मध्यम वर्गातील डॉक्टर दाम्पत्याच्या या कन्येनं जाणीवपूर्वक परदेशी जाऊन वित्त शिक्षण घेतलं आणि भारतात आल्यावर वैद्यक क्षेत्रातील अनुभवानुसार एकामागोमाग एक छोटय़ा छोटय़ा पॅथलॉजी लॅब ताब्यात घेतल्या. तत्पूर्वी तिनंच स्थापन केलेल्या कंपनीचा भारतभर विस्तार तर केलाच; पण एचआयव्ही, टेस्ट टय़ूब, गर्भपातविषयक नेमक्या चाचण्या सर्वप्रथम देशात उपलब्ध करून देण्याचं श्रेय तिच्या ‘करिअर ग्राफ’मध्ये नोंदलं गेलं. त्या ‘मेट्रोपॉलिस हेल्थकेअर’च्या व्यवस्थापकीय संचालक अमीरा शाह यांच्याविषयी.
दक्षिण मुंबईतल्या गिरगावसारख्या मध्यवर्ती ठिकाणी राहणाऱ्या अमीरा शाह यांचे आई आणि वडील दोघेही डॉक्टर. त्यांचे आजोबाही डॉक्टरच. अमीरा सांगतात, ‘‘आजोबांचं कुटुंबही तसं मोठं होतं. म्हणजे घरात २०-३० जण तर नेहमी असायचेच. ते स्वत: वैद्यकीय व्यवसाय करायचे. घरात खाणारी तोंडं अधिक, पण त्याही स्थितीत काटकसर करत त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना डॉक्टर केलं. माझे आई-वडील डॉक्टर असले तरी सामान्य घरातून येऊन स्थिरावले होते. म्हणूनच मलाही परिस्थितीची जाणीव लहानपणापासूनच होती. तशीच शिकवण दिली गेली होती. घरात एसी किंवा शाळेसाठी कार असले लाड नव्हते. पण आम्हाला स्वातंत्र्य होतं. काय शिकायचं ते तूच ठरव असं सांगत असतानाच तू जे क्षेत्र निवडशील त्यात उत्तमच असली पाहिजेस, हे मात्र बाबा आवर्जून सांगायचे. इतकंच नाही तर कोणत्याही स्त्रीनं आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी असलंच पाहिजे, हे आई मला लहानपणापासून सांगत आलीय. तुमच्यातील आत्मविश्वास वाढण्यासाठी ते आवश्यक आहे, असं तिचं म्हणणं.’’

अमीरा यांचं शालेय शिक्षण गिरगाव परिसरातच झालं. त्यानंतर बारावीपर्यंत त्या चर्चगेटच्या एच. आर. महाविद्यालयात होत्या. पदवी शिक्षणासाठी त्यांनी विदेशात जायचं ठरवलं. त्यांच्यासाठी विदेशात शिक्षण घेणं महत्त्वाचं, कारण तेथे तुमच्या वयाच्या अगदी १६ व्या १८ व्या वर्षीच तुमच्या दीर्घकालीन करिअरविषयी विचार करू शकता. तिथे वेगवेगळे मार्गही सुचवले जातात. तिथे तुम्हाला प्रयोग करण्याची संधी मिळते. म्हणजे तुम्ही अमुक शाखा निवडली आणि नंतर वेगळं काही करायचं ठरवलं तरी तुम्हाला संबंधित शिक्षणाची पुन्हा एकदा संधी मिळते, असं अमीरा यांचं मत. म्हणूनच विदेशात गेल्यावर त्यांनी जाणीवपूर्वक सरकारी शिक्षणसंस्थेची निवड केली. त्याचं कारण त्या सांगतात की, ‘‘श्रीमंत विद्यार्थी असलेल्या मुलांमध्ये तुम्ही लवकर ‘अ‍ॅडजस्ट’ होऊ शकत नाहीत. तिथे जग एकाच नजरेतनं दिसतं. उलट मध्यमवर्गीयांमध्ये आर्थिक पाश्र्वभूमीतील वैविध्य तुम्हाला दिसतं. अशावेळी तुम्ही व्यक्तिगणिक मोकळेपणाने वावरू शकता. सत्य परिस्थितीची जाणीव आणि त्याचबरोबर वेगळे विचार, समस्यांचा सामना हे सारं काही अशा स्थितीत शिकायला मिळतं, जे आयुष्यात खूपच महत्त्वाचं आहे. पण कुठल्याही विद्यापीठाच्या अध्यापनात नसणारं!’’

