अमेरिकास्थित बर्ग्रून हॉटेल्स समूहाचा भारतीय आदरातिथ्य व्यवसाय असलेल्या ‘किज्’ हॉटेल्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सरिन यांनी दोन दशकांतील प्रवासानंतर व्यावसायिक गुरूंकडून मिळालेल्या मंत्राच्या जोरावर आदरातिथ्य सेवा क्षेत्राचा विस्तार निमशहरांकडे नेला आहे. सौंदर्यापेक्षा सुलभ सेवा अशा वेगळ्या नजरेतून या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्या देतात.

अमेरिकास्थित बर्ग्रून हॉटेल्स समूहाचा भारतीय आदरातिथ्य व्यवसाय असलेल्या ‘किज्’ हॉटेल्स’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सरिन. मूळच्या दिल्लीच्याच असलेल्या अंशू यांच्यावर त्यांच्या वडिलांच्या विचारांचा पगडा अधिक आहे. मुलगी म्हणून अमूक क्षेत्राला काट मारायची, याचा त्यांना तीव्र संताप. अंशू यांच्या बहिणीने विदेशात वित्त सेवा क्षेत्रासारखा निराळा मार्ग जोपासला, तर अंशूही मुद्दामच आदरातिथ्य व्यवसायात रुळल्या. अंशू यांचं सर्व शिक्षण दिल्लीतच झालेलं. विज्ञान शाखेतून पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर अंशू यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

हॉटेल व्यवसायाकडे वळण्याच्या श्रीगणेशाबद्दल त्या सांगतात, ‘‘करिअरची पारंपरिक वाट मला जोपासायची नव्हती. मला इंजिनीअर, डॉक्टर व्हायचंच नव्हतं. योगायोगानं मी हॉटेल क्षेत्राकडे वळले. शिक्षण घेतलं आणि पुढे यातच स्थिरावले. हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणानंतर मला लगेचच ‘ताज’ समूहात नोकरी मिळाली. पहिली दोन र्वष मी तिथं व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलं. सुरुवातीला सगळ्या छोटय़ा-मोठय़ा जबाबादाऱ्या सांभाळल्या. इथं अकाऊंट, काऊंटर अशा साऱ्याच जबाबदाऱ्या हाताळाव्या लागल्या.’’

अंशू यांनी ताज हॉटेलमध्ये काही महिने शेफचं कामही केलं. तेथील माहिती तंत्रज्ञान विभागही हाताळला. १९९४ पासून पुढील दहाएक वर्षे त्या ‘ताज’हॉटेलमध्ये होत्या. ताज हॉटेलच्या दिल्ली, बंगळुरू, गोवा, मुंबईतील आस्थापनांमध्ये त्यांनी काम केलं. ‘ताज’साठीच्या मुलाखतीपासून ते ती नोकरी सोडेपर्यंत आपल्याला खूप काही शिकायला मिळाल्याचं अंशू स्पष्ट करतात. त्या म्हणाल्या, ‘‘अजित केतकर हे त्यावेळी ‘ताज’ हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी यश मिळवू शकले. दुसरे तुमच्यावर विश्वास ठेवतात, पण त्यासाठी तुमचा तुमच्यावर विश्वास हवा. तुम्हाला जे करायचं त्यासाठी तुम्ही योग्यच असता. फक्त आत्मविश्वास हवा. स्वत:तील दोष काढणं टाळून आपल्यातील गुणांचा विनियोग कसा करता येईल, हे पाहावं, हे मी तिथं शिकले.’ अंशू सांगतात.

‘ताज’साठीच्या गोव्यातील कालावधीतही आपल्याला खूप काही वेगळं शिकायला मिळाल्याचं त्या आवर्जून सांगतात. खुद्द टाटा समूहाच्या प्रशासकीय कार्यपद्धतीत शिक्षण घेतलेले वरिष्ठ अधिकारी आपल्याला खऱ्या अर्थाने मार्गदर्शक म्हणून लाभल्याचं त्या सांगतात. पण पुढे त्याचं हॉटेल करिअर विस्तारत गेलं. ‘‘गोव्यानंतर मी ‘ताज’साठीच मुंबईत आले. या व्यवसायाशी पूरक अशा आणखी एका विमान वाहतूक क्षेत्रात हालचाल वाढली होती. २००६ मध्ये ‘किंगफिशर एअरलाइन्स’ सुरू झाली होती. आता किंगफिशर समूह हॉटेल क्षेत्रातही उतरू पाहत होता. त्यात रुजू होण्यासाठी मला स्वत:हून बोलावणं आलं. पण माझं प्राधान्य स्थिरता आणि स्वातंत्र्य याला होतं. या दोन्हीबाबत मला आश्वस्त केलं गेलं. मग वर्षभरानंतर मी ‘किंगफिशर’ समूहाच्या आदरातिथ्य व्यवसायात आले. लोकांना ओळखायची जाण मी इथं शिकले. कोणतंही क्षेत्र, व्यवसाय अथवा उत्पादन असू देत, त्याबद्दलचं सर्व ज्ञान आपल्याला असलं पाहिजे, हे इथं माझ्यावर बिंबविलं गेलं.

