गल्लीतील भाजी खरेदी असो वा मॉलमधील उंची कपडय़ांची निवड एक स्त्री म्हणून ती हे काम पुरुषांपेक्षा सहज करू शकते, असा सर्वसाधारण समज. पण वस्तूच्या किमतीतील घासाघीस आणि पदरात अधिक वस्तू पाडून घेण्याची वृत्ती, वायद्यातला फायदा मिळवणं हा व्यवसायाचाच भाग बनला तर? ‘अॅटलांटिक’ इंडस्ट्रियल अॅण्ड ट्रेडिंग कंपनीच्या संचालक वैशाली सरवणकर हे करतात. वायदा बाजार व्यवहारात आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्या महाराष्ट्रीय ट्रेडर असलेल्या वैशाली यांच्या प्रवासाविषयी..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शेती आणि निसर्गाशी संबंध येणारा कृषी उत्पादनांचा वायदा व्यवसाय अस्थिरतेवरच आधारित आहे. त्यातही वायदा बाजार आणि त्याचे व्यवहार या क्षेत्रात स्त्रियांचा शिरकाव तसा विरळच. कारण एक म्हणजे शेअर बाजाराप्रमाणे वायदा बाजाराचे व्यवहार आणि त्याचे सांख्यिकी, वित्तीय गणित. एकाच वस्तूचे भिन्न प्रकार, त्यांचे दरही निराळे, मागणी-पुरवठय़ाचे आव्हान, डॉलर आणि स्थानिक चलनाचा मेळ, कोटय़वधीचे आकडे, तांत्रिक-सांख्यिकी भान हे सारे राखून कोटय़वधींच्या वस्तूंची मागणी पूर्ण करून स्वत:च्या दिमतीवर सुरू केलेल्या व्यवसायाला सातत्याने नफ्यात ठेवणं..
ट्रेडर वैशाली सरवणकर हे सारं गेल्या अनेक वर्षांपासून विनासायास करतात. ‘अॅटलांटिक’ कंपनीच्या संचालक असलेल्या वैशाली यांच्याकडे आंतरराष्ट्रीय व्यापाराची जबाबदारी आहे. गेल्या दोन दशकांपासून या क्षेत्रात असलेल्या वैशाली यांनी ‘डालडा’च्या बुंगे इंडिया कंपनीच्या अनुभवाच्या जोरावर ‘अॅटलांटिक’ची मुहूर्तमेढ रोवली. ‘अॅटलांटिक’मध्ये त्यांचे पद संचालक, आंतरराष्ट्रीय व्यापारप्रमुख असे असले तरी कंपनीतील एक भागीदार या नात्याने धोरणात्मक तसेच तांत्रिक व्यवहार त्यांना पाहावे लागतात. भारतीय असल्या तरी विदेशात व्यवसाय असल्यामुळे त्यांचे भ्रमण अनेक देशांमध्ये सुरू असते.
विविध चीजवस्तू, त्यांचे व्यवहारही अनेक विदेशी चलनांमध्ये आणि हे व्यवहार होणाऱ्या वायदा बाजारांच्या विभिन्न वेळा अशी सगळी तारेवरची कसरत त्यांना करावी लागते. शिवाय व्यवसायाच्या निमित्ताने कराव्या लागणाऱ्या वाटाघाटी, ट्रेडिंग हे सारेही आलेच. चलनांची अस्थिरता, कृषी उत्पादनांची अनिश्चितता आणि देशोदेशीचे ऋतुमान-कालावधी यांची सांगड घालत वायदा वस्तूंचे व्यवहार अवघ्या काही मिनिटांमध्ये कोटय़वधी डॉलरच्या रूपात तडीस नेण्याचे मोठे आव्हान त्या येथे पेलतात.
वैशाली मूळच्या कोकणातील. राजापूरनजीकचे खारे पाटण हे त्यांचे गाव. पण त्या वाढल्या, शिकल्या मुंबईतच. येथील शालेय व महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी फायनान्स आणि कॉमर्समधून एमबीए केले. सुरुवातीला निवडक काही कंपन्यांमधून अगदी काही महिन्यांसाठी त्यांनी कंपन्यांचे अकाऊंट, फायनान्स आदींचे काम पाहिले. ‘बुंगे इंडिया’त खऱ्या अर्थाने त्यांना सध्याच्या व्यवसायाचा अनुभव घेता आला. विक्रेत्यांशी व्यवहार करताना, वस्तूंच्या किमती ठरवितानाच तसेच त्यांची मागणी नोंदविताना करावयाच्या उपाययोजना त्यांनी येथे केल्या.
