताही पाहायला हवी. म्हणून कंपनी ‘एसजीएस’ या आंतरराष्ट्रीय तपासणी संस्थेमार्फत अशा वस्तूंची चाचणी घेते. दोन नाममुद्रेच्या माध्यमातून स्वत:चे व अन्य वाहिन्यांकरिता स्वतंत्र अस्तित्व राखण्याचा अनोखा पायंडा यामार्फत पाडला गेला आहे. ४,००० रिटेल नेटवर्क, १२० कोटींची उलाढाल आणि २० टक्के बाजारहिस्सा असं सारं या क्षेत्रात पहिल्यांदाच घडत आहे.

व्यवसायाचा मूलमंत्र :
ग्राहक सुलभता ही खूपच महत्त्वाची आहे. आज माहिती तंत्रज्ञानाच्या विविध माध्यमांतून ती पुरविण्याचा प्रयत्न होत आहे. भारतात कौशल्य आहे. पण ते अधोरेखित होत नाही. इथलं म्हणजे स्वस्त असा एक गैरसमज झाला आहे. प्रत्यक्षात तसं नाहीय. उलट अर्थव्यवस्थेला आकार देण्यात आपण महत्त्वाचे ठरतोय. ते मांडलं जाणं आवश्यक आहे.

आयुष्याचा मूलमंत्र :
व्यवसायात म्हणा अथवा वैयक्तिक आयुष्यातही आपल्याला खूप आव्हानांचा सामना एकाच वेळी करावा लागतो. अशा वेळी सहनशीलता, धैर्य या बाबी अपरिहार्य ठरतात. बाका प्रसंग केव्हा उद्भवेल हे सांगता येत नाही. तेव्हा ‘पेशन्स’च तुमचे खरे पाठीराखे असतात. तुमची क्षमताही वेळोवेळी तपासून पाहत जा. अशा वेळी कुटुंबाचं पाठबळंही महत्त्वाचं ठरतं. कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, हे कायम लक्षात ठेवा.

– वीरेंद्र तळेगावकर
veerendra.talegaonkar@expressindia.com

Story img Loader