‘‘चित्रपटाच्या पडद्यावर आणि पडद्यामागच्याही प्रत्येक क्षेत्रात करिअर करता येतं. तुम्ही फक्त तुमची आवड तपासून बघायची आणि मग त्यात स्वत:ला झोकून द्यायचं. आम्ही इथे येणाऱ्या प्रत्येकाला त्यासाठी प्रोत्साहन देतो. अनेकांना त्यातून वेगवेगळी करिअर करता आली. नाव कमावता आलं, त्याचं खूप मोठं समाधान आहे.’’  सांगणाऱ्या ‘डू व्हॉट यू लव’ हे ब्रीदवाक्य असलेल्या ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल’च्या अध्यक्षा

 

त्या लहानाच्या मोठय़ा झाल्या हिंदी सिनेसृष्टीत, सिनेमाचं बाळकडूच त्यांना मिळालं असं म्हणायला हरकत नाही कारण लहानपणापासूनच चित्रपटाचंच वातावरण सभोवती. शूटिंगच्या ठिकाणी असो वा घरी, विविध कलाकारच नव्हे तर पडद्यामागचे तंत्रज्ञसुद्धा घरचेच जणू. कारण त्या आहेत सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांच्या कन्या, मेघना घई-पुरी. मुंबईतल्या वांद्रे येथील शाळेत दहावीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर लंडनला जाऊन तिथे उच्च शिक्षण आणि पुढे व्यवसाय व्यवस्थापनाचे शैक्षणिक कौशल्यही त्यांनी आत्मसात केलं. इतकंच नव्हे तर अनुभव म्हणून परदेशात त्यांनी याच क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये नोकरीही केली. आणि नंतर सज्ज झाल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी, वडिलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी..

‘कालिचरण’, ‘कर्ज’, ‘हिरो’, ‘मेरी जंग’, ‘खलनायक’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शक असलेल्या सुभाष घई यांच्या मार्गदर्शनाखाली मेघना यांनी आपलं सिने अध्यापन खूप लवकरच सुरू केलं होतं. त्यानंतर परदेशातील डॉट कॉम कंपनीतला अनुभव,  व्यवस्थापनाचे धडे यांची सांगड त्यांनी जणू वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घातली. त्यासाठी स्थापन करण्यात आलेली कंपनी म्हणजे ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल.’

मेघना सांगतात, ‘‘अभिनयात मला पूर्वीपासूनच रस नव्हता. सुरुवातीच्या काळात वडिलांबरोबर दिग्दर्शनासाठी थोडाबहुत हातभार लावलाही. निर्मिती, पटकथा तसंच सिनेमाच्या जडणघडणीतील काही तांत्रिक बाबतीत मी लक्ष घातलं. इतकंच नव्हे तर वडिलांच्या ‘परदेस’, ‘ताल’, ‘यादें’साठी विपणनाची (मार्केटिंग) जबाबदारीही सांभाळली.’’

चित्रपटाचं प्रशिक्षण देणारी एक खास संस्था असावी, असं सुभाष घईंचं पूर्वीपासून स्वप्न होतं. ‘व्हिसलिंग वूड्स’द्वारे मेघनांच्या माध्यमातून त्यांचा हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ २००० मध्ये आकारास येऊ लागला. त्यासाठी लागणाऱ्या निधी उभारणीकरिता भांडवली बाजाराचा पर्याय उभा केला गेला. घई यांची चित्रपटनिर्मिती कंपनी असलेल्या ‘मुक्ता आर्ट्स’ची मग याच दरम्यान शेअर बाजारातही नोंदणी झालं.

‘‘मलाही वाटलं, मी हे सारं काही करू शकेन का? पण वडिलांची इच्छा होती की, त्यांच्या या नव्या बाळाचं संगोपन मी करावं. ‘व्हिसलिंग वूड्स’चं त्यांनी मला केवळ अध्यक्षच केलं नाही तर माझ्याबरोबर देश-विदेशातील सिने जगतातील अव्वल मंडळीही दिली. ‘व्हिसलिंग’च्या अध्यक्षपदाबरोबरच मी स्वत: सुरुवातीच्या टप्प्यात अगदी एक्झिक्युटिव्ह, मॅनेजर म्हणूनही काम केलं,’’ मेघना सांगतात.

खरं तर मेघना यांची लहानपणापासूनच या किंवा अशा प्रकारच्या कामाला सुरुवात झालीच होती. वयाच्या १३ व्या – १४ व्या वर्षी त्या घईंबरोबर त्यांचं ऑफिस म्हणा किंवा शूटिंगस्थळी जात. अगदी रिसेप्शनिस्ट ते साहाय्यक म्हणूनही त्या काम करत. मेघना दहावीत असताना वडील तयार करत असलेल्या भारतीय सिनेमाच्या शतकोत्तर लघुपटनिर्मितीत त्यांनी सहकार्य केले. इतकंच नव्हे तर घईंच्या ‘परदेस’साठी त्यांनी कथालेखनही केलं. मात्र अभिनय, दिग्दर्शनाची वाट करिअर म्हणून सुलभ असतानाही मेघना त्यात उतरल्या नाहीत. त्यांनी चित्रपट क्षेत्राकडे पाहिलं ते व्यवसाय म्हणूनच. त्या सांगतात, ‘‘माझ्या आई-बाबांनी कधीच माझ्यावर त्यांचा निर्णय लादला नाही. पण बाबांबरोबर काम करत असताना, अगदी सगळ्या प्रकारची कामं केल्यामुळे मला नेमकं काय करायचंय ते अचूक समजलं. शिवाय बाबांनी तंबीच दिल्यामुळे मी बाहेरही कामं केली. एका डॉट कॉम कंपनीत तसेच जाहिरात संस्थेमध्येही मी काम केलं. वडिलांच्या कोणत्याही सहकार्याशिवाय मी तिथे काम करत होते. यामागे बाबांचा हेतू एकच, कर्मचारी म्हणून काय करावं लागतं आणि कसं करावं लागतं ते मी जाणून घ्यावं. त्याचा विनियोग भविष्यात मला निवडलेल्या करिअरमध्ये करता यावा. म्हणूनच या कंपनीची मी मालक असले तरी कर्मचारी, कलाकार म्हणून त्यांची वैयक्तिक आयुष्यं व इथलं कार्य यांचा योग्य मेळ घालण्यावर मी भर देते.’’

सुरुवातीच्या प्रवासाचं वर्णन करताना मेघना म्हणतात, ‘‘मला आवड होती म्हणूनच मी स्वत:ला या क्षेत्रात अगदी झोकून दिलं. ‘व्हिसलिंग वूड्स’च्या स्थिरस्थावर होण्याचं मोठं आव्हान माझ्या पुढय़ात होतं. मला त्यासाठी कुटुंबाकडूनही पाठिंबा मिळत होता. पती राहुल पुरीदेखील याच क्षेत्रात असले तरी त्यांचा पिंड जाहिरात, माध्यम क्षेत्रात रमणारा. अनया (९) आणि रणवीर (५) यांना अगदी ते काही महिन्यांचे असल्यापासून ‘व्हिसलिंग वूड्स’मध्ये मी आणते आहे. कारण त्यांचं संगोपन आणि माझं काम हातात हात घेऊनच चाललं आहे.’’

‘व्हिसलिंग वूड्स’बद्दल त्या सांगतात, स्वप्न तर पाहिलं होतं मात्र ते पूर्ण करण्याचा काळ खडतर होताच. ही संस्था उभी करण्यातच काही र्वष गेली. ही संस्था म्हणजे या क्षेत्रातला ‘बेंचमार्क’ करण्याचं आमचं ध्येय होतं. त्यासाठी घाई किंवा तडजोड करून चालणार नव्हतं. त्यासाठी मी देश-विदेशात फिरले. विदेशी तंत्रज्ञान, सिने शिक्षणपद्धती अभ्यासली. आमची कंपनी पहिली तीन-चार र्वष तोटय़ातच होती. त्यातच गोरेगावच्या जागेवरून कंपनी राजकीय आणि कायद्याच्या चर्चेत अडकली. मात्र मनोरंजन क्षेत्रातील भविष्यातले कलाकार घडविण्याचं कार्य थांबलं नाही. उलट त्याला गती मिळत गेली.