अद्ययावत तंत्रज्ञान, महसूल व्यवस्थापन आदी अंग अंशू यांना इथे उमगलं. नोकरीच्या निमित्तानं, वरच्या पदावर काम करावं लागल्यामुळे त्यांचं शिक्षण काही संपलं नाही. पण असं शिकण्यापेक्षा व्यावसायिक शिक्षण घेतलेलं बरं म्हणून २०१० मध्ये मुंबईच्या एस.पी.जैनमध्ये त्यांनी एमबीए केलं. अंशू सांगतात, ‘‘एमबीएनंतर पुन्हा ‘किंगफिशर’मध्ये जाण्यासाठी मला दरवाजे बंद झाले होते. कारण कंपनीच जमिनीवर आली होती. बरं, माझा यापूर्वीचा अनुभव हा लक्झरी गटातील होता. म्हणजे ताज हॉटेल, किंगफिशर या नाममुद्रा आघाडीच्या तर होत्याच, पण त्यांच्या सेवाही श्रीमंती वर्गासाठी होत्या. पण आपलं घर थोडंच हॉटेलसारखं असतं? किंवा हॉटेलसारखं थोडंच आपण घरात वावरतो? मनाची तयारी केलीच होती. याच क्षेत्रात कार्यरत राहायचं. कंपनी, नाममुद्रा लहान-मोठी असेल तरी चालेल. २०१४ मध्ये संजय सेठींनी ‘किज्’ हॉटेल सोडलं आणि  मला संधी मिळाली.’’

‘किज्’ हॉटेलला मिड मार्केट बाजारपेठेत अव्वल स्थानी नेण्याचं अंशू सरिन यांचं ध्येय आहे. त्यासाठी भारतातील शहरं, निमशहरांमध्ये सात ते आठ हॉटेल्स सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. हॉटेल व्यवसायात व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. म्हणून व्यवसायासाठी स्वत:च्या मालमत्ता उभारण्यापेक्षा, त्यात गुंतवणूक करण्यापेक्षा ‘किज्’ची नाममुद्रा अधिक विकसित करण्यासाठी ते ‘फ्रेंचाईजी मॉडेल’ची साखळी अधिक घट्ट करण्याची त्यांची मनीषा आहे.

आयुष्याच्या ‘डूज अ‍ॅण्ड डोन्ट’बद्दल अंशू सरिन यांचा मंत्र सोप्पा आहे, ‘मोकळे व्हा. मोकळेपणानं बोला. समोरच्यासाठी तुमचा एकच चेहरा ठेवा. वरवर दिसणारा वेगळा आणि त्याच्यामागे असलेले वेगळे विचार अशी कसरत करू नका. वैयक्तिक आयुष्यातही हेच तत्त्व जपा. प्रामाणिकपणा राखा. प्रयत्न करत राहा.’ महिला उद्योजिका म्हणून त्या  भेदभाव मानत नाही. समस्या साऱ्यांनाच असतात. त्या पुरुषांनाही चुकल्या नाहीत, त्यासाठी थोडंसं अतिरिक्त साहस बाळगा. तुम्ही सक्षम असताच, फक्त स्वत:च्या खांद्यावर जबाबदारी पेलण्याची तुमची क्षमता असावी.

व्यवसायाचा मूलमंत्र

व्यवसायात जोखीम तर आहेच, ती कोणत्याही व्यवसायात असतेच. पण त्याचं गणित जमलं पाहिजे. काही कालावधीसाठी ती सहन करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. व्यवसायाबाबत लोकांनी लक्षात ठेवावी अशी नाममुद्रा घडवा. हीच सेवा हवी असा ग्राहकांचा आग्रह असला पाहिजे.

आयुष्याचा मूलमंत्र

शिक्षण महत्त्वाचं आहे. ते वयाच्या कोणत्याही टप्प्यात घ्यावं. अनुभवाच्या शिदोरीबरोबर कालानुरूप आवश्यक शिक्षणाचं ज्ञान हवंच. आयुष्यात कुठेही, कुणासमोर क्षमा मागण्यात कचरू नका. फक्त तुम्ही चूक करून ती सुधारत नसाल तर त्या क्षमेलाही काही अर्थ नाही.

‘किज्’ हॉटेल्स

मूळच्या न्यूयॉर्क येथील निधी व्यवस्थापन समूहाचा ‘किज्’ हॉटेल हा भारतातील आदरातिथ्य व्यवसाय आहे. ‘कार क्लब’ ही कंपन्यांना कार भाडय़ाने देणारी कंपनीही या समूहाची. समूहांतर्गत सध्या विविध २६ हॉटेल्स आहेत. १० कोटी डॉलरची गुंतवणूक समूहात आहे. दरांमध्ये मध्यम गटातील ‘किज्’ हॉटेलचा व्यवसाय देशात आघाडीचा म्हणून गणला झाला. शिर्डी, महाबळेश्वरसारख्या महाराष्ट्रातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी ‘किज्’चे अस्तित्व आहे.

अंशू सरिन

ताज हॉटेलमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून आपल्या कारकिर्दीस सुरुवात करणाऱ्या अंशू यांनी ताज हॉटेल, किंगफिशरसारख्या प्रीमियम गटातील हॉटेलमध्ये वरिष्ठ पातळीवर काम केलं आहे. आदरातिथ्य व्यवसायातील सेवांवर अधिकाधिक भर देतानाच ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार, त्यातील सुलभता त्यांनी अंगीकारली आहे. पायाभूत सेवा क्षेत्राबाबत छोटय़ा शहरांमध्ये असलेली अनुपलब्धता लक्षात घेता ती ‘किज्’ हॉटेलच्या माध्यमातून कमी दरांमध्ये देत आहेत.

वीरेंद्र तळेगावकर

veerendra.talegaonkar@expressindia.com