२००३ मध्ये ‘बुंगे इंडिया’त रुजू झालेल्या वैशाली यांना वायदा व्यवहारांचे मूलभूत प्रशिक्षण येथे घेता आले. ‘बुंगे इंडिया’त त्यांनी वस्तू-उत्पादनांच्या खरेदी – विक्रीची गणिते मांडणे, ते प्रत्यक्षात व्यवहारात उतरवणे आदी सारे केले. आयात-निर्यातीतील सखोल शिक्षण त्यांनी नोकरीच्या ठिकाणीच घेतले. वैशाली सांगतात, ‘‘वायदा बाजार हा शेअर बाजाराप्रमाणेच. एक तर मराठी माणसांचे कमी अस्तित्व असलेले ठिकाण. त्यातच इथली भाषा, बोलण्याची पद्धती (सोबतचे पुरुष प्रसंगी शिव्याही देतात) सारे काही नकारात्मकच. पण या साऱ्यांकडे दुर्लक्ष करून आपले ध्येय तेवढय़ाच हिरिरीने साध्य करावे लागते. खरे तर माझा स्वभावही काहीसा चिडचिडा व्हायचा. पण मी हे सारे शांतपणे करण्याचे ठरवले.
त्या सांगतात, ‘‘२००४ मध्ये स्वित्झर्लण्डला पहिल्यांदा एकटीने विदेश सहल केली. पण भीती अशी नव्हती. मला पहिल्यापासून पप्पांचे पाठबळ मिळाले. आम्ही चार बहिणी. मुलगी म्हणून आम्हाला कधीच अमुक करू नको, असे सांगितले गेले नाही. घरात मुलगा नसल्यानं समाजानं खास पुरुषांची कामे अशी वर्गवारी केलेली सर्व कामे आम्ही करायचो. आज आम्ही चारही बहिणी वेगवेगळ्या क्षेत्रांत आघाडीवर आहोत.’’
करिअर प्रवासाबाबत वैशाली सांगतात, ‘‘दूरदर्शवर ‘उडान’च्या कविता चौधरी माझा आदर्श होत्या. आपणही असेच काहीसे वेगळे क्षेत्र निवडावे, असे वाटायचे. अगदी एमबीए अथवा सुरुवातीच्या नोकरीदरम्यानही ट्रेडिंगबाबतचा विचार मनात आला नाही. पण ओघाने संबंध आला आणि त्यात रुळले. या व्यवसायाचे रूप पाहता मला हे काम खूप आव्हानात्मक वाटते.
आव्हानांबाबत अधिक स्पष्ट बोलताना त्या सांगतात, ‘‘मला नेहमी काही तरी कठीण करायला आवडते. सहज सोप्पे तर मला कधी जमणार नाही. स्त्री म्हणून मला काही अडचणी आल्या नाहीत. फक्त तुम्ही थोडे सावध असायला हवे. पूर्णपणे तुम्ही तुमचे मन स्थिर ठेवून, भान ठेवून वावरा. तुम्ही सावध असाल तरच सुरक्षित असाल. मग ते कुठेही असोत. भारत असो वा अन्य कुठेही जाताना मी तिथला थोडा थोडी अभ्यास करूनच जाते. अनोळखी ठिकाणी आणि भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तींबाबत ते अधिक महत्त्वाचे ठरते.
वडील सेवानिवृत्त सीमाशुल्क अधिकारी व आई गृहिणी यांची ही द्वितीय कन्या. वैशाली त्यांच्या अनोख्या क्षेत्राबद्दल उत्साहाने बोलतात. त्या म्हणतात, ‘‘डोक्यावर घुंघट घेतलेली एक बाई मी पाहिली. ती काय काम करायची? ती होती ट्रक इंजिनीयर. हो भलं मोठं चाक ती हाताने त्या वाहनातून मोकळं करताना मी पाहिलं. स्त्रियांना काय कठीण आहे, सांगा?’’ परंपरा जपत आधुनिक जगाशी स्पर्धा करू शकणं हेच आजच्या स्त्रीचं वैशिष्टय़.
