‘व्हीयू टेक्नॉलॉजिज’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या देविता सराफ कंपनीच्या डिझाईन हेडही आहेत. ‘गॅझेट वुमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देविता यांचे माहिती तंत्रज्ञानातील अद्ययावत ज्ञान आणि संशोधन यामुळे ‘व्हीयू टेक्नॉलॉजिज’ला ‘लक्झरी इन टेक्नॉलॉजी’चे बिरुद मिळाले आहे.
गेल्या दिवाळीच्या हंगामात ‘४ के फ्लॅट एलसीडी’ (टीव्ही) ची अक्षरश: धूम सुरू होती. ‘सोनी’, ‘सॅमसंग’, ‘एलजी’, ‘व्हिडीओकॉन’ असे सारेच या स्पर्धेत सहभागी होत दालनांमध्ये एकमेकांना खेटून उभे होते. त्या वेळी तेच तंत्रज्ञान माफक दर पातळीवर देत स्थानिक बाजारपेठेतील निर्माता समूह म्हणून ‘व्हीयू टेक्नॉलॉजिज’ समोर आला. ३२ ते ५५ इंची आकारातील एलसीडी टीव्ही मालिकाच कंपनीने स्पर्धक विदेशी कंपन्यांच्या स्पर्धेत उतरवली, तेही माफक दरातील उत्पादन म्हणून. उत्पादनाची किंमत, त्याचे हाय डेफिनेशन तंत्रज्ञान याचबरोबर वॉटरप्रूफ स्क्रीन अशा अनोख्या तांत्रिक बाबी देत ‘व्हीयू टेक्नॉलॉजिज’ नामवंतांमध्ये वेगळी ठरली.
पस्तिशीतल्या तरुणीचे विपणन कौशल्य यामागे होते. शालेय जीवनातच कानावर पडणारे सॉफ्टवेअर, हार्डवेअरशी संबंधित शब्द आणि कौटुंबिक माहिती तंत्रज्ञान व्यवसाय हा पाया आणि आपल्या पिढीच्या हातात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पण परवडणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची मनीषा, या जोरावर या तरुणीने स्वत:ची स्वतंत्र कंपनी स्थापन केली. तिची ती सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारीही बनली.
देविता सराफ. ‘व्हीयू टेक्नॉलॉजिज’च्या सर्वेसर्वा.
मुंबईत जन्म आणि सुरुवातीचे शिक्षणही मुंबईतच. कॉन्व्हेंट शाळा आणि त्यानंतर एच.आर. कॉलेजमध्ये वाणिज्य विषयातील पदवी. व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण कॅलिफोर्नियातून. सोबतच विदेशातील तांत्रिक शिक्षणाची जोडही. देविता यांचे वडील राजकुमार सराफ यांची ‘झेनिथ’ कॉम्प्युटर्स ही कंपनी. सराफ कुटुंबीयांच्या ‘झेनिथ’ कॉम्प्युटर्स तसेच ‘झेनिथ’ इन्फोटेक लिमिटेडच्याही त्या प्रवर्तक आहेत. महागडय़ा पीसी (पर्सनल कॉम्प्युटर) ला पर्याय म्हणून आणि संगणक वापर वाढलेल्या कालावधीत, २००० च्या सुमारास ‘झेनिथ’ची या क्षेत्रात एक निराळीच क्रेझ होती. ‘असेंबल्ड पीसी’च्या वेगवान मागणीत तर ‘झेनिथ’ तंत्रज्ञानाबाबत विदेशी बनावटीच्या कॉम्प्युटरला तोड नव्हती. देशातील दुसऱ्या क्रमांकाची कॉम्प्युटर बनविणारी ही कंपनी ठरली.
व्यावसायिक कौटुंबिक पाश्र्वभूमी लाभलेल्या देविता यांच्या उद्यमशीलतेला त्यांच्या आजोबांनी खऱ्या अर्थाने आकार दिला. शिक्षण संपल्यानंतर कॉर्पोरेट जगतात शिरण्यापूर्वी वयाच्या १६ व्या वर्षी त्यांना व्यवसायाचे बाळकडू मिळाले. २१ व्या वर्षी त्या ‘झेनिथ’च्या विपणन विभागाच्या संचालक बनल्या. येथे त्यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा हेरून कॉम्प्युटरची रचना तयार केली. २००६ मध्ये त्या ‘झेनिथ’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी बनल्या. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी स्वत:ची ‘व्हीयू टेक्नॉलॉजिज’ ही कंपनी सुरू केली.