job at barc as a researcher research opportunity at barc
नोकरीची संधी : बीएआरसीत संशोधन संधी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Scheduled Caste students scholarships,
अकोला : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात: महाविद्यालयांची टाळाटाळ अन्…
Higher education , skill courses, guidelines UGC,
उच्च शिक्षणात आता कौशल्य अभ्यासक्रमांवर भर; ‘यूजीसी’कडून मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध
sbi education loan Study abroad
परदेशात शिक्षण घ्यायचे; पण पैशांची अडचण येतेय? मग SBI च्या शैक्षणिक कर्जाचा ‘हा’ पर्याय एकदा घ्या जाणून
Bhabha Atomic Research Centre
नोकरीची संधी
Foreign Education Concepts Misconceptions Idea of ​​Education Career news
जावे दिगंतरा: परदेशी शिक्षण : समजगैरसमज
Image Of Anita Anand
Anita Anand : कोण आहेत भारतीय वंशाच्या अनिता आनंद, ज्यांना मिळू शकते कॅनडाच्या पंतप्रधानपदाची संधी

टेक्सास विद्यापीठात अमीरा यांनी चार वर्षांच्या वित्त विषयातील पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. पहिल्या वर्षांच्या शिक्षणासाठी त्यांना पालकांनी अर्थसहाय्य केलं. पण पुढील तिन्ही वर्ष त्या शिष्यवृत्ती आणि नोकरीच्या साहाय्याने शिकल्या. अमीरा यांनी न्यूयॉर्कमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात काही लहान-मोठय़ा कंपन्यांमध्ये काम केलं. पण तिथेही त्यांना बडय़ा कंपन्यापेक्षा छोटय़ा फर्ममध्ये काम करायला अधिक आवडायचं.

त्या सांगतात, ‘‘ वीस हजार कर्मचारी असलेल्या कंपनीत कोण काय करतं, तुमचे सहकारी कोण या सगळ्याला कुठेही स्थान नसतं. उलट कमी लोकांमध्ये काम करताना तुम्ही काय करता याला अधिक महत्त्व दिलं जातं. अशा ठिकाणी तुम्ही एखादं चुकीचं काम केलं तर त्याचा विपरीत परिणाम कंपनीवर लवकर होतो. चांगलं केलं तर कंपनीच्या यशात तुम्हीही सहभागी असता.’’

२००१ मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमीरा भारतात परतल्या. आपण जे काही शिकलो त्याचा विनियोग इथे, देशवासीयांना करण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘उद्योजक’ व्हायचं ठरवलं. तेही सभोवताली असलेल्या वैद्यकीय वातावरणाच्या जोरावर. वैद्यकीय क्षेत्रात मार्गदर्शक खूप होते; पण व्यावसायिक सल्ला देणारं कुटुंबात कुणीच नव्हतं, म्हणून आपण या क्षेत्रात हेतुपुरस्सर आल्याचं अमीरा नमूद करतात. अमीरा यांच्या वडिलांची ‘डॉ. सुशील शहाज् पॅथ लॅब’ होतीच. शिवाय ते वैद्यकीय सेवाही देत होतेच. १,८०० चौरस फूटमधील या लॅबमध्ये २००० सालापर्यंत ४० लोक कामाला होते. त्याला व्यावसायिक स्वरूप देणं अमीरा यांना गरजेचं वाटलं. त्यावेळी ६ ते ७ कोटी रुपये महसूल मिळायचा. १ ते १.५ कोटी नफा होत होता. साहजिकच त्याचा विस्तार करण्याचा विचार सुरू झाला. सुरुवातीच्या टप्प्यात सोबत असलेल्या अनेक तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने या लॅबचं ‘मेट्रोपॉलिस’ नामकरण झालं. आणि भारतभरातील त्या त्या परिसरात कार्यरत असलेल्या लॅब ‘मेट्रोपॉलिस’बरोबर जोडण्याचा प्रयत्न अमीरा यांनी केला. याद्वारे तांत्रिक कौशल्य असलेल्या मात्र व्यावसायिक गंध नसलेल्यांना ‘मेट्रोपॉलिस’चं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं ध्येय होतं. अमीरा यांना एक बहीणअसून तीही विदेशात पॅथॉलॉजिस्ट आहे.
‘मेट्रोपॉलिस’मध्ये संस्कृतीला खूप महत्त्व असल्याचं अमीरा शाह सांगतात. ही संस्कृती म्हणजे काय? तर त्या म्हणतात, ‘‘आरोग्य निदान चाचणी आणि तिचे निकाल याला खूपच महत्त्व आहे. त्यातील थोडीशी चूक केवळ रुग्णाच्या पुढील उपचारावरच नव्हे तर त्याच्या मानसिकतेवरही परिणाम करणारी असते. तेव्हा पुन्हा पुन्हा तपासणं आणि त्यात अचूकता आणणं हे प्राधान्यानं पाळलं जातं. ‘अचूकतेची संस्कृती जपणारं ‘मेट्रोपॉलिस’ असं त्या आपल्या कामाचं एका वाक्यात अभिमानानं वर्णन करतात, आणि तेच त्याच्या यशाचं गमक आहे.

‘मेट्रोपॉलिस’च्या या महिला प्रवतर्काच्या केबिनमधलं
Integrity is in our venis
Empathy is in our blood
Accuracy is in our DNA
हे ब्रीद ही are Metropolis असल्याचं सिद्ध करतात ते अमीरा यांच्या व्यावसायिक तत्त्वज्ञानामुळे. आपली नाळ ओळखून त्या वर्गाला माफक पण अचूक आरोग्यनिदान सेवा उपलब्ध करून देणारं ‘मेट्रोपॉलिस’ आज वैद्यक व्यावसायिकांसाठीही विश्वासाचं ‘सेकंड ओपिनियन’ ठरलं आहे.

व्यवसायाचा मूलमंत्र :
गुणवत्ता ही खूपच महत्त्वाची आहे. नीतिमत्ता सोडता कामा नये. व्यवसाय म्हणून ग्राहकाशी संबंध येत असला तरी त्याला नातेवाईक म्हणून वागणूक मिळायला हवी. व्यवसायात वाढ होत असताना अथवा नसतानाही तडजोडीला कुठेही थारा देता कामा नये.

आयुष्याचा मंत्र :
आयुष्यात कधीही ‘शॉर्टकट’ अवलंबू नका. रात्री तुम्हाला शांत झोप लागेल, असं कार्य करा. पात्रता आणि आत्मविश्वास ही मोठी संपत्ती आहे, हे लक्षात ठेवा. ते असेल तर तुम्ही सारं जग जिंकू शकता. कुटुंबही खूप महत्त्वाचं आहे. पण प्रत्येकासाठी वैयक्तिक आयुष्याची भक्कम उभारणीही तितकीच गरजेची आहे.

अमीरा शाह :
अमीरा यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम २००३ मध्ये चेन्नईतील लिस्टर लॅबमधील ५१ टक्के हिस्सा ‘मेट्रोपॉलिस’ने खरेदी केला. तेव्हा ३.५ कोटी रुपयांचा महसूल व ७० ते ८० लाख रुपयांचा नफा कमाविणारी ही लॅब ‘मेट्रोपॉलिस’नं कालांतराने पूर्णच ताब्यात घेतली. २०१३ पर्यंतच्या दशकभरात कंपनीने २० विलीनीकरण प्रक्रिया पार पाडली आहे.

‘मेट्रोपॉलिस’ हेल्थकेअर :
६५० कोटी रुपयांचा महसूल जमविणारी ‘मेट्रोपॉलिस’ ही भारतातील निदान क्षेत्रातील आघाडीच्या पहिल्या तीनमधली कंपनी आहे. या तीनपैकी श्रीलंका, आफ्रिका, मध्य पूर्वेतील काही देश, केनिया असं विदेशी अस्तित्व असणारी ती एकमेव आहे. एचआयव्ही, टेस्ट टय़ुब, गर्भपात क्षेत्रातील नेमकी कारणे शोधून काढणाऱ्या चाचण्या सर्वप्रथम ‘मेट्रोपॉलिस’नं विकसित केल्या आहेत.

– वीरेंद्र तळेगावकर
veerendra.talegaonkar@expressindia.com

Story img Loader