वायदा व्यवसायही तेवढाच आव्हानात्मक असल्याचे त्या मानतात. स्त्रिया चांगल्या वाटाघाटी करू शकतात, यावर त्यांचा स्वानुभवाने विश्वास आहे. या क्षेत्रातील निवडक स्त्रियांमध्ये त्या स्वत: एक असल्याने या अनोख्या क्षेत्रात अन्य तरुण मुली, करिअरची नुकतीच सुरुवात करणाऱ्या, शेतकी अथवा आर्थिक व्यवहाराशी संबंधित स्त्रियांनाही वायदा व्यवहाराची ओळख अथवा त्यात स्थिरता आणून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. सैन्य, अभियांत्रिकी एवढेच काय राजकारणासारख्या क्षेत्रातही मुली, स्त्रियांनी उतरायला हरकत नाही, असे त्या मानतात.
वैशाली यांचा वायदा व्यापाराच्या निमित्ताने अप्रत्यक्षरीत्या कृषी क्षेत्राशी संबंध आहेच. पण त्या या क्षेत्रात अधिक सक्रिय होण्यासाठी धडपडत आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांनी त्यांना अस्वस्थ केले आहे. ‘अॅटलांटिक’च्या सहकार्याने त्या आता या क्षेत्रात प्रत्यक्ष उतरू पाहत आहेत. त्यासाठी अगदी विदर्भ, मराठवाडय़ातील खेडय़ा-पाडय़ातील शेतकऱ्यांपर्यंत त्यांना पोहोचायचे आहे. वायदा व्यवहारांचे ज्ञान अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अवगत करून शेतकऱ्यांच्या कृषी मालाबाबतच्या स्वावलंबनाचे ध्येय वैशाली यांच्यासमोर आहे. आणि ते आव्हान त्या नक्की पेलतील यात शंका नाही.
वैशाली सरवणकर : वायदा बाजार व्यवहारात आंतरराष्ट्रीय पातळीवर अगदी वरच्या फळीत कार्य करणाऱ्या भारतीयांमध्ये निवडक चार-पाच स्त्रियांचा समावेश आहे. त्यात वैशाली या पहिल्या महाराष्ट्रीय ट्रेडर आहेत. ‘बुंगे भारत’नं अनेक दशकानंतर भारतीय खाद्य बाजारपेठेत ‘डालडा’ नव्याने आणल्यानंतर कंपनीच्या उत्पादनांची किंमतनिश्चिती, त्यांची मागणी नोंद आणि प्रत्यक्ष विक्री व पुरवठा या कार्यात त्या सहभागी होत्या.
‘अॅटलांटिक’ : निवडक खाद्य, कृषी वस्तूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर वायदा करणारे हे व्यासपीठ २०११ मध्ये वैशाली यांनी भागीदारीत सुरू केले. ज्या देशात कोणतेच कृषी पीक होत नाही त्या सिंगापूरमधून या कंपनीचे कृषी उत्पादनांच्या खरेदी-विक्री व्यवहाराचे कार्य चालते. कंपनीचा विस्तार मुंबई, चीन, मध्य पूर्व, व्हिएतनाममध्येही करण्याची वैशाली यांची मनीषा आहे. सोबतच सध्या निवडक चीजवस्तूंच्या व्यवहारात असलेल्या या कंपनीने आता कापूस, काजू आदींचेही व्यवहार करण्याचे निश्चित केले आहे.
व्यवसायाचा मूलमंत्र
अशक्य काहीही नाही. तुम्हाला फक्त प्रयत्न करायचे आहेत. स्त्री-पुरुष म्हणून भेदही त्यासाठी किरकोळ आहे. काम हे काम आहे. ते लहान-मोठे असे कधीच नसते. सर्वच क्षेत्रांत आव्हाने आहेत. आपण अन्य भिन्न क्षेत्राचीही चाचपणी केली पाहिजे.
आयुष्याचा मूलमंत्र
आयुष्याचेही तसेच आहे. प्रयत्न करत राहा. यश तुमच्याजवळ येईलच. एक करिअर म्हणून स्त्रियांना कुटुंबाचा पाठिंबाही तेवढाच आवश्यक आहे. वेळेचे नियोजन आणि राखलेले ध्येय तडीस नेण्यासाठी ते महत्त्वाचे ठरते. पुढे जायचे असेल तर अहंकार बाजूला ठेवा.
veerendra.talegaonkar@expressindia.com