चित्रपटाच्या पडद्यावर आणि पडद्यामागे खूप काही करता येतं. त्यातल्या प्रत्येक क्षेत्रात करिअर करता येतं. तुम्ही फक्त तुमची आवड तपासून बघायची आणि मग त्यात स्वत:ला झोकून द्यायचं. शिवाय आवडत्या क्षेत्राबरोबर दुसऱ्या क्षेत्रातही तुम्ही स्वत:ला तपासून पाहू शकता. आम्ही इथे येणाऱ्या प्रत्येकाला त्यासाठी प्रोत्साहन देतो. अनेकांना त्यातून वेगवेगळी करिअर करता आली. अनेक जण आपापल्या क्षेत्रात नाव कमवत आहेत. त्याचं खूप मोठं समाधान आहे’’ ‘प्रिन्सिपॉल’ मेघना स्पष्ट करतात.

तुमचं मन ज्यात रमेल ते करा, हा सुभाष घईंचा मंत्र मेघना यांनी पुरेपूर जपला. ‘डू व्हॉट यू लव’ हे ब्रीद म्हणूनच ‘व्हिसलिंग वूड्स’ला चिकटवलं गेलंय.

 

मेघना घई-पुरी

वडील सुभाष घईंबरोबर दिग्दर्शन, निर्मिती आदींचे धडे गिरवणाऱ्या मेघना या आशियातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सिने प्रशिक्षण कंपनीच्या अध्यक्षा बनल्या. भांडवली बाजारात प्रवर्तक कंपनी सूचिबद्धतेपासूनचं त्यांचं कार्य आज जवळपास १,००० कोटी रुपयांच्या उलाढालीत रूपांतरित झालं.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा सोशल सायन्सच्या पुढाकाराने मनोरंजन क्षेत्रातील कौशल्याधारित अभ्यासक्रमासाठी देशातील

१० निमशहरांमध्ये प्रथमच ‘प्रशिक्षण हब’ साकारले जात आहेत.

 

व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल

सिने प्रशिक्षण क्षेत्रातील जागतिक दर्जाचे धडे देणारी ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल’ ही भारतातील एकमेव संस्था आहे. जगातील पहिल्या दहा प्रशिक्षण

देणाऱ्या संस्थांमध्ये तिचं स्थान अव्वल आहे. प्रशिक्षित १,४०० हून अधिक जण येते कार्यरत आहेत. सोनीचं ३ डी सारखं अद्ययावत तंत्रज्ञान, यूटय़ूबचा स्टुडिओ असं आंतराराष्ट्रीय कंपन्यांचं तांत्रिक व्यासपीठ असं आशियात केवळ ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल’मध्येच उपलब्ध आहे.

मेघना घई-पुरी

वडील सुभाष घईंबरोबर दिग्दर्शन, निर्मिती आदींचे धडे गिरवणाऱ्या मेघना या आशियातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सिने प्रशिक्षण कंपनीच्या अध्यक्षा बनल्या. भांडवली बाजारात प्रवर्तक कंपनी सूचिबद्धतेपासूनचं त्यांचं कार्य आज जवळपास १,००० कोटी रुपयांच्या उलाढालीत रूपांतरित झालं.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा सोशल सायन्सच्या पुढाकाराने मनोरंजन क्षेत्रातील कौशल्याधारित अभ्यासक्रमासाठी देशातील

१० निमशहरांमध्ये प्रथमच ‘प्रशिक्षण हब’ साकारले जात आहेत.

 

व्यवसायाचा मूलमंत्र

तुमचं शिक्षण, करिअर संपलं तरी शिकणं संपत नसतं. व्यवसायातही आपण विद्यार्थिदशेत आहोत, ही भूमिका कायम वठवा. शिक्षण तुम्हाला खडतर आव्हानांना सामोरं जाण्यास शिकवतं. खऱ्या अर्थाने आयुष्य जगण्याबरोबरच व्यवसायही सचोटीने करा. गुणवत्तेला तडा जाऊ

देऊ नका.

आयुष्याचा मूलमंत्र

आयुष्यात शिक्षण आणि प्रशिक्षण या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. व्यवसाय अथवा नोकरी आणि तुमचं वैयक्तिक आयुष्य यात समतोल साधण्याचा प्रयत्न करा. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तेव्हा कोणत्याही एकाकडे खूप दुर्लक्ष होतंय, असं होऊ

देऊ नका.

वीरेंद्र तळेगावकर

veerendra.talegaonkar@expressindia.com

Story img Loader