‘झेनिथ’ कॉम्प्युटरच्या निर्मितीत देविता यांचे संशोधन कामी आले. या अनोख्या उत्पादन क्षेत्राने देविता यांना एक उद्यमशील व्यक्तिमत्त्व दिले. या उत्पादनाची रचना, त्याचा आकार एवढेच नव्हे, तर त्यात सॉफ्टवेअर, हार्डवेअरबाबत काय काय असायला हवे, याकडे त्यांनी त्या वेळी जातीने लक्ष दिले. याच अनुभवाच्या जोरावर त्यांनी ‘व्हीयू टेक्नॉलॉजिज’ स्थापन केली आणि तिच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारीही बनल्या. गेल्या एका वर्षांतच त्यांच्या कंपनीचा महसूल ९६ कोटी रुपयांवरून थेट २७५ कोटी रुपयांवर गेला. आयओएस तंत्रज्ञानावर चालणारा पहिला टीव्ही ‘व्हीयू’च्या नावावर नोंदवला गेला आहे.
‘व्हीयू’बद्दल त्या म्हणतात, ग्राहकांच्या अडचणी, त्यांच्या समस्या हेरून त्यानुरूप उत्पादन सादरीकरणावर आपला खूप भर आहे. ग्राहकाला काय हवे आहे, त्याला अधिक सुलभतेची जोड कशी देता येईल, हा विचार व्यवसायाच्या दीर्घकालासाठी आवश्यक ठरतो. म्हणूनच ‘व्हीयू’मध्ये उत्पादनाच्या माफक किंमती आणि उंची सेवा यावर भर दिला जातो.
नवउद्यमशीलतेबाबत मत मांडताना त्या सांगतात, ‘‘स्वतंत्र व्यवसाय करू इच्छिणाऱ्या युवा वर्गाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. व्यवसायात मला वाटते, भांडवल उभारणीपेक्षा त्या व्यवसायाला जाणून घेण्याची आणि त्यानुरूप कार्य करण्याची अधिक आवश्यकता आहे. भारतात नावीन्यतेला संधी आहे. उद्यमशीलता आणि अनुभव याच्या मुळात ते आहेच.’’
‘फिक्की’सह ‘बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री’च्या यंग बॉम्बे फोरमवरही देविता आहेत. शिवाय ‘इंडिया टुडे’च्या २५ शक्तिशाली महिला व्यावसायिकांमध्ये देविता या सर्वात तरुण सीईओ म्हणून गणल्या गेल्या आहेत.
फेरारी, मर्सिडीजसारख्या लक्झरी कार त्यांना शोभतील अशाच वेगात हाकण्याचा छंद असलेल्या देविता प्रति तास २४० किलो मीटर वेगाने गाडी चालवून फॉर्मुला वनमध्ये एकमेव महिला सीईओ म्हणूनही अव्वल ठरतात. इतकेच नव्हे तर व्यापार विषय लेख, ब्लॉग लिहिणे हाही त्यांच्या आवडीचा विषय आहे.
भटकणे, सजणे, मुंबईतील गर्दी छायाचित्रित करणे, ओडिसीसारख्या नृत्यकला, थाय-मेक्सिकन पाककला अशा आयुष्याच्या साऱ्या प्रांतांत त्यांचा प्रवास सीईओ असतानाही विनाअडथळा सुरू आहे. करिअर म्हणून पहिल्यांदा प्रति व्यंगचित्र १० डॉलरची कमाई करणाऱ्या देविता यांचा जीवनपटही ‘मल्टिटास्किंग’ने परिपूर्ण आहे.
‘झेनिथ’ कॉम्प्युटर्समध्ये प्रवर्तकांच्या निधीवरून आणि ‘व्हीयू’ टेक्नॉलॉजिजमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून देविता यांना व्यवसाय ऐन वेगाच्या टप्प्यावर असताना बिकट आव्हानाचा सामना करावा लागला. मात्र माहिती तंत्रज्ञानातील संशोधन, नावीन्य मुठीत एकवटण्यासाठीच्या ध्येयाने त्यांना कधी खट्टू होऊ दिले नाही.
या वेळी त्यांनी विपणनाचे अनोखे तंत्र अवगत केले. ‘व्हीयू’ टीव्हीच्या रिमोटमधील नेटफिक्स बटनाचे वैशिष्टय़ त्यांनी स्वत: मॉडेलिंग करून विशद केले. फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स मंचाचा उपयोग करून एका मोसमात १०,००० उत्पादन विक्रीचे यश गाठले.
वयाच्या २४ व्या वर्षी वेगळ्या जगातील एक कंपनी स्थापन करून दशकभरात तिला १०० कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीत बसवले.. देविता यांचा हा प्रवास तंत्रज्ञानासारखाच वेगवान आहे..
देविता :
वयाच्या ३६ व्या वर्षी कंपनीची सीईओ बनणे. दूरचित्रवाणी संचासारख्या उत्पादननिर्मितीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे. खास युवा वर्गाला समोर ठेवून उपयुक्त गॅझेटची रचना आणि निर्मिती तसेच सातासमुद्रापल्याडचे अद्ययावत तंत्रज्ञान भारतात आणण्यात देविता यांचे योगदान मोठे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा